Saturday, August 6, 2022

काश्मीरची ऑगस्ट क्रांती

@#😈😈😈😈😈😈😈#@
           *अगंबाई अरेच्चा*
    *काश्मिरची "ऑगस्ट क्रांती*
******************************
दि. ०५ ऑगस्ट २०१९ दिल्लीला या भुतलावरचे नंदन'वन' असलेल्या काश्मिर प्रश्नासाठी 'वन'डे मॅच खेळली गेली आणि गृहमंत्री अमीत शहा यांच्या तुफानी टोलेबाजीने ३७० चे अशक्यप्राय आव्हान लिलया पेलत भारताने दणदणीत विजय नोंदवला. अर्थातच नतद्रष्ट विरोधकांनी इथेही हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रयत्न केला तरीपण डकवर्थ लुईसनुसार १२५ विरूद्ध ६१ असा एकतर्फी विजय साकारत मोदी, शहा जोडीने देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. कालच्या या भुतो न भविष्यती रणसंग्रामात श्री अमीत शहा मॅन ऑफ दी मॅच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॅन ऑफ दी सिरीज ठरले.

खरेतर भारताचा मुकुटमणी, मानबिंदू असलेले काश्मिर ही या देशाच्या माथ्यावरची भळभळती जखम होती. दिवस गेले, वर्षे गेली, सरकारे आली आणि गेली मात्र काश्मिर प्रश्न सुटण्याऐवजी आणखी चिघळतच गेला. किंबहुना कोणताही, एखादा प्रश्न सुटत नसला तर त्याला "कश्मिर प्रश्न" म्हणण्याची दुर्देवी प्रथाच पडली होती. हजारो सैनिकांचे बलिदान, लाखो करोडोंचा चुराडा करूनही हा प्रश्र्न काही केल्या सुटत नव्हता ना निगलते बनता ना उगलते बनता अशा भयानक कात्रीत सापडलेल्या या संकटाला सामोरे जायचे कसे हा यक्षप्रश्नच होता.

अखेर २०१४ साल उजाडले आणि बऱ्याच गोष्टींचा हळूहळू उलगडा होत गेला. देशभक्ती, राष्ट्रप्रेम, संस्कृती आणि अस्मिता सारख्या जाणुनबुजून वाळीत टाकलेल्या जिव्हाळ्याच्या विषयांना पुनर्जिवित करण्यात आले. यासाठी मग कठोर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येऊ लागली.  दुर्बल, हतबल आणि नेभळट नेतृत्वाला मुठमाती देऊन देशाने पहिल्यांदाच खमक्या पंतप्रधान पाहिला. मतांना नव्हे तर देशाला आणि देशवासीयांना केंद्रस्थानी ठेऊन धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. शत्रू ,मग ते सिमेवरील असो की देशांतर्गतले त्यांची नांगी ठेचण्यात या सरकारने अजिबात मागेपुढे पाहिले नाही. 

राहीला प्रश्न काश्मिरचा तर याकरीता सरकारने पीडीपी सारख्या पक्षाशी युती करून बॅकग्राऊंड तयार केले. मुळावर घाव घातले की फांद्या आपोआप खाली येतात हे सुत्र या सरकारने वापरल्याने त्यादिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे  भारतीय सुखसोयींच्या भरवश्यावर पोसलेल्या परजिवी बांडगुळांच्या आर्थिक नाड्या आवळल्याने आणि पाक समर्थकांना जेरबंद केल्याने सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले होते. तरीपण निर्णायक विजय मिळवण्यासाठी याप्रकरणी एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि याकामी प्रमुख भुमिका निभावली ती या देशातील राष्ट्रप्रेमी जनतेने.

तमाम राजकीय पंडीतांना तोंडघशी पाडत या जनतेने या सरकारला विक्रमी मतदान केले आणि मजबुत, स्थिर आणि दृढनिश्चयी सरकार येताच काय चमत्कार घडू शकते याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. मग ते नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ट्रिपल तलाक, युएपीए बिल असो वा सध्याचे ३७० कलम रद्द करणे असो. सरकारच्या नियत, मनसुबे आणि कार्यपद्धतीवर जनतेचा गाढ विश्वास असल्याशिवाय हे सर्व शक्यच नव्हते. वास्तविकत: हा प्रश्न यापुर्वीचे सरकारही सोडवू शकले असते मात्र दुबळे नेतृत्व, राजकीय हतबलता, इच्छाशक्तीचा अभाव, आतंक्या़बाबत बोटचेपे धोरण यामुळे हा प्रश्र्न वर्षानुवर्षे खदखदत राहीला. अखेर दुसऱ्यांदा जनतेने पारड्यात भरभरून मते टाकताच हे सरकार आपल्या वचनाला जागले आणि तयारी सुरू झाली एका क्रांतीची. कोणालाही कानोकानी खबर न होऊ देता अत्यंत धुर्तपणे रणनिती आखली गेली.

 सुरक्षेच्या दृष्टीने अमरनाथ यात्रेला स्थगिती दिली गेली. बाहेरचे पर्यटक, प्रवासी आणि इतरांना काश्मिर सोडण्याचे फर्मान जारी झाले. प्रचंड फौजफाटा काश्मिरात बंदोबस्तासाठी दाखल झाला. डोनाल्ड ट्रम्पसारख्या विदुषकाकडे कानाडोळा करण्यात आला. गोंधळलेल्या विरोधकांना कवडीची किंमत न देता काश्मिरातील ऐतखाऊ, पाकधार्जिण्या नेत्यांची गठडी वळण्यात आली. बाजारू मिडीयात अफवांची त्सुनामी आली. सर्वत्र भितीयुक्त चिंतेचे वातावरण होते मात्र मोदी, शहा म्हणजेच जयविरूची जोडी गालातल्या गालात हसत एका ऐतिहासिक घटनेला जन्म देणार होती. पाच ऑगस्टची सकाळ भारतमातेच्या ललाटी असलेल्या जखमेला पुर्णविराम देणारी ठरली. अगदी छत्रपती महाराज अफझलखानाच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी जाण्यासारखा प्रसंग जिवंत झाला. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 

सकाळी अकरा वाजता गृहमंत्री राज्यसभेत पोहचले आणि अवघे देशवासी श्वास रोखून अमीत शहा काय बोलणार यासाठी कान टवकारून बसले. अखेर मास्टर ब्लास्टर गृहमंत्र्यांनी ३७० रद्दबातल होण्याची घोषणा करताच संपूर्ण देश जल्लोषात बुडाला, जागोजागी फटाके फुटले, चौकाचौकात मिठाई वाटण्यात आली, घर रस्त्यांवर जनता फेर धरून नाचू लागली आणि तमाम जनता या राष्ट्रउत्सवात न्हाऊन निघाली. नाठाळ विरोधकांनी मात्र या ऐतिहासिक प्रसंगी हम नहीं सुधरेंगे चा राग आवळत जनतेची नाराजी ओढवून घेतली. पिडीपीच्या सदस्यांनी संविधान,घटना फाडण्याचे पातक केले तर इतर विरोधकांनी अनावश्यक गोंधळ आणि विधवाविलाप करत आपल्या कोत्या मानसिकतेचे प्रदर्शन घडविले. 

सर्जिकल स्ट्राईक प्रकरणी शंका घेऊन टिकेचे धनी झालेल्या केजरीवालांनी यावेळी दुधाने पोळले म्हणून ३७० चे ताक फुंकून पिले. तर सिबिआय अथवा ईडीच्या दंडुक्याला घाबरून मायावतींनी सरकारचे समर्थन तर केले नाही ना अशी शंका येते. बीजेडी, वायआरएस कॉंग्रेसने काळाची पाऊले लगेच ओळखली तर शिवसेना ताकदीने सरकारच्या पाठीशी राहीली. लोकसभेला सरकारवर सडकून टिका करणारे राज ठाकरे  केंद्राची तरफदारी करतांना दिसले तर जाणते राजे याप्रकरणी अजाणते राहीले.  तृणमूल, नितीशकुमारांनी मात्र विरोधाचा सुर आवळला. 

काश्मिरप्रश्नाचा आत्मा हा ३७० नावाच्या पोपटात दडला होता. आतंकवाद, सिमेवरील घुसघोरी, पत्थरबाज किंवा पाकधार्जिण्यांची जी काही मुजोरी चालायची ती ३७० च्या जिवावर. अर्थातच हे कलम अस्थायी होते मात्र कुत्रे ज्याप्रकारे जखम चाटुन चाटुन मोठे करते अगदी याच धर्तीवर आधीच्या राज्यकर्त्यांनी याप्रश्नाचा चोथा केला. खरेतर लाथोंको भुत बातोंसे नहीं मानते अशी स्पष्ट स्थिती असतांनाही शांततेची कबुतरे, विवेकाचे फुसके फुगे, वांझोट्या, निष्फळ चर्चा यातच काळवेळ दवडला गेला. राष्ट्रद्रोह्यांकडून राष्ट्रवादाची अपेक्षा केली गेली आणि इथेच घात झाला. आतंकी, देशद्रोही, पाकधार्जिण्यांचे कवचकुंडले असलेले ३७० "कलम",,,या सरकारने  "कलम" करताच काश्मिर प्रश्नाला मुठमाती देऊन इतिहास घडवला गेला. 

 याप्रकरणी गरज होती ती खंबीर नेतृत्वाची, दृढनिश्चयाची, पोलादी बाण्याची, कर्मठ हिंमतीची,,, आणि मोदी, शहा जोडीने नेमके हेच केले. सत्तर वर्षे जुनी समस्या सहजतेने हाताळण्यात हे सरकार यशस्वी ठरले आणि काश्मिरच्या ऑगस्ट क्रांतीला मुर्तरुप देण्यात आले. निश्चितच नथिंग इज इम्पाॅसिबल असे म्हटल्या जाते ते याचकरीता. शेवटी प्रश्र्न काश्मिरचा असो अथवा इतर कोणताही,,,, त्याबाबत आपण एवढेच म्हणू शकतो,,,
*कौन कहता है आसमांमे सुराख नहीं हो सकता*
*एक पत्थर तबीयतसे उछालो तो यारों*
*********************************
दि. ०६ ऑगस्ट २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...