गेमचेंजर आणि सातबारा चेंजर'
***************************************
राजस्थान मधली राजकीय धुळवड शांत होते न होते तोच राफेलच्या 'थरथराटाने' विरोधकांचा 'थयथयाट' सुरू झालेला आहे. आधीच राममंदीर भुमीपुजनाच्या केवळ कल्पनेनेच गलितगात्र झालेल्या विरोधकांना राफेलच्या दणक्याने पुरते नेस्तनाबूत केलेले आहेत. यातूनच वैफल्यग्रस्त होत विरोधकांनी आपल्या प्रदुषित विचारांचे जे प्रदर्शन केले आहे ते पाहता फायटर राफेलने विरोधकांच्या बुडाला चांगलीच फायर लावली असल्याचे सध्यातरी चित्र आहे.
झाले काय तर राफेल नावाचे बाळ कित्येक वर्षाच्या कठीण प्रसुतीत अडकलेले होते किंबहुना जाणिवपूर्वक अडकवले होते की काय अशी शंका येते. याकरिता २०१४ पुर्वीच्या सरकारचे प्रकल्प अडवा पैसा जिरवा चे धोरण कदाचित कारणीभूत असावे. मात्र २०१४ ला केंद्रात मोदी नावाच्या निष्णात सर्जनने देशाची सुत्रे हातात घेताच याजन्मी अशक्य वाटावे असे कित्येक निर्णय धडाक्यात घेण्यात आले. मग ते तिहेरी तलाक रद्द करणे असो अथवा काश्मीरचे ३७० कलम रद्दबातल करणे असो अथवा सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राईक असो.
याच श्रृंखलेत मग देशाच्या सिमा सुरक्षीत करण्यासाठी या सरकारने काही अभुतपूर्व निर्णय तातडीने घेतले आणि इथेच विरोधकांची पोटदुखी सुरू झाली. खरेतर राफेलचे आगमन हा राष्ट्राभिमानाचा आणि राष्ट्रकौतुकाचा विषय आहे. मात्र विरोधकांनी इथेही हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना राफेलचा 'रा' सुद्धा कळला नसेल अशा स्वयंघोषीत संरक्षण तज्ञांनी राफेलबाबत गरळ ओकणे सुरू केले आहे. आपला देश राफेलबाबत इतका का आग्रही हे ज्यांना पाकविरुद्ध एअर स्ट्राईक आठवूनही कळले नसावे याचे नवलच वाटते.
वास्तविकत: प्रश्र्न राफेलचा नाही तर मोदींच्या अंधविरोधाचा आहे. मोदींच्या प्रत्येक निर्णयाला बेंबीच्या देठापासून ओरडत विरोध करणे हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम दिसतो आहे. यातूनच मग ना राफेल सुटले ना राममंदीर. मात्र सध्यातरी राफेलचा 'रेट' आणि राममंदीराची 'डेट' विचारणारे विरोधक जनतेपासून 'सेपरेट' झालेले दिसताहेत. ज्यांना राफेल गेमचेंजर वाटत नाही अशा सातबाराचेंजर्सनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एक चायवाला गेमचेंजर ठरला होता हे विसरता कामा नये.
अर्थातच विरोधकांचा हा आकांडतांडव काही नवीन आहे अशातला भाग नाही. राफेल येण्यापूर्वीच राममंदिर भुमीपूजनाची तारीख निश्चित झाली होती आणि राममंदीराचे नाव घेताच इथल्या पुरोगामी उंदीरांनी जी वळवळ सुरू केली होती ती पाहता या ढोंगी पुरोगाम्यांनी केवळ देशातल्या नव्हे तर अख्या जगातल्या रामभक्तांच्या श्रद्धेचा उपहास केला आहे. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही असे दिव्यज्ञान देणाऱ्यांनी आपल्या राज्यात याविषयी काय दिवे लावले आहेत याचे आत्मपरीक्षण करायला हरकत नाही.
राफेल असो वा राममंदिर या दोन्ही प्रसंगांनी देशात परत एकदा राष्ट्राभिमानाची त्सुनामी आली असून हिच बाब विरोधकांना खटकत आहे. जळी स्थळी मोदींना पाण्यात पाहणारे मोदींचा सर्वत्र होणारा उदोउदो पाहून विरोधक खंगत चालले आहेत. काहीही झाले तरी जनमानसावरची मोदींची पकड आणखी घट्ट होत असलेली पाहून विरोधकांना आत्तापासूनच २०२४ लोकसभा निवडणुकांचे निकाल स्वप्नात येत असावेत. मात्र मोदींचा विरोध करता करता आपण देश, सैन्याविरुद्ध भुमिका घेत आहोत किंबहुना आपल्या वक्तव्यांनी शत्रूराष्ट्रांना विनाकारण बळकटी मिळत आहेत याचा विरोधकांनी गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा २०२४ ला पुन्हा एकदा ईव्हीएमच्या नावाने बोंबा ठोकायची नामुष्की विरोधकांवर येऊ शकते.
***************************************
दि. ३० जुलै २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
+++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment