Friday, February 4, 2022

मै झुकेगा नहीं साला

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
            *मै झुकेगा नहीं साला,,,!*
************************************
देशभरात सध्या कोरोनाची तिसरी लाट थंडावण्याच्या मार्गावर आहे. मात्र अल्लू अर्जुनच्या पुष्पा ची लाट अजूनही कायम आहे. दाक्षिणात्य स्टार असलेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा ने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत साडे तिनशे करोडचा टप्पा ओलांडला आहे. मुळच्या दक्षिणेतल्या चित्रपटाला संपूर्ण देशभर पाठींबा मिळण्याचा हा बहुतेक पहिलाच प्रयोग असावा. यातला एक डायलॉग सगळ्यात भारी असून "मै झुकेगा नहीं साला" सध्या सर्वांच्या तोंडी आहे. सध्यातरी हा डायलॉग आम्हाला तंतोतंत लागू होत असल्याने आम्ही अल्लू अर्जुनचे जबरा फॅन झालेलो आहे.

झाले काय तर जवळपास तिन चार वर्षांपूर्वीच आम्ही पन्नाशीची वेस ओलांडली असली तरी मनातून पहिल्या सारखेच तरूण आहोत. शिवाय मनाने वयाला पन्नाशीतच लॉक करून ठेवल्याने आमचे वय यापुढे वाढणे अजिबात शक्य नाही. त्यातच अख्खे जग ज्या दिवशी बेधुंद होऊन जल्लोष करते, तो आमचा प्रकटदिन, अर्थातच ३१ डिसेंबर. निश्चितच आम्ही प्रकट होण्यात आमचे काहीच योगदान नसले तरी आम्हाला एकतिस डिसेंबरला भरभरून येतं. त्यातच दुसरा दिवस म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस असल्याने आमच्या उत्साहाला उधाण येते. वाढदिवस आणि नववर्षाच्या आगमनाने या दोन दिवसांत आमची अवस्था "आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास" अशी होऊन जाते.

अर्थातच नवीन वर्ष म्हटले की वर्षभराचा संकल्प आलाच आणि यावर्षी आम्ही आळस झटकून नियमितपणे घर निटनेटके ठेवण्याचे काम करण्याचे ठरवले. मात्र यात प्रत्यक्ष कामापेक्षा जोश जास्त होता. यातच मग फुलझाडे  कुंड्यात लावतांना एक मातीचे पोते उचलण्यात आले. एकदम पाठीत कच्च असा आवाज आला आणि मी कळवळून उठलो. माती भरलेले  पोते ओले असल्याने ते अपेक्षेपेक्षा कितीतरी वजनदार झाले होते आणि इथेच घात झाला. कसेतरी हातपाय टेकवत मी उठलो आणि वर्षभराचा संकल्प अवघ्या दहा मिनिटात पुर्णत्वाला आला. शिवाय तुम्हाला एकही काम धड करता येत नाही हे टोमणे बसले ते वेगळेच.

आधीच घरगुती कामाचा कंटाळा आणि त्यात कंबरेच्या दणक्याने आमची पुरती वाट लागली. त्यातच दुखणे नेहमी हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पावलाने जात असल्याने आम्ही चांगलेच धास्तावलो होतो. एका सप्ताहात दुखण्याने चांगले बाळसे धरले आणि आमचा पुरता अल्लू अर्जुन करून टाकला. मात्र दुसऱ्या सप्ताहात कंबरेचा त्रास इतका वाढला की सरळ उभे राहणे तर सोडाच सरळ चालू सुद्धा शकत नव्हतो. दोन-चार पावले टाकताच कंबरेतून पायापर्यंत जोरदार कळ यायची आणि खाली बसावे लागत होते. कितीही वेदनाशामक औषधे घेतली तरी काही फायदा होत नव्हता. "गम उठाने के लिये मै जीये जाऊंगा" अशी आमची अवस्था झाली होती.

या वेदनेतही अल्लू अर्जुनचा "तेरी झलक अशर्फी श्रीवल्लीचा" डान्स पाहून आपणही अगदी तसेच चालतो याचे कौतुक वाटत होते. त्यावेळी अल्लू अर्जुन माझा हमदर्द झाला होता. अखेर हे दुखणे सहनशक्तीच्या पुढे जाताच विशेषज्ञाचा सल्ला घेण्याचे ठरले. मग लगेच एमआरआय काढला असता तिथे मातीचे पोते उचलल्याने कंबरेच्या मणक्यांची माती झालेली दिसली. शेवटी काय तर आपली माती आपली माणसं. अखेर आलीया भोगाशी असावे सादर करत औषधोपचार सुरू केला. पहिले प्रख्यात न्युरोसर्जन डॉ अजय कुर्वे यांच्या देखरेखीखाली औषधोपचार तर नंतर फिजीओथेरपीस्ट डॉ संजय राजहंस यांनी फिजिओथेरपी करून आमची प्रचंड दुखण्यातून सुटका केली.

खरेतर वयोमानानुसार शरिरात बदल होणे अपरिहार्य आहे. तसेच काम करतांना काही दक्षता घेणे गरजेचे असते. याप्रसंगी अल्लू अर्जुनचा उल्लेख केला गेला आणि त्याला कारणही तसेच आहे. पुष्पा चित्रपटाकरीता अल्लू अर्जुनने हटके दिसण्यासाठी तब्बल दोन वर्षे खांदा झुकवून चालण्याची प्रॅक्टिस केली. यात त्याने भोगलेल्या कळा त्यालाच माहीत. शिवाय दररोज मेकप साठी दोन तासांच्या वर बसावे लागत होते तो भाग वेगळाच. "तारिफ ऐ काबिल होने के लिये वाकिफ ऐ तकलिफ होना पडता है" म्हणतात ते यासाठीच. यामुळेच अल्लू अर्जुनचे दुखणे पाहून "दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है! लोगोंका गम देखा तो मै अपना गम भूल गया" हे गुणगुणत आपले दुखणे विसरु लागलो.

एक मात्र खरे,,या दुखण्यातून काही नक्कीच शिकायला मिळाले. यापुढे जोश मध्ये नव्हे तर होश मध्ये काम करायचे ठरवले. आरोग्यं धनसंपदा का म्हणतात याचा जवळून प्रत्यय आला. मात्र यापुढे समोर झुकायचे नाही, एकाजागी जास्त वेळ उभे रहायचे नाही याची सक्त ताकीद देण्यात आल्याने थोडं हिरमुसलो होतो. या काळ्या ढगाला एक रूपेरी किनार जरूर होती. यापुढे घरगुती कामातून सुटका मिळाल्याचे समाधान होते. कानाकोपऱ्यातील जळमटं काढणं, पंखा पुसणे आदी आमची कामे आता इतिहासजमा झाली. शिवाय कोणतीही वस्तू खाली पडली तरी ती पायाने उचलण्याची कला आम्ही आत्मसात केली आहे. यामुळेच की काय आता समोर झुकून काही उचलायचे असल्यास आम्ही स्वतःलाच ठणकावतो,,"मै झुकेगा नहीं साला"!
***********************************
दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...