#@😈😈😈😈😈😈😈😈@#
मै सेहरा बांध के आऊंगा, मेरा वादा है!
‘डॅा अनिल पावशेकर’
—————————————————
महाराष्ट्र विधानसभा निकालांचे कवित्व संपले असून नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सूत्रे हाती घेतली आहेत. गावठी चाणाक्य, सकाळचा भोंगा, आधारवड आणि टोमणे सम्राटां सोबतच ढोंगी पुरोगाम्यांना पुरून उरत देवेंद्रजींनी दुसऱ्यांदा राज्याची धुरा सांभाळली आहे. लोकसभेत चार सौ पार चे बॅक फायर असो की विरोधकांचे फेक नॅरेटीव्ह असो, राज्यात भाजप महायुतीची कामगिरी ‘अर्श से फर्श तक’ झाली होती. तरीसुद्धा पिछेहाटीने खचून न जाता देवाभाऊंनी जिद्दी ने समीकरण जुळवले आणि पुन्हा एकदा महायुतीला सुगीचे दिवस आणून दिले आहेत.
झाले काय तर लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यातच राज्यात विधानसभेचा रणसंग्राम होता. अर्थातच पारडे इंडी आघाडीकडे झुकलेले होते मात्र यश पचवायला सुज्ञपणा लागतो, ज्यात विरोधक कमी पडले. याउलट झालेल्या चुकांतून देवेंद्रजींनी धडा घेतला आणि विधानसभेची बरोबर आखणी केली. प्रचाराचा संपूर्ण फोकस, दिशा ही विकास, जनकल्याण योजना आणि जातपात विरहित राहिल याची काळजी घेतली. याकामी त्यांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांनी रसद पुरवली.
मग ते मुलींना मोफत उच्चशिक्षण असो की लखपती दिदी योजना असो अथवा शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकविमा, विजमाफी, शेतकरी सन्मान निधी योजनेने सहायता करणे असो. आपल्या स्पष्ट आणि बेधडक निर्णयांनी देवेंद्रजींनी जनसामान्यात एक आश्वासक प्रतिमा निर्माण केली. राज्याच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर चे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी सम्रुद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, बुलेट ट्रेन आदी प्रोजेक्ट तसेच परकीय गुंतवणूकीच्या वाटा मोकळ्या केल्या. यासोबतच लाडकी बहीण योजनेने देवेंद्रजींचे देवाभाऊत रूपांतर केले.
मात्र हे रूप त्यांना सहजासहजी मिळाले नाही. २०१४ पासून विधानसभेत भाजपा आमदारांची संख्या सतत तीन वेळा १०० पार करण्याची किमया त्यांनी केली. खरे तर २०१९ ला नैसर्गिक न्यायाने देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायला हवे होते पण उद्धवजींची अतिमहत्वाकांक्षा आड आली. मात्र या दगाबाजीने खचून न जाता त्यांनी विरोधी पक्षनेत्याच्या पदाला न्याय दिला. अखेर मविआच्या फाटाफुटीने पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पदाचा योग आला होता परंतु युतीधर्माला जागून त्यांनी सहकार्यांच्या सोबतीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारून मनाचा मोठेपणा दाखवला.
अर्थातच देवेंद्रजींमुळे ज्यांची दुकानदारी बंद झाली ते त्यांच्यावर तुटून पडले होते. जात, देह आणि कुटुंबीयांना लक्ष्य करत विरोधकांनी टीकेची न्यूनतम पातळी गाठली होती. अनाजीपंत, फडतूस, कलंक, नालायक सारखी दुषणे देत विरोधकांनी आपली खाज मिटवली परंतु देवेंद्रजींचे काही वाकडे करू शकले नाहीत. तसेही कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसते. ज्यांचे हात आदिवासी गोवारी हत्याकांड आणि मावळ गोळीबारात बरबटलेले आहे त्यांची सम्रुद्धी महामार्गावर अपघातातील म्रुतांना देवेंद्रवासी म्हणेपर्यंत मजल गेली होती. पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला लागले असे म्हणणे असो की १०५ घरी बसवले अशी टिंगल करणे असो, विरोधकांनी तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय फारकाही केले नाही.
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर सध्यातरी महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या तोडीचा नेता नाही. प्रचंड ट्रोलींग सहन करूनही त्यांनी कधी तोल ढळू दिला नाही. खिशात राजीनामे घेऊन फिरणारे असोत की बंद खोलीतले कथित वचन असो अथवा अकेला देवेंद्र क्या करेगा ची दर्पोक्ती करणारे असोत, सर्वांचा करेक्ट कार्यक्रम केला गेला. जातीपातीचा चिखल करणारे असोत की ह्याला पाडा त्याला गाडा करणारे असोत, देवाभाऊंनी शांतपणे, संयमाने कठीण परिस्थितीतून मार्ग काढला.
बालपणापासून देशभक्तीचे बाळकडू मिळालेल्या देवेंद्रजींची इनिंग संघ स्वयंसेवक पासून सुरू केली आणि नगरसेवक, महापौर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, आमदार, भाजयुमो राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा सरचिटणीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री व्हाया विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री परत एकदा मुख्यमंत्री अशी बहरत गेली. उत्तम राजकीय जाण असलेले, प्रत्येक व्यक्तीच्या पदाचा मान राखणारे, विषय समजून घेण्याची हातोटी असणारे देवेंद्रजी शालीन नेते आहेत. कायद्याचे सखोल ज्ञान, मुद्देसूद मांडणी, नियमांचे बारकावे कोळून प्यालेल्या देवाभाऊंच्या रणनितीपुढे विरोधक अक्षरशः आडवे झाले आहेत.
२०१९ ला मी पुन्हा येईन हा त्यांचा एल्गार उगाचच नव्हता, त्यात जबरदस्त आत्मविश्वास होता. भलेही तीन नापासांच्या कटकारस्थानाने त्यावर पाणी फेरले गेले परंतु त्याचा हिशोब २०२४ ला व्याजाससहीत चुकता केला गेला. देवेंद्रजींना सतत पाण्यात पाहणारे विरोधक धड पन्नास चा गाठू शकले नाहीत. हा विरोधकांवर काळाने घेतलेला सूड आहे. बुद्धिमान आणि कर्तबगार देवेंद्रजींच्या नेत्रुत्वात महाराष्ट्र अग्रेसर राहील, आणखी वेगाने प्रगती करेल यात शंकाच नाही. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान पटकावणारे देवेंद्रजी दुप्पट जोमाने राज्याच्या विकासाकरीता स्वत:ला झोकून देतील यात वाद नाही. २०१९ ला केलेला पुन्हा परत येण्याचा वादा त्यांनी २०२४ ला पूर्ण केला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. देवेंद्रजींच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!
—————————————————
दिनांक ०५ डिसेंबर २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++