Wednesday, March 10, 2021

हाऊझ दी जोश, व्हेरी हाय सर,,

"हाऊज द जोश, व्हेरी हाय सर"
*************************************
सर सायरील रेडक्लीफ यांनी ऑगस्ट १९४७ ला आखलेल्या रेडक्लीफ रेषेने ४,५०,००० कि.मी. चौरस भूभागाचे आणि ८८ लाख जनसंख्येचे ब्रिटिश जोखडातून मुक्ती होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन देशात विभाजन झाले. फाळणीच्या रक्तरंजित पार्श्वभूमीवर जरी दोन देश वेगवेगळे झाले असले तरी दोन्ही देशांची नाळ अटारी वाघा या सिमेने अजूनही शाबूत आहे. दळणवळण, व्यापार आणि इतर बाबींसाठी रस्तेमार्गाने संपर्क करण्याची दोन्ही देशादरम्यान ही सिमा एकमेव जागा असल्याने अटारी वाघा सिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 याचप्रकारे फिरोझपूर जवळ गंडासिंगवाला, हुसैनीवाला सिमा आणि फाझिल्का जवळ महाविर, सद्की सिमा दोन्ही देशाच्या दरम्यान आहे. अमृतसरपासून ३२ कि.मी. तर लाहोरपासून २२ कि.मी. अंतरावर असलेली अटारी वाघा सिमा दोन्ही देशांसाठी जिव्हाळ्याचा विषय असून दोन्ही देशातील नागरिक सुर्यास्ताच्या दोन तास पुर्वी होणाऱ्या बिटींग दी रिट्रीट समारंभाला एकच गर्दी करतात. अटारी सिमेजवळ ऑगस्ट २०१७ला उभारण्यात आलेला ३६० फुट (११० मिटर) उंच गगणचुंबी ध्वजावर भारताचा तिरंगा डौलाने फडकत असतो तर यालाच समांतर वाघा सिमेकडे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो.

या सिमेवर १९५९ पासून या निरोप समारंभाला सुरवात झाली असली तरी भारताकडून सिमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) स्थापना व्हायच्या पहिले पंजाब पोलीस दलातर्फे या समारंभात संचालन केले जात असे मात्र सिमा सुरक्षा दलाच्या स्थापनेनंतर म्हणजेच १९६५ पासून बीएसएफ तर पाकतर्फे पाकिस्तानी रेंजर्स यात सहभागी होतात. आतंकवाद्यांच्या हल्ल्यातून ही जागासुद्धा सुटली नाही आणि २ नोव्हेंबर २०११ ला वाघा सिमेकडे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ६० जणांचा मृत्यु तर ११० लोक जायबंदी झाले होते. 

या सिमेवर नेहमीच तणाव असला तरी बकरी ईद, दिवाळी, दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाला दोन्ही बाजूंनी शुभेच्छा आणि मिठाईचे आदानप्रदान होते. अर्थातच वारंवार होणाऱ्या अप्रिय घटनांमुळे यात बरेचदा खंडसुद्धा पडतो. पुलावामा इथे झालेला भ्याड आतंकी हल्ला, प्रत्युत्तरादाखल भारताचा एअर स्ट्राईक आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्या धाडसी कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेल्या अटारी वाघा बॉर्डरला भेट द्यावे असे मनोमन वाटत होते आणि किसी चिजको शिद्दतसे चाहो तो पुरी कायनात उसे मिलानेकी कोशिश करती है याचा अनोखा अनुभव आला.

अमृतसर सोडताच कधी एकदाचे अटारी वाघा सिमेवर पोहचतो असे झाले होते. शिस्तबद्ध वाहतूक, मार्गावर दिसणारी लष्करी ठाणी, युद्धस्मारके, मधातच दृष्टीस पडणारी लष्कराची वाहने, कडक, करारी बाण्याचे आणि देशाच्या संरक्षणार्थ अहोरात्र झटणारे गणवेषातील सैनिक पाहुन मन देशप्रेमाने उचंबळून येत होते. संपूर्ण देशातील विविध जातपात आणि धर्माचे नागरिक हातात तिरंगा, गालावर तिरंग्याचे चिन्ह आणि ओसंडून वाहणाऱ्या अलोट उत्साहाने सिमेकडे कूच करत होते. अखेर आकाशी डौलाने झळाळणारा तिरंगा दिसताच भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद आणि वंदे मातरमच्या गगणभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक तपासणी करून ओळखपत्र असेल तरच स्टेडियमवर प्रवेश दिला जातो. प्रवेशाकरीता व्हीआयपी पासेससुद्धा असतात मात्र त्याकरिता एक दिवसआधी बुकिंग करावे लागते. आत पोहचताच आपले स्वागत होते ये शान तिरंगा है, ये जान तिरंगा है,भगवान तिरंगा है, अभिमान तिरंगा है, बलिदान तिरंगा है या गिताने. बस एवढेसे गित तुमच्या धमन्यात रक्त सळसळवायला पुरेसे असते आणि पुढील दोन तास तुमची वैयक्तिक ओळख गळून पडते आणि तुम्ही उरता ते ते केवळ अस्सल भारतीय. आपल्या बाजूने सिमा सुरक्षा दलातर्फे उद्घोषक कार्यक्रमाचे सुरळीतपणे संचालन करत प्रेक्षकांचा उत्साह वाढवत असतो आणि समयोचित मार्गदर्शन पण सुरू असते. 

पाकिस्तानी बाजूने मात्र मदारीचा खेळ चालू असल्यासारखे प्रेक्षकांकरीता ढोल वाजवले जातात परंतु त्याला आपल्याकडील ओसंडून वाहणाऱ्या झंझावताची सर नसते. सतत गुंजणारे देशभक्तीपर गिते, बीएसएफच्या जवानांचा जोशपूर्ण राबता, उद्घोषकाची आवेशपूर्ण ललकारी आपल्याला बेभान करते. 
दरम्यान स्टेडियमच्या परेडभागात आपल्याकडे नारी सम्मानार्थ प्रेक्षकातील बालिका, स्त्रीयांना मर्यादित रेषेपर्यंत हातात तिरंगा घेऊन फेरी मारण्याची मुभा दिली जाते. आमच्या सहकारी डॉ गिता आणि डॉ पल्लवी यांना हा सम्मान मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानी बाजुने नागरिकांना ही सुविधा नव्हती, केवळ कागदी झेंडे हालवण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता.

 खरोखरच इथले सळसळते वातावरण पाहता आपण या देशात जन्म घेतला याचा सार्थ अभिमान आणि परम आनंद होतो. दरम्यान ये देश है विर जवानोंका...हे गित सुरू होताच आबालवृद्ध हर्षोलात्साने नाचू लागतात आणि एड्रीनॅलीन रश काय असते याची स्वानुभुती होते. या सर्व धावपळीत वाघा बाजूने पाकिस्तानी रेंजर्सची जमवाजमव सुरु होते मात्र आपल्याकडील सोहळा आनंदात सुरू असतो.

सिमा सुरक्षा दलाचे जवान कडक शिस्तीने, कणखरपणे लष्करी पोषाखात वावरत असतात तर पाक रेंजर्स दरबान, चौकीदारा सारखे परिधान करून असतात. पाक बाजुने सिमेवर पाकिस्तान चे जनक मोहम्मद अली जिना यांची तसबीर लागलेली असते. पाक ध्वजासोबतच भगवे, निळे, हिरवे, अनेकरंगी ध्वज सोबत फडकत असतात. 
ये देश है विर जवानोंका, अलबेलोंका,,, हे गित कानावर पडताच एक श्वास, एक ध्यास घेतलेल्या देशप्रेमी जनतेच्या उत्साहाला आणखी उधाण येते.

 विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा या गितावर जवळजवळ १५ मिनीटे स्टेडियमच्या परेडभागात बालिका,स्त्रीया या राष्ट्रसंगीत उत्सवात न्हाऊन निघतात. एक मोठ्या एलईडी पडद्यावर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणसुरू असते. या सोहळ्यात खरा रंग भरला जातो तो सुनो गौरसे दुनियावालो, बुरी नझरना हमपे डालो, सबके आगे होंगे हिंदुस्थानी या गिताने. उद्घोषकांतर्फे खड्या आवाजात भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मातरम चा जयघोष होताच उपस्थित जनसागरात राष्ट्रचैतन्याची त्सुनामी उसळते. 

बरोबर ४.४५ वाजता सिमा सुरक्षा दलातर्फे त्यांची स्थापना, दैदिप्यमान इतिहास, गौरवगाथा याची संक्षिप्त माहिती दिली जाते.  याची सुरवात बीएसएफच्या हम सिमा के पहरी है या गिताने होते. राजस्थानचे वाळवंट असो की काश्मीरचे बर्फाळ वातावरण असो, दलदल असो की उंच शिखरे, देशाची सुरक्षा आपले रक्त शिंपडत अहर्निशपणे सिमा सुरक्षा दलाचे जवान डोळ्यात तेल घालून करत असतात.

जवळपास साठ वर्षे झालेल्या या निरोप समारंभाच्या सुरवातीला स्वर्णजयंती द्वाराच्या गॅलरीतून सुरुवात होते. १३ जवानांच्या या तुकडीतून समारंभाचे संचालन होते. रणदंदुभीचा स्वर कानी पडताच प्रत्यक्ष युद्धाचा आभास होतो. आरंभी दोन ब्लॅक कमांडो यंत्रवत संचालन करत थेट सिमेवर जातात. पाठोपाठ जर्मन शेफर्ड आणि लॅब्राडॉर जातीचे दोन श्वान जवानांसोबत ऐटीत गस्त घालतात. 

यानंतर दोन महिला सैनिकांच्या नेतृत्वात जवानांची तुकडी गॅलरीतून खाली उतरते. यावेळी भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी दोन स्त्रीसैनिक दिमाखात संचालन करत पोस्टपर्यंत येतात. पाठोपाठ आठ सैनिक शिस्तबद्ध संचालन करत येतात आणि एकमेकांना सामोरे आल्यावर जोर आजमवतात. बाहुंचा दम, आवळलेल्या मुठी, गर्वाने छाती ताठ करून, करारी मुद्रा, भेदक डोळे, नजरेत अंगार वातावरण आणखी तापवतात. 

फाटक उघडताच दोन्ही बाजुंनी हस्तालोंदन होताच पुन्हा एकदा मनगटाची ताकद दाखवली जाते. भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मारतम च्या घणाघाती घोषणांनी वातावरण ढवळून निघते. जवानांचे मिशांवर ताव मारणे, भक्कम खांदे उंचावत समोरासमोर आव्हान देणे यामुळे आपण प्रत्यक्षात युद्धभूमीवर असल्याची भावना मनात येते. यानंतर दोन्ही देशांचे ध्वज उतरवणे सुरू होते. अत्यंत लगबगीने परंतु काळजीपूर्वक ही प्रक्रिया पार पाडली जाते. एकवेळ अशी येते की हे दोन्ही राष्ट्रांचे ध्वज एकमेकांची गळाभेट घेत असल्याचे दृश्य दिसते, मात्र हा आभास असतो. नियतीला जागून हे दोन्ही ध्वज सम्मानाने खाली येताच व्यवस्थित घडी करून जवानांच्या खड्या पहाऱ्यात परत आणले जातात. दोन्ही बाजूने एकमेकांना निरोप दिल्या जातो आणि हा कार्यक्रम विसर्जित झाल्याची घोषणा केली जाते.

अत्यंत भावनिक आंदोलन घेत जवळपास दोन तास चाललेला हा समारंभ डोळ्याचे पारणे फेडून जातो. समारंभाची सांगता झाली तरीही पाय जागेवरून हलायला तयार नसतात, नजर हटत नाही, खालीवर झालेला श्वास लवकर सामान्य होत नाही. याची देही याची डोळी हा समारंभ पाहतांना ध्यान हरपून जाते. स्टेडियम सोडून जातांना जिवलगाची ताटातूट झाल्याची तरंगे मनात उठतात, उर अभिमानाने भरून येतो. अत्यंत हळव्या मनाने देश, जवानांना सलाम करत जड पावलाने अखेर निरोप घेतल्या जातो. अत्यंत भारावलेल्या या समारंभाची सांगता झाली असली तरी कोणीही विचारले की हाउझ द जोश तर उत्तर एकच मिळते "व्हेरी हाय सर"... 
*************************************
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...