Monday, April 10, 2023

वेगाचा बादशहा, उसेन बोल्ट



     वेगाचा बादशहा,,, "उसेन बोल्ट" 
************************************
फास्टेस्ट मॅन ऑन दि अर्थ अशी ख्यातीप्राप्त जमैकाच्या उसेन बोल्टची कारकीर्द अखेर लंडनच्या वर्ल्ड एथलेटिक्स स्पर्धेत संपुष्टात आली. कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात सुवर्णपदक पटकाऊन यशस्वी सांगता करण्याचे त्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले. अर्थातच उसेन बोल्टसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंना करिअरच्या शेवटाला नियतीच्या क्रुरतेचा सामना करावा लागला. 
जमैकात जन्मलेला उसेन बोल्ट हा खरोखरच असामान्य खेळाडू होता. ऑगस्टमध्ये (२१ ऑगस्ट १९८६) जन्मलेल्या या महान खेळाडूच्या कारकीर्दीला ऑगस्टमध्येच (२०१७) पुर्णविराम मिळावा किती हा योगायोग समजावा.

 बालपणापासून खेळाची आवड असलेल्या बोल्टचे मन क्लासरूम पेक्षा मैदानावरच जास्त रमले. सुरवातीला क्रिकेट, फुटबाॅल आदी खेळात रमणारा हा पठ्ठ्या लवकरच शालेय क्रीडास्पर्धात धावक म्हणून नावारुपास आला. तरीही क्रिकेटचे वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. मात्र त्याच्या क्रिकेट प्रशिक्षकाच्या चाणाक्ष नजरेने त्यातला धावपटू लगेच ओळखला आणि त्याला क्रिकेट सोडून ॲथलेटिक्सच्या क्षेत्रात वळवले. हाच प्रसंग त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला आणि जगाला एक असामान्य धावपटू मिळाला.

आपल्या जवळपास सतरा वर्षाच्या कारकिर्दीत उसेन बोल्टने अनेक विश्वविक्रम रचले. १०० मिटर, २०० मिटर आणि ४०० रिले स्पर्धा म्हणजे त्याच्या बाए हाथका खेल होता. चित्याच्या चपळाईने धावतांना तो प्रतिस्पर्ध्यांना लिलया हरवत असे.  आपल्या यशस्वी कारकिर्दीत तब्बल नऊ ऑलिम्पीक सुवर्णपदक तर अकरा जागतिक एथलेटिक्स सुवर्णपदकांची लयलूट केली. दुर्दैवाने सहकारी खेळाडू डोपींगच्या जाळ्यात फसल्याने बोल्टला एका ऑलिम्पीक सुवर्णपदकाला मुकावे लागले. 

अर्थातच उसेन बोल्टला हे सुवर्णयश  एका रात्रीत नाही मिळाले तर त्यामागे त्याची दीर्घकालीन तपस्या आहे. आपल्या आवडीनिवडीला फाटा देत अंतिम रेषेपर्यंत सुसाट धावने हे त्याचे ध्येय होते. स्पर्धा कोणतीही असो, प्रतिस्पर्धी कोणीही असो किंवा स्पर्धेचे ठिकाण कोणतेही असो उसेन बोल्ट मैदानावर उतरताच एका वेगळे वादळ अनुभवायला मिळायचे. खरेतर उसेन बोल्टला स्कोलीऑसीस नावाची व्याधी होती ज्यात त्याचा मेरुदंड उजवीकडे वळल्याने उजवा पाय डाव्या पायापेक्षा अर्धा इंचाने छोटा होता. परंतु प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वासाने त्याने यशोशिखर गाठलेच. अशा या यशस्वी खेळाडूवर आय ॲम बोल्ट नावाचा चित्रपटदेखील नोव्हेंबर २०१६ प्रदर्शित झाला आहे.

शेवटी ज्याला सुरवात आहे त्याला अंत हा ठरलाच आहे. काळाची पाऊले ओळखून उसेन बोल्टने वयाच्या तिसाव्या वर्षी  निवृत्ती घेण्याचे ठरवले आणि त्याकरिता लंडन येथील वर्ल्ड एथलेटिक्स स्पर्धेचा मुहूर्त ठरला. सगळे काही मनासारखे घडले होते परंतु तिकडे नियती गालातल्या गालात हसत आपला क्रुर खेळ खेळायला तयार होती. आणि शेवटी झालेही तसेच ...वर्षानुवर्षे १०० मिटरची स्पर्धा लिलया जिंकणारा बोल्ट त्याच्यापेक्षा वयस्कर म्हणजेच तब्बल पस्तीस वर्षे वयाच्या अमेरिकन जस्टीन गॅटलीनसमोर लीन झाला. एवढेच काय तर अमेरिकेच्याच नवोदित एकविस वर्षीय क्रिस्टीयन कोलमनने त्याला धोबीपछाड देत तिसऱ्या स्थानावर ढकलले. सुवर्ण पदकाची आशा बाळगणाऱ्याला बोल्टला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

 कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात नियतीचा हिसका तर ब्रॅडमन आणि मोहम्मद अलीलासुद्धा बसला. क्रिकेटमध्ये फलंदाजीत डाॅन असलेल्या ब्रॅडमन यांना कसोटी फलंदाजीत शंभरी गाठाण्यासाठी शेवटच्या इनींगमध्ये अवघ्या चार धावा हव्या होत्या. परंतु दुर्दैवाने ते शुन्यावर बाद झाले. बाॅक्सिंगमध्ये दंतकथा ठरलेले मोहम्मद अलीसुद्धा आपल्या अंतिम सामन्यात ट्रॅव्हर बर्बिकडून पराभूत झाले. शतकांच्या राशी लावणारा सचिन एकदाही त्रिशतकाला गवसणी घालू शकला नाही. अशा एक ना अनेक घटना महान खेळाडूंना हुलकावणी देतांना आढळतात. खरेतर अशा घटनांमुळे या महान खेळाडूंचे कर्तृत्व निश्चितच झाकोळले जात नाही परंतु कारकिर्दीचा गोड शेवट करण्याची इच्छा मात्र अपुरी राहून जाते. म्हणूनच तर म्हणतात ना,,,
"कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता" 
"कही जमीं तो कही आसमां नही मिलता"

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...