Saturday, April 8, 2023

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९८३, भाग १०



      *शुर आम्ही सरदार आम्हाला,,भाग १०*
   *क्रिकेट विश्र्वचषक १९८३ अंतिम सामना*
***************************************
अखेर २५ जुन १९८३ चा दिवस उजाडला आणि जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या नजरा अंतिम सामन्यासाठी लॉर्डस मैदानाकडे लागलेल्या होत्या. तसेही यापुर्वी १९७५ आणि १९७९ ला या मैदानाने अंतिम सामन्याचा थरार अनुभवला होता परंतु यावेळी एका इतिहासाचा साक्षी होण्यासाठी हे मैदानही मनातुन आतुरलेले होते. जवळपास ३० हजार प्रेक्षकांनी गच्च भरलेले लॉर्डसचे मैदान कलिप्सोच्या धुंदीसोबत सोबतच डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याने न्हाऊन निघालेले होते. विंडीजच्या बेधुंद, बेहोशीत नाचणाऱ्या समर्थकांना "भारत माता की जय" च्या गजरात प्रत्युत्तर दिले जात होते. विंडीजचा कर्णधार क्लाईव्ह लॉईड निश्चिंतपणे कॉफीचे घोट घेत सामन्याची वाट बघत होता तर भारतीय कर्णधार कपिलदेव विश्वचषकावर डोळा ठेऊन संघसहकाऱ्यांना "जागते रहो, सिर्फ मेरे भरोसे मत रहो" चा कानमंत्र देत होता.
विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला पहिले फलंदाजी दिली आणि आता वेळ होती भारतीय फलंदाजी व विंडीजच्या पेस बॅटरीच्या द्वंदाची‌. विंडीजच्या तोफखान्यातील पहिले अस्त्र होते जोऐल गार्नर नावाचा वेगवान गोलंदाज. "बिग बर्ड" या टोपणनावाने प्रसिद्ध हा बार्बाडोसचा ६ फुट ८ इंच उंचीचा खेळाडू आपल्या भेदक बाऊंसर्स आणि  अचूक यॉर्करसाठी प्रसिद्ध होता. एकतर उंचपुरा, त्यातच हाय आर्म ऐक्शन, सोबत गोलंदाजी करतांना दोन फुटाची उडी मारताच साधारण उंची असलेल्या भारतीय फलंदाजांना गार्नरला खेळताना "नाकी नऊ यायचे". विंडीजचा दुसरा वेगवान गोलंदाज, जमैकन मायकेल होल्डींग "व्हिस्परींग डेथ" म्हणून ओळखला जायचा. समकालीन जेफ लॉसन, डेनिस लिली आणि एन्डी रॉबर्ट यांच्यापेक्षा वेगात सरस होता‌. ऐंटीगुआचा ऐंडी रॉबर्टस हा सुद्धा दर्जेदार वेगवान गोलंदाज, हिटमॅन नावाने ओळखला जायचा. विंडीज वेगवान चौकडीतला चौथा किलर गोलंदाज होता बार्बाडोसचा माल्कम मार्शल. दोन्ही बाजुंनी स्विंग करण्यात पटाईत असलेला हा गोलंदाज इनस्विंगींग यॉर्करवर फलंदाजांना अक्षरश: नाचवायचा. मुख्य म्हणजे हे खतरनाक वेगवान गोलंदाज गोलंदाजीला आले की बॅकग्राउंडला विंडीज प्रेक्षकांचा "किल हिम" चा गदारोळ असला की आणखी भयानक भासायचे.
भारतीय सलामी जोडीकडून चांगली सुरुवात मिळणे अपेक्षित होते परंतु या विश्र्वचषकात फारसा प्रभाव न टाकलेल्या गावसकरला अवघ्या दोन धांवात बाद करत एंडी रॉबर्टसने विंडीजला बळींचे खाते उघडून दिले होते. गावसकर झटपट बाद होताच भारतीय संघ चिंतेत पडला होता मात्र दुसऱ्या टोकाला श्रीकांतने दबाव झुगारत बॅटने कारंजे उडवणे सुरू केले होते. विंडीज तोफखान्याला शिंगावर घेत श्रीकांतने सात चौकार आणि एका षटकारासह वादळी ३८ धावा ठोकल्या. मात्र हाच झंझावात पुढे चालू ठेवतांना तो माल्कम मार्शलला अक्रास खेळला आणि पायचितात अडकला. २ बाद ५९ वरून मोहिंदर अमरनाथ सोबत यशपाल शर्माने डाव सांभाळण्याचा चांगला प्रयत्न केला. विशेषतः मोहिंदरने माल्कम मार्शलला हुक करत चौकारही ठोकला. मात्र संघाच्या ९० धावा झाल्या असताना मायकेल होल्डींगने अमरनाथचा त्रिफळा उडवत भारतीय मध्यफळीला गळती लावली. खरेतर विंडीज केवळ चार तज्ञ गोलंदाजांसह मैदानात उतरला होता आणि पाचवा गोलंदाज म्हणून कामचलाऊ लॅरी गोम्स आणि विव रिचर्डस गोलंदाजीचा भार उचलणार होता. भारतीय फलंदाज याच दोघांना टार्गेट करणार होते परंतु त्याकरिता संयम आणि हातात विकेट्स राखण्याची गरज होती.
३ बाद ९० वरून भारतीय संघ आणखी संकटात सापडला. मध्यफळीतील विश्वासू फलंदाज यशपाल शर्मा लॅरी गोम्सवर हल्ला चढवा‌यला गेला आणि डिप बॅकवर्ड प्वाईंटला  बदली खेळाडू गट्स लोगीकडून झेलबाद झाला. भारतीय संघाची हालत खस्ता होत असतांनाच मैदानात संदिप पाटील आणि कर्णधार कपिलदेवने मोर्चा सांभाळला. शिवाय समोर पार्टटाईम गोलंदाज असल्याने कपिलने आठ चेंडूत तिन चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेले होते. मात्र लवकरच तो लॅरी गोम्सच्या गोलंदाजीत फसला आणि लॉंग ऑनला षटकार ठोकतांना होल्डींगने त्याला अलगद पकडले. आता केवळ संदिप पाटीलच्या रूपात भारतीय आशा आकांक्षा जिवंत होत्या आणि तळातील फलंदाजांनी त्याला साथ द्यायची गरज होती.
भारताचा अर्धा संघ तंबूत परतताच ऐंडी रॉबर्टसने चेंडूचा ताबा घेतला आणि त्याच्या अचूक माऱ्यापुढे अष्टपैलू कि‌र्ती आझाद व रॉजर बिन्नी तग धरू शकले नाहीत. या दोघांनाही ऐंडी रॉबर्टसने बरोबर नेमलेल्या क्षेत्ररक्षकांच्या हाती झेल द्या‌यला भाग पाडून भारतीय संघाच्या नाड्या आणखीनच आवळल्या. ७ बाद १३० धावसंख्येवर मदनलाल संदिप पाटीलच्या दिमतीला आला आणि दोघांनी मिळून भारताला दिडशेचा महत्त्वपुर्ण पल्ला गाठून दिला. आता ही जोडी भारतीय संघाला तारतील असे वाटत असतांनाच जोऐल गार्नरने सॅंडीला बाद करत भारतीय संघाला आठवा हादरा दिला. या पाठोपाठ मार्शलने मदनलालच्या दांड्या उडवत भारतीय संघाची परिस्थिती केविलवाणी केली. अखेर सय्यद किरमाणी आणि बलविंदरसिंग संधूने धैर्य दाखवत शेवटच्या गड्यासाठी बहुमुल्य २२ धावांची भागीदारी करत भारताला १८३ पर्यंत पोहचवले. यात २० अतिरिक्त धावांचा समावेश होता.
लागोपाठ तिसऱ्यांदा विश्र्वचषक जिंकून विंडीजला हॅटट्रिक साधायची नामी संधी लाभलेली होती. शिवाय गार्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, विव रिचर्डस, कर्णधार क्लाईव्ह लॉईड, जेफ्री दुजां सारखे मातब्बर फलंदाज संघात असतांना जिंकण्यासाठी केवळ १८४ धावा म्हणजे "उंटके मुंहमे जिरा" सारखी स्थिती होती. सोबतच भारतीय मध्यमगती मारा कधीच काळजात धडकी भरवणारा नव्हता. तर दुसरीकडे विश्र्वचषक जिंकण्यासाठी कपिलदेव "इरेला पेटलेला होता". याकरीता त्याने संघाला चेतवणे सुरू केलेले होते. तसेच गोलंदाज बलविंदर संधूला काहीही झाले तरी फलंदाज संदिप पाटीलकडे चेंडू टोलवणार नाही अशी गोलंदाजी करायची याची ताकीद दिली होती कारण सॅंडीचे क्षेत्ररक्षण यथातथाच होते. दरम्यान सामन्याचा उत्तरार्धात विव रिचर्डस तडाखेबंद फलंदाजी करत असतांना सामन्याचे भवितव्य पाहून प्रेक्षकांत सामना बघत असणाऱ्या गावसकरच्या पत्नीने (मार्शनिलने) सिमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संदिप पाटीलजवळ गावसकर यांच्याकरिता एक निरोप पाठवला होता.
क्रमशः,,,,

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...