@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*गुजरातेत भाजपचे "सत्तेपे सत्ता"*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
अवघ्या देशाचे डोळे लागलेली गुजरात विधानसभा निवडणूक पार पडली असून भाजपने तिथे छप्पर फाड कामगिरी केली आहे. सलग सातव्यांदा सत्तेपे सत्ता टिकवण्यात भाजप यशस्वी झाला आहे. अनेक विक्रमांची लयलूट करत भाजपने कांग्रेस आणि आप पक्षाला दाती तृण धरण्यास भाग पाडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यूतांडव, सुपारी बाज मिडीयाचा अपप्रचार आणि मोरबी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. अर्थातच मतदारांनी स्वाभीमानाशी तडजोड न करता लांगुलचालन आणि रेवडी संस्कृतीला सपशेल धुडकावून लावत विजयश्री भाजपच्या गळ्यात टाकली आहे. या दिग्वीजयात भाजप मॅन ऑफ दी सिरीज तर पंतप्रधान मोदी मॅन ऑफ दी मॅच ठरले आहेत.
झाले काय तर गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असून ढोंगी पुरोगामी तसेच जेएनयूछाप डाव्यांसाठी अवघड जागेचं दुखणं आहे. त्यातच गुजरात मोदींची होम पीच असल्याने झाडून पुसून सर्व मोदीविरोधी भाजपच्या पराभवासाठी देव पाण्यात सोडून बसले होते. मात्र मोदींचा झंझावात रोखायचा कसा हा यक्षप्रश्नच होता. त्यातच भारत जोडो यात्रेचे कोलीत विरोधकांच्या हाती लागले आणि जणुकाही दुसरे महात्मा गांधी अवतरल्याचा थाटात विरोधकांनी या यात्रेला डोक्यावर घेतलं. भारत जोडो यात्रेचा गुजरातेत शून्य प्रभाव पडला. अखेर व्हायचे तेच झाले. मतदारांनी प्रगल्भता दाखवत भाजपच्या पारड्यात मतं टाकली. कांग्रेस आणि केजरीवाल यांच्या दिमतीला एचएमव्ही मिडीया होता. परंतु सतत सत्तावीस वर्षे मिडीयाला फाट्यावर हाणून गुजरातच्या जनतेने केवळ कांग्रेस, केजरीवाल यांनाच नव्हे तर मिडीयाला सुद्धा पराभूत केले आहे.
गुजरात विधानसभेचे पडघम वाजताच दिल्लीची मफलर गॅंग सक्रीय झाली. रेवडी संस्कृतीचे सर्वेसर्वा केजरीवाल यांनी मतदारांना भुरळ पाडण्यासाठी अनेक फुकट योजनांच्या फुसक्या सोडल्या. मात्र गुजराती मतदारांनी हा विषप्रयोग वेळीच हाणून पाडला. फुकटचंदची खेळी अयशस्वी होताच केजरीवाल यांनी 'हम तो लिखके देते है जी' ची हातचलाखी केली. आयबी के सुत्रोंके अनुसार गुजरात में आम आदमी की सरकार बन रही, हमारे प्रत्याशी भारी मतोंसे जीत रहे सारख्या वावड्या उठवल्या. प्रत्यक्षात झाले काय तर आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालीया, मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुधान गढवी आणि अल्पेश कथेरीया यांना मतदारांनी धूळ चारली. केजरीवाल यांच्या आमिषाला गुजरातच्या मतदारांनी भीक घातली नाही.
या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काॅंग्रेसचे नाव घेतले जात होते. परंतु या पक्षाची गुजरातमध्ये वाटचाल अधोगतीकडे राहीली. कधीकाळी दिडशेच्या जवळपास विधानसभा जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसने या निवडणुकीत निच्चांक गाठला आहे. नरेंद्र ते भुपेंद्र हे वादळ कॉंग्रेस थोपवू शकली नाही. केवळ गुजरातच कशाला मध्यप्रदेश, महाराष्ट्र सारखी राज्ये भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतली तर राजस्थान, छत्तीसगड मध्ये सगळं आलबेल आहे असं नाही. कॉंग्रेस पक्षाने आपला अध्यक्ष जरूर बदलला आहे मात्र पक्षाची स्थिती जैसे थे तशीच आहे.
कॉंग्रेसची मध्यप्रदेशात हातातोंडाशी आलेली सत्ता निसटली, तिथे ऐन मधुचंद्राच्या रात्री घटस्फोट झाला. तर महाराष्ट्रात उधारका सिंदूर असलेली सत्ता रातोरात पळवली गेली. तिकडे छत्तीसगडमध्ये खाटा अजूनही कुरकुरत आहे तर राजस्थानच्या तबेल्यातील घोडे सारखे फुरफुरत आहे. शिवाय कॉंग्रेसतर्फे वारंवार होणारा मोदींचा मानभंग मतदारांना रुचला नाही. कधी मौत का सौदागर तर कधी नीच आदमी आणि नुकतेच रावण म्हणत काॅंग्रेसने मतदारांची नाराजी ओढवून घेतली. वरून काय तर नफरत छोडो भारत जोडो च्या घोषणा द्यायच्या. अखेर व्हायचे तेच झाले, भाजपाप्रती असलेली सुप्त लाट ना निवडणुक पंडीतांना ओळखता आली ना विरोधी पक्षांना ना मिडीयाला.
अबकी बार गुजरात में परिवर्तन होंगा, जनता बदलाव चाहती है, नतिजे चौकानेवाले होंगे, आठ दिसंबरको चमत्कार होंगा, मोदी भाजपा का सिंहासन डोलने लगा सारख्या गमजांना गुजराती मतदारांनी दिवसा तारे दाखवले. यासोबतच गुजराती मतदार २००२ ला दुधाने पोळल्याने प्रत्येक निवडणुकीचे ताक फुंकून फुंकून पित आहे. मोदींचे हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या मोदींचा प्रचंड पगडा गुजराती जनमानसावर आहे. त्यातच हिंदुत्वाच्या गाभ्याला विकासाचे कोंदण लाभताच गुजरात कोणाला मतदान करणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. मात्र विरोधकांचे समजते पण उमजत नाही असेच चालले होते. शेवटी आठ डिसेंबरचा दिवस उजाडला आणि विरोधकांना पळता भुई थोडी झाली.
खरेतर गुजरात सोबतच दिल्ली नगर निगम आणि हिमाचल विधानसभेची निवडणूक आटोपली. परंतु सर्वांची डार्लींग होती ती गुजरात निवडणूक. कारण विरोधक गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणतात. अर्थातच कोणाला काय म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी गुजरात निवडणूकीला एक आगळेवेगळे वलय प्राप्त आहे. चुकून माकून भाजपला इथे काही दगाफटका झाला असता किंवा एक जागा जरी कमी झाली असती तर युनो पासून न्युयॉर्क ते लंडनब्रीज पर्यंत २०१४ पासुनचे दुखात्मे सुखावले असते. जीर्णजर्जर आंदोलनजीवी असोत की आउटडेटेड छद्म सेक्युलर असोत, या सगळ्या फ्युज बल्बना चकाकी आली असती. कित्येक राजकीय बेरोजगारांचा हॅपी इंडेक्स लंकेच्याही वर गेला असता. उरल्यासुरल्या वामपंथीय मिडीयाने आनंदात रस्त्यावर लोळून मोदींच्या स्वच्छ भारत मोहीमेला हातभार लावला असता.
निश्चितच भाजपने गुजरातचे मैदान मारले असले तरी सर्वत्र जीलेबी जीलेबी गोड वातावरण आहे असे मुळीच नाही. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा काबीज करुन आता भाजपकडून नगरनिगम ताब्यात घेतले आहे. भलेही आप पक्षाची गत विधानसभेपेक्षा मतांची टक्केवारी जरी कमी झाली असली तरी बहुमताचा आकडा त्यांनी सहज पार केला आहे. भाजपने तिथे शंभरी जरी गाठली असली तरी त्यांना केजरीवाल भारी पडले आहेत. भलेही मग ते शाळा, रुग्णालय आणि विकासाच्या गोष्टी करो अन्यथा भ्रष्टाचार मुक्ततेच्या किंवा तिथे बांग्लादेशी घुसेखोर, रोहींग्यांचा दबदबा असो, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना दूर सारत केजरीवाल यांनी दिल्लीत आपले सिंहासन मजबूत केले आहे. केवळ दिल्लीच कशाला पंजाब मध्ये भगवंत मान यांना बसवून केजरीवाल यांनी हळूहळू आपले राजकीय हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
राहीली बाब हिमाचलची तर तिथे उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून कॉंग्रेसला विजय मिळाला आहे. परंपरा म्हणा अथवा प्रथा ,सरकार बदलविण्याची रीत हिमाचल प्रदेशने तंतोतंत पाळली आहे. मुख्य म्हणजे यावेळी कॉंग्रेस आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीत फारतर एक टक्का एवढा फरक आहे. तरीपण विजय हा विजय असतो. मग तो एक मताने मिळो अथवा एका टक्क्याने. मात्र खरा लोच्या इथेच आहे. काॅंग्रेसला बहुमत मिळवूनही तिथे ऑपरेशन लोटसची भिती वाटत आहे. कारण बहुमत के साथ भी बहुमत के बाद भी ही कॅचलाईन असलेली अमीत जीवन ही पॉलिसी भारतभर कुठेही लागू होऊ शकते. त्यामुळे कॉंग्रेसला येत्या काळात आपले आमदार सांभाळतांना नाकी नऊ येऊ शकते.
एक मात्र खरे या निवडणुकीत मतदारांनी प्रगल्भता दाखवत कोणत्याही पक्षाला नाराज केले नाही. गुजरातेत भाजपला, दिल्लीत आप पक्षाला तर हिमाचलला कॉंग्रेसला मतदान करुन प्रत्येक निवडणूकीचे प्राधान्य, संदर्भ वेगवेगळे असते हे दाखवून दिले आहे. सगळ्यात मजेची बाब म्हणजे भाजप विजयी होऊनही अजूनपर्यंत कोणीही इव्हिएमच्या नावाने बोंबा मारल्या नाहीत. येत्या काळात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक सहित पुर्वोत्तर राज्यात विधानसभेची रणधुमाळी होणार आहे तर २०२४ लोकसभेचे घोडामैदान दूर नाही आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या निवडणूकांचे निकाल सर्वच राजकीय पक्षांना पुढील निवडणूकांसाठी कसा काय होमवर्क करायचा आहे याची कल्पना जरूर देऊन गेल्या आहेत.
*********************************
दि. ०९ डिसेंबर २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment