Monday, April 10, 2023

फ्लाईंग फिश, "मायकल फेल्प्स"


 *फ्लाईंग फिश,, जलतरणपटू मायकेल फेल्प्स*
                 डॉ अनिल पावशेकर 
***************************************
ऑलिम्पिक स्पर्धेला बॅटल विदाऊट बुलेट सुद्धा म्हटले जाते आणि त्याला कारणही तसेच आहे. जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंत पदकासाठी जिवघेणी चुरस असते आणि यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या खेळाडूला सुवर्णपदक देऊन सम्मानित करण्यात येते. अर्थातच या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी उत्सुक असतो. आपल्या देशाने आजपर्यंत २४ ऑलिम्पिकमध्ये ५७ क्रीडा प्रकारातौ ९ सुवर्णपदकांसह २८ पदके जिंकलेली आहेत. मात्र अमेरिकेच्या एका खेळाडूने ४ ऑलिम्पिकमध्ये २३ सुवर्णपदकांसह तब्बल २८ पदके जिंकण्याचा भिमपराक्रम केला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव खेळाडू ठरलेला आहे. न भुतो न भविष्यती अशी उत्तुंग भरारी मारणाऱ्या मायकेल फेल्प्स या खेळाडूला दि बाल्टीमोर बुलेट आणि फ्लाईंग फिश या टोपणनावाने ओळखले जाते.

मोस्ट डेकोरेटेड ऑलिम्पिअन म्हणून नावाजलेल्या मायकेल फेल्प्सचा जन्म ३० जुन १९८५ ला बाल्टीमोर, मेरीलॅंड, अमेरिका इथे झाला होता. आई शिक्षिका तर वडिल पोलिस दलात कार्यरत होते. आपल्या दोन मोठ्या बहिणींच्या पाठोपाठ मायकेलनेही सात वर्षांचा असताना केवळ पोहणे शिकण्यासाठी स्विमींग पुलाला जवळ केले होते. मात्र पुढे अशा काही घटना घडत गेल्या की स्विमींग पुल हेच त्याचे आयुष्य ठरले गेले. मायकेल केवळ ९ वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा काडीमोड झाला आणि याचा नकारात्मक परिणाम मायकेल फेल्प्सच्या कोवळ्या मनावर झाला. वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या मायकेलने अखेर आपले दुःख पचविण्यासाठी स्विमींग पुलला जवळ केले ते कायमचेच. स्विमींग पुल हाच त्याचा आधार ठरला तर यातच त्याला त्याच्या आयुष्याचे सार सापडले होते.आपले सर्व लक्ष, सुखदुःख आणि भविष्य त्याने पणाला लावून स्विमींग मध्ये जी अकल्पनिय कामगिरी केली त्याला तोड नाही. 

वयाच्या दहाव्या वर्षी त्याने १०० मिटर बटरफ्लाय मध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केले तर बाराव्या वर्षी स्विमींगच्या राष्ट्रीय विक्रमांना त्याने गवसणी घातली. मात्र इथेच नशिब त्याच्यावर पुन्हा एकदा रूसले आणि त्याला एडीएचडी (अटेंशन डेफिसिट हायपरएक्टीव्हीटी डिसाॅर्डर) चा सामना करावा लागला. यामुळे त्याच्यावर बराच मानसिक परिणाम झाला परंतु यातून सहीसलामत पार पडण्यासाठी त्याने आपल्या आवडत्या स्विमींगला जवळ केले. इथेच जगाला मायकेल फेल्प्सच्या रुपाने एक असामान्य जलतरणपटू लाभला. आपल्या अद्भुत कलेने तो १५ वर्षांचा असताना २००० सिडनी ऑलिम्पिक साठी निवडला गेला आणि अशाप्रकारे अमेरिकेच्या ६८ वर्षांच्या इतिहासात सर्वात कमी वयात ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणारा खेळाडू ठरला. भलेही पहिल्या ऑलिम्पिकमध्ये त्याला फारसे यश मिळाले नाही परंतु २०० मिटर बटरफ्लाय स्पर्धेत त्याने अंतिम फेरीत धडक मारून आपली योग्यता सिद्ध केली होती.

यानंतर फेल्प्सचे आगामी लक्ष्य होते २००४ अथेन्स ऑलिम्पिक आणि यासाठी त्याने कंबर कसली होती. बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, फ्रिस्टाईल या स्विमींगच्या प्रकारात त्याने धडाकेबाज प्रदर्शन करत अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ६ सुवर्णपदक आणि २ कांस्यपदकांची लयलूट केली. मुख्य म्हणजे आपला आदर्श असलेल्या इयान थॉर्पसमोर मायकेलने हे घवघवीत यश मिळवले होते. मात्र इयान थॉर्पने २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कुणीही स्विमींग मध्ये ८ सुवर्णपदक मिळवू शकणार नाही असे विधान त्यावेळी केले होते आणि त्याचा रोख मायकेल फेल्प्सकडे होता. इथेच एकप्रकारे फेल्प्सच्या भावनांना आव्हान दिले गेले होते आणि फेल्प्सने ते मनोमन स्विकारले सुद्धा होते.

तुम्ही जितके मोठे स्वप्न पाहू शकता तितके मोठे स्वप्न बघा असा ध्यास घेतलेल्या फेल्प्सने मग २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्णपदक जिंकण्याच्या सोनेरी स्वप्नाचा पाठलाग सुरू करणे सुरू केले. याकरिता ४ वर्षे सतत रोज १२ तास कठीण परिश्रमाला सुरूवात केली. दररोज १५ किमी. तर हप्त्याला १०० किमी. पर्यंत फेल्प्स स्विमिंगची प्रॅक्टिस करायचा. मात्र इथेही नियती त्याच्यावर पुन्हा एकदा रुसली आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला स्विमिंगमध्ये उजव्या हाताचा उपयोग पहिल्या सारखा करता येणार नाही असे सांगताच फेल्प्सच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र एवढ्या लवकर हार मानेल तर तो मायकेल फेल्प्स कसला.

संकटात संधी शोधणाऱ्या फेल्प्सने स्विमिंग करतांना हाताऐवजी पायांवर जास्त भर दिला आणि स्वत:ला इतक्या चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करुन घेतले की आपल्या हातात फ्रॅक्चर आहे हे सुद्धा तो विसरून गेला होता. अखेर २००८ साल उजाडले आणि मायकेलच्या सोनेरी स्वप्नांना धुमारे फुटणे सुरू झाले होते कारण याकरिता त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. बिजिंग ऑलिम्पिक सुरु होताच त्याने आपल्या धडाडीने सुवर्णपदक हस्तगत करायला सुरुवात केली होती आणि आता वेळ होती २०० मिटर बटरफ्लाय स्पर्धेची. ही स्पर्धा सुरू होताच मायकेल फेल्प्सच्या गॉगलला तडा गेला आणि त्याला पुढचे धुसर दिसू लागले. मात्र फेल्प्सने जिद्द, चिकाटी सोडली नाही. त्याने स्वत:ला इतके जास्त प्रशिक्षित करून घेतले होते की अशाही परिस्थितीत तो स्पर्धेत अव्वलच होता. शेवटचे १०० मिटर अंतर बाकी असताना त्याच्या गॉगलमध्ये पुर्णतः पाणी भरले गेले आणि त्याला पुढचे काही दिसणे जवळपास बंद झाले होते. मात्र तरीही फेल्प्सने हार न मानता स्विमिंग सुरूच ठेवले आणि जेव्हा स्पर्धा पुर्ण झाली तेव्हा त्याच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला गेला होता.

बिजिंग ऑलिम्पिकमध्ये तब्बल ८ सुवर्णपदक जिंकत त्याने त्याच्या टिकाकारांच्या तोंडाला कुलूप लावले होते. त्याच्या या कामगिरीवर विश्र्वास नसणाऱ्यांनी त्याच्यावर आक्षेपसुद्धा घेतले होते. मात्र जागतिक डोपींग विरोधी पथकाच्या एकूण नऊ टेस्टमध्ये तो निर्दोष आढळला होता. यानंतर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये फेल्प्सने ४ सुवर्ण आणि २ रजतपदक जिंकले तर २०१६ रिओ ऑलिम्पिक मध्ये ५ सुवर्ण, १ रजत जिंकत आपल्या दर्जेदार कामगिरीने जगाला भुरळ घातली होती. केवळ ऑलिम्पिकच नव्हे तर स्विमिंगच्या इतरही जागतिक स्पर्धांमध्ये त्याने ६५ सुवर्णपदकांसही एकूण ८२ पदकांची भरगच्च कमाई केलेली आहे. 

फेल्प्सच्या या दैदिप्यमान कामगिरीसाठी त्याचे मुळगाव, बाल्टीमोरच्या एका मार्गाचे नामकरण दि मायकेल फेल्प्स मार्ग असे करण्यात आले आहे. "वर्ल्ड स्विमर ऑफ दि इयर" हा सन्मान मायकेलला ८ वेळा मिळाला आहे तर "अमेरिकन स्विमर ऑफ दि इयर" हा बहुमान त्याने ११ वेळा पटकावला आहे. २०१२ आणि २०१६ ला तो "इंटरनॅशनल स्विमर ऑफ दि इयर" ठरला होता तर गोल्डन गॉगल पुरस्कार त्याला सहा वेळा मिळाला आहे. स्विमिंगमध्ये विक्रमाची राशी रचतांना त्याचे जवळपास २३ विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहेत.
मायकेल फेल्प्सच्या दमदार कामगिरीला त्याची कठोर मेहनत, प्रचंड जिद्द, दृढ आत्मविश्वास आणि कधीही हार न मानण्याच्या प्रवृत्ती सोबतच त्याची अंगकाठी ही कारणीभूत आहे. 

सहा फुट चार इंच उंचीच्या मायकेल फेल्प्सच्या हाताचे विंग स्पॅन जवळपास सहा फुट सात इंच भरते, जे त्याच्या उंचीपेक्षा तिन इंच जास्त भरते. यामुळे त्याला स्विमिंग करतांना चांगली मदत होते. हातापायाचे पंजे लांब असल्याने स्विमिंग मध्ये त्यांचा फ्लिपर्स सारखा उपयोग होतो. शरीराचा मध्यभाग त्रिकोणी आकाराचा असल्याने स्विमिंग मध्ये सहजता आढळून येते. सोबतच त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक वादळांना त्याने समर्थपणे तोंड देत आपल्या कणखर मानसिकतेचा परिचय दिलेला आहे. कधी एडीएचडी सारख्या व्याधीने त्याला छळले होते तर कधी आई-वडिलांच्या कलहाने तो उध्वस्त झाला होता. कधी मद्यप्राशन करुन वाहन चालवताना तो दोषी आढळला तर कधी त्याला तुरुंगवारी सुद्धा घडली होती. तर मानसिक अवसादामुळे आत्महत्येसारखे विचारही त्याच्या मनात डोकावत होते. मात्र जेंव्हा केंव्हा फेल्प्सला आयुष्यात बिकट प्रसंग आलेत तेव्हा तेव्हा तो स्विमिंग पुलला शरण गेला आणि पुन्हा ताजातवाना होऊन पुढील आयुष्याला धीरोदात्तपणे सामोरा गेला.

स्विमिंगच्या तळमळीने त्याने मायकेल फेल्प्स फाऊंडेशन ची स्थापना केली आणि निरोगी आयुष्य व समाजात स्विमिंगची आवड निर्माण करण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. २०१६ ला मायकेल फेल्प्सने आपली निवृत्ती जाहीर केली असली तरी त्याची नाळ अजुनही स्विमिंगशी घट्टपणे जुळलेली आहे. मला आयुष्यात जे स्विमिंगने दिले ते मी स्विमिंगला परत देणार या दृढनिश्चयाने तो आजही स्विमिंग बाबत कौतुकाने बोलत असतो. खरोखरच कोणत्याही खेळाडूला, कोणत्याही खेळात, कोणत्याही काळी, कोणत्याही देशाविरुद्ध जितकी पदके मायकेल फेल्प्सने जिंकली आहे तितकी पदके जिंकणे कुणाला शक्य होईल की नाही याबाबत शंकाच वाटते. यामुळेच मायकेल फेल्प्सला अद्भुत खेळाडू म्हणावे की चमत्कार अथवा महामानव म्हणावे अशी त्याची अविश्वसनीय कामगिरी आहे.

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...