Thursday, September 25, 2025

ये बनाएंगे इक आशियां


 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

         “ये बनाएंगे इक आशियां”

        ✍️डॅा अनिल पावशेकर✍️

—————————————————

आशिया चषकात सलग पाच सामने जिंकून टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. बांगलादेशच्या उत्साही संघाला आणि उतावीळ पाठीराख्यांना जोर का झटका धीरे से देत टीम इंडियाने ही लढत ४१ धावांनी जिंकली आहे. संघात तब्बल चार बदल करत बांगलादेशने संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला परंतु पुन्हा एकदा अभिषेक शुभमन जोडीने दणक्यात सुरुवात करत पहिली चढाई जिंकली. तर मध्यक्रम ढेपाळूनही हार्दिक पांड्याच्या बुस्टर डोझने टीम इंडीयाला तारले आणि आपल्या संघाचा अंतिम फेरीत प्रवेश सुकर झाला. आता पाक विरुद्ध बांगलादेश यातील विजेता अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.


झाले काय तर दुबईत पाठलाग करून सामने जिंकणे सोपे आहे. मात्र त्याकरिता फलंदाजी तेवढीच सक्षम असणे गरजेचे आहे आणि इथेच बांग्ला संघ गळपटला. प्रथम गोलंदाजी करताना बांग्ला संघाने टीम इंडियाला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. आपल्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट सुरुवात केली. विशेषत: अभिषेकचा धावांचा अभिषेक कायम होता. मात्र गील बाद होताच आपल्या संघाची स्पिड फाईव्ह जी वरून टू जी वर आली. शिवम दुबे, सूर्या आणि तिलक वर्मा मैदानावर आले आणि लगेच डेझर्ट सफारीला निघून गेले. 


चांगल्या ओपनिंग चा पचका व्हायला वेळ लागला नाही. अवघ्या साडेसहा षटकात ४६ धावांत चार विकेट्स गमावताच आपला संघ दिडशेत गारद होतो की काय अशी शंका यायला लागली होती. गील, दुबे, सूर्या आणि तिलक वर्मा हे चौघेही झेलबाद झाले होते. एकतर स्ट्रोक्सचे टायमिंग जुळत नव्हते आणि त्यामागे ताकद पण कमी वाटत होती. जणुकाही या फलंदाजांचे नवरात्रीचे उपवास तर सुरु नाही ना असे वाटत होते. त्यामुळेच यापुढे ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपल्या फलंदाजांना हमदर्द का टॅानिक सिंकारा द्यावे अशी सूचना कराविशी वाटते.


टीम इंडियाला खरा धक्का बसला जेव्हा तडाखेबंद फलंदाजी करणारा अभिषेक धावबाद झाला. खरेतर बॅकवर्ड प्वाईंटला तिथे धाव होतीच नाही. त्यामुळे तिथे ‘रन चोर विकेट छोड’ चा प्रयोग बघायला मिळाला. मात्र अनुभवी पांड्याने तिथे आपले कौशल्य पणाला लावले. त्याच्या फेव्हरेट एक्स्ट्रा कव्हर एरियात त्याने खणखणीत चौकार ठोकत २९ चेंडूत ३८ धावांची उपयुक्त खेळी केली. बांगलादेश गोलंदाजांचे खरोखरच कौतुक करावे लागेल. अभिषेकच्या झंझावातानंतरही त्यांनी अचूक मारा करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.


लंकेविरूद्ध यशस्वी पाठलाग केल्याने बांगलादेशला विजयाची आशा होती. मात्र मागच्या सामन्यात महागडा ठरलेला बुमराह यावेळी त्याच्या जुन्या रंगात दिसून आला. त्याने पहिल्याच षटकात बळी घेत त्यांच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याला सहकारी गोलंदाजांनी उत्तम साथ दिली. मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांनी मागील चुकांतून बोध घेतला नाही. ट्रम्पच्या ५०% टेरिफ नियमाचे तंतोतंत पालन करून त्यांनी हाय कॅचेसवर बांग्ला फलंदाजांना ५०% नवरात्र ॲाफर दिली. लागोपाठ दोन सामन्यात अर्धा डझन झेल सोडणार्या क्षेत्ररक्षकांना काय म्हणावे ते कळत नाही. 


क्षेत्ररक्षणात हाच धांगडधिंगा चालू राहिला तर बीसीसीआय एच वन बी व्हिसाने जगातले चांगले दहा क्षेत्ररक्षक भाड्याने आणू शकतात. मात्र क्षेत्ररक्षकांचे पाप पोटात घेत कुलदीप, वरूण आणि अक्षरच्या फिरकीने लाज राखली. कुलदीपची तर हॅट्रिक होता होता राहिली. तर बांगलादेश तर्फे सैफ हसनने एकाकी झुंज दिली. त्याने तीन चौकार आणि पाच उत्तुंग षटकार ठोकत ६९ धावांची खेळी केली. मात्र त्याला परवेझ होसेन इमॅान वगळता कोणीही साथ दिली नाही. या दोघां व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला नाही. त्यातही मिस्टर एक्स्ट्रा म्हणजेच वाईड बॅालच्या सर्वाधिक नऊ धावा होत्या.


थोडक्यात काय तर बांगलादेश संघाने गोलंदाजीत बाजी मारली परंतु फलंदाजांनी त्यांना दगा दिला. याउलट आपला संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत भरपूर पर्याय असल्याने काम जमून गेले . मात्र क्षेत्ररक्षण, विशेषतः हाय कॅचेस ही आपली नवीन डोकेदुखी होऊन बसली आहे. तर मध्यक्रमात सगळं ॲाल इज वेल नाही आहे. मध्य फळीत विविध प्रयोग नकोच. दुबे ला दुबईत तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचे लॅाजिक फक्त आणि फक्त सूर्या, गौतम गंभीरच सांगू शकतील. मात्र अंतिम सामन्यात मध्यफळीच्या योग्य घडी सोबतच उत्तम क्षेत्ररक्षण राहिले तर हा संघ ‘ये बनाएंगे इक आशियां’ असं आपण म्हणू शकू.

—————————————————

दिनांक २५ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...