*स्कुल डायरीज,,भाग ०१*
*'गणिताचा' विषय आणि आयुष्याचे 'गणित'*
*************************************
साल १९८३, स्थळ लोकमान्य विद्यालय, वरोरा जिल्हा चंद्रपूर आणि वेळ होती सकाळी ११ वाजताची. माझा या शाळेतला हा पहिलावहिला दिवस होता. पिताश्री जिल्हा परिषद यवतमाळ इथे हायस्कूलला मुख्याध्यापक असल्याने वारंवार बदली होऊन आमची शिक्षणयात्रा गावोगावी भटकत होती. पाटणबोरी,उमरखेड, पुसद, लोणी यानंतर नववीपर्यंत कुरई, ता.वणी इथपर्यंत शिक्षण आटोपले होते. त्याकाळी प्रचंड मानाच्या आणि शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या मॅट्रीक (दहावी) करिता आम्ही वरोरा शहराची निवड केली होती. तेव्हा पंचक्रोशीत वरोऱ्याचे लोकमान्य विद्यालय आणि आनंद निकेतन महाविद्यालय गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेले होते.
अर्थातच ग्रामीण पार्श्र्वभूमीतून आल्याने आणि शाळेत कोणाचीही ओळख नसल्याने लाजतबुजत कसातरी वर्गात प्रवेश केला आणि पहिल्याच बेंचवर कसेबसे बसलो. पहिलाच क्लास गणिताचा आहे आणि तो विषय मुख्याध्यापक पाटील सर शिकवतात, जे प्रचंड शिस्तीचे, तापट स्वभावाचे आणि विद्यार्थ्यांना झोडपण्यात तज्ञ आहेत हे ऐकून आम्ही लगेच गर्भगळीत झालो. कारण इतर विषय आम्ही कोळून प्यायलो असलो तरी गणिताशी आमचा जन्मजात ३६ चा आकडा होता. अखेर सरांची क्लासमध्ये प्रवेश करताच त्यांच्याबद्दल जे ऐकले होते, त्यापेक्षा ते जास्तच धोकादायक, उग्र दिसत होते आणि आमच्या मनाला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली होती.
वाघासमोर सशाची जशी अवस्था होते, अगदी तशीच आमची पंढरी घाबरलेली होती. सरांनी वर्गावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि फळ्यावर एक समीकरण लिहिले. टू एक्स प्लस टू एक्स स्क्वेअर किती होतात? मी निर्बुद्ध, निर्विकार चेहऱ्याने फळ्याकडे पाहत होतो आणि सरांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाही. त्यांनी माझ्याकडे बोट दाखवताच मी यंत्रवत उभा झालो परंतू तोंडातून शब्दच फुटेना. अखेर कसेबसे आवंढा गिळत मी फोर एक्स स्क्वेअर असे उत्तर ठोकून दिले. माझे उत्तर ऐकताच सरांचा पारा अचानकपणे चढला आणि क्षणार्धात त्यांनी एक थप्पड सणसणीतपणे माझ्या कानशिलात भडकावून दिली.
अचानक झालेल्या सरांच्या सर्जिकल स्ट्राईकने मी पुरता गोंधळून गेलो. डोळ्यासमोर काजवे आणि अख्खे तारामंडळ भ्रमण करु लागले होते. मात्र यातून लवकरच सावरत मी परिस्थितीचा आढावा घेतला तर सरांनी ढोरे नावाच्या विद्यार्थ्याला विचारले असता त्यानेही चुकीचे उत्तर देताच सरांच्या अंगाचा आणखी तिळपापड झाला. त्याची बखुटी पकडून सरांनी त्याला चांगलेच बुकलून काढले. मी मात्र मला कमी मार बसला यावर समाधान मानत उभा होतो, तसेही परदु:ख शितल असतेच. परंतु त्या विद्यार्थ्यांला सरांनी एवढे का बदडले याचा उलगडा होत नव्हता. शेवटी सरांनीच खुलासा केला की वर्गात बाहेरून आलेल्या गावखेड्यातील विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिले तर ते एकदाचे समजण्यासारखे आहे परंतु याच शाळेतील विद्यार्थ्यांने एवढे साधे समीकरण का सोडवले नाही याचा त्यांना भयंकर राग आला होता.
नवीन शाळेत, नवीन वर्गात पहिल्याच दिवशी, पहिल्याच तासिकेला आपले एवढे जय्यत आणि वाजतगाजत स्वागत होईल अशी मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. मात्र आपण खुप हुशार आहोत, आपल्याला खुप समजते असा जो स्वत:च्या मनाशी वर्षानुवर्षे गोड गैरसमज बाळगला होता तो क्षणार्धात गळून पडला होता. भलेही गणिताने प्रथमाग्रासे माक्षीकापात केला असला तरी आयुष्यात यापुढे एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसले तर गप्प बसायचे किंवा उत्तर येत नाही असे सांगून मोकळे व्हायचे. मग जे होईल ते होईल पाहून घेऊ परंतु चुकीचे किंवा खोटे सांगून समोरच्या व्यक्तीचा संताप वाढवू नये अशी खुणगाठ मी मनाशी बांधली.
सरांनी दिवसा तारे दाखवले याचे मला बिलकुल वाईट वाटले नाही. किंबहुना शिक्षकांच्या हातचा मार खाणे याचा शालेय पाठ्यक्रमात नियमितपणे समावेश असतो असा माझा ठाम समज होता. तरीपण वाजपेयीजींच्या अब हिंदू मार नहीं खाऐंगा प्रमाणे अब ये भोंदू गणितके वास्ते मार नहीं खाऐगा अशी आम्ही भिष्मप्रतिज्ञा केली आणि मग सुरू झाला आमचा गणिताचा तारणहार शोधण्याचा उपक्रम. लवकरच आम्ही यात यशस्वी झालो. लोकमान्य विद्यालयातील श्री लखपती सरांचा गणित शिकविण्यात हातखंडा होता. दुसऱ्याच दिवशी पहाटेलाच लखपती सरांच्या दारात आम्ही हजर झालो आणि साक्षात लोटांगण घालत सरांना गणिताचा भवसागर पार करून द्यायची विनवणी केली.
खरेतर त्याकाळी गणित आणि इंग्रजी हे विषय साधारण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खलनायक होते. कित्येक पिढ्या या दोन विषयांनी वर्षानुवर्षे कुजवल्या होत्या. त्याकाळच्या मॅट्रीक फेल किंवा दहावी नापासांनी खरेतर शिक्षण मंडळावर आजही अब्रुनुकसानीचा दावा ठोकला तरी माझे त्याला समर्थनच राहीला. तेव्हा मुलगी दहावी नापास म्हटले की लगेच वर्ष, दोनवर्षात तिचे हात पिवळे करून आई-वडील आपली जबाबदारी झटकत होते. मुलांचे हाल तर कुत्रही खात नव्हते. अनलिमिटेड मार, अमर्याद शिव्याशाप आणि समाज, नातेवाईकात दहावी नापास म्हटले की तोंड दाखवायची सुद्धा जागा रहायची नाही.
गणिताने पहिल्याच दिवशी ४४० व्होल्टचा झटका देताच मी खडबडून जागे झालो. अर्थातच ज्ञानेश्वर माऊलींना रेड्याच्या तोंडून वेद वदवतांना जेवढा त्रास झाला नसेल त्याच्या कैकपट कळा सोसून लखपती सरांनी चांगल्या प्रकारे हा विषय माझ्या मनात उतरवून दिला. यामुळे झाले काय तर गणितात कायम कुंपणावर उत्तिर्ण होणारे आम्ही बोर्डाच्या परीक्षेत भुमितीत ७५ पैकी ७५ तर बिजगणितात ७५ पैकी ७३ गुण मिळवत स्वत:सहित सर्वांना चकित केले होते. खरेतर आमच्या नजरेत हे यश म्हणजे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्याइतपत विशाल होते. सोबतच लखपती सर मला थोर गणितज्ञ रामानुजन यांचाच अवतार आहेत असे वाटायचे.
क्रमश:,,,,
*************************************
दि. २३ नोव्हेंबर २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
No comments:
Post a Comment