Monday, March 10, 2025

चित्तथरारक लढतीत टीम इंडिया चॅम्पियन!

#@😈😈😈😈😈😈😈😈😈😈@#

“चित्तथरारक लढतीत टीम इंडिया चॅम्पियन”

                ‘डॅा अनिल पावशेकर’

+++++++++++++++++++++++++

चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाचा कडवा प्रतिकार मोडून काढत चषकावर  तिसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. क्षणाक्षणाला उत्सुकता आणि धाकधूक वाढवणार्या या सामन्यात अखेर भारतीय फलंदाजांनी निग्रही फलंदाजी करत विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. पाठलाग करताना विराट कोहली सारखा हुकुमाचा एक्का अपयशी झाला तरी रोहित,अय्यर, पांड्या आणि राहुल या चालीच्या सत्त्यांनी जीगरबाज खेळी करत हा अंतिम डाव सर केला आहे. भारतीय संघाचे एकेक शिलेदार तंबूत परतत असताना प्राण तळमळत होता परंतु राहुलने शेवटपर्यंत व्हेंटीलेटरचे काम करत आपल्या संघाचा श्वास धडधडत ठेवला आणि ४९ व्या षटकात जडेजाने चौकार ठोकत जीवात जीव आणला.


झाले काय तर आयसीसी स्पर्धा ही क्रिकेटचे सर्वोच्च शिखर आहे आणि हे शिखर सर करणे सर्वांचेच लक्ष्य असते. त्यातही काही अलिखित नियम आहेत. पाकविरूद्ध हरणे महापाप असते तर माजोरड्या कांगारूंचा माज उतरवायचा असतो. तर किवी संघ म्हणजेच ब्लॅक कॅप्स नेहमीच अशा स्पर्धेत काळी मांजर होऊन आपल्याला आडवी येते. पहिल्या दोघांना आडवे केल्यावर फक्त किवींचा अडथळा आपल्यापुढे होता आणि तब्बल एक तपानंतर चॅम्पियन्स ट्रॅाफी जिंकण्याचा योग आला होता.  त्यामुळे आपल्याकडे जिंकू किंवा जिंकू हाच पर्याय शिल्लक होता. मुख्य म्हणजे उपांत्य फेरीत किवींना सहज लोळवल्याने आपल्या संघाचा आत्मविश्वास दुणावला होता तरीदेखील किवी संघ अपशकुन तर करणार नाही अशी शंका होती.


प्रारंभीच किवींनी झकास सलामी देत आपली चिंता वाढवली होती. मो. शमी नेहमीप्रमाणे धारदार न वाटता आऊट ऑफ कव्हरेज एरियात होता. तर त्याच्यासोबत पांड्याचा मारा भुले बिसरे गीत होता. भरीस भर म्हणून मो. शमी आणि श्रेयसने धोकादायक रचिनला जीवदान देत विकेटच्या दुष्काळात तेरावा महिना काय असते हे दाखवून दिले. शेवटी वद जाऊ कुणाला शरण झाल्याने रोहितने चेंडू वरूणकडे दिला आणि त्याने विल यंगचा बळी घेत विकेटची बोहणी करून दिली. पाठोपाठ कुलदीपने अल्लाऊद्दीन च्या जादुई दिव्यासारखी रोहितची मनोकामना पूर्ण करत डोईजड ठरलेल्या रचिनचा आणि त्यांचा फलंदाजीचा बॅकबोन असलेल्या विलीयम्सचा काटा काढला. हे तीन बळी किवींसाठी पॅावर ब्रेक ठरले आणि यातून ते शेवटपर्यंत बाहेर पडले नाहीत.


 पहिल्या सत्रात खेळपट्टी संथ वाहते क्रुष्णा माई सारखी होती, तरीही ती फिरकीच्या फारशी प्रेमात नव्हती. मात्र आपल्या फिरकीपटूंनी लाईन, लेंथवर टिच्चून मारा केल्याने किवी फलंदाज मनमोकळी फलंदाजी करू शकले नाहीत. त्यातही डॅरेल मिचेलने कूर्मगतीने अर्धशतकी खेळी केली परंतु त्याने डावाचा टेम्पो निघून गेला. तर दुसऱ्या बाजूला मायकल ब्रेसवेलने ‘वेल टायमिंग’ साधत ४० चेंडूत नाबाद ५३ धावा करून टीम इंडियापुढे एक चॅलेंजेबल टोटल उभे केले. वास्तविकतः आपण त्यांना फारतर २३० पर्यंत रोखू शकलो असतो पण चार झेल सोडून आपण जागतिक सद्भावना जीवंत ठेवली तर मो.शमी, पांड्या बेरंग ठरले. त्यातही या दोघांनी डावखुर्या फलंदाजांना राऊंड दी विकेट गोलंदाजी केली असती तर त्यांच्या फटकेबाजीला आळा घालता आला असता.


टार्गेटने अडीचशे पार करताच किवींचे डोळे चमकले कारण त्यांच्याकडे सॅंटनर, ब्रेसवेल सारखे दर्जेदार फिरकीपटू होते तर दिमतीला रचिन, ग्लेन फिलिप्स सारखे कम में बम गोलंदाज होते. शिवाय अंतिम सामना, पाठलागाचे दडपण आणि पीच स्पिनर्स कडे आक्रुष्ट होऊ लागल्याने हा सामना फुल पैसा वसूल होणार यात शंकाच नव्हती. मात्र रोहित, शुभमनने किवींचे मनसुबे धुळीस मिळवले. या स्पर्धेत सर्वोत्तम शतकी सलामी देत या जोडीने सामन्याचे स्टेअरींग व्हिल हाती घेतले. रोहितने किवींचा फडशा पाडत तब्बल सात चौकार तीन षटकारांची उधळण केली. रोहितच्या या खेळीचे वर्णन “फिरत्या पीचवर देसी डावाला तू आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार” असे करता येईल. ही जोडी मैदानात असेपर्यंत सामना एकतर्फी तर होत नाही ना असे वाटत होते. मात्र कहाणीत ट्वीस्ट बाकी होते.


किवींची गोलंदाजी निष्प्रभ ठरली असताना ग्लेन फिलिप्सने कमाल केली.  त्याने शुभमनचा अप्रतिम झेल टिपत आपल्या संघाला वेटींग लिस्ट वरून कन्फर्म बर्थवर आणले. खरेतर ज्याप्रकारे ग्लेन फिलिप्स हवेत उडत झेल घेतो ते पाहता त्या जागेला नो फ्लाईंग झोन जाहीर करायला हवे!लगेचच ब्रेसवेलने विराटला बाद करत टीम इंडियाला लोअर बर्थवर टाकले. अचानक से वक्त बदल दिया, हालात बदल दिए, जज्बात बदल दिए सारखी परिस्थिती निर्माण झाली. फुले वेचणार्या हातांना गोवर्या वेचायची पाळी आली. मोठे फटके तर दूरच, एकेरी धावांसाठी रोहीत, श्रेयस झगडू लागले होते. बॅंकेत तारखेवर ईएमआय लागला आहे आणि खात्यात मिनिमम बॅलन्स सुद्धा नाही अशी आपली अवस्था झाली होती. पीच रंग बदलू लागली होती, स्पिनर्सनी फास आवळला होता तर कडेकोट क्षेत्ररक्षकांनी चक्क नाकाबंदी केली होती. अखेर कोंडी फोडण्यासाठी रोहित सरसावला परंतु परतीचे दोर कधीच कापले गेले होते.


मैदानात घमासान युद्ध सुरू असताना ट्रबल शुटर श्रेयस अक्षरच्या संताजी धनाजी जोडीने खिंड लढवली. सॅंटनरच्या तंबूचे कळस कापण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तरीही दिल्ली अजून बरीच दूर होती. श्रेयसला एक जीवदान जरूर मिळाले पण त्याला त्याचा फारसा फायदा झाला नाही. तीन षटकांच्या अंतराने दोघेही बाद झाले आणि आपली फलंदाजी ऐन मोक्याच्या वेळी घालीन लोटांगण करते की काय अशी शंका आली होती. कारण अजूनही जिंकायला ५० धावांत ४९ धावा करायच्या होत्या. महत्त्वाचे बाब म्हणजे किवींच्या प्रमुख स्पिनर्सची षटके संपत जरी आली होती तरी आपली फलंदाजीही बुडाला टेकू लागली होती.


एका टोकाला जरी गळती लागली असली तरीही दुसरीकडे राहुल ऋषीमुनी सारखा ध्यानस्थ होऊन शांतचित्ताने बाजू लढवत होता. गरज होती त्या राजा ला साथ द्यायची आणि पांड्या मैदानात अवतरला. मात्र तो नेहमीचा हार्दिक पांड्या नव्हता तर जख्मी शेर होता. ज्याप्रकारे तो या स्पर्धेत गोलंदाजांना तुडवत होता अगदी त्याच मानसिकतेत तो दिसला. नताशा प्रकरण त्याने फारच मनावर घेतल्याचे दिसले. “ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी तू” सारखे तो सर्व बंधने झुगारून किवींवर तुटून पडला. त्याने अवघ्या क्रिकेट प्रेमींना झालेली बद्धकोष्ठता एक चौकार, एक षटकाररूपी कायमचूर्ण देऊन मोकळी केली. राहुल पांड्याच्या ३६ चेंडूत ३८ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाचे विजय प्रमाणपत्र लिहिले गेले. सर जडेजाने त्यावर चौकाररूपी सही करत थरारक नाट्यावर पडदा टाकला.


थोडक्यात काय तर पीच नक्कीच संथ होती, मोठे फटके सहजशक्य नव्हते तरीही किवींची २५१ चे टार्गेट सोपे अजिबात नव्हते. सॅंटनरने वेगवान गोलंदाजांना भारतीय फलंदाज दाद देत नसल्याने फिरकी सुरू केली. यावेळी त्याने स्लिप लावली असती तर फलंदाजांवर दबाव वाढला असता. शिवाय रोहित शुभमनची शतकी भागीदारी तोडण्यासाठी ब्रेसवेलला लवकर आक्रमणाला लावायला पाहिजे होते. तर शुभमन आणि श्रेयसला जीवदान देऊन सामन्यावर पकड घेण्याची संधी त्यांनी गमावली. सामना अटीतटीचा होत असताना आणि स्पिनर्सची षटके संपत असतांना ओरूक ला जास्त षटके दिली. त्यापेक्षा जेमीसनला आणखी लवकर आणले पाहिजे होते. क्षेत्ररक्षणात एकदोनदा भारतीय फलंदाजांना धावचीत करण्यात किवी संघ अपयशी ठरला. तर आपल्या फलंदाजांनी आवश्यक धावगती रन ए बॅाल ठेवल्याने त्यांना घाम जरी गाळाना लागला तरी टार्गेट नेहमीच आवाक्यात राहिले. 


महत्त्वाची बाब म्हणजे स्पर्धे साठी चार फिरकी गोलंदाज निवडने, रिषभ पंत ऐवजी यष्टीरक्षक म्हणून राहुलला प्राधान्य देणे, वरूण चक्रवर्तीचा मोक्याच्या क्षणी वापर करणे, रोहितची आक्रमक सुरुवात, मध्यफळीत श्रेयस अक्षर जोडीचे डाव सांभाळणे आणि शेवटी राहुल पांड्याचे लढतीला फिनिशींग टच देणे टीम इंडियाला चॅम्पियन्स बनवून गेले. ही स्पर्धा जिंकून टीम इंडियाने एकूण सात आयसीसी ट्रॅाफीवर कब्जा केला आहे. भारतीय संघाचे तमाम क्रिकेट रसिकांतर्फे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. 

++++++++++++++++++++++++

दिनांक १० मार्च २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++


Wednesday, March 5, 2025

टीम इंडिया अंतिम फेरीत

 #@😈😈😈😈😈😈😈😈@#

       “टीम इंडिया अंतिम फेरीत”

            ‘डॅा अनिल पावशेकर’

++++++++++++++++++++++++

२०२३ विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा टीम इंडियाने तब्बल दिड वर्षांनंतर कांगारूंचा प्रतिशोध घेतला असून चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. अत्यंत रोमांचक आणि चुरशीच्या लढतीत दोन्ही संघासाठी कभी खुशी कभी गम सारखे प्रसंग आले परंतु दमदार गोलंदाजी आणि भक्कम फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने बाजी मारली आहे. झेल टिपण्याच्या बाबतीत दोन्ही संघांनी उदारता दाखवली असली तरी आपल्या संघाची गोलंदाजी उजवी असल्याने आपला संघ विजयी ठरला. जसप्रित बुमराहची जेवढी उणीव आपल्याला जाणवली नाही त्याच्या कैकपट उणीव कांगारूंना स्टार्क, कमीन्स आणि हेझलवूडची जाणवली असणार.

झाले काय तर आयसीसी स्पर्धांमध्ये कांगारूंची दादागिरी जगजाहीर आहे. त्यातच समोर टीम इंडिया असली की त्यांचे बळ आपोआप दुप्पट होते. नुकतेच त्यांनी कसोटीत भारतीय संघाची धुळधाण केल्याने त्यांना आकाश दोन बोटे उरले होते. तर आपला संघ स्पर्धेतील तिन्ही साखळी सामने जिंकून त्यांच्याशी दोन हात करायला उत्सुक होता. त्यामुळेच सामन्याला अंतिम सामन्याचे स्वरूप आले होते. नाणेफेक जिंकत कांगारूंनी फलंदाजी निवडली कारण त्यांच्याकडे ट्रॅव्हीस हेड नामक हुकमाचा एक्का होता. जन्मोजन्मीचे वैर असल्यागत हेड नेहमीच टीम इंडीयावर तुटून पडतो आणि पाहता पाहता सामना एकतर्फी करून टाकतो. यामुळेच ही लढत हेड विरुद्ध भारतीय संघ अशी वाटत होती.

सामन्याचा प्रारंभ सनसनाटी झाला. मो. शमीने पहिल्याच षटकात हेडचा फॅालोथ्रुत झेल सोडत त्याला जीवदान दिले तर जडेजाने त्याला धावचीत करायची संधी गमावली. मात्र आपल्या गोलंदाजांनी त्याला फटकेबाजीसाठी रूम न दिल्याने तो अस्वस्थ होता. कारण एकदा का त्याला हात मोकळे करायला रूम दिली तर त्या रूमचा तो ओयो करून धिंगाणा घालतो. त्याला आवर घालायला ॲाफीसर ॲान स्पेशल ड्यूटी वरूण चक्रवर्तीला आणले आणि त्याने त्याचे काम चोख बजावले. अहमदाबादला विराटला बाद करून जी शांतता आणि स्तब्धता पॅट कमीन्सने निर्माण केली होती त्याची परतफेड या सामन्यात वरूण, शुभमन गील जोडीने केली.

हेड चा शिरच्छेद करताच टीम इंडिया फ्रंटफूटवर आली पण ॲास्ट्रेलिया संघाला कमी लेखून चालणार नव्हते. कारण त्यांच्याकडे ‘घर घरसे हेड निकलेगा’ अशी स्थिती होती. सोबतच हेड शिवाय पण ‘करून दाखवले’ यात ते वाकबगार होते. त्यामुळे कर्णधार स्टिव्ह स्मिथने मोर्चा सांभाळला आणि संघाला निर्भय बनो चा संदेश दिला. त्याने हेड, लाबुशेन, जॅाश इंग्लिश आणि ॲलेक्स कॅरी सोबत चार अर्धशतकी भागीदार्या करत सामन्यात संघाची स्थिती मजबूत केली. खरेतर या सामन्यातील खेळपट्टी गुड फॅार नथिंग होती. ना वेगवान गोलंदाजांना मदत होती ना फिरकीला साथ देत होती ना फलंदाजांना मोठ्या फटक्याची मोकळीक देत होती. जणुकाही खेलते रहो, मेरे भरोसे मत रहो चा संदेश ती दोन्ही संघाना देत होती.

यामुळेच तिथे विकेट टू विकेट गोलंदाजी करणे गरजेचे होते आणि आपल्या गोलंदाजांनी तेच केले. तरीदेखील स्मिथ, लाबुशेन आणि ॲलेक्स कॅरीने आदर्श फलंदाजी करत भारतीय संघाला लक्ष्य गाठतांना कशी फलंदाजी करायची याची मोफत शिकवण ते देऊन गेले. धोकादायक ग्लेन मॅक्सवेलचा आतातायीपणा टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. वास्तविकतः या तिघांनी आणखी संयमाने आपली खेळी पुढे नेली असती आणि धावसंख्या जर २८० पार नेली असती तर भारतीय संघाची धडधड वाढली असती. कारण धावांचा पाठलाग करतांना एक वेगळेच दडपण असते आणि प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व कसे गाजवायचे यात स्मिथ ॲंड कंपनी तरबेज आहे. तरीही २६४ धावा चीनी कम अशाच वाटत होत्या.

२६५ धावांचा पाठलाग करताना रोहित जणुकाही दुहेरी जीवन विमा पॅालिसी घेतल्यासारखा खेळत होता. शुभमन गील लवकरच बाद झाला तरी रोहित वर त्याचा किंचितही परिणाम जाणवला नाही. पुर्वार्धात मो. शमीने उजव्या हाताने हेड ला, डाव्या हाताने स्मिथला आयुष्यमान भवः करत जीवदान दिले होते. स्मिथचा संघही तेवढाच दिलदार निघाला. खतरनाक रोहितला कुपर कॅानलीने गल्लीत तर लाबुशेनने मिडॅाफला जीवदान देत क्षेत्ररक्षण हे क्षेत्ररक्षण असतं, तुमचं आमचं सेम असतं हे दाखवून दिले. मात्र रोहितने या जीवनदान पॅालिसीचे प्रिमीयम फक्त २८ पर्यंत भरून पॅालिसी बंद करून निघून गेला.

पण खेळपट्टीवर चेस मास्टर विराटने ठाण मांडले होते, स्लो ॲंड स्टेडी विन्स दी रेस हा त्याचा मूलमंत्र होता. खेळपट्टी संथ आणि सीमारेषा मोठ्या असल्याने मोठ्या फटक्यांना फारसा वाव नव्हता. शिवाय धावगती सहाच्या आत असल्याने सातच्या आत घरात येण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र श्रेयसने नैसर्गिक खेळ खेळला आणि विराटचे ओझे कमी झाले. खरेतर मध्यफळीत श्रेयस आणि अक्षर एकाचवेळी मैदानावर फायर ब्रिगेड सारखे आग विझवतात आणि संघाची पडझड रोखून डागडुजी करतात. या दोघांनीही त्यामानाने क्रेडिट मिळत नाही. सध्या आपला संघ विजयावर स्वार आहे, त्यात श्रेयस अक्षरचा मोलाचा वाटा आहे.

हे दोघेही बाद होताच सामना जीवंत होऊ लागला कारण गोलंदाज थोडेफार वर्चस्व गाजवू लागले होते आणि जिंकायला ८७ धावा बाकी होत्या. एक टोक विराटने सांभाळल्याने राहुलने मुक्त फलंदाजी केली. हे दोघेही नाबाद परततील असे वाटतांनाच विराटचा संयम सुटला आणि पुन्हा एकदा कहानीमें ट्विस्ट येते की काय अशी भिती वाटू लागली होती. पांड्या मैदानात आला परंतु तो प्रेक्षकांची जणुकाही सत्वपरिक्षा घेतो की काय असे वाटत होते. कारण रन ए बॅाल स्थिती असताना त्याच्या डॅाट बॅालने तमाम रसिकांच्या घशाला कोरड पडली होती. पण कुंगफू पांड्याने षटकार चौकाराची आतषबाजी करत तहानलेल्या प्रेक्षकांना थंडगार शितल जल दिले. राहूल इंच इंच लढत असतांना पांड्याने उंच उंच लढत सामना आपल्या झोळीत टाकला. मात्र विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जडेजाला मैदान गाठावे लागले.

थोडक्यात काय तर बलाढ्य फलंदाजी असली तरी तुल्यबळ गोलंदाजी नसली की सामना जिंकता येत नाही हे ॲास्ट्रेलिया संघाला समजले असेलच. स्टार्क, कमीन्स, हेझलवूडच्या पोलादी कड्यात ॲडम झॅम्पा, मॅक्सवेल उगाचच भाव खाऊन जात होते. बेन डॅार्शुस, नॅथन इलीस, कुपर कोलोनी, तनवीर संघा हे कोणत्याही द्रुष्टीने भेदक गोलंदाज वाटत नव्हते. जणुकाही पिवळे डगले घालून कोणते दुसरेच खेळाडू ॲास्ट्रेलियाकडून गोलंदाजी करत आहेत असे वाटत होते. ना कोणते ॲग्रेशन, ना खुन्नस ना गोलंदाजीत धार, एकंदरीत काय तर प्युअर व्हेज गोलंदाजी. त्यातही रोहितला दोनदा तर विराटला ५१ धावांवर असतांना दिलेले जीवदान त्यांना महागात पडले. डावाच्या मध्यात खोदून विकेट काढणार्या गोलंदाजाची कमतरता ॲासींना भासली. त्यातही डाव्याखुर्या अक्षरने थोडाफार असलेला फिरकी प्रभाव नष्ट केला होता.

आपल्या गोलंदाजी बाबत बोलायचे झाले तर भलेही मो.शमी रंगात नसला तरी त्याने कुपर कोनोलीला चांगलेच नाचवले तर वरूणने ब्रह्मराक्षस ट्रॅव्हिस हेडला फसवत टीम इंडीयाला डिप्रेशन मधून बाहेर काढले. जडेजाने फेविकॅाल लाबुशेनला आणि धोकादायक जॅाश इंग्लिश ला माघारी धाडत ॲासींना बॅकफुटवर ढकलले. तर शिरजोर झालेल्या स्मिथला शमीने लो फुलटॅसवर मामा बनवले. मुख्य म्हणजे ॲलेक्स कॅरी असेपर्यंत त्यांना आणखी मोठी धावसंख्या गाठता आली असती परंतु श्रेयसच्या डायरेक्ट थ्रो ने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. फलंदाजीत विराटने श्रेयस सोबत ९१ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. सोबतच अक्षर आणि राहुल बरोबर क्रमशः ४४,४७ धावांची भागीदारी करत विजय सुनिश्चित केला. तर राहुल पांड्याच्या ३१ चेंडूत ३४ धावांनी विजयाला फिनिशींग टच दिला.विराटच्या खेळी बाबत सांगायचे झाले तर त्याच्या द्रुढनिश्चयाचे कौतुक करावे तितके कमी आहे. धावफलक सतत हलता ठेवणे, एकेरी दुहेरी धावा करत क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकणे, मोठे फटके टाळणे आणि स्पिनर्सना उत्तम फुटवर्कने खेळणे हे होय. ॲासीविरूद्धच्या दिग्विजयासाठी टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. 

++++++++++++++++++++++++

दिनांक ०५ मार्च २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++


Monday, March 3, 2025

वरूणच्या चक्रवातात किवींची वाताहत!

 #@😈😈😈😈😈😈😈😈@#

“वरूण चक्रवातात किवींची वाताहत”

          ‘डॅा अनिल पावशेकर’

++++++++++++++++++++++++

१९५६ ला प्रदर्शित छू मंतर या चित्रपटात एक गीत आहे, “तुम्ही ने दर्द दिया तुम्ही दवां देना गरीब जान के!”अगदी अशीच काही परिस्थिती भारतीय गोलंदाज वरूण चक्रवर्तीची दुबईच्या मैदानाबाबत होती. २० ऑक्टोबर २०२१ ला याच मैदानावर टी ट्वेंटीत पाक विरुद्ध पदार्पण केलेल्या वरूणची गोलंदाजीत झोळी रिती होती. तब्बल चार वर्षांचा वनवास भोगून त्याने चॅम्पियन्स ट्रॅाफीत झोकात पुनरागमन करत याच मैदानावर किवींचा अर्धा संघ गारद करत भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. कधीकाळी फिरकीवर रुसलेल्या दुबईच्या खेळपट्टीने अंतिम साखळी सामन्यात भारतीय गोलंदाजांवर भरभरून प्रेम करत न्युझीलंडच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही.


झाले काय तर आयसीसी स्पर्धां म्हटली की किवी संघाला चेव येतो आणि भारतीय संघाविरूद्ध त्यांचा दबदबा असतो. इतरत्र निरुपद्रवी असणाऱ्या किवी संघाने टीम इंडियाला आयसीसी स्पर्धांमध्ये अनेकदा छळले आहे. तर नुकतेच त्यांनी आपल्याला कसोटीत व्हाईटवॅाश दिलेला होता. यामुळेच किवींचा वचपा काढणे गरजेचे होते. सुदैवाने या सामन्यात संघनिवड हा मास्टरस्ट्रोक ठरला. ध्यानीमनी नसताना हर्षित राणा ऐवजी वरूणची लॅाटरी लागली आणि त्याने पाच बळी घेत किवींची मैफिल लुटत आपली निवड सार्थ ठरवली.


या सामन्यात आपली सुरुवात निराशाजनक होती. अवघ्या तीस धावांत तीन बळी म्हणजे नमनाला घडाभर तेल होते. शुभमन पायचितात पकडल्या गेला तर रोहित त्याच्या आवडत्या पुल शॉटला मिसटाईम झाला. ३०० वा सामना खेळनार्या विराटची खेळी ग्लेन फिलिप्सने एक अफलातून झेल घेत संपुष्टात आणली. आपल्या संघाची बत्ती गुल होते की काय असे वाटतांनाच जनरेटर रूपी श्रेयस अय्यरने बाजू सांभाळली. सध्या श्रेयसची फलंदाजी टॅाप गियरला असून त्याची फटकेबाजी गोलंदाजांवर दादागिरी दाखवत आहे. क्रिझ चा सुरेख वापर करत त्याने वेगवान असो की फिरकी गोलंदाज, दोघांनाही चोपून काढले.


श्रेयसच्या दिमतीला मध्यफळीत अक्षर पटेल असल्याने लेफ्ट राईट कॅाम्बिनेशन प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी ठरले आहे. ही ढाल तलवारची जोडी टीम इंडिया साठी संकटमोचक ठरली आहे. या जोडीने ९८ धावांची उत्कृष्ट भागीदारी करत आपल्या संघाचा टेम्पो कायम राखला. या व्यतिरिक्त श्रेयसने राहुलसोबत ४४ धावांची तर जडेजा सोबत ४१ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. अक्षर, श्रेयस बाद झाल्यावर राहुल, जडेजाने फारशी चमक दाखविली नाही परंतु हार्दिक पांड्याने फिनिशरची भूमिका निभावत ४५ धावांची खेळी करत भारताला जवळपास अडीचशे धावांचा पल्ला गाठून दिला.


किवींसाठी अडीचशेचे लक्ष्य थोडे चकवणारे होते. कारण खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती, सोबतच आपल्या कडे चार कसलेले फिरकी गोलंदाज होते. त्यातही किवी फलंदाजांनी वरूणचा यापूर्वी सामना केला नसल्याने त्यांच्यासाठी तो भुलभुलैय्या होता. लढत अटीतटीची होणार यात वाद नव्हता परंतु सरस कामगिरी कोणता संघ बजावणार याची उत्सुकता होती. प्रारंभीच पांड्याने बोहणी केल्याने आपले काम सोपे झाले. कारण रविंद्र रचिनच्या अप्परकटचा कठीण झेल पकडत अक्षरने मैदानात विजयाचा वन्ही चेतवला. यानंतर आपल्या फिरकीपटूंनी अक्षरशः धुमाकूळ घालत किवी फलंदाजांची नाकेबंदी केली.


वरूण, कुलदीप, जडेजा आणि अक्षरच्या फिरकीपुढे विल यंग, डॅरेल मिशेल, टॅाम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिशेल ब्रेसवेल आणि कर्णधार सॅंटनर गोंधळले. त्यातच आपल्या फिरकीपटुंनी विकेट टू विकेट मारा केल्याने किवी फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. केवळ केन विलियम्सने हा कठीण पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु तो एकटा कुठवर पुरणार. तो असेपर्यंत किवी संघ सामन्यात टिकून होता. मात्र डॅाट बॅालने धावा आटल्या, अपेक्षित सरासरी वाढत गेली आणि मोठ्या फटक्याच्या नादात त्यांचे गडी बाद होत गेले. शिस्तबद्ध फिरकीने चार फलंदाज पायचीत झाले तर तिघांचा त्रिफळा उडाला.


न्युझीलंडने सामना गमावल्याने ते उपांत्य फेरीत द.आफ्रिकेशी भिडणार तर आपला संघ कांगारूंशी. या सामन्यात किवी क्षेत्ररक्षकांनी झेल घेतांना अक्षरशः जीव ओतला. विशेषतः विराटचा फिलीप्सने आणि जडेजाचा विलियम्सने घेतलेले झेल अप्रतिम होते. जबरदस्त हॅंड आय कॅार्डीनेशन, कमालीचा फिटनेस आणि झेल पुर्ण करतांना दाखवलेला फॅालो थ्रू डोळ्याचे पारणे फेडणारा होता. विराटला त्याचा झेल घेतला गेला यावर विश्वास बसत नव्हता, त्यावेळी तो स्तिमित झाला होता. किवींच्या पराभवाला त्यांची फलंदाजी कारणीभूत ठरली. त्यांनी पाठलाग करतांना ३०/४० धावांच्या तीन भागीदार्या जरूर केल्या परंतु त्या पुरेशा नव्हत्या. विलियम्सचे शेवटपर्यंत टिकणे गरजेचे होते पण तो अक्षरच्या गोलंदाजीवर संयम ठेवू शकला नाही आणि आपल्या बरोबर संघाचाही घात करून बसला.


थोडक्यात काय तर स्पिन टू विन हा मंत्र वापरल्याने टीम इंडियाची सरशी झाली. मी पुन्हा येईन चा नारा लावत वरूणने किवींविरूद्ध बळींचा पंजा मारला. वरूणच्या चक्रवातात किवी संघाची वाताहत झाली. दहा पैकी नऊ बळी टिपत आपल्या फिरकीपटुंनी सामन्यात वर्चस्व गाजवले. भलेही शुभमन रोहित विराट या सामन्यात अपयशी ठरले परंतु श्रेयस अक्षर आणि पांड्याने त्यांची भरपाई केली. या विजयात राहुलचे यष्टीरक्षक ही कमजोर कडी वाटते. विशेषतः फिरकीसमोर त्याच्या यष्टीरक्षणातील भगदाड सहज दिसून येते. चेंडू आणि त्याच्या ग्लोव्हजचा जणुकाही ३६ चा आकडा आहे असे वाटते. त्यामुळे तिथे तज्ञ यष्टिरक्षक असणे संघासाठी महत्त्वाचे आहे. कारण पुढील लढत बलाढ्य कांगारूंसोबत आहे आणि तिथे क्षुल्लक चुक संघाचे चॅम्पियन्स ट्रॅाफी जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवू शकते. टीम इंडियाचे किवी विजयासाठी हार्दिक अभिनंदन!

++++++++++++++++++++++++

दिनांक ०३ मार्च २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++


टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...