Wednesday, June 29, 2022

तिस्ता चा हिशोब चुकता झाला?

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
      *तिस्ता चा हिशोब चुकता झाला?*
               *डॉ अनिल पावशेकर*
********************************
महाराष्ट्रातील राजकीय धुळवड शिगेला पोहोचली असतांनाच सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. गेली कित्येक वर्षे ढोंगी पुरोगाम्यांनी रचलेले कुभांड अखेर निष्प्रभ झाले असून नरेंद्र मोदी नाम बावन्न कशी सोने पुन्हा एकदा झळाळून उठले आहे. हिंदू द्वेषाचा अजेंडा राबवून मोदी विरोधात देशविदेशात रान पेटवणाऱ्या पुरोगामी दुष्ट कंपूचे चक्रव्यूह भेदत मोदी सहिसलामत बाहेर पडले आहेत. देर है अंधेर नहीं प्रमाणे तब्बल एकोणीस वर्षे गुजरात दंगलीचे हलाहल पचवून मोदी हिंदू द्वेष्ट्यांना पुरून उरले आहेत.

झाले काय तर गुजरात दंगलप्रकरणी न्यायालयाने मोदींना क्लीन चिट दिली असून झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळली आहे. यासंदर्भात एटीएसने लगेचच कारवाई करत पुरोगाम्यांचे चिरतरुण बुजगावणे असलेल्या तिस्ता सेटलवाड यांना अटक केलेली आहे. सोबतच माजी आयपीएस अधिकारी आर.बी.श्रीकुमार आणि बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यावर विविध गुन्हे दाखल झाले आहेत. एकुणच काय तर पंचतारांकित ॲक्टिव्हिस्ट असलेल्या तिस्ताला बेड्या पडताच तमाम पुरोगामी कंपू कोमात गेलेला आहे.

खरेतर गुजरात दंगलीच्या मुळ कारणांचा ना कधी शोध घेतला गेला ना कुणालाही त्याची गरज वाटली. कारण याप्रकरणीचे सत्य पुरोगामी अजेंड्याला प्रतिकूल असल्याने जो तो केवळ गुजरात दंगलप्रकरणी आपला मोदी द्वेषाचा कंडू शमवून घेत होता. धर्मांधांनी अयोध्येत कारसेवा करून परतणाऱ्या ५९ हिंदूंना साबरमती एक्सप्रेसच्या एस सहा बोगीत निर्घृणपणे जीवंत जाळले होते. मात्र हिंदूंच्या किंकाळ्या कोणालाही ऐकू गेल्या नाही. याच्याच प्रतिक्रियेस्वरूप मग गुजरात दंगली घडल्या.

अर्थातच कोणताही सुज्ञ व्यक्ती अशा दंगलींचे समर्थन करणार नाही. परंतू जे जीवंत जाळले गेले त्यांच्या न्यायाचे काय? किती स्वयंसेवी संस्था हिंदूंच्या न्यायाकरीता उभ्या राहिल्या? किती राजकीय पक्षांनी हिंदू हत्येविरूद्ध आवाज उठवला? मतांच्या लाचारीसाठी तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी मिठाची गुळणी का धरून ठेवली होती? गुजरात दंगलीच्या नावे बेंबीच्या देठापासून ओरडणारे गोध्रा हत्याकांडाबाबत तोंडातून शब्द का काढत नाही? यातच मग दंगलग्रस्तांना मदतीचे आमिष दाखवून जी काही अनैतिक बांडगुळे उदयास आली त्यात तिस्ताचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र दंगलग्रस्तांना मदतीच्या नावाखाली तिस्ताने मोदींविरोधाचा एककलमी कार्यक्रम राबवला. शिवाय परदेशातून येणाऱ्या आर्थिक मदतीवर डल्ला मारला. खरेतर हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार होता. सर्वकाही राजेरोसपणे चालू होते. मात्र पापाचा घडा कधीतरी भरतोच आणि झालेही तसेच.

 तिस्ताचे दिवस २०१३ पासून भरायला लागले होते. अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीच्या बारा रहिवाशांनी तिस्ता विरोधात चौकशीची मागणी केली होती. २०१४ ला क्राईम ब्रांचने तिस्ता आणि तिच्या पत्नीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. तिस्ता आणि एनजीओच्या संबंधाबाबत तिचा माजी सहकारी रईसखान पठाणने न्यायालयात वाच्यता करताच तिस्ताला सरकारी पाहुणचार मिळणे क्रमप्राप्तच होते. त्यातच दंगलीसंदर्भात पुराव्यांबाबत छेडछाड, साक्षीदारांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणे, गुन्हेगारी कट रचणे आणि कारवाई दरम्यान सहकार्य न करणे असे तिच्यावर गंभीर आरोप आहेत.

निश्चितच तिस्ताची एकंदरीत वाटचाल पाहता भक्कम राजकीय पाठबळाशिवाय ती एवढे उपद्रव करूच शकत नव्हती. मोदींना बदनाम करणे, देशविदेशात भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याकाळी जणुकाही चढाओढ लागली होती. त्यातच २००२ ला कांग्रेस तर्फे तिस्ताला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार दिला गेला. २००६ ला नानी पालकीवाला पुरस्कार तर भरीस भर म्हणून कांग्रेस प्रणित युपीएने २००७ ला तिस्ताला पद्मश्री देऊन उरलीसुरली कसर पुर्ण केली. अर्थातच पुरस्काराच्या कितीही माळा तिस्ताला अर्पण केल्या असल्या तरी ना तिचा हिंदू,मोदींचा तिरस्कार लपून राहीला ना तिच्या देशसमाजद्रोही कारवाया. जितकी तिस्ता दोषी आहे, तितकेच तिला राजकीय पाठबळ देणारे तिच्या पापात सहभागी आहेत.

अर्थातच ही बया एवढे सगळे सोंग करून नाकाने कांदे सोलत होती. पुरोगामी कंपूच्या पाठबळाने देश, न्यायालयास वेठीस धरून हिचे उपद्रव दिवसेंदिवस वाढत होते. तिस्ताने हिंदू व्देष आणि मोदींना खलनायक म्हणून प्रस्तूत करण्याचा जणुकाही विडाच उचलला होता. मात्र मोदी या सर्व कटू प्रसंगांना धीरोदात्तपणे सामोरे गेले. कारण लोहा कितना भी गरम रहें, हथोडा थंडा रहके ही काम करता है,, आणि झालेही तसेच. गुजरात दंगलप्रकरणी विशेष तपास पथक आणि पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने मोदींना क्लीन चिट देत तिस्ता पंथीयांचा हिशोब चुकता करण्याच्या दृष्टीने एक सुरवात केलेली आहे. 

केवळ मोदीच कशाला याच पुरोगामी टोळक्याने अमीत शहांना ही तुरुंगवारी घडवली. आतंकवादी इशरत जहाँ असो की याकुब मेनन असो अथवा अफझल गुरू, पुरोगामीत्वाच्या गोंडस नावाखाली हिंदूंना झोडपून धर्मांधांना चुचकारण्याचे महापाप याच पुरोगामी टाळक्यांनी केलेले आहे. मौत का सौदागर असो की खुन की दलाली असो, नाना प्रकारे मोदींना लक्ष्य केले जात होते. अखेर सर्वोच्च न्यायालयात आरोपांचा बुडबुडा फुटला आणि मोदींविरुद्ध कटकारस्थान उलथून पडले आहे. 

मोदी म्हटले की गुजरात आणि गुजरात म्हटले की दंगल अशी कहाणी रचून पुरोगाम्यांचे ह्रदय उचंबळून येत असे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दणका देत हे प्रकरण निकाली काढले आहे. कमीतकमी यापुढे तरी योग्य तो धडा घेऊन ढोंगी पुरोगामी देशविरोधी वळवळ कमी करतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा त्यांना तिस्तासारखे तोंडघशी नक्कीच पडावे लागेल. तिस्ताला भलेही कायद्यानुसार जी शिक्षा व्हायची ती होईल मात्र तिच्या देशविरोधी कारवाईने देशाची प्रतिमा डागाळली होती त्याचे काय? खरेतर न्यायालयाने अशा पिलावळींना जन्माची अद्दल घडावी अशी शिक्षा देणे अपेक्षित आहे. भलेही तिस्ताला शिक्षा मिळण्यास विलंब होऊ शकतो तरीपण,,, इंसाफकी चक्की चलती बहोत आहिस्ता है, लेकिन पिसती बहोत महिन है, हे सुद्धा ध्यानात ठेवावे लागेल.
**********************************
दि. २९ जून २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Saturday, June 11, 2022

देंवेंद्रजींनी मविआ चे नाक कापले

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
    *देवेंद्रजींनी मविआचे नाक कापले*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
नुकतेच महाराष्ट्रात बारावीच्या निकालापाठोपाठ राज्यसभेचा निकाल लागला असून महाविकास आघाडीचे बारा वाजलेले आहेत. सहाव्या जागेसाठी झालेल्या रोमांचक सामन्यात ट्रिपल मल्लांना धोबीपछाड देत फडणवीसांनी फड जिंकला आहे. हम करे सो कायदा या फुशारकीत जगणाऱ्या बेडूकांनी फुगून बैल होण्याचा प्रयत्न केला परंतु देवेंद्रजींच्या दणक्याने तिन्ही मल्ल गारद झालेले आहेत. अर्थातच या रोमहर्षक सामन्यात धनंजय महाडिक मॅन ऑफ दी मॅच ठरले तर देवेंद्रजींना मॅन ऑफ दी सिरीजचा बहुमान मिळाला आहे.

खरेतर महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकून भाजप सत्ता स्थापनेत अग्रेसर होती. मात्र अचानक डकवर्थ लुईस मेथडने महाविकास आघाडी सरकार उदयास आले. त्यातच सत्तेची नशा अशी काही रोमारोमांत भिनली की आपणच एकमेव या ब्रह्मांडाचे उध्दार कर्ते आहोत अशी स्वप्ने सत्ताधाऱ्यांना पडू लागली. आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही या भ्रमात ते नांदू लागले. याच गुर्मीतून मग अर्णव ते केतकी व्हाया कंगणा सारख्या प्रकरणांना उत येऊ लागला. एखाद्याने टिका केली तर त्याला झोडपणे असो की मंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन चामडी लोंबवणे असो,, सर्वकाही बिनधास्तपणे सुरू होते.

एस टी कर्मचाऱ्यांचा संप असो की स्पर्धा परिक्षांचा गोंधळ असो कोणाचाच पायपोस कोणाच्या पायी नव्हता. १०५ घरी बसवल्याचा हर्षवायू झालेल्यांना कधी पंतप्रधान पदाचे तर कधी थेट २५ वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे दिवास्वप्न पडत होते. तर तिकडे अमर अकबर अँथनी सरकारचे दोन मंत्री उलाला उलाला प्रकरणी वलयांकित होते तर दोन मंत्री आपल्या अचाट आर्थिक कामगिरीने सरकारी पाहुणचार झोडत आहेत. निश्चितच जनता मुकपणे हे सर्व न्याहाळत होती. मात्र यांच्या दांडगाई, दडपशाहीपुढे सर्वच हतबल होते. या दुष्टचक्राला कुठेतरी चाप बसणे गरजेचं होतं आणि तसेही आजवर कोणाचाच अहंकार टिकला नाही कारण "अहंकारसे तीन गये धन वैभव वंश, ना मानो तो फिर देखो रावण कौरव कंस" याची आठवण सत्ताधाऱ्यांना असायला हवी होती.

अखेर राज्यसभा निवडणूकीचे पडघम वाजले आणि जनतेला कुठेतरी या सरकारचा हिशोब चुकता करण्याची तीव्र इच्छा झाली. अर्थातच या निवडणुकीत जनतेचा प्रत्यक्ष सहभाग नसतो परंतु त्यांचे प्रतिनिधी ही मोहिम नक्कीच फत्ते करतील यात तिळमात्र शंका नव्हती. त्यातच तिन तिघाडा काम बिघाडा सरकारने सहाव्या जागेसाठी राजहट्ट केला. मात्र संख्याबळ पाहता करंगळी सुजली तरी डोंगराएवढी होत नाही हे सत्य नाकारून कसे चालणार होते. त्यातच संभाजीराजेंना डावलून सत्ताधाऱ्यांनी रोष ओढवून घेतला होता.

सोळाव वरीस धोक्याचं असतं तसंच राज्यसभेची सहावी जागा धोक्याची होती. सेनेला तिचे सगेसोयरे, पक्षअपक्ष किती प्रामाणिकपणे साथ देतील हे गौडबंगालच होते. कांग्रेसची अवस्था तर भुले बिसरे गीत सारखी होती. युपीचे पार्सल मस्तकी बसल्याने त्यांच्या दुःखाला पारावर उरला नव्हता. तरीपण जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया करत ते मैदानात उतरले होते. तसेही त्यांनी नाराजी, असंतोष, प्रादेशिक अन्याय, राजीनामे सारखी वावटळे उडवली परंतु ती दिल्लीपर्यंत जाईपर्यंत हवेत विरून गेली. त्यामानाने राष्ट्रवादीच्या दोन्ही हातात लाडू होते. सेना, कांग्रेस सारखी अगतिकता,व्यथा त्यांच्या गावीही नव्हती.

तर दुसरीकडे देवेंद्रजींनी नेमकी परिस्थिती हेरून आखणी केली. पंचतारांकीत दंडबैठकात वेळ दवडण्यापेक्षा आवश्यक ती व्युहरचना रचली. मविआ दंडाच्या बेडक्या फुगवून विजयाचे निशाण दाखवत होती. परंतु त्यांचा सामना तेल लावलेल्या मातीतल्या पहेलवानाशी आहे हे ते विसरले. अखेर सामना अटीतटीचा झाला आणि मविआ तोंडघशी पडली. घरी बसलेल्यांनी हवेत उडणाऱ्या १७० जणांचा बाजार उठवला. अमर अकबर अँथनी ला अखेर देवेंद्र नावाच्या किशनलालने बाप कोण आहे हे दाखवून दिले. आपल्याच गुर्मीत असलेल्या आघाडीच्या तंबूचे कळस देवेंद्रजींनी लिलया कापून नेले.

वास्तविकत: केवळ एका जागी पटकनी  बसल्याने या सरकारमध्ये खळबळ माजेल असे अजिबात वाटत नाही. तरीपण कुठेतरी याप्रकरणी विद्यमान सरकारचे नाक नक्कीच कापले गेल्याची भावना आहे. प्रत्येक वेळी तीन नापास मिळून एका मेरीटला हरवू शकत नाही. ओसाड रानात एरंडाचा उदो उदो असल्याप्रमाणे हे सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत होते. मात्र सहाव्या जागेने त्यांना सातवे आसमान जरूर दाखवले आहे.

 बाजारू विचारवंत असोत की स्वस्तातले चाणाक्य असो, राज्यसभेची जागा जिंकणे हे येरागबाळ्याच काम तर नव्हेच. शिवाय बिनकामाची तोंडपाटीलकी केली तर कसे तोंडघशी पडल्या जाते हे या निमित्ताने दिसून आले. देवेंद्रजींच्या सभ्य सुसंस्कृत, अभ्यासू नेतृत्वाने ट्रिपल टपाल दिल्लीऐवजी गल्लीत परत पाठवले. राज्यात या निवडणूकीचे निकाल पाहता भाजप मेरीट मध्ये, राष्ट्रवादी, कांग्रेस फर्स्ट क्लासमध्ये पास झालेत तर सेना वरपास झाली असे म्हणता येईल. यानिमित्ताने निवडणूकीत तोंडाने फुलझड्या उडवणाऱ्यांनी हे नक्की लक्षात ठेवावे,,,,,
"झुठी शान के परिंदे ही जादा फडफडाते है"
"बाज के उडाण में कभी आवाज नहीं होती"
*********************************
दि. ११ जून २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...