Tuesday, March 17, 2026

काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

 काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

हैदराबाद सनराईझर्सच्या सर्वेसर्वा आणि को ओनर असलेल्या ३३ वर्षीय काव्या मारन सध्या वादाच्या भोवर्यात सापडल्या असून भारतीय जनता आणि क्रिकेट प्रेमींच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. देशाची अस्मिता, जनभावना पायदळी तुडवत त्यांनी व्यवसायिकतेला प्राधान्य दिल्याने क्रिडा जगतात त्यांच्याविरूद्ध क्षोभ उसळला आहे. टी ट्वेंटी विश्वचषकाचे कवित्व नुकतेच संपले असून आयपीएल ची चाहूल लागली असतानाच काव्या मारनला पाक प्रेमाचा पान्हा फुटल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आयपीएल मध्ये तिच्या संघावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाय सनराईझर्स हैदराबादचे ट्विटर हॅंडल सस्पेंड झाल्याने हा वाद लवकर मिटण्याची शक्यता वाटत नाही. 


झाले काय तर क्रिकेट आता केवळ एक खेळ राहिला नसून तो सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे. आयपीएल याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. यांत बड्या व्यावसायिकांनी धनराशी ओतल्याने त्याला ग्लॅमरस रूप आले आहे. मात्र असे असले तरीही आपल्या देशातील संघ मालकांना व्यवसायिकता टिकवून ठेवतांना देशाशी नाळ जोडून ठेवणे गरजेचे आहे आणि इथेच खरी गोम आहे. भारतीय खेळाडू विदेशी लीगमधून खेळत नाहीत. पण भारतीय मुळाचे संघमालक विदेशी लीग मध्ये त्यांच्या संघांना सहभागी करतात. अर्थातच यात वावगे काहीच नाही. पण असे करत असताना कोणत्या देशांचे खेळाडू त्यांच्या संघात सामील करून घ्यायचे यात तारतम्य बाळगणे जरूरी आहे आणि इथेच वादाची ठिणगी पडली आहे.


दी हंड्रेड लीगच्या ८ संघांपैकी आयपीएल संघातून प्रसवलेले मॅंचेस्टर सुपर जाएंट्स, एमआय लंडन, सदर्न ब्रेव्ह आणि सनराईझर्स लीड्स हे चार भारतीय मालकांचे संघ आहेत. या लीग साठी १२ मार्च २०२६ ला झालेल्या ॲाक्शन मध्ये काव्या मारनने सनराईझर्स लीड्स संघासाठी पाक खेळाडू अब्रार अहमदवर जवळपास दोन करोड चौतीस लाखांची बोली लावली. भारतीय संघमालक असूनही त्यांनी पाक खेळाडूवर बोली लावल्याने त्या क्रिकेट प्रेमींच्या रडारवर आल्या आणि वादाला तोंड फुटले. सतत भारता विरुद्ध भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर दौलतजादा करताच भारतीय जनमानस खवळले आणि सोशल मिडियात बॅायकॅाट सनराईझर्सचा ट्रेंड चालू झाला.


खेळ आणि राजकारण यांची गल्लत करू नये हे कितीही सांगितले तरी देशभावनेचे काय हा प्रश्न उरतोच. ज्या पाक ने आपल्या देशावर १९४६-४७, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी चार युद्ध लादली, अपरिमित जीवित आणि वित्तहानी झाली, २००८ मुंबई, २०१६ उरी, २०१९ पुलावामा आणि २०२५ पहलगाम असे दहशतवादी हल्ले केले, त्या हल्लेखोर देशाच्या खेळाडूंसाठी पायघड्या घालण्यात काय अर्थ आहे? सैन्याची अतोनात हानी, निरपराधांचे रक्त सांडवणार्या शत्रू देशाच्या खेळाडूंना भाव देणे कितपत योग्य आहे? केवळ व्यवसायिक फायद्यासाठी देशभावनेला तिलांजली देण्याचा नीचपणा सनराईझर्स कडून झाला आहे. भलेही यांत संघ प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा डॅनियल वेट्टोरी, काव्या मारन सोबत उपस्थित होता परंतु संघ मालकांपुढे, त्यांच्या आवडीनिवडी पुढे कोणाचेही चालत नसते.


बातमी तर अशी आहे की सनराईझर्सनी केवळ अब्रार अहमदच नव्हे तर उस्मान तारीक, फहीम अशरफ आणि सैम अयुब साठी पण फिल्डिंग लावली होती, त्यात अब्रार अहमद त्यांच्या गळाला लागला. या अब्रारच्या लीला काय वर्णाव्या, चॅम्पियन्स ट्रॅाफीत शुभमनला क्लीन बोल्ड करताच घुंगरू सेठ सारखी मान हलवत सेलिब्रेशन केले होते. तर आशिया चषकात साहबजादे फरहान, हॅरीस रौफने खेळभावना न दाखवता ॲापरेशन सिंदूरची खिल्ली उडवली होती. याच अब्रारने यापुर्वी एअर स्ट्राईक च्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेना आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची थट्टा केली होती. तर एसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारतीय संघाने त्यांच्या हस्ते आशिया चषक स्वीकारण्यास नकार देताच ते आशिया चषक स्वतःसोबत घेऊन गेले.


जनक्षोभ काय असतो याचा तडाखा केकेआर संघाला यापूर्वी बसला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना केकेआर संघाने आयपीएल साठी बांगलादेशी मुस्तफिजूर रहमानला करारबद्ध केले होते. मात्र त्यांना आपली चूक कळली आणि त्यांनी मुस्तफिजूरला बाहेरचा रस्ता दाखवला. याच नाट्यात बांगलादेशने टी ट्वेंटी विश्वचषकावर बहिष्कार टाकला परंतु त्याचा काही परिणाम स्पर्धेवर झाला नाही. उलट बांगलादेश याप्रकरणी एकाकी पडला. भलेही त्याला पाक ने पाठिंबा दिला पण स्वतः पाक संघ स्पर्धेत सहभागी होऊन नामनिराळा राहिला. तसेही भारत पाक द्विपक्षीय मालिका २००८ पासून बंद आहे, केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघांची गाठ पडते. क्रिकेट सामन्याला धर्मयुद्ध समजणाऱ्या आणि सातत्याने भारता विरुद्ध आतंकवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानशी यामुळेच द्विपक्षीय क्रिकेट मालिका बंद असून आयपीएलची कवाडे पाक खेळाडूंना २००८ पासून बंद आहेत.


या प्रकरणी काव्या मारन यांनी खुलासा केला आहे की पाक खेळाडूंना निवडण्याचा निर्णय हा संघाची गरज, क्रिकेटींग मेरीट यावर आधारित आहे. तसेच दी हंड्रेड लीग ही भारतीय लीग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर क्रिकेट महर्षी सुनिल गावसकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते पाक खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पैशाचा उपयोग भारताविरूद्ध  होण्याची शक्यता असून यातून पुन्हा आपल्या सैनिकांचे,निरपराध नागरिकांना रक्त वाहणार. एखाद्या लीग चे विजेतेपद मिळवण्याची किंमत भारतीयांचे प्राण देऊन चुकवणार काय हा त्यांचा प्रश्न आहे. हाच पैसा आयुधं, शस्त्रे विकत घेऊन आपल्याच विरुद्ध वापरण्यात येत असेल तर हे कितपत योग्य आहे? सनराईझर्सचा पाक खेळाडूं प्रतीचा स्नेह   क्रिकेटवर अतोनात प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा आहे. क्रिकेट, क्रिकेटपटू, आयपीएल संघ, त्यांचे संघ मालक यापेक्षा इथल्या जनतेचे, चाहत्यांचे देशप्रेम सर्वतोपरी आहे आणि याचा मान राखला जावा हे काव्या मारन, सनराईझर्सला कळायला हवे.

—————————————————

दिनांक १७ मार्च २०२६

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Monday, March 9, 2026

टीम इंडिया विश्वविजेता

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

          टीम इंडिया विश्वविजेता

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

२०२६ टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडचा दारुण पराभव केला आहे. स्टेडियमवर भारतीय प्रेक्षकांना गप्प करण्याच्या वल्गना करणाऱ्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाच्या कर्णधारांचे दात टीम इंडियाने आपल्या दणदणीत कामगिरीने त्यांच्याच घशात घातले आहेत. इंग्रजीत एक म्हण आहे, देअर आर नॅाट बॅड सोल्जर्स, देअर आर बॅड जनरल्स. म्हणण्याचे तात्पर्य की विश्वचषकाचा अंतिम सामना असताना किवी कर्णधार सॅंटनरने कर्णधार पदाच्या भिकार कामगिरीने त्यांच्या संघाचा बट्ट्याबोळ केला आहे. उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असलेल्या किवी संघाचा सॅटनरने चुकीचे निर्णय घेतल्याने फायनलला पाय खोलात गेला आहे.


झाले काय तर फायनलची पीच सुद्धा वानखेडे सारखी बाऊंस आणि पेस असलेली होती. त्यातही फायनलला पाठलाग करणाऱ्या संघावर दडपण असते. अशा परिस्थितीत टॅास जिंकून पहिले फलंदाजी करणे शहाणपणाचे होते. सोबतच सेमिफायनलला दणक्यात अडीचशे धावा करणाऱ्या टीम इंडियाच्या हाती सॅटनरने आयते कोलीत दिले. या संधीचा भारतीय संघाने पुरेपूर फायदा घेतला. खरेतर ओपनिंगला समोर ॲाफ स्पिनर आला की अभिषेक चाचपडतो. मात्र या सामन्यात त्याने बऱ्यापैकी संयम दाखवला. पहिला ओव्हर मॅट हेन्री तर दुसरा ग्लेन फिलिप्स ने उत्तम टाकला होता. या दोन षटकात केवळ १२ धावा निघाल्या होत्या. मॅट हेन्रीची लाईन लेंथ तर फिलिप्सच्या ॲक्युरसीने आपले सलामीवीर थबकले होती. प्रेशर संजू अभिषेक वर असताना सॅटनरने विनाकारक गोलंदाजीत बेक्कार बदल केले आणि टीम इंडियासाठी फ्लड गेट्स उघडले. 


हेन्रीच्या जागी डफी येताच दोन्ही सलामीवीरांनी न्यूझीलंडची डफली वाजवने सुरू केले. फॅार्म साठी झगडणार्या अभिषेकने संजू सोबत तुफानी खेळी केली. या दोघांच्या झंजावातात बिचारा लॅाकी फर्ग्युसन सापडला. पुन्हा एकदा सॅटनरने मॅट हेन्रीला पाचारण केले परंतु तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. हेन्री फलंदाजांना बाद करण्यापेक्षा मार कसा कमी पडेल यासाठी वाईड गोलंदाजी करत होता, शेवटी तो वाईडग्रस्त झाला पण काही केल्या त्याला सलामीवीरांनी दाद दिली नाही. अभिषेक अर्धशतकी खेळी करून परतला पण न्यूझीलंड चे दु:ख काही कमी झाले नव्हते. येणारा इशान त्याच्यापेक्षा तिखट निघाला. त्याने संजूसोबत ४८ चेंडूत १०५ धावांची भागीदारी करत अडीचशेचा पाया रचला.


पहिले फलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य, फलंदाजीला साजेशी खेळपट्टी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरवश्यावर भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांचा फडशा पाडला. विशेषत: संजू सॅमसने तर कहर केला. विंडीज, इंग्लंड पाठोपाठ त्याने फायनलला शतकाचा विचार न करता, वैयक्तिक धावसंख्येला महत्त्व न देता जबरदस्त फटकेबाजी करत तिन्ही सामन्यात लाजवाब खेळी केल्या. यापूर्वी विराट जी स्ट्रेंथ, स्थिरता आणि डावाला आकार द्यायचा, तेच काम संजू सलामीला येऊन करत आहे. त्याने गेल्या पाच डावात जवळपास सव्वातीनशे धावा काढल्या. सामन्याच्या १६ व्या षटकात निशमने संजू इशान आणि सूर्याला बाद करत सामन्यात थोडंफार थ्रिल आणलं होतं परंतु शेवटी दुबेने अवघ्या आठ चेंडूत २९ धावा वसूल करून हिशोब चुकता केला.


फायनलला अडीचशे धावांचे टार्गेट कधीच सोपे नसते. त्यातही त्यांची मुख्य मदार सेफर्ट आणि ॲलन या जोडीवर होती. या दोघांनी सेमीफायनलला द.आफ्रिकेला तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला होता. मात्र इथे परिस्थिती वेगळी होती. जवळपास तेराच्या स्ट्राईक रेटवर धावा करणे अवघड होते. शिवाय बुमराहचे चार ओव्हर म्हणजे निव्वळ सासुरवास, ना धावा निघतात, ना मोकळे खेळता येत ना विकेट वाचवता येते. बुमराह यायच्या अगोदर इतर गोलंदाजांना टार्गेट करताना बरेचदा अर्शदीप पांड्या किंवा अक्षर बळी टिपतो. त्यातही तुरळक अपवाद वगळता ग्राऊंड फिल्डिंग, कॅचींग मध्ये सुधारणा झाल्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांची नाकाबंदी झालेली असते.


धोकादायक ॲलनला जीवदान मिळाले परंतु तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही तर रचिन रविंद्रला बुमराहने लिलया फसवले. सेम टू सेम सेमिफायनलला जसे हॅरी ब्रुकला चकवले होते. हे दोन बळी जाताच किवी संघ बॅकफूटवर आला तो कायमचाच. यानंतर ते सामन्यातून जवळपास बेदखल झाले होते. टीम सेफर्टने थोडाफार प्रतिकार केला परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. न्यूझीलंड खेळाडू केंव्हाचेच मनाने पराभूत झाले होते. केवळ सामना संपण्याची औपचारिकता बाकी होती ती बुमराहने पूर्ण केली.


थोडक्यात काय तर जगज्जेतेपदात संजूच्या सलामीच्या खेळींनी प्रमुख भूमिका बजावली. तर त्याला तोलामोलाची साथ दिली इशानने. खरेतर हे दोन्ही खेळाडू या संघात फर्स्ट प्रिफरंस नव्हते परंतु या दोघांनीही आपली निवड सार्थ ठरवली. तर फिनिशिंग टच दिले तिलक आणि दुबे ने. दुबेच्या छोटेखानी पण उपयुक्त खेळी कौतुकास्पद आहेत. हार्दिक पांड्या भलेही फलंदाजीत फारसा चमकला नाही परंतु ती कसर त्याने गोलंदाजीत भरून काढली. अक्षर पटेल गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात नाव कमावून गेला पण वरूणला मात्र अखेरपर्यंत सूर गवसला नाही. आईसींग ॲान दी केक होता बुमराह. 


त्याचे स्लोअर वन, धारदार यॅार्कर फलंदाजांसाठी अगम्य होते. हेटमायर, रोस्टन चेस, हॅरी ब्रुक आणि रचिन रविंद्र या दिग्गज फलंदाजांना त्याने सहज फसवले. या चौघांनाही बाद झाल्यापेक्षा फसवल्या गेल्याचे दुःख असेल. सामना कुठलाही असो, प्रतिस्पर्धी संघ , फलंदाज कोणताही असो, सगळ्यावर रामबाण इलाज एकच, तो म्हणजे बुमराह. कोणत्याही कर्णधाराला हवाहवासा वाटणारा बुमराह टीम इंडियासाठी ‘हारे का सहारा, बुमराह हमारा’ आहे. यासोबतच सूर्या फलंदाजीत फारसा चमकला नसला तरीही त्याचे काही निर्णय, मैदानावरील सहज वावर आणि सांघिक कामगिरीने त्याची कर्णधारपदाची खुर्ची शाबूत राहील यात वाद नाही. एकंदरीत हे विजेतेपद एकट्या दुकट्या खेळाडूच्या भरवश्यावर नव्हे तर ते सांघिक कामगिरीचे फळ होय!

—————————————————

दिनांक ०९ मार्च २०२६

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar169@gmail.com

—————————————————

Friday, March 6, 2026

भारतीय संघाची सांघिक कामगिरी

 

भारतीय संघाची सांघिक कामगिरी 
✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️
————————————————-
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा थरारक पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. अगदी पहिल्या षटकापासून उत्सुकता आणि थरार याचा अनुभव आलेल्या या लढतीत संयम आणि कॅामन सेन्स वापरत टीम इंडियाने इंग्लंडला चीत केले आहे. पहिले दे दणादण फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला सेम टू सेम दणका देत इंग्लंडने भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला फेस आणला होता. मात्र पुन्हा एकदा ॲाल आईज ॲान बुमराह कडे वळल्या आणि त्याने अकेला बुमराह क्या करेगा हे जगाला दाखवून दिले. या हाय व्होल्टेज सामन्यात जेवढी मर्दुमकी फलंदाजांनी गाजवली त्याच तोडीचे क्षेत्ररक्षण करत टीम इंडियाने बाजी मारली आहे. बुमराहने टिच्चून केलेले शेवटचे दोन षटक आणि अक्षरचे तीन झेल हे दोन्ही संघातील मुख्य विजयी फरक ठरले.

झाले काय तर वानखेडेची खेळपट्टी म्हणजे रूपानं देखणी, रंगानं चिकनी. फलंदाजांसाठी तर तू पीच बडी है मस्त मस्त, तर गोलंदाजांसाठी माहेरची साडी, संपूर्ण सामनाभर रडारड. मग फलंदाज फायदा तर घेणारच. सध्याचा संजूचा फॅार्म आणि विकेटची साथ पाहता त्याच्यासाठी आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास झाले. तसेही लंघन, उपवास केले की शरीर, मन शुद्ध होते आणि भूक जोमाने लागते. संजूला स्पर्धेच्या सुरवातीला बेंचवर बसवल्याने त्याला सामन्यांचा उपवास घडल्याने तो सध्या गोलंदाजांना कच्चा खात आहे. त्याला हॅरी ब्रुकने जीवदान देत स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. संजूने लावलेल्या ठिणगीचा इशान, दुबे, पांड्या आणि तिलकने वणवा केला आणि इंग्लंडचे गोलंदाजी जंगल त्यात बेचिराख झाले.

सामन्याची खरी मजा उत्तरार्धात आली. ईट का जवाब पत्थरसे काय असते हे इंग्लंडने दाखवून दिले. सुसाट निघालेल्या इंग्लंडला पहिला ब्रेक लावला तो पांड्याने. पीटर सॅाल्ट बाद होताच बुमराहने भाजल्या तव्यावर हॅरी ब्रुकला स्लोअर वन वर फसवले. २०२३ फायनलला जसा रोहीतचा झेल ट्रॅव्हिस हेड ने पकडला, तसंच अक्षरने एक्स्ट्रा कव्हरला जवळपास २० यार्ड उलटे धावत जाऊन हॅरी ब्रुकला झेलबाद केले. अक्षरची ती धाव, तो जीगर, ते डेडीकेशन सामन्याचा टेम्पो सेट करून गेला. उंच उंच टोलवणार्या इंग्लंडला आपला संघ इंच इंच टक्कर देऊ लागला होता. मात्र पांड्या, बुमराहने निर्माण केलेला दबाव वरूण, अक्षर कायम राखू शकले नाहीत. टप्पा, गुगली आणि वेग ही वरूणची आयुधं, मात्र गेल्या चार सामन्यात ती प्रतिस्पर्धी फलंदाजांनी निष्प्रभ केलेली आहे.

भलेही वरूण आणि अक्षरने एक एक बळी मिळवला परंतु ते षटकार रोखू शकले नाहीत, धावगतीला वेसण घालू शकले नाहीत. जेकब बॅथलच्या झंझावातापुढे अडीचशे चे टार्गेट खुजे वाटू लागले होते. भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र समाधानाची बाब म्हणजे आपल्या कडे बुमराहची षटके बाकी होते. ती कधी कशी वापरायची हा मोठा यक्षप्रश्न होता आणि इथेच सूर्याच्या कर्णधार पदाची कसोटी होती. तसेही जेकब जॅक्स जोडीने टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळवत १४ व्या षटकात ४ बाद १७२ गाठले होते. मागील सामन्यातून शहाणपण शिकत अर्शदिपने चौदाव्या षटकात वाईड लाईन पकडली आणि तिच टीम इंडिया साठी लाईफलाईन ठरली. विल जॅक्सने अर्शदिपच्या शेवटच्या चेंडूंवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच भारतीय संघाच्या विजयासाठी आशेचा किरण उजाडला. 

२०२४ च्या अंतिम सामन्यात सूर्याने मिलरचा झेल घेतांना जे कौशल्य, जी जिद्द, जी समयसूचकता दाखवली, त्यापेक्षा दहापट कला अक्षरने दाखवली. काय नव्हतं त्या झेलामागे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॅाजी सोबतच मनोविज्ञान पण होतं. उंचावरून डिप होणाऱ्या चेंडूंवर हॅंड आय कॅार्डीनेशन ठेवणं, मैदानातून बाऊंड्रीकडे धावतांना सेंट्रीफ्युगल फोर्स, वाकून झेल घेतांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कव्हर करणं, सोबतच वक्र रेषेत धावतांना फ्रिक्शन झिरो झाले तर बंडी ऊलार होण्याची भीती! या सर्वांवर मात करून बॅलन्स राखत चेंडू बाऊंड्रीच्या आत दुबे कडे फेकणं, निव्वळ अप्रतिम, अद्वितीय, आकर्षक आणि अवर्णनीय! काय ते ॲड्रीनॅलीन रश असेल, ह्रुदयाची धडधड, वरखाली होणारा श्वास, मनाचा थरकाप, शरीराची घामाघूम, मेंटल अवेअरनेस, फोकस, एनर्जी आणि वाढलेली स्ट्रेंथ! भारत इंग्लंड युद्धात बाऊंड्रीवरची ही चकमक पाहण्यासारखी होती.

यांत शिवम दुबेचे पण कौतुक करावे लागेल. एरवी तांडव न्रुत्याशी निगडीत हा शिवम यावेळी मंद स्मित करत जणुकाही अक्षरला म्हणत होता, भिऊ नको मी तुझ्या शेजारी उभा आहे. अगदी शांत चित्ताने दुबेने झेल पकडत आपल्या आशा जीवंत ठेवल्या. या अविश्वसनीय झेलाने सूर्याची कर्णधार पदाची ठाकूरकी कायम राहिली, अभिषेक, वरूणचे अपयश झाकले गेले, गोलंदाजी ची लक्तरे विसरल्या गेली, १४० करोड जनतेत हर्षोल्लास निर्माण झाला, जॅक्स जेकब जोडीची ३९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी संपुष्टात आली, भारतीय संघाला विजयासाठी बुस्टर डोझ मिळाला, कॅचेस विन मॅचेस याचे जीवंत उदाहरण पहायला मिळाले. विल जॅक्स बाद होऊनही आपले संकट टळले नव्हते, कारण मैदानात इंग्लंड कर्णधार सॅम करनने बाजू लावून धरली होती. लंडन ब्रिज इज फॅालिंग डाऊन होत असतानांही बेथेल करन जोडीने वेगवान अर्धशतकी भागीदारी करत सामन्याचा रोमांच वाढवला होता.

इंग्लंडने अडीचशेच्या डोंगराचा पाठलाग करताना थोडाफार उंचवटा बाकी ठेवला होता. जेकब बेथम शांत डोक्याने रक्तहीन क्रांती करत होता. शेवटचे अस्त्र म्हणजे सूर्याकडे बुमराहचे एक षटक बाकी होते. डेथ ओव्हर्स मध्ये अक्षर किंवा हार्दिक ला बुमराहच्या पहिले आणणे जोखमीचे होते. अखेर १८ व्या षटकात बुमराहने चेंडू हातात घेताच अवघ्या देशाने सुटकेचा नि:श्वास टाकला. बुमराहने चेंज ॲाफ पेस, स्ट्रेट लाईन, यॅार्कर टाकल्याने इंग्लंडचे फलंदाज मवाळ झाले आणि त्या षटकात फक्त सहा धावा निघाल्या. यानंतर कमाल केली ती कुंगफू पांड्याने. १९ व्या षटकात षटकार खाऊनही त्याने सॅम करनला बाऊंड्रीवर तिलकद्वारे झेलबाद केले. २०२४ फायनलला पांड्याने असेच मिलरला बाद केले होते.

१९ व्या पांड्याच्या षटकांत केवळ ९ धावा निघाल्याने अंतिम षटकात ३० धावांचे टार्गेट उरले होते. अक्षरचे एक षटक बाकी होते पण ती जोखीम घेणे म्हणजे आ बैल मुझे मार होते. अखेर ही शिवधनुष्य शिवम दुबे ने उचलले. २० व्या षटकात पहिल्याच चेंडूंवर जेकबने लॅांग ॲाफ्लाईट फटका हाणत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता फिट ॲन्ड फाईन पांड्या. त्याने क्षणाचाही विलंब न लावता रॅाकेट थ्रो करत जेकबला धावबाद केले. जेकब जमिनीवर लोळताच इंग्लिश संघाचा डोलारा भुईसपाट झाला. वानखेडे मैदानावर आसमंत आनंदात न्हाऊन निघाला, जेकब बाद होताच देशव्यापी धडधड सुखावली, टीम इंडियाची वाटचाल अहमदाबादकडे तर इंग्लिश संघ घरवापसी साठी कामाला लागला. 

हे केवळ शारीरिक द्वंद्व नव्हते तर मानसिक कणखरतेचा, नर्व्हचा इथे कस लागला. संजू, पांड्याचा झेल सोडणे आणि क्षेत्ररक्षणातली ढिलाई इंग्लिश संघाच्या मुळावर आली. कर्णधार म्हणून सूर्याचे कौतुक करावे लागेल. दुबेला चवथ्या क्रमांकावर पाठवतांना लेफ्ट राईट कॅाम्बिनेशन सोबत स्पिनचा प्रभाव कमी करणे, बुमराह पांड्याचा योग्य वापर करणे, बाऊंड्रीवर अक्षर पांड्या तिलक ची तैनाती करणे आदी निर्णय टीम इंडियाच्या पथ्यावर पडले. गोलंदाजांना उठता लाथ बसता बुक्की मिळत असतानाही आपल्या क्षेत्ररक्षकांनी जीव ओतून सामना आपल्या बाजूला फिरवला. फलंदाजीच्या वाहत्या गंगेत सगळे हात धुवत असताना अभिषेक मात्र कमनशिबी ठरला. अभिषेक संघासाठी ॲसेट नसून लायबलिटी ठरत आहे. संघासाठी ही एक चिंतेची बाब आहे. फायनल पुर्वी टी ट्वेंटीतील नंबर वन बॅटर आणि बॅालर अभिषेक, वरूण आपल्या फॅार्मसाठी झगडत आहेत. संघातील इतर खेळाडूंच्या कामगिरीने हे दोघेही झाकून जात आहे, मात्र फायनलला यांना सूर गवसणे गरजेचे आहे. या विजयाचे श्रेय जाते टीम इंडियाच्या सांघिक कामगिरीला. त्यातही संजूची फलंदाजी, बुमराह ची गोलंदाजी, अक्षरचे झेल आणि सूर्याचे नेतृत्व उठून दिसते. 
———————————————
दिनांक ०६ मार्च २०२६
मो. ९८२२९३९२८७

Monday, March 2, 2026

इस शाम ऐ संजू का क्या कहना!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

    इस शाम ऐ संजू का क्या कहना!

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

————————————————

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या सुपर ऐट च्या अंतिम लढतीत टीम इंडियाने विंडीजचा थरारक पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात संजू सॅमसनने लाईफटाईम झुंजार खेळी करत विंडीजला नमवले आहे. अभिषेक, ईशान आणि सूर्या सारखे दिग्गज अल्पावधीतच माघारी परतले तरी संजूने द्रुढनिश्चयी खेळी करत टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट कन्फर्म केले आहे. संघात नियमितपणे इनकमिंग आऊटगोईंग करण्यात येणाऱ्या संजूने अखेर आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखविली आहे. या विजयाने टीम इंडियाची सेमीफीयनलला इंग्लंड सोबत गाठ पडणार आहे.


झाले काय तर ही लढत जवळपास क्वार्टर फायनलची होती. इथे चुकीला माफी नव्हती. डू ॲार डाय परिस्थिती असताना ही लढत दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा प्रश्न होता. त्यातच टी ट्वेंटी आणि विंडीजचा संघ म्हणजे डेडली कॅाम्बिनेशन. त्यांचे फलंदाज म्हणजे निव्वळ रॅा पॅावर आणि बेधडक. वेड्याच्या अंगात दहा हत्तींचे बळ असतात असे म्हणतात. याबाबतीत विंडीजच्या फलंदाजांना डबल वेडे म्हणावे लागेल आणि आयसीसीने ताकदीसाठी हॅार्स पॅावर ऐवजी विंडीज पॅावर ही दुरुस्ती करावी असे वाटते. सध्याचे त्यांचे फलंदाज ज्या ताकदीने फटके मारतात, त्यासाठी पंधरा क्षेत्ररक्षक सुद्धा कमी पडतात. अंगावरचा मच्छर आपण ज्या हळुवारपणे मारतो, तितक्याच सहजतेने ते लांबलचक, उत्तुंग षटकार मारतात. 


या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अनेकदा बाजी मारली असल्याने आपला पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला की काय असे वाटत होते. कारण १८० धावां तिथे विजयी स्कोअर ठरत होता. त्यातच आपला ओपनिंगचा झिंगाचिका, अभिषेकचा बेभरवश्याचा फॅार्म. परंतु उत्तरार्धात ड्यू फॅक्टर डोक्यात असल्याने त्याचा फायदा होणार होता. विंडीजचा प्रारंभ दणदणीत नव्हता तरी धडधड वाढवणारा नक्कीच होता. एकवेळ सापाचे मुंडके छाटल्यावर त्याची बॅाडी शेपूट वळवळणार नाही परंतु फलंदाजीत विंडीजचे शेपूट काय करू शकते हे त्यांनी द. आफ्रिकेविरूद्ध दाखवून दिले होते. आजकालचे फलंदाज निव्वळ वेगाला भीत नाही, भीक घालत नाही. म्हणूनच गोलंदाजीतील विविधता काम करते. मग ते चेंज ॲाफ पेस, पेस ॲाफ असो किंवा वाईड यॅार्कर वगैरे वगैरे.


आपल्या वेगवान आक्रमणात बुमराहने निराश केले नाही पण पांड्या, अर्शदिपला मार बसल्याशिवाय ते सुधरत नाही. अर्शदिपने तिसऱ्या षटकात मार खाताच वाईड लाईन पकडली आणि अब्रू राखली. बाकी फिरकीत वरूणची जादू एकतर फिकी पडू लागली किंवा त्याची गोलंदाजी विरोधी गोलंदाजांनी डी कोड केली असावी. तरीही भारतीय गोलंदाजी ॲाक्सिजनवर आली की आपल्याला बुमराह शिवाय पर्याय नाही आणि हे त्याने कालच्या सामन्यात दाखवून दिले. बुमराह नसला की इतर गोलंदाज दात नख नसलेले वाघ सिंह होतात. नशीब समजा हेटमासर लवकर गारद झाला अन्यथा बाऊंड्री लाईन काही मीटर वाढवण्याशिवाय बीसीसीआय कडे पर्याय उरला नसता. बुमराहच्या बाराव्या षटकार विंडीजचे दोन फलंदाज बाद झाले नसते तर त्यांनी विसाव्या षटका पर्यंत टीम इंडिया चे तेरावे उरकून टाकले असते.


उत्तरार्धात आपली फलंदाजी म्हणजे केवळ जस्टिस फॅार संजू शो होता. टीम इंडियातील संजूला संधी हा अन्याय या शब्दाचा पर्यायवाची शब्द होऊ शकतो इतक्या वेळा तो आतबाहेर झाला आहे. टॅाप ॲार्डरची त्रिमुर्ती कोसळताच संजू सॅमसनचा स्वामी संजू झाला. या सामन्यात जणुकाही त्याच्या शरीर मनाचा विराट कोहलीने ताबा घेतला आहे असे वाटत होते. विराटसारखा द्रुढनिश्चय, चेस माईंडसेट आणि मुख्य म्हणजे फुट मूव्हमेंट. कधी बॅकफुट कधी फ्रंटफूट तर कधी ॲाफ, ॲान, लेग ला हलकेच फूट मूव्हमेंट करत त्याने कोणत्याही गोलंदाजाला सेटल होऊ दिले नाही, तर त्याच्यावर हुकूमत गाजवली. कुठलेही ॲग्रेशन नाही की मुठ आवळणे नाही की दातओठ खाणे नाही. सिंप्लीसिटी ॲट इट्स बेस्ट काय असते हे संजूच्या कालच्या खेळीत दिसून आले. संपूर्ण सामना म्हणजेच तब्बल ४० षटके पॅड लावून राहतांना त्याने दाखवलेली जिद्द, संयम, मॅच अवेअरनेस नक्कीच कौतुकास्पद आहे.


थोडक्यात काय तर कालचा सामना म्हणजे गोलंदाजीत बुमराह आणि फलंदाजीत संजू सॅमसन! खरेतर विंडीजला २०/३० धावा कमी पडल्या. शिवाय पॅावर प्ले मध्ये स्कोअर पुरेसा नव्हता. ओपनिंग जरी चांगली झाली तरी मधात बुमराहने दोन विकेट घेत स्पिड ब्रेकर लावले. जर स्कोअर २०० वर गेला असता तर आपल्या फलंदाजांची दमछाक झाली असती. अभिषेकचे अपयश येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढवून जाते, त्यातच इशानला सूर्यग्रहण लागले तर फलंदाजी कोण सांभाळणार? पुढच्या सामन्यात पुन्हा एकदा संजूच उभा राहणार काय? तसेच क्षेत्ररक्षणातली बोंबाबोंब कशी सुधारणार हा खरा प्रश्न आहे. भलेही अभिषेक ज्या सामन्यात झेल सोडतो तो सामना आपण हमखास जिंकतो पण काळ सोकावतो आहे. आपल्या फलंदाजांना विंडीज क्षेत्ररक्षकांनी झेल सोडून रिटर्न गिफ्ट जरूर दिले परंतु पुढील सामन्यात हे अंगावर येऊ शकते. म्हणूनच टीम इंडिया जरी सेमीफायनलला पोहचली असली तरीही गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारताला नट बोल्ट कसून ठेवावे लागेल.

————————————————

दिनांक ०२ मार्च २०२६

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

————————————————

काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@  काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद        ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— हैदराबाद सनराईझर्सच्या सर्वेसर्वा ...