@#😈😈😈😈😈😈😈😈#@
डॉ अनिल पावशेकर
**********************************
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू,,, या श्लोकात गुरू म्हणजेच शिक्षकांचे महत्व प्रतिपादीत केले आहे. अर्थातच मातीच्या गोळ्याला योग्य आकार देण्याचे पुण्यकर्म गुरूद्वारे केले जाते. बालपण ते युवावस्था किंबहुना आजिवन गुरुंचे मार्गदर्शन लाभल्याने जिवन सुकर, सुलभ होते. असेच आमचे महाविद्यालयीन गुरुवर्य डॉ जगमोहन राठी सर यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचा आणि महाविद्यालयीन कालाचा आढावा या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सन १९८६ पासून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत विदर्भातील ३०% जागा इतर विभागांसाठी (मुंबई,मराठवाडा) राखीव करण्याचा निर्णय झाला आणि आमच्या स्वप्न,भविष्याची राखरांगोळी करून गेला. योग्यता असुनही विभागीय आरक्षणाचा दुष्टचक्रात कित्येक गुणवंतांचा शैक्षणिक मुडदा पाडला गेला. कारण त्यावेळी वैद्यकीय प्रवेश बारावी बोर्डाच्या गुणांवरून केले जात असायचे. विदर्भाच्या तुलनेत मुंबई आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना भरमसाठ मार्क्स मिळत असायचे. विदर्भातील जागा या दोन विभागातील विद्यार्थी पटकवायचे परंतू विदर्भातील विद्यार्थी मागे पडायचे.अर्थातच हे हलाहल पचवून आम्ही आलीया भोगाशी असावे सादर म्हणून पुढे सरसावलो. मात्र या घटनेचा मनावर इतका परिणाम झाला आणि दु:खाच्या बाबतीत आम्ही इतके आत्मनिर्भर झालो की यानंतर "दुख किस बला का नाम है" हे आमच्या आयुष्याचे ब्रिदवाक्य ठरले. आत्यंतिक दु:खातही आमचा हसरा चेहरा पाहून मित्रमंडळी आजही आम्हाला चेष्टेने लाफिंग डॉक्टर म्हणतात.
सांगायचे तात्पर्य असे की बीएएमएस प्रथम वर्षाला एकमेकांचे दु:खी, अगतिक, केविलवाणे, गरिब आणि बापुडे चेहरे वारंवार पाहुन आम्हाला थोडी धिटाई आली होती. मनातल्या मनात "दुनिया में कितना गम है,मेरा गम कितना कम है" हे गुणुणत असायचो. त्यातच काही बेफिकीर, बंडखोर, मस्तवाल आणि उद्धट मित्रांची साथ मिळताच ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला अशी आमची स्थिती झाली होती. मात्र याच बऱ्यावाईट संगतीने आम्ही वैज्ञानिक नसलो तरी दु:खाचे रुपांतर सुखात करायला शिकलो.
एवढी कलाकारी अंगी येताच मग १९८८ साल उजाडले आणि सुरू झाली आमची मस्ती की पाठशाला. आमचे कॉलेज आमच्यासाठी नंदनवन होते. लहानपणी बागडण्याची उरलीसुरली हौस इथे कशी पुर्ण करता येईल यातच आमची विचारशक्ती गुंतुन जायची. मस्ती, टवाळखोरी आणि दंगलमंगल साठी कॉलेजचा वेळ कमी पडायचा. यासाठी मग क्लासरूममध्ये शिक्षक आले की आम्हा मित्रांचे विविध सुप्तगुण वर उफाळून यायचे आणि त्याचे प्रदर्शन घडत असे. निश्र्चितच गुरूजनांचा आम्ही आदर करायचो तर काही गुरुवर्य आम्हाला मित्रवत वाटायचे. किंबहुना आमच्या मर्कटटोळीला कसे हाताळायचे याचे त्यांना पुरेपूर ज्ञान असावे.
द्वितीय वर्षाला स्वस्थवृत्त नावाचा विषय होता. अर्थातच "(त्यावेळी) नॉन क्लिनिकल विषय म्हणजे निव्वळ टाईमपास" असतो हा आमचा ठाम समज होता. मधल्या सुटीत गायब होऊन आम्ही थेट शेवटच्या स्वस्थवृत्ताच्या क्लासला यायचो आणि निव्वळ उधम करायचो. काही तंतरलेले तर काही मंतरलेले विद्यार्थी इतर क्लासेसला मागच्या रांगेत बसायचे परंतु स्वस्थवृत्ताच्या क्लासला अगदी समोर ठिय्या मांडून बसायचे. मात्र आमच्या दंगामस्तीला आवर घातला तो डॉ. जगमोहन राठी सरांनी.
उंचपुरे, गौरवर्ण, नावाप्रमाणेच चेहऱ्यावर सदैव मनमोहक स्मितहास्य आणि लोभस व्यक्तीमत्वाचे धनी असलेले राठी सर क्लासमध्ये येताच आम्ही जल्लोषात डुंबून जायचो. खरेतर योग शिकविण्यात सरांचा हातखंडा असायचा. मात्र त्यावेळी आमच्या दृष्टीने योग हा विषय निरुपयोगी असून रसायन वाजीकरण आम्हा मित्रांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आणि कान टवकारण्याचा विषय होता. हाच विषय सरांनी शिकवावा यासाठी आम्ही मित्र आग्रही असायचो. परंतू यात ज्ञानार्जन कमी आणि मनोरंजन जास्त असल्याने तसेच आमच्या टोळक्याची दुष्ट मनिषा ओळखून सर यातून सहज मार्ग काढायचे.
खरेतर सर आम्हाला गुरु कमी मित्र जास्त भासायचे. शांत, संयमी आणि एखाद्या हिरो सारखे व्यक्तीमत्व लाभलेले सर विद्यार्थ्यांत प्रचंड लोकप्रिय होते. मुख्य म्हणजे कबीर बेदी नंतर चेहऱ्यावर दाढी शोभायची ती फक्त राठी सरांच्या. विशेष म्हणजे द्वितीय वर्षाला आमची आनंदवनला शैक्षणिक सहल आयोजित केली होती. आमच्या क्लासची किर्ती पाहता सहसा कोणीही शिक्षक सोबत यायला धजावत नसायचे. कारण आमच्या खोड्या आणि धिंगाणा पाहता आम्ही आमच्या पुर्वजांचे अर्थातच बंदरांचे खरेखुरे वारसदार आहोत यात कुणालाही शंका येत नसायची, त्यामुळे अशा बॅचच्या दूर राहणेच गुरूजन पसंत करायचे.
तरीपण राठी सरांनी हे शिवधनुष्य योग्यरीत्या पेलले आणि आम्ही सर्वांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. ३६४ दिवस हसण्या खिदळण्यात गेले की त्याची भरपाई वायवा म्हणजेच तोंडी परिक्षेत व्हायची. विषमज्वर म्हणजे मलेरिया की टायफॉइड यातच आमचा नेमका घोळ व्हायचा आणि वायवामध्ये तोच लोच्या झाला. अखेर शेवटची हेल्पलाईन म्हणून आमच्या नजरा राठी सरांवर खिळल्या. सर मात्र नेहमीप्रमाणेच निर्गुण निराकार आणि शांतचित्ताने आमची घालमेल बघत होते. अखेर मंदस्मित करत सरांनी "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" चा संकेत देताच आम्ही नि:श्र्वास सोडला होता आणि दुसऱ्या वर्षीची परिक्षा पहिल्या प्रयत्नातच उरकवली होती.
आपल्या स्वच्छ प्रतिमेने आणि आपुलकीच्या वागण्याने सरांनी विद्यार्थ्यांच्या ह्रदयावर कायम राज्य केले आहे. "श्री" मधून सरांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला आणि युजी, पीजी, विभागप्रमुख ते उपप्राचार्य पदापर्यंत यशस्वी मजल मारली. सर सध्या डी वाय पाटील आयुर्वेद विद्यापीठात पीएचडी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.२०१४/१६ या कालावधीत निमा नागपूर संघटनेचे अध्यक्षपद सरांनी उत्तमपणे भुषविले. तर आपल्या संघटनकौशल्याने लायन्स क्लबमध्ये अध्यक्षपद आणि झोन चेअरपर्सन पदांची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळली. सोबतच विदर्भ प्रांतिय आयुर्वेद संम्मेलनचे कोषाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे.
जवळपास ३४ वर्षांचे शैक्षणिक ज्ञानकुंड चेतवत सरांनी शेकडो विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ ओरडून, शिक्षा करून किंवा नापास करून नाही तर त्यांच्यात विश्र्वास जागवून आणि खेळीमेळीच्या वातावरणाने घडवता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. आजही सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात सरांचा उत्साह आणि वावर एखाद्या तरुणाला लाजवणारा आहे. विशेषतः मी आणि प्रदिप पाटील म्हणजेच जय विरुची जोडी भेटली की सरांची कळी आणखीनच खुलते आणि आम्ही गप्पांत रमून जातो.
मनमोकळा स्वभाव आणि अजातशत्रू असलेले राठी सर आज वयाची ६८ वर्षे पूर्ण करून ६९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. खरेतर चिरतरुण असलेले राठी सर जरी २०१३ साली निवृत्त झाले असले तरी आजही टाईम ट्रॅव्हल करून परत १९८८ मध्ये जावे, सरांच्या क्लासमध्ये पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात पुन्हा रंगून जावे असे मनोमन वाटते. मात्र आपण सर्व वेळेसमोर खुजे आहोत. ते कॉलेजचे रम्य दिवस आणि त्या सोनेरी आठवणींनी आजही मन उचंबळून येते. आपण सर्वांतर्फे श्रीयुत राठी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्र्वर आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏🌹🙏
**********************************
दि. १८ नोव्हेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment