Friday, April 22, 2022

मुंबई इंडियन्सची साडेसाती संपेना

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
    *मुंबई इंडियन्सची साडेसाती संपेना*
           *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आयपीएलचा पंधरावा हंगाम ऐन भरात आला असून सर्वाधिक वेळ आयपीएल चषक पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सची मात्र वाताहत झाली आहे. तब्बल पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या रोहीतच्या संघाला साडेसाती लागली असून त्यांनी या हंगामातला सतत सातवा पराभव आपल्या नावे केला आहे. ना फलंदाजी, ना गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या मुंबई इंडियन्सचे दाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही अशी दुरावस्था झाली आहे. सोबतच रोहीतच्या ताफ्यातील बिनीचे शिलेदार निष्प्रभ ठरत असल्याने मुंबई इंडियन्स चे "जो भी कदम बढे, बर्बादी की ओर बढे" असे हाल झाले आहे.

झाले काय तर आयपीएलच्या नवीन नियमावली नुसार प्रत्येक संघांना काही खेळाडूंना सोडचिठ्ठी द्यावी लागली. अर्थातच यात एकसे बढकर एक खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई संघाला खुपच फटका बसला. कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या करत इतर संघांनी क्लिंटन डिकॉक, पांड्या बंधू, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आदी खेळाडूंची पळवापळवी केली. वास्तविकत: मुंबई संघाची ब्रॅण्ड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. त्यांनी खिसा चांगला खाली केला तरीपण रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात अशीच स्थिती आहे. त्यांनी इतकी वर्षे गुंफलेली खेळाडूंची माला हर्रासी बोलीने एका झटक्यात तोडून टाकली. यामुळे मुंबई संघाची अवस्था पवार साहेबांनी कांग्रेस बाबत जे म्हटले होते अगदी त्यासारखीच झाली आहे,,म्हणजेच ओसाड गावाच्या पाटीलकी सारखी.

मुंबई संघाने रोहीत, सुर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहला राखून धरले. मात्र आत घेतलेले नवीन खेळाडू निव्वळ खोगिरभरती ठरले. तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेवीसचा अपवाद वगळता इतर खायला काळ भुईला भार ठरले. निश्चितच नवोदित खेळाडूंवर इतक्या लवकर शिक्कामोर्तब करणे त्यांच्यावर अन्याय आहे परंतु सामन्याच्या शेवटी तुम्हाला फक्त निकालाशी देणेघेणे असते. त्यातच जर तुमचा संघ विजयी होत असेल तर सोन्याहून पिवळे. मात्र जिथे खुद्द कर्णधारच चाचपडत आहे, रोहीतचा कच्चा बादाम झाला आहे,,,तिथे कच्चे निंबू काय करणार?

देशभरात हिट वेव्ह सुरू झाली असली तरी हिटमॅन रोहीतला अजुनही फलंदाजीत सुरू गवसलेला नाही. या हंगामात त्याने एकोणविसच्या सरासरीने केवळ एकशे चौदा धावा गोळा केल्या आहे. सलामीवीर ईशान किशनचे कभी खुशी कभी गम चालू आहे तर एकटा सुर्यकुमार कितीदा तळपणार हा प्रश्नच आहे. तिलक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस मुंबईची फलंदाजी गुंफू पाहतात पण जिथे आभाळच फाटले आहे तिथे कोणाचाच इलाज चालत नसतो. खरेतर मुंबई संघाजवळ क्रिकेटचा गॉड सचिन आहे , शिवाय फलंदाजीचा गॉडझिल्ला कायरन पोलार्ड‌‌‌ पण आहे. मात्र यावेळी पोलार्डने निद्रिस्त ज्वालामुखीचे रुप घेतल्याने डावाच्या शेवटी आग लावणारे कोणीच उरले नाही.

पुर्वी पांड्या बंधू संघात असतांना मैदानावर करून दाखवलं आणि मैदानाबाहेर करून आलो म्हणून दंगा करत होते. मात्र हे दोघेही अहिरावण महिरावण संघात नसल्याने मुंबईचीच लंका जळत आहे. वर चांगली फलंदाजी नाही झाली तर खाली आनंदी आनंद असतो. पांड्या बंधुंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत खारीचा वाटा उचलून कित्येकदा मुंबई संघाला विजयसेतू बांधून दिला होता. खेळाडू निलामीच्या बुलडोझर ने मुंबईचा विजयसेतू उध्वस्त करून टाकला आहे. चुकून माकून मुंबई संघाने चांगल्या धावा उभारल्या तरी गोलंदाजीत ठण ठण गोपाळा ठरलेलेच आहे.

मुंबईच्या यशात गोलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. बुमराह बोल्ट या ग्लोबल गोलंदाजांच्या दबदब्याने पांड्या बंधू, राहुल चहर सारखे लोकल गोलंदाज भाव खाऊन जात होते. बुमराह बोल्ट चे आठ षटके प्रतिस्पर्धी संघांना चांगलेच रखडवत होते. मग याच गोंधळात उर्वरित गोलंदाज काम फत्ते करून टाकायचे. मात्र या दोघांची जोडी फुटली आणि तिकडे मुंबई संघाचे नशिब फुटले. अकेला फडणवीस क्या करेगा प्रमाणे अकेला बुमराह क्या करेगा हा यक्षप्रश्न निर्माण झाला. फडणवीसांना कमीतकमी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, किरीट सोमय्यांचे बॅकप पॉवर तरी आहे, बुमराह याबाबतीत कमनशिबी ठरला.

एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून गणल्या गेलेल्या रोहीतची हतबलता आपण समजू शकतो. मात्र त्याची फलंदाजी का रुसली याचे उत्तर त्यालाच शोधावे लागेल. या हंगामात ओळीने सात पराभव झाल्याने विजयाची सप्तपदी त्याच्या नशिबी दिसत नाही. अजुनही विजयाची बोहणी न झाल्याने मुंबई इंडियन्स संघाला रस्त्यावर टेबल खुर्ची टाकून जिओ सिम विकण्याची सक्ती येऊ नये म्हणजे झाले. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स सारखे नवोदित संघ गुणतालिकेत अग्रेसर असतांना मुंबई संघ दो गज जमीन के निचे का झाला हा गंभीर प्रश्न आहे.

 कदाचित खेळाडू निवडतांना झालेली गफलत मुंबई संघाच्या मुळाशी आलेली दिसते. मुंबई संघ जळत असताना जोफ्रा आर्चर फिडल वाजलण्यात गुंग आहे. डिकॉक सारखा उमदा सलामीवीर, पांड्या बंधू सारखे अष्टपैलू खेळाडू, बोल्ट सारखा धारदार, अचूक गोलंदाज यांची कमतरता अदलाबदली खेळाडूंनी अजिबात पुर्ण केलेली नाही. सोबतच रोहीत सकट ईशान, पोलार्डचे फलंदाजीतील अपयश मुंबईची नाव डुंबण्याला पुरेसे ठरले. असे असले तरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हिरमुसले होऊन चालणार नाही. आत्ताही त्यांचा आवडता संघ आयपीएलच्या थेट अंतिम सामन्यात धडक मारु शकतो. कारण अंबानींचा संघ म्हणून त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री नक्कीच मिळू शकेल.
*********************************
दि. २२ एप्रिल २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Wednesday, April 13, 2022

टेनिस सम्राज्ञी, स्टेफी ग्राफ

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                    *अगंबाई अरेच्चा*
            *टेनिससम्राज्ञी,,,'स्टेफी' "ग्राफ"*
**********************************
१९८५ च्या काळात महिला टेनिसचे नाव घेतले की मार्टीना नव्रातिलोव्हा आणि ख्रिस एव्हर्ट लॉईड यांचे नाव हमखास पुढे यायचे. मार्टीनाचा जन्म तर जणुकाही ग्रॅंड स्लॅम जिंकण्यासाठीच झाला आहे असे एकंदरीत तिच्या खेळावरून वाटत असे. मात्र असे असले तरी वेळ काढून मार्टीनाचा खेळ बघावा असे कधीच वाटत नव्हते. दरम्यान दुरदर्शनने जनमानसात आपले जाळे चांगले पसरवले होते आणि याचदरम्यान मार्टीना व ख्रिस एव्हर्टच्या साम्राज्याला धक्का द्यायला जर्मनीची एक नवोदित टेनिस सुंदरी अवतरण घेत होती. या टेनिस सुंदरीने जर्मनीत टेनिसची लोकप्रियता वाढवली असे म्हणतात परंतू हे अर्धसत्य असून या सम्राज्ञीने न केवळ जगात टेनिस ची लोकप्रियता वाढवली तर आपल्या सुंदर खेळाने जगभरातील प्रेक्षकांना टिव्हीसमोर खिळवून ठेवले होते.

या टेनिस सम्राज्ञीचे नाव होते स्टेफनी मरिया ग्राफ परंतू ही स्टेफी नावानेच प्रसिद्ध होती‌. १४ जुन १९६९ ला मॅनहेम, पश्चिम जर्मनीत जन्मलेल्या या टेनिस ललनेने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना तर टेनिस कलेने विरोधकांना पुरते घायाळ केलेले होते. ५ फुट ९ इंच उंची, गौरवर्ण, हलके निळे डोळे, सोनेरी केसांची ही सोनपरी टेनिस कोर्टवर अवतरली की "तुम हुस्नपरी, तुम जाने जहाँ, तुम सबसे हसी, तुम सबसे जवाॅं" ह्या ओळी आपोआप ओठांवर यायच्या. मुख्य म्हणजे स्टेफीचा कोर्टवर सहजसुंदर सभ्य वावर, त्यातच तिच्या पांढराशुभ्र पोषाखात ती एकदम डिसेंट दिसायची, क्वचित प्रसंगी रंगीत कपड्यात तर आणखीनच मोहक दिसायची आणि तिचे भारतीय साडी मधले रुप कित्ती कित्ती विलोभनीय असणार याची तर कल्पनाच करवत नसे. बस आपल्या हातात "बेचैन नजर बेताब जिगर, ये दिल है किसी का दिवाणा" एवढेच म्हणायचे बाकी असायचे.

अर्थातच "काबिले तारिफ होने के लिये, वाकिफ ऐ तकलीफ होना पडता है" हे विसरून कसे चालणार. स्टेफीचा जन्मच टेनिस प्रशिक्षकाच्या घरी झाल्याने आणि मातापिता दोघांच्याही नसानसांत टेनिस खळखळून वाहत असल्याने स्टेफीने टेनिसचे बाळकडू चिमुरड्या वयातच घेतलेले होते‌. अवघ्या तिन वर्षांची असतांना तिने घरबसल्या टेनिसची रॅकेट कशी फिरवायची याचे धडे घेतले तर चौथ्या वर्षी तिची चिमुकली पाऊले टेनिस कोर्टवर अवतरली. पाचव्या वर्षापासून तिने टेनिस स्पर्धेचा श्रीगणेशा केला तर सहाव्या वर्षी तिने आयुष्यातील पहिलीवहिली टेनिस स्पर्धा जिंकली. "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" असे म्हणतात मात्र स्टेफीचे पाय थेट टेनिस कोर्टवरच दिसू लागल्याने तिला आपले घर आणि प्रशिक्षक मातापित्यासोबत उज्वल भविष्यासाठी आपले घरदार सोडणे अपरिहार्य झाले होते.

अखेर मजल दरमजल स्टेफी एक्स्प्रेस १९८७ च्या फ्रेंच ओपनच्या फायनलला पोहोचली आणि तिने मार्टीना नव्रातिलोव्हाला धुळ चारत आपले पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले. इथून तिच्या टेनिस करिअरची गाडी सुसाट सुटली ती थेट १९९९ च्या फ्रेंच ओपनचे विजेतेपद सहाव्यांदा जिंकेपर्यंत. आपल्या स्वर्णीम कारकिर्दीत तिने ऑस्ट्रेलियन ओपन ४ वेळा, अमेरिकन ओपन ५ वेळा, फ्रेंच ओपन ६ वेळा, विम्बल्डन ७ वेळा जिंकली. १९८८ ला स्टेफीने ४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासोबतच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकत "गोल्डन स्लॅमची" कामगिरी करून दाखवली आणि अशी कामगिरी करणारी ती एकमेव खेळाडू ठरली. तसेच प्रत्येक ग्रॅंड स्लॅम स्पर्धा कमीतकमी ४ वेळा जि़कण्याचा मान तिलाच जातो. डब्ल्युटीए च्या मानांकनात सर्वोच्च स्थानी सर्वात जास्त वेळ आरूढ राहण्याचा भिमपराक्रम (तब्बल ३७७ आठवडे) स्टेफीच्याच नावावर आहे. 

महिला टेनिसमध्ये पदकतालिकेत ती मार्टीना (१६७), ख्रिस एव्हर्ट‌‌‌ (१५७) नंतर १०७ टायटलसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टेफीच्या या भव्यदिव्य यशामागे तिची अथक मेहनत, खेळाप्रती समर्पन आणि प्रचंड आत्मविश्वास दडलेला आहे. ग्रास कोर्ट हे तिचे आवडते मैदान असले तरी क्ले कोर्ट, हार्ड,फास्ट कोर्ट यावरही तिचा झंझावात बघायला मिळायचा‌. तिचे जबरदस्त फुटवर्क आणि ताकदवर फोरहॅंड फटके तिच्या विरोधकांना खेळताना चांगलेच घाम फोडायचे. इनसाईड आऊट फोरहॅंड पॉवरफुल ड्राईव्ह हे तिचे रामबाण अस्त्र होते. तिच्या रॅकेट ची स्पिड आणि स्विंग कमालीचा होता. तिची १७४ कि.मी‌. प्रती तासाची अचूक आणि ताकदवर सर्व्हिस महिला टेनिसमध्ये वेगवान सर्व्हिस मानली जायची.

एवढे सर्व यश पदरात पडल्यावरही तिला अहंकार कधी शिवला नाही. काहीशी लाजाळू आणि विनम्र असलेली स्टेफी "विद्या विनयेन शोभते" ची जिवंत उदाहरण होती. कोर्टवर कधीच आदळआपट नाही की पंचाचे निर्णय विरोधात गेले तर उगाचाच त्रागा नाही. अनावश्यक वादविवाद नाही की एवढी मोठी स्टार खेळाडू असून कुठलाच बडेजाव नाही. असे असले तरी तिच्या आयुष्यात काही अप्रिय आणि कटू प्रसंग आलेले होते. १९९३ ला स्टेफीची कट्टर प्रतिस्पर्धी असलेली मोनिका सेलेस कोर्टवर खेळत असतांना स्टेफीच्या एका जर्मन चाहत्याने मोनिका सेलेसच्या खांद्यावर चाकुने सपासप वार केले होते. स्टेफीला नंबर वन होता यावे म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले होते. मात्र झालेल्या या हिंसक घटनेने मोनिका सेलेस दोन वर्षांच्या वर काळासाठी टेनिस पासून दुर राहिली होती. १९९५ ला काल्फ मसल दुखापतीने ती चांगली हैराण झाली होती तर तिचे प्रशिक्षक आणि वडिलांना कर विवाद प्रकरणात ४५ महिन्यांची कैदेची शिक्षा झाली होती, जी नंतर २५ महिने करण्यात आली होती. 

१९९७ ते १९९९ दरम्यान टोंगळे आणि कंबरेच्या दुखापतीने तिला ग्रासले होते आणि हळूहळू तिला "हेल्थ इज वेल्थ" चे महत्व पटायला लागले होते. शिवाय आयुष्याच्या या टप्प्यावर कोणत्याही ग्रॅंड स्लॅम विजेतेपदापेक्षा "आरोग्यं धनसंपदा" किती महत्त्वाची आहे हे कळून चुकले होते. तसेच अमांडा कोईत्झर, याना नोवोत्ना, लिंड्से डेव्हनपोर्ट, मार्टीना हिंगिस आणि विलियम्स भगिनींद्वारे तिला कडवट झुंज देण्यात येऊ लागली होती. यामुळे "स्टेफी ग्राफच्या यशाचा ग्राफ" खाली डोकावूं लागला होता. अखेर या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून तिने १९९९ चे फ्रेंच ओपन जिंकूनही निवृत्तीचा निर्णय घेतला.

स्टेफीच्या निवृत्तीने तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली. ज्यांना टेनिसची एबीसीडी कळत नव्हती त्यांना फोरहॅंड, बॅकहॅन्ड, टेनिस कोर्ट, ग्रॅंड स्लॅम सारख्या शब्दांना स्टेफीने मुखोदगत करून दिले होते. स्टेफी जिंकली की चाहत्यांना स्वत: बाजी मारल्याची फिलींग येत होती तर स्टेफीला हरवणारी खेळाडू चाहत्यांसाठी व्हिलन ठरत असायची. "टेनिस करिता स्टेफी आणि स्टेफी करिता चाहते" असा अलिखित नियमच तयार झाला होता. एक मात्र खरे स्टेफीला जे चाहत्यांचे प्रेम, पसंती मिळाली, त्याची बरोबरी आणखी कोणत्या टेनिस खेळाडूला मिळाली असेल असे वाटत नाही. 

स्टेफीने जरी १९९९ ला अधिकृतपणे टेनिस मधून निवृत्ती स्विकारली असली तरी टेनिस रसिकांच्या हृदयातून ती कधीच निवृत्त होऊ शकणार नाही. तिचे टेनिस कोर्टवरचे आकर्षक पददालित्य, प्वाईंट जिंकली अथवा हरल्यावर निमुटपणे मान खाली घालत आपल्या जागी परतणे, सर्व्हिसची वाट बघतांना तिचे धारदार नाक आणि तिक्ष्ण नजर, सतत हलणारी केसा़च्या वेणीची शेपटी,,,,सर्वकाही लोभस आणि निव्वळ मन वेडावून टाकणारे होते. 

मात्र २००१ ला या टेनिस सम्राज्ञीने अमेरिकेचा नंबर एक खेळाडू आंद्रे अगासी याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या जगभरातील चाहत्यांची "इस दिले टुकडे हजार हुऐ, कोई यहाँ गिरा कोई वहा गिरा" अशी स्थिती झाली. लवकरच तिच्या संसारवेलीवर जेडेन आणि जाझ अशी दोन गोंडस फुले अवतरली.आपल्या टेनिस कारकिर्दीत प्रचंड व्यस्त असुनही तिला चांगले सामाजिक भान होते. १९९८ ला तिने युद्ध अथवा इतर कारणांनी जखमी, विकलांग बालकांसाठी "चिल्ड्रेन फॉर टुमारो" या सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती. 
**********************************
दि‌. १३ एप्रिल २०२२ 
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Tuesday, April 5, 2022

क्रिकेट विश्वचषक १९८३, भाग ०१

@#😈😈😈😈😈😈😈😈😈#@
  *हम होंगे कामयाब एक दिन,,भाग ०१*
*भारतीय क्रिकेटची पायाभरणी 'विश्वचषक ८३'*
***************************************
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी क्रिकेटला पैसा आणि प्रसिद्धीचे जे वलय लाभलेले आहे ते भाग्य हाॅकीच्या वाट्यास आलेले नाही. आज भारतीय क्रिकेटला जे सोन्याचे दिवस आलेले आहेत किंबहुना कसोटी, एकदिवसीय सामने, टी ट्वेंटीत बऱ्या प्रमाणात भारतीय क्रिकेट संघ जी दादागिरी दाखवत आहे त्याची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने १९८३ च्या विश्वचषकात रोवली गेलेली होती. पिढी दरपिढी यात नवनवीन खेळाडूंनी आपले योगदान देत क्रिकेटचा वृक्ष आणखी बहारदार केलेला आहे‌. शिवाय बीसीसीआयच्या अख्त्यारीत क्रिकेटचे नियमन येताच भारतीय क्रिकेटविश्व गर्भश्रीमंतीत दाखल झालेले आहे. चला तर मग विरंगुळा म्हणून आपण १९८३ च्या विश्वचषकाचे एक अवलोकन करूया.

१९८३ च्या पहिले भारतीय क्रिकेट संघ फारसा नावारूपाला आला नव्हता. तुरळक कसोटी विजय आणि सामने अनिर्णित राखणे यातच आपले सौख्य सामावले होते. नाही म्हणायला आपल्याकडे दिग्गज फलंदाजांची कमतरता नव्हती परंतु प्रतिपक्षाची दाणादाण उडवणारे किंवा उरात धडकी भरवणाऱ्या गोलंदाजांची वाणवा होती. शिवाय त्याकाळी वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि कांगारू सारख्या धाकड संघासमोर संघं शरणं गच्छामी ठरले असायचे. पहिल्या (१९७५) आणि दुसऱ्या (१९७९) एकदिवसीय विश्वचषकात तर आपल्या संघाची कामगिरी पाहून  तिसऱ्या म्हणजेच १९८३ च्या विश्वचषकाबाबत कुणीही फारसे आशावादी अथवा उत्साही नव्हतेच.

पहिल्या दोन विश्वचषकात एकूण सहा सामन्यात आपल्या संघाने फक्तन एक विजय मिळवला होता. १९७५ ला भारतीय संघ इंग्लंड, न्युझीलंड आणि पुर्व आफ्रिका संघासोबत अ गटात समाविष्ट होता आणि दुबळ्या पुर्व आफ्रिका संघावर १० गड्यांनी मात करत एकमेव विजय मिळवला होता. १९७९ च्या दुसऱ्या विश्वचषकात तर परिस्थिती आणखी हलाखीची होती. वेस्ट इंडिज, न्युझीलंड आणि लंकेसमवेत भारतीय संघ ब गटात सामील होता. यावेळी तर कसोटीचा दर्जा प्राप्त न झालेल्या लंकेकडून आपल्याला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती.

 अर्थातच पहिल्या दोन्ही विश्वचषकात पहिल्याच फेरीत गारद होत भारतीय संघ परतल्याने १९८३ ला वर्हाड लंडनला जाऊन कोणते दिवे लावणार याबाबत शंका नव्हती. मात्र प्रत्येक काळ्या ढगाला चंदेरी किनार असते हे विसरून कसे चालणार होते,,, आणि झालेही तसेच.
Winner doesn't do different things, they do things differently असे का म्हणतात याचा प्रत्यय १९८३ ला आला‌. पाकविरूद्ध सुनिल गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाचा चांगलाच दणका बसला होता.  खरेतर ही एकादृष्टीने इष्टापत्तीच होती. विश्र्वचषक स्पर्धेच्या अवघे चार महिन्याआधी कपीलदेवच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आणि इथेच भारतीय संघाच्या नियतीने गालात खुदकन हसणे सुरू केले होते. १९८३ ला भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता आणि अपेक्षेप्रमाणे आपण कसोटी मालिका २/० ने गमावली होती. मात्र एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आगामी विश्वचषकात आपण नक्की काय करू शकतो याची किंचितशी कल्पना आलेली होती. गयानाच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य विंडीजला भारतीय संघाने त्यांच्याच मायभुमीत खडे चारले होते.
वास्तविकत: १९७५, १९७९ असे दोन्ही विश्र्वचषक जिंकत विंडीजचा संघ त्याकाळी ऐन भरारीत होता. त्यांचे फास्ट अँड फ्युरीअस गोलंदाज विरोधी फलंदाजांची खांडोळी करण्यात तरबेज होते तर त्यांचे निष्ठूर निर्दयी फलंदाज कोणत्याही गोलंदाजांची लिलया कत्तल करण्यास त्यांना अजिबात सोयरसुतक नव्हते. नाणेफेक कोण जिंकले, खेळपट्टी कशी आहे, गेमप्लान काय आहे याच्याशी त्या संघाला काहीही देणेघेणे नव्हते. क्रिकेट विश्र्वाचे अनभिषक्त सम्राट असल्याने विंडीज विरूद्धचा एक विजय भारतीय संघाला विशेषतः कपिलदेवला नवी उर्मी, नवी उर्जा देऊन गेला होता. विंडीजला आपण एकदा हरवू शकतो तर वारंवार का हरवू शकत नाही या अतृप्त लालसेची एकमेव शिदोरी विश्वचषकापुर्वी भारतीय संघाच्या पाठीशी होती.
क्रमश:,,,,,
**************************************
दि. ०५ एप्रिल २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...