Monday, December 19, 2022

मेस्सी मॅजिक ने अर्जेंटिना विजयी

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *मेस्सी मॅजिकने अर्जेंटिना विजयी*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
ल्युसेल आयकॉनीक स्टेडियम, दोहा इथे पार पडलेल्या फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शुट आऊट मध्ये फ्रान्सचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावला आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत निर्धारित वेळेसोबतच अतिरिक्त वेळेत आणि पेनल्टी शुट आऊटमध्ये मेस्सी मॅजिकपुढे फ्रान्सची दाळ शिजली नाही आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधानी रहावे लागले. प्रारंभीच्या सामन्यात सौदी संघाकडून धोबीपछाड बसूनही मेस्सीच्या संघाने आपला खेळ आणि दर्जा दोन्ही उंचावत अखेर विश्वचषकाला गवसणी घातली आहे. यासोबतच लिओ मेस्सीचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे अधुरे स्वप्न पूर्णत्वास आले आहे.

झाले काय तर फुटबॉल हा पृथ्वी ग्रहावरचा सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो. त्यातच दर चार वर्षांनी फिफाद्वारे फुटबॉलचा कुंभमेळा भरवला जातो. भलेही आपला देश या स्पर्धेत नसला तरी फुटबॉल प्रेमींची आपल्याकडे कमी नाही. शिवाय मॅराडोनाच्या अर्जेंटिना संघाला फुटबॉल विश्वात आगळेवेगळे वलय प्राप्त आहे. यामुळेच जेव्हा अर्जेंटिना संघ अंतिम सामन्यात पोहोचला तेव्हा फुटबॉल प्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सोबतच फ्रान्स हा प्रतिस्पर्धी संघ असल्याने ही लढत छातीत धडधड वाढवणारी असणार यात वादच नव्हता आणि झालेही तसेच.

भलेही फुटबॉलमध्ये अकरा खेळाडूंचा संघ असला तरी अर्जेंटिनाच्या लिओ मेस्सी आणि फ्रान्सच्या एम बाप्पेवर अवघ्या फुटबॉल विश्वाच्या नजरा खिळल्या होत्या. त्यातच मेस्सीने हा विश्वचषक जिंकून निवृत्तीचे संकेत दिल्याने चाहत्यांची भावनीक घालमेल सुरू झाली होती. खरेतर मेस्सी ची उंची तोलामोलाची. परंतु यामुळेच त्याला खेळतांना लोअर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा फायदा होतो. मग ते ड्रिबलींग असो की दिशा बदलने असो. यासोबतच मेस्सीचे चापल्य जबरदस्त असल्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंचे टॅकल तो सहजपणे मोडून काढत असतो. शिवाय चाली रचणे, त्यांचे गोलमध्ये रूपांतर करणे यात सध्यातरी त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. तसेच आक्रमण असो की बचाव संघाचा ताळमेळ तो उत्तम प्रकारे साधतो. यामुळेच मेस्सीला कधी जादुगार तर कधी गारुडी म्हटल्या जाते.

अर्जेंटिना संघाची मदार मेस्सी वर होती तशीच फ्रान्सची आशा आकांक्षा एम बाप्पेवर केंद्रीत होत्या. तेवीस वर्षाचा बाप्पे हा फ्रान्स संघाचा हॉर्स पॉवर आहे. काय ती त्याची अचाट ताकद, सोबतीला भन्नाट वेग आणि कमालीची अचूकता त्याला फुटबॉलच्या श्रेष्ठ खेळाडूंमध्ये स्थान देऊन जाते. गोल करताना बाप्पेकडे मेस्सी सारखी नाजुकता, हळुवारपणा आणि सहजसुंदरता नसली तर त्याच्या धडाकेबाज खेळीने प्रतिस्पर्धी संघ दिपून जातो. मुख्य म्हणजे त्याच्या ताकद आणि वेगाला आक्रमकतेची जोड मिळताच त्याला थोपवणे अशक्य कोटीतली गोष्ट असते. २०१८ ला फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात क्रोएशियाचा प्रतिकार ४/२ असा मोडून काढण्यात बाप्पेचा सिंहाचा वाटा होता. या विश्वचषकात अर्जेंटिना विरूद्ध दणादण तीन गोल करत बाप्पेने जी हॅटट्रिक केली ती पाहता, 'बाप रे बाप सबसे पहले आप' असेच म्हणावेसे वाटते.

दोन्ही संघाकडे सुपरस्टार असल्याने मामला फिफ्टी फिफ्टीचा होता. मॅराडोनाचा वारसदार मेस्सी तर बाप्पे थीअरी हेन्रीचे अपडेटेड व्हर्जन. सुपर संडेच्या ब्लॉकबस्टरला मेस्सीने तेवीसव्या मिनीटाला बोहणी करत सामन्यात रंगत आणली. भरीस भर म्हणून एंजेलो डी मारीयाने छत्तीसव्या मिनीटाला फ्रान्सच्या बचाव फळीला भगदाड पाडत आघाडी २/० अशी केली. पहिल्या हाफमध्ये बाप्पेची जादू चालली नाही आणि लढत एकतर्फी, मिळमिळीत तर होणार नाही अशी शंका वाटू लागली होती. तरीपण बाप्पे नावाचा बाजीगर हरलेली बाजी पलटवेल अशी फ्रान्सच्या चाहत्यांना आशा होती आणि दुसऱ्या हाफमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही.

दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सची अवस्था करा अथवा मरा अशी होती. अखेर सामना संपायला उणेपुरे दहा मिनिटे उरले असताना फ्रान्सला बाप्पे पावला. फ्रान्सने पेनल्टी क्षेत्रात धुमाकूळ घालताच पेनल्टी मिळवली ज्यावर बाप्पेने गोल नोंदवला आणि लगेचच त्याने डबल धमाका करत अर्जेंटिना चाहत्यांच्या काळजाला भोके पाडली. लढत बरोबरीत येताच मेस्सी चाहत्यांची अवस्था,,, सब कुछ अच्छा चल रहा था, एकदम से वक्त बदल दिए, जजबात बदल दिए, जीन्दगी बदल दी अशी झाली. बाप्पेच्या दोन गोलने अर्जेंटिना संघ जमिनीवर आला. ऐनवेळी अर्जेंटिना संघ सामन्याची लय घालवून बसला. फ्रान्स संघाने खेळाडू बदली करत फ्रेश लेग्ज आत आणल्याने निर्धारित वेळेत पिछाडी भरून काढत त्यांनी सामना बरोबरीत आणला होता.

घामाघूम झालेले दोन्ही संघ एक्स्ट्रा टाईमला उतरले आणि १०८ व्या मिनिटाला पुन्हा एकदा मेस्सी मॅजिक पहायला मिळाले. अत्यंत चतुरतेने आणि चपळाईने मेस्सीने गोल करत फ्रान्सच्या गोलरक्षकाला स्तब्ध केले. पुन्हा एकदा सामना अर्जेंटिना कडे झुकला होता. त्यातच यलो कार्डवाटप मोहिमेने जोर पकडला होता. दोन्ही संघ इरेला पेटले असल्याने रेफ्रीची चांगलीच दमछाक झाली होती. तरीपण दोन्ही संघ आणि त्यांच्या सुपरस्टार्सची पर्वा न करता रेफ्रींनी हायव्होल्टेज सामना उत्तम प्रकारे हाताळला. अर्जेंटिना विजयासमीप असताना पुन्हा एकदा बाप्पेने पेनल्टी वर गोल करून सामना पेनल्टी शुट आऊटवर नेऊन ठेवला. खरेतर ही अर्जेंटिना साठी इष्टापत्ती ठरली. कारण पेनल्टी शुट आऊटमध्ये अर्जेंटिनाचा रेकॉर्ड चांगला असल्याने ते बिनधास्त होते. तसेही अंतिम क्षणी अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने एक अफलातून गोल वाचवत संघाचे मनोबल वाढवले होते.

अखेर पेनल्टी शुट आऊटचा थरार सुरू झाला आणि बाप्पे, मेस्सीने चेंडू जाळीत भिरकावत आपापले कार्य उरकले. खरी कालवाकालव यापुढे सुरू झाली कारण यापुढे हे दोन्ही सुपरस्टार फक्त प्रेक्षकाचे काम करणार होते आणि आता सर्वस्वी जबाबदार उर्वरित खेळाडू आणि दोन्ही गोलरक्षकांवर होती. त्यातही अर्जेंटिनाचा ३० वर्षीय,साडे सहा फुट उंच गोलरक्षक इमीलीयानो मार्टीनेझ सरस होता. त्याने एकंदरीत ३९ पेनल्टीत सात पेनल्टी वाचवल्या होत्या. तर फ्रान्सचा ३५ वर्षीय, सव्वा सहा फुट उंच गोलरक्षक ह्युगो लॉरीसने ११६  पेनल्टीत १४ पेनल्टी रोखल्या होत्या.

अखेर अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने चपळता दाखवत दुसरी आणि तिसरी पेनल्टी अडवली तर फ्रान्सच्या ह्युगो लॉरीसला एकही पेनल्टी अडविता आली नाही. अर्जेंटिना तर्फे चौथ्या आणि निर्णायक पेनल्टीसाठी जेव्हा गोन्झालो मॉंटीएल गोलपोस्टकडे जात होता तेंव्हा जवळपास पाच करोड देशवासीयांच्या आशा आकांक्षा त्याच्यावर अवलंबून होत्या. तर फ्रान्सची जवळपास सात करोड जनता त्याची पेनल्टी हुकण्याची वाट बघत होती. मात्र दुसऱ्यावर अवलंबून राहून विजेतेपद कसे काय मिळणार? शेवटी गोन्झालो मॉंटीएलने गोल करत अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा विश्वचषक मिळवून दिला.बाप्पे असो की मेस्सी, दोघांनीही आपापल्या संघासाठी जीवाचे रान केले. मात्र मेस्सीला सहकाऱ्यांची जी साथ लाभली त्यामानाने बाप्पे एकाकी झुंजला. शिवाय अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने पेनल्टी शुट आऊटमध्ये भक्कम बचाव करत फ्रान्सचे आक्रमण परतवून लावले.

 दोन्ही संघांची तुलना केली तर या सामन्यात अर्जेंटिनाचा खेळ सरस झाला. अर्जेंटिनाची पास अचूकता ८२% तर फ्रान्सची ७६% होती. सोबतच अर्जेंटिनाने शॉट ऑन टार्गेट १० होते तर फ्रान्सचे अवघे ०५ होते. मुख्य म्हणजे मेस्सीने आक्रमणासोबतच बचाव करत संघाचे संतूलन राखले तर फ्रान्सची बचाव फळी बरेचदा वर खेळली आणि आत्मघात करून बसली. एकंदरीत काय तर संघात केवळ सुपरस्टार असून चालत नाही तर संघात ताळमेळ तेवढाच जरुरी आहे. 'एक अकेला चना भाड नही झोंक सकता' हे ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगीज संघाकडे आणि बाप्पेच्या फ्रान्स संघाकडे पाहून सहज लक्षात येते. फुटबॉलमध्ये युरोपियन आणि लॅटीन अमेरीकन देशांचा वरचष्मा असला तरी आफ्रीकन मोरोक्को संघ आणि द.कोरीया, जपान या आशियाई संघांनी नजरेत भरणारी कामगिरी करून दाखवली हे ही थोडकं नसे. मात्र अंतिम सामन्यातील मेस्सी, बाप्पेची जुगलबंदी दिर्घकाळ फुटबॉल प्रेमींच्या स्मरणात राहील हे मात्र नक्की आहे.
********************************
दि. १९ डिसेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Friday, December 9, 2022

'गुजरातेत भाजपचे सत्तेपे सत्ता'

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *गुजरातेत भाजपचे "सत्तेपे सत्ता"*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
अवघ्या देशाचे डोळे लागलेली गुजरात विधानसभा निवडणूक पार पडली असून भाजपने तिथे छप्पर फाड कामगिरी केली आहे. सलग सातव्यांदा सत्तेपे सत्ता टिकवण्यात भाजप यशस्वी झाला आहे. अनेक विक्रमांची लयलूट करत भाजपने कांग्रेस आणि आप पक्षाला दाती तृण धरण्यास भाग पाडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यूतांडव, सुपारी बाज मिडीयाचा अपप्रचार आणि मोरबी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. अर्थातच मतदारांनी स्वाभीमानाशी तडजोड न करता लांगुलचालन आणि रेवडी संस्कृतीला सपशेल धुडकावून लावत विजयश्री भाजपच्या गळ्यात टाकली आहे. या दिग्वीजयात भाजप मॅन ऑफ दी सिरीज तर पंतप्रधान मोदी मॅन ऑफ दी मॅच ठरले आहेत.

झाले काय तर गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असून ढोंगी पुरोगामी तसेच जेएनयूछाप डाव्यांसाठी अवघड जागेचं दुखणं आहे. त्यातच गुजरात मोदींची होम पीच असल्याने झाडून पुसून सर्व मोदीविरोधी भाजपच्या पराभवासाठी देव पाण्यात सोडून बसले होते. मात्र मोदींचा झंझावात रोखायचा कसा हा यक्षप्रश्नच होता. त्यातच भारत जोडो यात्रेचे कोलीत विरोधकांच्या हाती लागले आणि जणुकाही दुसरे महात्मा गांधी अवतरल्याचा थाटात विरोधकांनी या यात्रेला डोक्यावर घेतलं. भारत जोडो यात्रेचा गुजरातेत शून्य प्रभाव पडला. अखेर व्हायचे तेच झाले. मतदारांनी प्रगल्भता दाखवत भाजपच्या पारड्यात मतं टाकली. कांग्रेस आणि केजरीवाल यांच्या दिमतीला एचएमव्ही मिडीया होता. परंतु सतत सत्तावीस वर्षे मिडीयाला फाट्यावर हाणून गुजरातच्या जनतेने केवळ कांग्रेस, केजरीवाल यांनाच नव्हे तर मिडीयाला सुद्धा पराभूत केले आहे.

गुजरात विधानसभेचे पडघम वाजताच दिल्लीची मफलर गॅंग सक्रीय झाली. रेवडी संस्कृतीचे सर्वेसर्वा केजरीवाल यांनी मतदारांना भुरळ पाडण्यासाठी अनेक फुकट योजनांच्या फुसक्या सोडल्या. मात्र गुजराती मतदारांनी हा विषप्रयोग वेळीच हाणून पाडला. फुकटचंदची खेळी अयशस्वी होताच केजरीवाल यांनी 'हम तो लिखके देते है जी' ची हातचलाखी केली‌. आयबी के सुत्रोंके अनुसार गुजरात में आम आदमी की सरकार बन रही, हमारे प्रत्याशी भारी मतोंसे जीत रहे सारख्या वावड्या उठवल्या. प्रत्यक्षात झाले काय तर आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालीया, मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुधान गढवी आणि अल्पेश कथेरीया यांना मतदारांनी धूळ चारली. केजरीवाल यांच्या आमिषाला गुजरातच्या मतदारांनी भीक घातली नाही.

या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काॅंग्रेसचे नाव घेतले जात होते. परंतु या पक्षाची गुजरातमध्ये वाटचाल अधोगतीकडे राहीली. कधीकाळी दिडशेच्या जवळपास विधानसभा जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसने या निवडणुकीत निच्चांक गाठला आहे. नरेंद्र ते भुपेंद्र हे वादळ कॉंग्रेस थोपवू शकली नाही. केवळ गुजरातच कशाला मध्यप्रदेश, महाराष्ट्र सारखी राज्ये भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतली तर राजस्थान, छत्तीसगड मध्ये सगळं आलबेल आहे असं नाही. कॉंग्रेस पक्षाने आपला अध्यक्ष जरूर बदलला आहे मात्र पक्षाची स्थिती जैसे थे तशीच आहे.

कॉंग्रेसची मध्यप्रदेशात हातातोंडाशी आलेली सत्ता निसटली, तिथे ऐन मधुचंद्राच्या रात्री घटस्फोट झाला. तर महाराष्ट्रात उधारका सिंदूर असलेली सत्ता रातोरात पळवली गेली. तिकडे छत्तीसगडमध्ये खाटा अजूनही कुरकुरत आहे तर राजस्थानच्या तबेल्यातील घोडे सारखे फुरफुरत आहे. शिवाय कॉंग्रेसतर्फे वारंवार होणारा मोदींचा मानभंग मतदारांना रुचला नाही. कधी मौत का सौदागर तर कधी नीच आदमी आणि नुकतेच रावण म्हणत काॅंग्रेसने मतदारांची नाराजी ओढवून घेतली. वरून काय तर नफरत छोडो भारत जोडो च्या घोषणा द्यायच्या. अखेर व्हायचे तेच झाले, भाजपाप्रती असलेली सुप्त लाट ना निवडणुक पंडीतांना ओळखता आली ना विरोधी पक्षांना ना मिडीयाला.

अबकी बार गुजरात में परिवर्तन होंगा, जनता बदलाव चाहती है, नतिजे चौकानेवाले होंगे, आठ दिसंबरको चमत्कार होंगा, मोदी भाजपा का सिंहासन डोलने लगा सारख्या गमजांना गुजराती मतदारांनी दिवसा तारे दाखवले. यासोबतच गुजराती मतदार २००२ ला दुधाने पोळल्याने प्रत्येक निवडणुकीचे ताक फुंकून फुंकून पित आहे. मोदींचे हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या मोदींचा प्रचंड पगडा गुजराती जनमानसावर आहे. त्यातच हिंदुत्वाच्या गाभ्याला विकासाचे कोंदण लाभताच गुजरात कोणाला मतदान करणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. मात्र विरोधकांचे समजते पण उमजत नाही असेच चालले होते. शेवटी आठ डिसेंबरचा दिवस उजाडला आणि विरोधकांना पळता भुई थोडी झाली.

खरेतर गुजरात सोबतच दिल्ली नगर निगम आणि हिमाचल विधानसभेची निवडणूक आटोपली. परंतु सर्वांची डार्लींग होती ती गुजरात निवडणूक. कारण विरोधक गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणतात. अर्थातच कोणाला काय म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी गुजरात निवडणूकीला एक आगळेवेगळे वलय प्राप्त आहे. चुकून माकून भाजपला इथे काही दगाफटका झाला असता किंवा एक जागा जरी कमी झाली असती तर युनो पासून न्युयॉर्क ते लंडनब्रीज पर्यंत २०१४ पासुनचे दुखात्मे सुखावले असते. जीर्णजर्जर आंदोलनजीवी असोत की आउटडेटेड छद्म सेक्युलर असोत, या सगळ्या फ्युज बल्बना चकाकी आली असती. कित्येक राजकीय बेरोजगारांचा हॅपी इंडेक्स लंकेच्याही वर गेला असता. उरल्यासुरल्या वामपंथीय मिडीयाने आनंदात रस्त्यावर लोळून मोदींच्या स्वच्छ भारत मोहीमेला हातभार लावला असता.

निश्चितच भाजपने गुजरातचे मैदान मारले असले तरी सर्वत्र जीलेबी जीलेबी गोड वातावरण आहे असे मुळीच नाही. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा काबीज करुन आता भाजपकडून नगरनिगम ताब्यात घेतले आहे. भलेही आप पक्षाची गत विधानसभेपेक्षा मतांची टक्केवारी जरी कमी झाली असली तरी बहुमताचा आकडा त्यांनी सहज पार केला आहे. भाजपने तिथे शंभरी जरी गाठली असली तरी त्यांना केजरीवाल भारी पडले आहेत. भलेही मग ते शाळा, रुग्णालय आणि विकासाच्या गोष्टी करो अन्यथा भ्रष्टाचार मुक्ततेच्या किंवा तिथे बांग्लादेशी घुसेखोर, रोहींग्यांचा दबदबा असो, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना दूर सारत केजरीवाल यांनी दिल्लीत आपले सिंहासन मजबूत केले आहे. केवळ दिल्लीच कशाला पंजाब मध्ये भगवंत मान यांना बसवून केजरीवाल यांनी हळूहळू आपले राजकीय हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

राहीली बाब हिमाचलची तर तिथे उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून कॉंग्रेसला विजय मिळाला आहे. परंपरा म्हणा अथवा प्रथा ,सरकार बदलविण्याची रीत हिमाचल प्रदेशने तंतोतंत पाळली आहे. मुख्य म्हणजे यावेळी कॉंग्रेस आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीत फारतर एक टक्का एवढा फरक आहे. तरीपण विजय हा विजय असतो. मग तो एक मताने मिळो अथवा एका टक्क्याने. मात्र खरा लोच्या इथेच आहे. काॅंग्रेसला बहुमत मिळवूनही तिथे ऑपरेशन लोटसची भिती वाटत आहे. कारण बहुमत के साथ भी बहुमत के बाद भी ही कॅचलाईन असलेली अमीत जीवन ही पॉलिसी भारतभर कुठेही लागू होऊ शकते. त्यामुळे कॉंग्रेसला येत्या काळात आपले आमदार सांभाळतांना नाकी नऊ येऊ शकते.

एक मात्र खरे या निवडणुकीत मतदारांनी प्रगल्भता दाखवत कोणत्याही पक्षाला नाराज केले नाही. गुजरातेत भाजपला, दिल्लीत आप पक्षाला तर हिमाचलला कॉंग्रेसला मतदान करुन प्रत्येक निवडणूकीचे प्राधान्य, संदर्भ वेगवेगळे असते हे दाखवून दिले आहे. सगळ्यात मजेची बाब म्हणजे भाजप विजयी होऊनही अजूनपर्यंत कोणीही इव्हिएमच्या नावाने बोंबा मारल्या नाहीत. येत्या काळात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक सहित पुर्वोत्तर राज्यात विधानसभेची रणधुमाळी होणार आहे तर २०२४ लोकसभेचे घोडामैदान दूर नाही आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या निवडणूकांचे निकाल सर्वच राजकीय पक्षांना पुढील निवडणूकांसाठी कसा काय होमवर्क करायचा आहे याची कल्पना जरूर देऊन गेल्या आहेत.
*********************************
दि. ०९ डिसेंबर २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Saturday, December 3, 2022

'पुलों का तारों का' सबका कहना है,,!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
   *पुलों का तारों का सब का कहना है!*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील पुल दुर्घटनेची शाई वाळते न वाळते तोच बल्लारशहा येथे रेल्वे फुट ओव्हर ब्रीजची दुर्घटना घडली आहे.एका महिन्याच्या आत घडलेल्या या दोन पुल दुर्घटनांनी पुन्हा एकदा निष्पापांचे बळी घेतले आहे. जणुकाही मानवी जीवनाचे काही मुल्य नसल्यासारखे सामान्यजन अशा प्रशासकीय मुर्दाड पणाचे बळी ठरत आहेत. भलेही बल्लारशहा येथील बळी संख्या सुदैवाने मोठी नसली तरी 'हर जान किमती' हे विसरून कसे चालणार? अशा दुर्दैवी घटनानंतर आर्थिक मोबदल्याच्या घोषणा जरूर होतात मात्र गेलेल्या जीवांचे काय हा प्रश्न अनुत्तरित राहतोच. काही दिवस माध्यमांत याची चर्चा होते आणि पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या प्रमाणे जगरहाटी सुरू राहते. परंतु यातून धडा शिकून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन फारसे उत्सुक दिसत नाही.

झाले काय तर बल्लारशहा स्थानक हे मध्य रेल्वे अंतर्गत दक्षिणेकडील शेवटचे जंक्शन आहे. एनजीएसआर अर्थातच निझाम्स गॅरंटीड स्टेट रेल्वे, हैदराबाद तर्फे स्थापित हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून सध्या त्याचे प्रचलन मध्य रेल्वे करत आहे. अत्यंत मोक्याच्या जागी असलेले हे रेल्वे स्थानक पाच फलाट आणि आठ मार्गांनी (ट्रॅक्स) युक्त आहे. २०१४ ला या स्थानकाला सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. एवढ्या महत्वाच्या स्थानकाला मात्र २७ नोव्हेंबर २०२२ रविवारला गालबोट लागलं. जवळपास पन्नास वर्षे जुन्या पुलाला भगदाड पडून एक महिला मृत्युमुखी पडली तर जवळपास पंधरा ते वीस व्यक्ती जखमी झालेत. सुदैवाने अपघाताच्या वेळी त्या मार्गाने कोणतीही रेल्वे जात नव्हती अन्यथा बळींची संख्या निश्चितच वाढली असती.

नेहमीप्रमाणे अपघात होताच सावरासवर सुरु झाली. लगेचच चार अधिकारी निलंबीत झाले तर बळी, पीडीतांवर मोबदल्यांचा वर्षाव झाला. मात्र या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कोण शिक्षा देणार हा प्रश्नच आहे, केवळ निलंबनाने रेल्वेचे हे पाप कसेकाय धुवून निघणार?. प्रवाश्यांच्या सुरक्षीततेची सर्वस्वी जबाबदारी रेल्वेवर असताना एक महिलेचा जीव का गेला? रेल्वेतर्फे या अपघातासाठी फुट ओव्हर ब्रीजचा प्री कास्ट स्लॅबचा एक तुकडा पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र पीडीतांच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले त्याचे काय? आप्तांचे मरण आणि जन्मभरासाठी जखमा, अपंगत्व घेऊन जगणाऱ्यांचा आक्रोश कोण ऐकणार? आर्थिक मोबदल्याच्या मलमपट्टीने पीडीतांना खरोखरच न्याय मिळेल काय? पन्नास वर्षे जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते काय, देखभाल दुरुस्तीचे नेमके काय झाले होते ते समोर येणे गरजेचे आहे.

केवळ बल्लरशहा दुर्घटना कशाला थोडं मागे जरी डोकावून पाहिले तरी आपल्याला कमीतकमी तीन चार पुल दुर्घटना लक्षात येतात. २ऑगस्ट २०१६ ला कोंकणात सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने जवळपास चाळीस जणांना जलसमाधी मिळाली. तर ३० सप्टेंबर २०१७ मुंबईत एलफिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरीत २२ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. अगदी अलीकडचे उदाहरण सांगायचे झाले तर मोरबी पुल दुर्घटनेबाबत बोलता येईल. जवळपास दिडशे वर्षे जुना हा सस्पेंशन पुल कलात्मकता आणि तंत्रज्ञानाचा चमत्कार मानला जात होता. मात्र नुतनीकरणाच्या पाचव्याच दिवशी हा पुल कोसळला आणि जवळपास दिडशे व्यक्ती प्राणाला मुकल्या.

अगदी याच धर्तीवर नागपूरचा अजनी रेल्वे पुल एखाद्या दुर्घटनेची वाट बघत आहे असे वाटते. हिंदीत एक म्हण आहे "हद से जादा बुढे व्यक्ती और बुढे मकान को छेडना नहीं चाहिए". मात्र सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त जुन्या अजनी रेल्वे पुलाला रोज तुडवले जात आहे. खबरदारी म्हणून येथून जड वाहनांना लोखंडी खुट्या गाडून प्रवेश बंदी केलेली आहे. खरंतर आशा खुटीऊपाड उपाययोजनांनी मुळ समस्या कशी काय सुटणार हे कोडेच आहे. या जुनाट पुलावर एकाचवेळी दुचाकी चारचाकी मिळून जवळपास शंभर वाहने असतात. सकाळ संध्याकाळी म्हणजेच रश अवरच्या वेळी तर वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते. एकदोन मिनिटांच्या प्रवासाला कमीतकमी दहापंधरा मिनिटे वेळ लागतो. यांत बहुमुल्य वेळ आणि इंधनाची नासाडी होते ते वेगळंच.

बरं या अजब पुलाची गजब कहाणी वेगळीच आहे. संबंधित प्रशासनाला पुलाच्या जर्जर अवस्थेची चांगलीच कल्पना आहे परंतु घोडं कुठे पेंड खातंय हेच कळायला मार्ग नाही. त्यातही या पुलाच्या दोन्ही बाजू वैशिष्ट्य पुर्ण आहेत. अजनी कॉलनी कडे हा पुल संपताच सिमेंट रोडचा दुभाजक तुमच्या समोर दत्त म्हणून हजर राहतो. तर रेल्वे स्थानकाकडच्या बाजूला तिवाड,तीठा (तीन मार्ग एकत्र येतात ती जागा) आहे. तुम्हाला कमीतकमी तीन डोळे असल्याशिवाय तुम्ही येथून सही सलामत जाऊ शकत नाही. कारण एक मार्ग अजनी चौकाकडून येतो, मधला मार्ग जेल चौकाकडून येतो तर तिसरा मार्ग अजनी रेल्वे स्थानकाकडून येतो. त्यातही लोखंडी खुट्यांमुळे कोण कुठून घुसेल याचा नेम नाही. अगदीच तुम्ही संत महात्मे असल्याशिवाय शिव्यांची बाराखडी न म्हणता इथून जाणे केवळ अशक्य आहे.

निश्चितच १००% अपघात होणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही. मात्र अशा अपघातातून धडा घेऊन भविष्यातील संकटे टाळता येईल किंवा त्याची तीव्रता तरी कमी करता येईल. तशी मानसिकता प्रशासनाला असणे आवश्यक आहे. चलता है म्हणून याकडे कानाडोळा करणे चुकीचे आहे. चौकशीचे थातुरमातुर सोपस्कार असोत की सुरक्षेबाबत उदासीनता असो, यांत सामान्यांचा हकनाक बळी जातो. तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात पिडीतांचे अश्रू आटून जातात. पीडीतांचे दुःख, वेदना, आक्रोश, संताप, संवेदना मातीमोल ठरल्या जातात. परत एकदा मृत्यूचे हे झुलते सापळे नवीन सावज टिपायला टपून असतात.

वास्तविकत: जुन्या जीर्ण पुलांबाबत त्यांची उपयोगीता, क्षमता, त्यांच्यावर वातावरणाचा प्रभाव, काळानुसार वाढलेली लोकसंख्या,रहदारी याचा ताळमेळ लागतो काय याचा विचार करायलाच हवा. स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार किती उपाययोजना केल्या जातात? शिवाय अशा कामांना किती महत्त्व दिले जाते, किती तत्परतेने अशा बाबी पूर्ण केल्या जातात, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. अर्थातच निर्जीव पुले, तारा, बांधकाम स्वतः काय सांगणार? तरीपण 'पुलों का तारों का सबका कहना' आपल्याला ऐकावाच लागेल. अरूंद पुल, ढासळणाऱ्या भिंती, जंग खाल्लेले लोखंडी खांब, उखडलेले प्लास्टर, गळणाऱ्या भिंती, छिद्रे पडलेले पुल पत्रे यांची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे अन्यथा अशा दुर्घटना कधीही घडू शकतात.
*********************************
दि. ०३ डिसेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...