Saturday, August 12, 2023

तामीया प्रवास वर्णन भाग ०५


           तामीया प्रवासवर्णन, भाग ०५
           पातालकोट, रहस्यमयी दुनिय
***************************************
हिलटॉपला अर्धातास नैसर्गिक सौंदर्य न्याहाळल्यानंतर आता वेळ होती पायथ्याशी परत यायची. जितकी चढाई जोखमीची आहे तितकेच खाली उतरणेसुद्धा जिकिरीचे काम आहे. कारण उतरतांना ठिसुळ दगड, कुठे बारीक वाळू तर कुठे छोट्या दगडांवरून पाय सहज घसरू शकतो. शिवाय उतरतांना नैसर्गिकरीत्या आपण खाली खेचले जात असल्याने बरेचदा तोलसुद्धा जातो. वाटेत परत एकदा लायकेनची उपस्थिती इथल्या वातावरणाची श्रीमंती सांगून जाते. उतरतांना कोतवाल (ट्रोंगो) पक्षाचे दर्शन घडले. यापक्षाची विशेषता म्हणजे हा विविध प्रकारच्या पक्षांचे नक्कल करत हुबेहूब आवाज काढू शकतो आणि आपल्या या कलेने तो इतर पक्षांचे खाद्य हातोहात लंपास करतो.

पायथ्याशी येताच उजव्या बाजुला छोटा महादेवला जाण्याचा मार्ग आहे. अंदाजे ७५० मिटर खोल असलेल्या दरीत छोट्या महादेवाचे मंदिर आहे. मेघनादला शस्त्रास्त्रे अर्पण केल्यानंतर भगवान श्रीशंकर इथेच ध्यानस्थ झाल्याचे सांगितले जाते. सुरवातीला सिमेंटच्या पायऱ्या आणि लोखंडाचे कठडे असल्याने उतरणे सोपे होते परंतु नंतर खडकाळ पायवाट असल्याने थोडी सांभाळून उतरावे लागते. जवळपास अर्धा तासांत आपण एका छोटेखानी शिवमंदिराजवळ पोहोचतो. इथे तिन शिवलिंग, भगवान शंकराची मुर्ती आणि नंदीबैलाचे दर्शन होते. बाजुलाच उंच पहाडातून स्त्रवणारा जलप्रपात मनमोहून घेतो. इथले गार आणि गोड शुद्ध पाणी पिऊन मनाला थोडा हुरूप येतो आणि नैसर्गिक, दैवी शक्तीपुढे आपण आपोआप नतमस्तक होतो.

थोडावेळ विश्रांती नंतर आम्ही परत फिरलो. उतरतांना जेवढा वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ चढतांना लागतो. विशेष म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती असल्याशिवाय अशा प्रकारचे साहस करणे योग्य नव्हे. चढतांना चांगल्याच धापा टाकाव्या लागल्याने थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घेत आम्ही जवळपास एका तासात वर आलो. आता वेळ होती रिसोर्टचा निरोप घ्यायची. मात्र ही जागा सोडून नये असे मनोमन वाटत होते. मात्र काळवेळेला शरण जात आम्ही पाताळकोटला कूच करायचा निर्णय घेतला.

पाताळकोट खरोखरच एक रहस्यमयी दुनिया आहे. मात्र याबाबत फारच गैरसमज प्रचलित आहेत. तामीया पासून अंदाजे २० कि.मी. अंतरावर पाताळकोटचे अजब विश्व सातपुडा पर्वतरांगात पहुडले आहे. मुख्य मार्गापासून दिडदोन तासाने आपण पातालकोट व्ह्यु प्वाईंटला पोहचतो. इथून आपल्याला पाताळकोट चे दर्शन होते. पाताळकोटमध्ये अंदाजे १० ते १४ गावांचा समावेश होतो. तिन्ही बाजुंनी महाकाय पर्वतरांगांनी वेढलेली हे छोटेखानी विश्व बाह्यजगतापासून बरेचशे अलिप्त आहे. वरून डोकावले असता हिरव्या पार्श्वभुमीवर छोट्या ठिपक्यांच्या रूपात मानवी वस्ती किंवा गावांचे दर्शन होते. जिथे गावच छोटे दिसतात तर तिथे राहणारे लोकसुद्धा किती आकाराचे दिसणार,,,, आणि यामुळेच मग पाताळकोटमध्ये बुटके (बौने) लोक राहतात असा गैरसमज झालेला आहे.
वास्तविकत: आम्ही ज्या सिरेंडीपिटी रिसोर्टला मुक्कामी होतो तिथे याच पाताळकोट आणि आजुबाजूचे लोक आमच्या दिमतीला होते.

 पाताळकोटचा भुभाग अंदाजे ३००० फुट खोल दरीत सामावलेला आहे. काही भाग इतका दुर्गम आहे की तिथे सुर्यप्रकाशसुद्धा पोहचत नाही. शेती, फळे,फुले,शहद गोळा करून विकणे, जडीबुटी विकणे हे इथल्या रहिवाशांच्या उपजिविकेचे प्रमुख साधन आहे. धरतीला आई मानून तिचे संरक्षण, संवर्धन यावर यांची नितांत श्रद्धा आहे.एकतर इथले लोक सहजा आजारी पडत नाही आणि गरज पडली तर भुमका (वैदू) द्वारे उपाचार करतात. 
क्रमशः,,,,,
***************************************
दि. २८ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...