#@😈😈😈😈😈😈😈😈😈😈@#
“चित्तथरारक लढतीत टीम इंडिया चॅम्पियन”
‘डॅा अनिल पावशेकर’
+++++++++++++++++++++++++
चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाचा कडवा प्रतिकार मोडून काढत चषकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. क्षणाक्षणाला उत्सुकता आणि धाकधूक वाढवणार्या या सामन्यात अखेर भारतीय फलंदाजांनी निग्रही फलंदाजी करत विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. पाठलाग करताना विराट कोहली सारखा हुकुमाचा एक्का अपयशी झाला तरी रोहित,अय्यर, पांड्या आणि राहुल या चालीच्या सत्त्यांनी जीगरबाज खेळी करत हा अंतिम डाव सर केला आहे. भारतीय संघाचे एकेक शिलेदार तंबूत परतत असताना प्राण तळमळत होता परंतु राहुलने शेवटपर्यंत व्हेंटीलेटरचे काम करत आपल्या संघाचा श्वास धडधडत ठेवला आणि ४९ व्या षटकात जडेजाने चौकार ठोकत जीवात जीव आणला.
झाले काय तर आयसीसी स्पर्धा ही क्रिकेटचे सर्वोच्च शिखर आहे आणि हे शिखर सर करणे सर्वांचेच लक्ष्य असते. त्यातही काही अलिखित नियम आहेत. पाकविरूद्ध हरणे महापाप असते तर माजोरड्या कांगारूंचा माज उतरवायचा असतो. तर किवी संघ म्हणजेच ब्लॅक कॅप्स नेहमीच अशा स्पर्धेत काळी मांजर होऊन आपल्याला आडवी येते. पहिल्या दोघांना आडवे केल्यावर फक्त किवींचा अडथळा आपल्यापुढे होता आणि तब्बल एक तपानंतर चॅम्पियन्स ट्रॅाफी जिंकण्याचा योग आला होता. त्यामुळे आपल्याकडे जिंकू किंवा जिंकू हाच पर्याय शिल्लक होता. मुख्य म्हणजे उपांत्य फेरीत किवींना सहज लोळवल्याने आपल्या संघाचा आत्मविश्वास दुणावला होता तरीदेखील किवी संघ अपशकुन तर करणार नाही अशी शंका होती.
प्रारंभीच किवींनी झकास सलामी देत आपली चिंता वाढवली होती. मो. शमी नेहमीप्रमाणे धारदार न वाटता आऊट ऑफ कव्हरेज एरियात होता. तर त्याच्यासोबत पांड्याचा मारा भुले बिसरे गीत होता. भरीस भर म्हणून मो. शमी आणि श्रेयसने धोकादायक रचिनला जीवदान देत विकेटच्या दुष्काळात तेरावा महिना काय असते हे दाखवून दिले. शेवटी वद जाऊ कुणाला शरण झाल्याने रोहितने चेंडू वरूणकडे दिला आणि त्याने विल यंगचा बळी घेत विकेटची बोहणी करून दिली. पाठोपाठ कुलदीपने अल्लाऊद्दीन च्या जादुई दिव्यासारखी रोहितची मनोकामना पूर्ण करत डोईजड ठरलेल्या रचिनचा आणि त्यांचा फलंदाजीचा बॅकबोन असलेल्या विलीयम्सचा काटा काढला. हे तीन बळी किवींसाठी पॅावर ब्रेक ठरले आणि यातून ते शेवटपर्यंत बाहेर पडले नाहीत.
पहिल्या सत्रात खेळपट्टी संथ वाहते क्रुष्णा माई सारखी होती, तरीही ती फिरकीच्या फारशी प्रेमात नव्हती. मात्र आपल्या फिरकीपटूंनी लाईन, लेंथवर टिच्चून मारा केल्याने किवी फलंदाज मनमोकळी फलंदाजी करू शकले नाहीत. त्यातही डॅरेल मिचेलने कूर्मगतीने अर्धशतकी खेळी केली परंतु त्याने डावाचा टेम्पो निघून गेला. तर दुसऱ्या बाजूला मायकल ब्रेसवेलने ‘वेल टायमिंग’ साधत ४० चेंडूत नाबाद ५३ धावा करून टीम इंडियापुढे एक चॅलेंजेबल टोटल उभे केले. वास्तविकतः आपण त्यांना फारतर २३० पर्यंत रोखू शकलो असतो पण चार झेल सोडून आपण जागतिक सद्भावना जीवंत ठेवली तर मो.शमी, पांड्या बेरंग ठरले. त्यातही या दोघांनी डावखुर्या फलंदाजांना राऊंड दी विकेट गोलंदाजी केली असती तर त्यांच्या फटकेबाजीला आळा घालता आला असता.
टार्गेटने अडीचशे पार करताच किवींचे डोळे चमकले कारण त्यांच्याकडे सॅंटनर, ब्रेसवेल सारखे दर्जेदार फिरकीपटू होते तर दिमतीला रचिन, ग्लेन फिलिप्स सारखे कम में बम गोलंदाज होते. शिवाय अंतिम सामना, पाठलागाचे दडपण आणि पीच स्पिनर्स कडे आक्रुष्ट होऊ लागल्याने हा सामना फुल पैसा वसूल होणार यात शंकाच नव्हती. मात्र रोहित, शुभमनने किवींचे मनसुबे धुळीस मिळवले. या स्पर्धेत सर्वोत्तम शतकी सलामी देत या जोडीने सामन्याचे स्टेअरींग व्हिल हाती घेतले. रोहितने किवींचा फडशा पाडत तब्बल सात चौकार तीन षटकारांची उधळण केली. रोहितच्या या खेळीचे वर्णन “फिरत्या पीचवर देसी डावाला तू आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार” असे करता येईल. ही जोडी मैदानात असेपर्यंत सामना एकतर्फी तर होत नाही ना असे वाटत होते. मात्र कहाणीत ट्वीस्ट बाकी होते.
किवींची गोलंदाजी निष्प्रभ ठरली असताना ग्लेन फिलिप्सने कमाल केली. त्याने शुभमनचा अप्रतिम झेल टिपत आपल्या संघाला वेटींग लिस्ट वरून कन्फर्म बर्थवर आणले. खरेतर ज्याप्रकारे ग्लेन फिलिप्स हवेत उडत झेल घेतो ते पाहता त्या जागेला नो फ्लाईंग झोन जाहीर करायला हवे!लगेचच ब्रेसवेलने विराटला बाद करत टीम इंडियाला लोअर बर्थवर टाकले. अचानक से वक्त बदल दिया, हालात बदल दिए, जज्बात बदल दिए सारखी परिस्थिती निर्माण झाली. फुले वेचणार्या हातांना गोवर्या वेचायची पाळी आली. मोठे फटके तर दूरच, एकेरी धावांसाठी रोहीत, श्रेयस झगडू लागले होते. बॅंकेत तारखेवर ईएमआय लागला आहे आणि खात्यात मिनिमम बॅलन्स सुद्धा नाही अशी आपली अवस्था झाली होती. पीच रंग बदलू लागली होती, स्पिनर्सनी फास आवळला होता तर कडेकोट क्षेत्ररक्षकांनी चक्क नाकाबंदी केली होती. अखेर कोंडी फोडण्यासाठी रोहित सरसावला परंतु परतीचे दोर कधीच कापले गेले होते.
मैदानात घमासान युद्ध सुरू असताना ट्रबल शुटर श्रेयस अक्षरच्या संताजी धनाजी जोडीने खिंड लढवली. सॅंटनरच्या तंबूचे कळस कापण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तरीही दिल्ली अजून बरीच दूर होती. श्रेयसला एक जीवदान जरूर मिळाले पण त्याला त्याचा फारसा फायदा झाला नाही. तीन षटकांच्या अंतराने दोघेही बाद झाले आणि आपली फलंदाजी ऐन मोक्याच्या वेळी घालीन लोटांगण करते की काय अशी शंका आली होती. कारण अजूनही जिंकायला ५० धावांत ४९ धावा करायच्या होत्या. महत्त्वाचे बाब म्हणजे किवींच्या प्रमुख स्पिनर्सची षटके संपत जरी आली होती तरी आपली फलंदाजीही बुडाला टेकू लागली होती.
एका टोकाला जरी गळती लागली असली तरीही दुसरीकडे राहुल ऋषीमुनी सारखा ध्यानस्थ होऊन शांतचित्ताने बाजू लढवत होता. गरज होती त्या राजा ला साथ द्यायची आणि पांड्या मैदानात अवतरला. मात्र तो नेहमीचा हार्दिक पांड्या नव्हता तर जख्मी शेर होता. ज्याप्रकारे तो या स्पर्धेत गोलंदाजांना तुडवत होता अगदी त्याच मानसिकतेत तो दिसला. नताशा प्रकरण त्याने फारच मनावर घेतल्याचे दिसले. “ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी तू” सारखे तो सर्व बंधने झुगारून किवींवर तुटून पडला. त्याने अवघ्या क्रिकेट प्रेमींना झालेली बद्धकोष्ठता एक चौकार, एक षटकाररूपी कायमचूर्ण देऊन मोकळी केली. राहुल पांड्याच्या ३६ चेंडूत ३८ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाचे विजय प्रमाणपत्र लिहिले गेले. सर जडेजाने त्यावर चौकाररूपी सही करत थरारक नाट्यावर पडदा टाकला.
थोडक्यात काय तर पीच नक्कीच संथ होती, मोठे फटके सहजशक्य नव्हते तरीही किवींची २५१ चे टार्गेट सोपे अजिबात नव्हते. सॅंटनरने वेगवान गोलंदाजांना भारतीय फलंदाज दाद देत नसल्याने फिरकी सुरू केली. यावेळी त्याने स्लिप लावली असती तर फलंदाजांवर दबाव वाढला असता. शिवाय रोहित शुभमनची शतकी भागीदारी तोडण्यासाठी ब्रेसवेलला लवकर आक्रमणाला लावायला पाहिजे होते. तर शुभमन आणि श्रेयसला जीवदान देऊन सामन्यावर पकड घेण्याची संधी त्यांनी गमावली. सामना अटीतटीचा होत असताना आणि स्पिनर्सची षटके संपत असतांना ओरूक ला जास्त षटके दिली. त्यापेक्षा जेमीसनला आणखी लवकर आणले पाहिजे होते. क्षेत्ररक्षणात एकदोनदा भारतीय फलंदाजांना धावचीत करण्यात किवी संघ अपयशी ठरला. तर आपल्या फलंदाजांनी आवश्यक धावगती रन ए बॅाल ठेवल्याने त्यांना घाम जरी गाळाना लागला तरी टार्गेट नेहमीच आवाक्यात राहिले.
महत्त्वाची बाब म्हणजे स्पर्धे साठी चार फिरकी गोलंदाज निवडने, रिषभ पंत ऐवजी यष्टीरक्षक म्हणून राहुलला प्राधान्य देणे, वरूण चक्रवर्तीचा मोक्याच्या क्षणी वापर करणे, रोहितची आक्रमक सुरुवात, मध्यफळीत श्रेयस अक्षर जोडीचे डाव सांभाळणे आणि शेवटी राहुल पांड्याचे लढतीला फिनिशींग टच देणे टीम इंडियाला चॅम्पियन्स बनवून गेले. ही स्पर्धा जिंकून टीम इंडियाने एकूण सात आयसीसी ट्रॅाफीवर कब्जा केला आहे. भारतीय संघाचे तमाम क्रिकेट रसिकांतर्फे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
++++++++++++++++++++++++
दिनांक १० मार्च २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++

No comments:
Post a Comment