@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*मुंबई इंडियन्सची साडेसाती संपेना*
*डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आयपीएलचा पंधरावा हंगाम ऐन भरात आला असून सर्वाधिक वेळ आयपीएल चषक पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सची मात्र वाताहत झाली आहे. तब्बल पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या रोहीतच्या संघाला साडेसाती लागली असून त्यांनी या हंगामातला सतत सातवा पराभव आपल्या नावे केला आहे. ना फलंदाजी, ना गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या मुंबई इंडियन्सचे दाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही अशी दुरावस्था झाली आहे. सोबतच रोहीतच्या ताफ्यातील बिनीचे शिलेदार निष्प्रभ ठरत असल्याने मुंबई इंडियन्स चे "जो भी कदम बढे, बर्बादी की ओर बढे" असे हाल झाले आहे.
झाले काय तर आयपीएलच्या नवीन नियमावली नुसार प्रत्येक संघांना काही खेळाडूंना सोडचिठ्ठी द्यावी लागली. अर्थातच यात एकसे बढकर एक खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई संघाला खुपच फटका बसला. कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या करत इतर संघांनी क्लिंटन डिकॉक, पांड्या बंधू, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आदी खेळाडूंची पळवापळवी केली. वास्तविकत: मुंबई संघाची ब्रॅण्ड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. त्यांनी खिसा चांगला खाली केला तरीपण रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात अशीच स्थिती आहे. त्यांनी इतकी वर्षे गुंफलेली खेळाडूंची माला हर्रासी बोलीने एका झटक्यात तोडून टाकली. यामुळे मुंबई संघाची अवस्था पवार साहेबांनी कांग्रेस बाबत जे म्हटले होते अगदी त्यासारखीच झाली आहे,,म्हणजेच ओसाड गावाच्या पाटीलकी सारखी.
मुंबई संघाने रोहीत, सुर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहला राखून धरले. मात्र आत घेतलेले नवीन खेळाडू निव्वळ खोगिरभरती ठरले. तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेवीसचा अपवाद वगळता इतर खायला काळ भुईला भार ठरले. निश्चितच नवोदित खेळाडूंवर इतक्या लवकर शिक्कामोर्तब करणे त्यांच्यावर अन्याय आहे परंतु सामन्याच्या शेवटी तुम्हाला फक्त निकालाशी देणेघेणे असते. त्यातच जर तुमचा संघ विजयी होत असेल तर सोन्याहून पिवळे. मात्र जिथे खुद्द कर्णधारच चाचपडत आहे, रोहीतचा कच्चा बादाम झाला आहे,,,तिथे कच्चे निंबू काय करणार?
देशभरात हिट वेव्ह सुरू झाली असली तरी हिटमॅन रोहीतला अजुनही फलंदाजीत सुरू गवसलेला नाही. या हंगामात त्याने एकोणविसच्या सरासरीने केवळ एकशे चौदा धावा गोळा केल्या आहे. सलामीवीर ईशान किशनचे कभी खुशी कभी गम चालू आहे तर एकटा सुर्यकुमार कितीदा तळपणार हा प्रश्नच आहे. तिलक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस मुंबईची फलंदाजी गुंफू पाहतात पण जिथे आभाळच फाटले आहे तिथे कोणाचाच इलाज चालत नसतो. खरेतर मुंबई संघाजवळ क्रिकेटचा गॉड सचिन आहे , शिवाय फलंदाजीचा गॉडझिल्ला कायरन पोलार्ड पण आहे. मात्र यावेळी पोलार्डने निद्रिस्त ज्वालामुखीचे रुप घेतल्याने डावाच्या शेवटी आग लावणारे कोणीच उरले नाही.
पुर्वी पांड्या बंधू संघात असतांना मैदानावर करून दाखवलं आणि मैदानाबाहेर करून आलो म्हणून दंगा करत होते. मात्र हे दोघेही अहिरावण महिरावण संघात नसल्याने मुंबईचीच लंका जळत आहे. वर चांगली फलंदाजी नाही झाली तर खाली आनंदी आनंद असतो. पांड्या बंधुंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत खारीचा वाटा उचलून कित्येकदा मुंबई संघाला विजयसेतू बांधून दिला होता. खेळाडू निलामीच्या बुलडोझर ने मुंबईचा विजयसेतू उध्वस्त करून टाकला आहे. चुकून माकून मुंबई संघाने चांगल्या धावा उभारल्या तरी गोलंदाजीत ठण ठण गोपाळा ठरलेलेच आहे.
मुंबईच्या यशात गोलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. बुमराह बोल्ट या ग्लोबल गोलंदाजांच्या दबदब्याने पांड्या बंधू, राहुल चहर सारखे लोकल गोलंदाज भाव खाऊन जात होते. बुमराह बोल्ट चे आठ षटके प्रतिस्पर्धी संघांना चांगलेच रखडवत होते. मग याच गोंधळात उर्वरित गोलंदाज काम फत्ते करून टाकायचे. मात्र या दोघांची जोडी फुटली आणि तिकडे मुंबई संघाचे नशिब फुटले. अकेला फडणवीस क्या करेगा प्रमाणे अकेला बुमराह क्या करेगा हा यक्षप्रश्न निर्माण झाला. फडणवीसांना कमीतकमी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, किरीट सोमय्यांचे बॅकप पॉवर तरी आहे, बुमराह याबाबतीत कमनशिबी ठरला.
एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून गणल्या गेलेल्या रोहीतची हतबलता आपण समजू शकतो. मात्र त्याची फलंदाजी का रुसली याचे उत्तर त्यालाच शोधावे लागेल. या हंगामात ओळीने सात पराभव झाल्याने विजयाची सप्तपदी त्याच्या नशिबी दिसत नाही. अजुनही विजयाची बोहणी न झाल्याने मुंबई इंडियन्स संघाला रस्त्यावर टेबल खुर्ची टाकून जिओ सिम विकण्याची सक्ती येऊ नये म्हणजे झाले. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स सारखे नवोदित संघ गुणतालिकेत अग्रेसर असतांना मुंबई संघ दो गज जमीन के निचे का झाला हा गंभीर प्रश्न आहे.
कदाचित खेळाडू निवडतांना झालेली गफलत मुंबई संघाच्या मुळाशी आलेली दिसते. मुंबई संघ जळत असताना जोफ्रा आर्चर फिडल वाजलण्यात गुंग आहे. डिकॉक सारखा उमदा सलामीवीर, पांड्या बंधू सारखे अष्टपैलू खेळाडू, बोल्ट सारखा धारदार, अचूक गोलंदाज यांची कमतरता अदलाबदली खेळाडूंनी अजिबात पुर्ण केलेली नाही. सोबतच रोहीत सकट ईशान, पोलार्डचे फलंदाजीतील अपयश मुंबईची नाव डुंबण्याला पुरेसे ठरले. असे असले तरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हिरमुसले होऊन चालणार नाही. आत्ताही त्यांचा आवडता संघ आयपीएलच्या थेट अंतिम सामन्यात धडक मारु शकतो. कारण अंबानींचा संघ म्हणून त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री नक्कीच मिळू शकेल.
*********************************
दि. २२ एप्रिल २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment