@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*सुपर सामन्यात पाक सुपरहिट*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
आशिया चषकातील सुपर फोर सामन्यात पाकने परंपरागत प्रतिद्वंदी भारताला नमवून साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढला आहे. भारतीय संघाने चांगली धावसंख्या उभारुनही गोलंदाजी निष्प्रभ ठरल्याने आपल्या संघाला पराभूत व्हावे लागले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत पाक फलंदाजांनी सैरभैर झालेल्या भारतीय गोलंदाजीचा बिमोड करत विजय मिळवला आहे. फलंदाजांनी कमावले तर गोलंदाजांनी गमावले असे एकंदरीत या सामन्याचे वर्णन करता येईल.
खरेतर आपला पराभव होताच आपल्या संघातील उणीवा स्पष्ट दिसायला लागल्या आहेत आणि याची सुरुवात होते संघ निवडी पासून. प्रतिष्ठेच्या आशिया चषकात आपण केवळ तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळतो ही एक प्रकारची गंमतच आहे. त्यातही आवेश खान आणि अर्शदिपसिंग सारखे काच्चा बादाम असल्यावर आनंदी आनंद. वास्तविकत: आपल्याकडे मो.सामी, मो.सिराज, शार्दुल ठाकूर, दिपक चहर सारखे फिनिश्ड प्रॉडक्ट असतांना आवेश, अर्शदिप सारखा कच्चा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरवायचाच कशाला? त्यातही हे दोघे द्विपक्षीय मालिकेत चालून गेले परंतु विश्वचषकाचे बोन्साय असलेल्या आशिया चषकात नेमके किती चालतील हा प्रश्नच आहे.
दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखे दुर्दैवाने जडेजा जायबंदी झाला. तर अनुभवी आणि क्रिकेट कारकिर्दीत एकंदर साडेसहाशेच्यावर बळी टिपणारा अश्विन ड्रेसींग रुममध्ये आराम करतोय. किंबहुना संघ व्यवस्थापनाने त्याला दुबईच्या संग्रहालयात ठेवायचा मानस केलेला असावा. मोजक्याच साधनांचा मेळ साधत रोहीतला पाकचा मुकाबला करायचा होता. त्यामुळे त्याने निव्वळ चार गोलंदाज आणि अष्टपैलू हार्दिकवर विश्वास ठेवला आणि इथेच थोडा घोळ झाला. प्रमुख किंवा अस्सल पाच गोलंदाजानंतर हार्दिकची गोलंदाजी म्हणजे आयसींग ऑन दी केक असते. मात्र जेव्हा तो प्रमुख पाच गोलंदाज म्हणून खेळवला जातो तेव्हा त्याची कामगिरी दारिद्र्य रेषेखालील असते.
भारतीय फलंदाजीचे चित्र निश्चितच आशादायी आहे. या सामन्यात रोहीत आणि विराट अगदी त्यांच्या नावारुपाला जागत खेळले. विशेषतः सलामीला रोहीत राहुलने पाकवर त्वेषाने हल्ला करत सामन्याचा झकास प्रारंभ करून दिला होता. मात्र राहुल चांगली फलंदाजी करतोय म्हणजे ते धावपट्टी फलंदाजीला पोषक असल्याचे संकेत होते. म्हणूनच धावसंख्या कमीतकमी दोनशेच्या टप्प्यात राहील अशी अपेक्षा होती. मात्र चितलं ते घडत नसतं आणि झालेही तसेच. सलामीवीरांनी दामटलेल्या फेरारीला ब्रेक लागताच टीम इंडियाने धक्का स्टार्टचे रुप घेतले. विराटने वेळोवेळी धावांचे पेट्रोल टाकून विस्कटलेली फलंदाजी सावरली. तरीपण सुर्यकुमार, रिषभ, पांड्या हे शोभेचे बाहुले ठरले तर दिपक हुड्डाकडे तोकडा वेळ असल्याने त्याला मर्यादा आल्या.
ज्या मध्यफळीवर आपल्याला गर्व होता तिच कोसळल्याने दोनशे धावा म्हणजे "दुबई बहोत दूर है" अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खरेतर रिषभ पंतचा प्रवास ब्लॉकबस्टर ते बुजगवाण्याकडे झाल्याने आपल्या संघाला त्याचा चांगलाच फटका बसला. आतातर रिषभ पंतने "सोनेरी संधीचे मातेरे कसे करायचे" याचे कोचिंग क्लासेस घ्यायला हवे. पाकने रिषभला लेगवर गोलंदाजी करत त्याचे पाय बांधून ठेवले आणि उतावीळ होत त्याने आपली विकेट फेकत बेजबाबदारपणा दाखवून दिला. गत सामन्यातील हिरो पांड्या आला कधी, गेला कधी कळलेच नाही . अखेर हुड्डा, विराट परतताच आपली फलंदाजी संकुचली. नशीब समजा शेवटच्या षटकांत फखर झमनने शेजारधर्म निभावत आपल्याला दोन चौकारही बहाल केले आणि रवी बिश्नोईचा झेलसुद्धा सोडला म्हणून आपण १८० पार करू शकलो.
पाकला रोखण्यासाठी बाबर आणि रिझवानला थोपवण्याची मोठी कामगिरी भारतीय गोलंदाजांवर होती. त्यातही बाबर लवकरच गळाला लागल्याने भारतीयांच्या आशा बळावल्या होत्या. मात्र रिझवानने जीब्राल्टरचा खडक बनून भारतीय आशा अपेक्षा धुळीस मिळवल्या. भुवी, अर्शदिप आणि रवी बिश्नोई ने प्रारंभी सुरेख मारा करत सामना जीवंत ठेवला. मात्र त्यामानाने चहल पांड्याला सुर गवसला नव्हता. वर फारशी पडझड न झाल्याने हळूहळू भारतीय गोलंदाजीची धार बोथट झाली आणि इथेच आपले आक्रमण ढेपाळल्याने पाकचा विजयपथ सुकर होत गेला. त्यातच बिश्नोई भुवीने करून सरून भागले अन वाईड ला लागले सारखी वाईट गोलंदाजी करत भारताच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या.
कधी नव्हे ते या सामन्यात कर्णधार रोहीत गोंधळल्या सारखा वाटला. निष्प्रभ गोलंदाजीने त्याच्या चिंता वाढविल्या होत्या तर ऐन मोक्याच्या वेळी अर्शदिपने धोकादायक आसिफ अलीचा झेल सोडून पाकच्या फखर झमनला रिटर्न गिफ्ट दिले. खरोखरच या सामन्यात भारत पाक क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जुळी भावंडं शोभत होते. निश्चितच या सामन्यात पाक संघ विजयाचा हकदार होता. रोहित राहुलच्या धडाकेबाज प्रारंभानंतरही पाक गोलंदाजांनी जबरदस्त कमबॅक करत भारतीय फलंदाजांना हात मोकळे करू दिले नाही. अन्यथा आपली सुरूवात पाहता सहजपणे दोनशे धावा झाल्या असत्या.
मात्र आता पश्चात्ताप करून फायदा नाही. चहलला आराम देऊन एकतर अश्विन किंवा अक्षर पटेलला उर्वरित सामन्यात संधी द्यावी. सोबतच बेभरवशाच्या रिषभ पंत ऐवजी ओल्ड इज गोल्ड दिनेश कार्तिकला संघात स्थान द्यावे. शिवाय पाच तज्ञ गोलंदाज संघात नसण्याची चुक आपल्या संघाला परतीचे तिकीट देऊ शकते. तसेही या सामन्यात दिपक हुड्डाचा गोलंदाज म्हणून उपयोग का केला गेला नाही हा प्रश्न उरतोच. सरतेशेवटी राहुल, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले अत्यंत गरजेचे आहे. सोबतच गोलंदाजांना आपली वज्रमूठ आवळणे जरूरी आहे तेंव्हाच कुठे आपल्याला अंतिम फेरीच्या आशा बाळगता येईल.
*********************************
दि. ०५ सप्टेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment