Thursday, February 24, 2022

कबाब मे ईड्डी,,,!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *कबाब मे ईड्डी,,!*
             *डॉ अनिल पावशेकर*
***********************************
देशभरातील हुडहुडी कमी होत असली तरी ईडीच्या धाडीने घोटाळेबाजांच्या ह्रदयात धडधडी वाढल्या आहेत. राजकारणातील तमाम मुरब्बी आणि भ्रष्टाचाराच्या गंगेत पट्टीचे पोहणारे सुद्धा ईडीच्या लाटेने गर्भगळीत झाले आहे. "जो उखाडना है, उखाड लो" म्हणणारे ही ईडीच्या नावाने पत्रकार परिषदेत घामाघूम झालेले आहेत. ईडीच्या तुफान गोलंदाजीने पहिलेच राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना सरकारी तंबूत परत पाठवले आहे. तर नुकतेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने क्लिन बोल्ड केलेले आहे.

झाले काय तर कुख्यात दहशतवादी असलेला दाऊद, त्याचे साथीदार आणि अंडरवर्ल्ड संबंधीत बेकायदेशीर सावकारी प्रकरणी नवाब मलिक गुंतले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अर्थातच एवढा मोठा मासा ईडीच्या गळाला लागणे हे एवढे सोपे काम नक्कीच नाही. मात्र कधीतरी "पापाचा घडा भरतोच" आणि याप्रकरणी नेमके हेच झाले. नवाब मलिकांना ईडीने आलिंगन देताच राष्ट्रवादीचा प्राण तळमळला परंतु मुंबई बॉम्बस्फोटाच्या झळा ज्यांना बसल्या त्यांचे काय? राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले मग ईडीच्या नावाने खडे फोडण्याला काहीच अर्थ उरत नाही.

केवळ राष्ट्रवादीच कशाला येत्या काळात महाआघाडीच्या आणखी काही विकेट ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. किरीट सोमय्या यांनी उडवलेल्या धुराळ्यात महाआघाडीची दाणादाण उडाली असून "ईडी नको पण सोमय्याला आवर" अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. निश्चितच किरिट सोमय्यांनी सबळ पुराव्यानिशी महाआघाडीच्या शिलेदारांची जी लक्तरे वेशीवर टांगली आहे त्याला तोड नाही. सध्यातरी किरीट सोमय्यांच्या झंझावातापुढे घोटाळेबाजांना "बाबूजी जरा धीरे चलो, ईडी खडी यहाँ ईडी खडी" हे गाणे नक्कीच ऐकू येत असणार.

खरेतर नवाब मलिक हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चांगलेच प्रकाशझोतात आले होते. आर्यनला एनसीबीने ताब्यात घेताच कित्येक पुरोगाम्यांचा प्राण कंठाशी आला होता. आर्यनला बेड्या ठोकताच फिनाईल टाकल्यावर जसे जंतू,किडे वळवळत बाहेर येतात अगदी तसेच सो कॉल्ड पुरोगामी पुढे सरसावले होते. मात्र एनसीबी आणि न्यायालयाच्या दणक्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही. तरीपण "गिरे भी तो टांग उपर" करत नवाब मलिकांनी चक्क तपास यंत्रणांना वेठीस धरले होते. वरकरणी आर्यनचा लळा जरी असला तरी मलिकांना त्यांचे जावई समीर मलिकांच्या अटकेच्या वेदना सतावत होत्या.

फुटका डोळा काजळाने साजरा करायचा असतो मात्र मलिकांनी तपास यंत्रणांवर आरोपांचा पिसारा फुलवला. अखेर त्यात शेवटी त्यांचे पितळ उघडे पडले आणि त्यांना माफी मागावी लागली. त्यातच दाऊदच्या गुन्हेगारी संबंधित जुन्या प्रकरणांना नुकतेच उजाळा मिळाला आणि नवाब मलिक बेनकाब झाले. मलिकांनी ईडा पिडा टळो चा भरपूर प्रयत्न केला शिवाय "बुलाती है मगर जाने का नहीं" यावर ते ठाम होते. परंतु ईडीने पहाटेच त्यांना गुड मॉर्निंग केले आणि गुड नाईट होईपर्यंत ते ईडीच्या ताब्यात होते. शेवटी ईडी न्यायालयाने त्यांना तिन मार्चपर्यंत सरकारी पाहुणचाराचा आदेश दिला आहे.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या राज्यासारखं सुजलाम सुफलाम दुसरं राज्य या भुतलावर अस्तित्वात नाही याची सर्वांना खात्री आहे. कोरोनाच्या कितीही लाटा आल्या तरी "महाआघाडीच्या खाटा कधीच कुरकुरल्या नाही." नॉटी विरोधकांनी कित्येकदा या सरकारच्या चांगल्या निर्णयात खोडा घातला आहे. या सरकारने नतद्रष्ट विरोधकांना कैक वेळा समजावून सांगितले की वाझे म्हणजे लादेन नाही. जिलेटीन म्हणजे स्फोटके नाही, नॉटी म्हणजे हरामखोर नाही, हर्बल तंबाखू म्हणजे गांजा नाही, विवाहबाह्य संबंध म्हणजे लफडे नाही, वाईन म्हणजे दारू नाही. तरीपण वेंधळे विरोधक उगाचच महाआघाडीच्या तोंडाला फेस आणत आहेत.

वास्तविकत: महाआघाडीने २८८ पैकी १६९ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. "अमर अकबर अँथनी" सरकारने आपल्या कर्तृत्वाने जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. अर्थातच काही अपवादात्मक घटना जरूर घडल्या आहेत मात्र विरोधकांनी उगाचच त्याचा बाऊ केला आहे. एखाद्या मंत्र्याविरुद्ध बोलले म्हणून बंगल्यावर त्याची थोडी पाठ शेकली यात वावगे ते काय? एखाद्या मंत्र्याचे बहुपत्नीत्व सिद्ध झाले तर इतरांना पोटदुखी का व्हावी. खुद्द न्यायालयानेच व्यभिचार हा गुन्हा नसल्याचे ( भादंवि ४९७) सांगितलेले आहे. कोणी मंत्री एखाद्या तरुणीसोबत "उलाला उलाला" करत असेल तर तो त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात कोणीही नाक खुपसू नये. शिवाय प्रत्येकात ही कला असतेच असेही नाही.

कुणी मंत्री महिन्याला करोडोंची वसूली करत असेल तर त्याने "करून दाखवलं" म्हणून त्याचे कौतुक करायला हवे. सोबतच अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी "गावं तिथे किराणा, किराणा तिथे वाईन" ही योजना आखली तर कोणाच्या डोळ्यात का यावे? मुळातच या सरकारच्या चांगल्या गोष्टी कोणाच्याही लक्षात येतंच नाही. दाऊद सारख्या गुन्हेगारांचे मन वळविण्यासाठी आणि त्याला सामाजिक जिवनात परतण्यासाठी कोण्या मंत्र्याने त्याची मालमत्ता विकत घेतली तर काय बिघडले? शेवटी दाऊद सुद्धा एक मनुष्य आहे आणि कोणत्याही व्यक्ती कडून चुका होऊ शकतात. मग सुबहका भुला शामको घरी येण्यासाठी त्याला मदत करणे कसाकाय गुन्हा होऊ शकतो? माझे कुटुंब माझी जबाबदारी या नात्याने मंत्री महोदयांनी दाऊद ॲंड कंपनीला हातभार लावला तर काय बिघडले?

शेवटी काय तर एवढ्या गुणसंपन्न मंत्रीमंडळाला कुणाचे गालबोट लागले कुणास ठाऊक. मंत्री महोदयांनी दाऊद मालमत्ता प्रकरणी सावकारी करुन सरकारला रेव्हेन्यू प्राप्त करून दिला याचे कुणाला कौतुकच नाही. शिवाय मलिकांना अटक झाल्याने ते पालकमंत्री असलेले गोंदिया आणि परभणी हे दोन्ही जिल्हे पोरके झाले त्याचे काय? आधीच माजी गृहमंत्री अटकेत असतांना नवाबांच्या अटकेने जनमानस ढवळून निघाले आहे. जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाआघाडीच्या मंत्र्यांचे दुःख पाहून चांदा ते बांदा पर्यंत जनता व्यथित आहे. तिनचाकी पांगुळगाडा असुनही जवळपास अडीच वर्षे सर्वोत्कृष्ट कारभार करणाऱ्या सरकारचे चिरहरण पाहून अख्खे ब्रह्मांड तळमळत आहे. त्यातच नवाब मलिकांना अटक करुन ईडीने कबाबमे हड्डी केली आहे.
***********************************
दि. २४ फेब्रुवारी २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Friday, February 4, 2022

मै झुकेगा नहीं साला

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
            *मै झुकेगा नहीं साला,,,!*
************************************
देशभरात सध्या कोरोनाची तिसरी लाट थंडावण्याच्या मार्गावर आहे. मात्र अल्लू अर्जुनच्या पुष्पा ची लाट अजूनही कायम आहे. दाक्षिणात्य स्टार असलेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा ने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत साडे तिनशे करोडचा टप्पा ओलांडला आहे. मुळच्या दक्षिणेतल्या चित्रपटाला संपूर्ण देशभर पाठींबा मिळण्याचा हा बहुतेक पहिलाच प्रयोग असावा. यातला एक डायलॉग सगळ्यात भारी असून "मै झुकेगा नहीं साला" सध्या सर्वांच्या तोंडी आहे. सध्यातरी हा डायलॉग आम्हाला तंतोतंत लागू होत असल्याने आम्ही अल्लू अर्जुनचे जबरा फॅन झालेलो आहे.

झाले काय तर जवळपास तिन चार वर्षांपूर्वीच आम्ही पन्नाशीची वेस ओलांडली असली तरी मनातून पहिल्या सारखेच तरूण आहोत. शिवाय मनाने वयाला पन्नाशीतच लॉक करून ठेवल्याने आमचे वय यापुढे वाढणे अजिबात शक्य नाही. त्यातच अख्खे जग ज्या दिवशी बेधुंद होऊन जल्लोष करते, तो आमचा प्रकटदिन, अर्थातच ३१ डिसेंबर. निश्चितच आम्ही प्रकट होण्यात आमचे काहीच योगदान नसले तरी आम्हाला एकतिस डिसेंबरला भरभरून येतं. त्यातच दुसरा दिवस म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस असल्याने आमच्या उत्साहाला उधाण येते. वाढदिवस आणि नववर्षाच्या आगमनाने या दोन दिवसांत आमची अवस्था "आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास" अशी होऊन जाते.

अर्थातच नवीन वर्ष म्हटले की वर्षभराचा संकल्प आलाच आणि यावर्षी आम्ही आळस झटकून नियमितपणे घर निटनेटके ठेवण्याचे काम करण्याचे ठरवले. मात्र यात प्रत्यक्ष कामापेक्षा जोश जास्त होता. यातच मग फुलझाडे  कुंड्यात लावतांना एक मातीचे पोते उचलण्यात आले. एकदम पाठीत कच्च असा आवाज आला आणि मी कळवळून उठलो. माती भरलेले  पोते ओले असल्याने ते अपेक्षेपेक्षा कितीतरी वजनदार झाले होते आणि इथेच घात झाला. कसेतरी हातपाय टेकवत मी उठलो आणि वर्षभराचा संकल्प अवघ्या दहा मिनिटात पुर्णत्वाला आला. शिवाय तुम्हाला एकही काम धड करता येत नाही हे टोमणे बसले ते वेगळेच.

आधीच घरगुती कामाचा कंटाळा आणि त्यात कंबरेच्या दणक्याने आमची पुरती वाट लागली. त्यातच दुखणे नेहमी हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पावलाने जात असल्याने आम्ही चांगलेच धास्तावलो होतो. एका सप्ताहात दुखण्याने चांगले बाळसे धरले आणि आमचा पुरता अल्लू अर्जुन करून टाकला. मात्र दुसऱ्या सप्ताहात कंबरेचा त्रास इतका वाढला की सरळ उभे राहणे तर सोडाच सरळ चालू सुद्धा शकत नव्हतो. दोन-चार पावले टाकताच कंबरेतून पायापर्यंत जोरदार कळ यायची आणि खाली बसावे लागत होते. कितीही वेदनाशामक औषधे घेतली तरी काही फायदा होत नव्हता. "गम उठाने के लिये मै जीये जाऊंगा" अशी आमची अवस्था झाली होती.

या वेदनेतही अल्लू अर्जुनचा "तेरी झलक अशर्फी श्रीवल्लीचा" डान्स पाहून आपणही अगदी तसेच चालतो याचे कौतुक वाटत होते. त्यावेळी अल्लू अर्जुन माझा हमदर्द झाला होता. अखेर हे दुखणे सहनशक्तीच्या पुढे जाताच विशेषज्ञाचा सल्ला घेण्याचे ठरले. मग लगेच एमआरआय काढला असता तिथे मातीचे पोते उचलल्याने कंबरेच्या मणक्यांची माती झालेली दिसली. शेवटी काय तर आपली माती आपली माणसं. अखेर आलीया भोगाशी असावे सादर करत औषधोपचार सुरू केला. पहिले प्रख्यात न्युरोसर्जन डॉ अजय कुर्वे यांच्या देखरेखीखाली औषधोपचार तर नंतर फिजीओथेरपीस्ट डॉ संजय राजहंस यांनी फिजिओथेरपी करून आमची प्रचंड दुखण्यातून सुटका केली.

खरेतर वयोमानानुसार शरिरात बदल होणे अपरिहार्य आहे. तसेच काम करतांना काही दक्षता घेणे गरजेचे असते. याप्रसंगी अल्लू अर्जुनचा उल्लेख केला गेला आणि त्याला कारणही तसेच आहे. पुष्पा चित्रपटाकरीता अल्लू अर्जुनने हटके दिसण्यासाठी तब्बल दोन वर्षे खांदा झुकवून चालण्याची प्रॅक्टिस केली. यात त्याने भोगलेल्या कळा त्यालाच माहीत. शिवाय दररोज मेकप साठी दोन तासांच्या वर बसावे लागत होते तो भाग वेगळाच. "तारिफ ऐ काबिल होने के लिये वाकिफ ऐ तकलिफ होना पडता है" म्हणतात ते यासाठीच. यामुळेच अल्लू अर्जुनचे दुखणे पाहून "दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है! लोगोंका गम देखा तो मै अपना गम भूल गया" हे गुणगुणत आपले दुखणे विसरु लागलो.

एक मात्र खरे,,या दुखण्यातून काही नक्कीच शिकायला मिळाले. यापुढे जोश मध्ये नव्हे तर होश मध्ये काम करायचे ठरवले. आरोग्यं धनसंपदा का म्हणतात याचा जवळून प्रत्यय आला. मात्र यापुढे समोर झुकायचे नाही, एकाजागी जास्त वेळ उभे रहायचे नाही याची सक्त ताकीद देण्यात आल्याने थोडं हिरमुसलो होतो. या काळ्या ढगाला एक रूपेरी किनार जरूर होती. यापुढे घरगुती कामातून सुटका मिळाल्याचे समाधान होते. कानाकोपऱ्यातील जळमटं काढणं, पंखा पुसणे आदी आमची कामे आता इतिहासजमा झाली. शिवाय कोणतीही वस्तू खाली पडली तरी ती पायाने उचलण्याची कला आम्ही आत्मसात केली आहे. यामुळेच की काय आता समोर झुकून काही उचलायचे असल्यास आम्ही स्वतःलाच ठणकावतो,,"मै झुकेगा नहीं साला"!
***********************************
दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...