Thursday, July 28, 2022

पिवळा गुलाब, अजब प्रेम की गजब कहाणी

@#😈😈😈😈😈😈😈😈😈#@
                     *अगंबाई अरेच्चा*
    *पिवळा गुलाब, अजब प्रेमकी गजब कहाणी*
***************************************
साल १९९०, कसेबसे पदवी परिक्षा उत्तीर्ण केली आणि लगेचच पक्वासा रुग्णालयात इंटर्नशिप सुरू झाली होती. मैदानात मनसोक्त बागडणाऱ्या एखाद्या बालकाला ओढत आणून जबरदस्तीने अभ्यासाला बसवावे अशी आमची गत झाली होती. कारण कॉलेजची मौजमजा आटोपून आता गंभीरपणे रुग्णालयात सेवा करायची होती. पहिले दहा पंधरा दिवस वार्डमध्ये राहणे थोडे अवखळल्यासारखे वाटत होते परंतु त्याची हळूहळू सवय व्हायला लागली होती. याबाबतीत आमची मित्रमंडळी मात्र बिनधास्त होती.

 "फुल खिले है गुलशन गुलशन" असे ब्रीदवाक्य असलेले वस्ताद मित्र प्रेमाच्या पीचवर डबल ट्रिबल सेंच्युरी मारून मोकळे झाले होते. आम्ही मात्र नेहमीच हिट विकेट व्हायचो आणि यामुळेच पुन्हा अशा भानगडीत पडायचे नाही अशी भिष्मप्रतिज्ञा केली होती. मात्र "दिल तो पागल है, दिल दिवाना है" हे विसरून कसे चालणार होते? सोबतच "मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरुनी येते पिकावर" ह्या ओळी मनाला स्वस्थ बसू देत नव्हत्या.

 अशातच एके दिवशी मेडीसीन वार्डमध्ये एक सुंदर, सावळी, नाकी डोळी चुणचुणीत तरुणी अवतरली. खरेतर निसर्गानेच आकर्षणासाठी शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध असा ठास्सून बारूद भरायला काहीतरी कारण निश्चितच असावे. सोबतच गोरापान वर्ण तुम्हाला लगेच आकर्षीत करणार मात्र सावळा रंग वारंवार लक्ष वेधणार,,,अगदी डिसी करंट आणि एसी करंट मध्ये असलेल्या फरका सारखा. वास्तविकत: ती तरुणी एका रूग्णाची नातेवाईक होती आणि दररोज ती सकाळी रुग्णाला भेटायला यायची‌. अर्थातच रुटीन केसपेपर लिहितांना या केसकडे मी कसे आकर्षित झालो हे मलासुद्धा कळले नाही.

हळूहळू ओळख वाढत गेली मात्र काही बोलायचे किंवा विचारायचे म्हटले की आमची दातखीळ बसायची. शेवटी "खामोशी, दी म्युझीकल प्रेमकथा" प्रमाणे आमची दिनचर्या सुरू होती. एका दिवशी ती मला तिच्या रुग्णाकडे घेऊन गेली आणि रुग्णाला असलेल्या बेडसोअर (व्रण,जखम) याबाबत विचारले आणि ड्रेसिंग ची विनंती केली. अर्थातच याबाबत नकार देणे मला शक्यच नव्हते परंतु मला त्याकाळी ड्रेसिंग किंवा ऑपरेशन चा भयंकर तिटकारा यायचा. मात्र लगेच स्वत:ला सावरत मी ड्रेसिंग करता सर्जरी विभागातल्या एका डॉ बोलावतो असे सांगून वेळ मारुन नेली.

असा बाका प्रसंग येताच धर्मेंद्र गजबे माझ्यासाठी हेल्पलाईन असायचा. धर्मेंद्रने फार आढेवेढे न घेता रुग्णाचे व्यवस्थित ड्रेसिंग करुन दिले आणि माझी कॉलर टाईट झाली. ती सुद्धा खुष झाली आणि आपण अर्धी लढाई जिंकल्याचे मनाला समाधान झाले. मैत्रीला जागून धर्मेंद्र दररोज डोळे फाडून रुग्णाची ड्रेसींग करायचा तोवर आम्ही डोळे भरून एकमेकांकडे बघायचो. एक दिवशी तर कमालच झाली, अबोल या प्रेमकथेत चक्क "कहाणीमे ट्वीस्ट आले". दुपारनंतर वार्डमध्ये राऊंड आणि इतर गजबजा आटोपताच तिने लपतछपपत मला एक गुलाबाचे फुल दिले.

आधीच "अर्ध्या हळकुंडाने 'पिवळा' होणारा मी 'पिवळा' गुलाब मिळताच पुरता हरखून गेलो". "अपनी तो निकल पडी" म्हणून आनंदाने उसळू लागलो. प्रेमाची भेट म्हणून तो पिवळा गुलाब मी माझ्या नोटबुकमध्ये जपून ठेवला. मात्र माझा हा आनंद अल्पजीवी ठरला. एके दिवशी नेहमीप्रमाणे तिचे दर्शन झाले नाही म्हणून वार्डमध्ये फेरफटका मारला तर थोडा धक्काच बसला. त्या रुग्णाला सुट्टी झाली होती आणि ती सुद्धा कुठेच दिसली नाही, ती कायमचीच नजरेआड झाली, ना काही निरोप किंवा ना कुठे ठावठिकाणा. पुन्हा एकदा आपण हिट विकेट झालो की काय असे वाटू लागले. आपले प्रेम नेहमीप्रमाणे एकतर्फी तर नव्हते ना अशी मनात शंका यायला लागली. अखेर मी धर्मेंद्रचा धावा केला आणि त्याला सगळी परिस्थिती सांगितली. 

माझी कैफियत ऐकताच धर्मेंद्र खो खो हसत सुटला आणि त्याने जे उत्तर दिले ते पाहता "प्रेम केवळ आंधळेच नसते तर बावळट सुद्धा असते" याचा प्रत्यय आला. अरे प्रेमवेड्या पिवळा गुलाब हे प्रेमाचे नव्हे तर मैत्रीचे प्रतिक असते हे धर्मेंद्रने सांगताच "हसावे की रडावे" हेच समजत नव्हते. अखेर प्रेमभंगाचे परवलीचे गित "तू प्यार है किसी औरका, तुझे चाहता कोई और है" म्हणत मनाची समजूत काढली. तरीपण "तू नहीं, कोई और सही, और नहीं, कुछ और सही" म्हणत आमची स्वारी पुन्हा एकदा प्रेममैदानात हजर झाली.
***************************************
दि. २८ जुलै २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...