Tuesday, April 11, 2023

पुरावे गॅंग चा पाक कडून पर्दाफाश


      पुरावे गॅंगचा पाककडून पर्दाफाश
              डॉ अनिल पावशेकर
*************************************
पाकिस्तान मुस्लिम लिगचे नेते अय्याज सादिक यांनी नुकतेच पाकच्या नॅशनल असेंब्लीत पुलावामा प्रकरणी इम्रानखान सरकारच्या पापाचा पाढा वाचला असून त्यामुळे आपल्याकडील यच्चयावत पाकप्रेमी गर्भगळीत झालेले आहे. तर दुसरीकडे पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी पुलावामा हल्ला पाकने घडवून आणल्याची निर्लज्ज कबुली देत भारतातल्या जयचंदांचे थोबाड चांगलेच रंगवले आहेत. सत्य कधीच लपून राहत नाही, कधीना कधी ते तोंड वर काढतेच हे या दोन्ही पाक नेत्यांच्या नापाक विधानाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पाकिस्तान ही आंतरराष्ट्रीय दहशतवादाची जननी असून जगातल्या जवळपास सर्वच आतंकी घटना आणि हल्ल्यांची पाळेमुळे पाकमध्ये रूजलेली नक्कीच आढळतात. तसेच निर्मिती झाल्यापासून या शत्रुराष्ट्राच्या कुरापती आणि छुपे हल्ले आपल्या देशाच्या पाचवीलाच पुजले आहेत. मात्र पाकचे नाव काढताच इथल्या काही नतद्रष्टांचा कंठ दाटून येतो तर कित्येकांना पान्हा फुटायला लागतो. अर्थातच याबाबतीत जेएनयु छाप लाल विचारवंत आणि मॅगसेसे छाप मिडीया नेहमीच अग्रेसर असतो.

झाले काय तर १४ फेब्रुवारी २०१९ ला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुलावामा इथे पाकपुरस्कृत आतंकी हल्ला झाला आणि आपले ४० जवान त्यात हुतात्मा झाले होते. पाकची खोड जिरवण्यासाठी भारताने बालाकोट एअर स्ट्राईक करुन जवळपास ३०० अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. वास्तविकत: अशा बिकट प्रसंगी अवघा देश, सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना इथल्या काही मोदीबिंदू झालेल्या राजकीय नेत्यांनी नेमकी उलटी भुमिका घेत एअर स्ट्राईक वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मग ते सिद्धू आणि बुद्धू असो की दिल्लीचे सडजी अथवा संजय निरुपम असो. देशात पाकविरूद्ध प्रचंड जनाक्रोश असताना वरील नेत्यांसह दिग्वीजयसिंग, चिदंबरम, संदीप दिक्षीत आदींनी सैन्याच्या पराक्रमाविषयी शंका निर्माण करणारी वक्तव्ये केली. सोबतच पुलावामा हल्ला लोकसभा निवडणुका ध्यानात ठेऊन राजकीय फायद्यासाठी घडवून आणल्याची आवई उठवली होती. मात्र आता खुद्द पाकिस्तानी नेत्यांनीच या गुन्ह्याची कबुली दिली असल्याने बेताल वक्तव्य करणारे धुरंधर या खुलाश्यावर तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेले आहेत.

खरे पाहता पाकिस्तानला त्यांचे अधिकृत प्रवक्ते ठेवायची अजिबात गरज नाही. कारण इथलीच काही नेतेमंडळी पाकच्या पे रोल वर असल्यासारखी पाकधार्जिणी वक्तव्ये करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याच देशाची बदनामी करत असतात. मग ते सर्जिकल स्ट्राईक असो अथवा एअर स्ट्राईक असो. कित्येक पाकप्रेमींनी तर एअर स्ट्राईक प्रकरणी कॅप्टन अभिनंदन यांची सुटका होताच इम्रानखानला हातोहात  नोबेल पुरस्कार सुद्धा बहाल करुन टाकला होता. मात्र निशाने पाकिस्तान पुरस्काराचे डोहाळे लागलेल्यांनी आणि बाटला हाऊस प्रकरणी रात्रभर डोळे डबडबलेल्यांनी आपल्याच वायुदलावर शंका घेत आपला कोतेपणा दाखवून दिला होता.

इम्रानखानने अभिनंदन यांना सुखरुपपणे का परत केले याचा खुलासा खुद्द अयाज सादिक यांनी केला असून त्यावेळी झालेल्या बैठकीत पाकचे लष्कर प्रमुख जावेद कमर बाजवा घामाघूम होऊन त्यांचे पाय थरथर कापत असल्याची कबुली दिली आहे. अभिनंदन यांना न सोडल्यास भारत पाकवर हमखास आक्रमण करेल या भितीमुळे गाळण उडाल्याने पाकने सुटका करत पांढरे निशाण फडकवल्याचे आता सिद्ध झाले आहे. पुलावामा प्रकरणी तोंडावर आपटुनही उपरोक्त नेतेमंडळी पुन्हा पाकची री ओढणार नाही अशी अपेक्षा आहे. मात्र नसानसांत भिनलेला मोदीद्वेष त्यांना एवढ्या लवकर स्वस्थ बसू देईल असे वाटत नाही. कमीतकमी जनाची नाही तर मनाची लाज बाळगत या नेत्यांनी देश, सैन्य आणि जनतेची दिशाभूल केल्याबाबत माफी मागणे अपेक्षीत आहे.
*************************************
दि. ३० ऑक्टोबर २०२०
मो. ९८२२९३९२८७
++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...