Friday, April 14, 2023

राधा क्यों गोरी, है क्यों काला


         राधा क्यों गोरी, मै क्युं काला
***********************************
भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर, २७ वर्षीय अभिनव मुकुंदने सध्या एक ट्विट करून आपल्या मनातली खदखद सर्वांसमोर मांडली आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर भारतीय कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूने त्याच्यावर होणाऱ्या रंगभेदी टिप्पणी वरून समाजात, देशविदेशात होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडली आहे. सध्या जग झपाट्याने बदलत आहे, टेक्नॉलॉजीच्या प्रसार प्रचाराने भौगोलिक अंतर जरी कमी झालेले असले तरी मनामनातील वर्णद्वेष, रंगभेद आणि नस्लभेदाच्या भिंती किती मजबूत आहे हे या प्रकरणाने सिद्ध होते.

खरेतर त्वचेचा रंग पाहून कोणत्याही व्यक्तीचे मुल्यमापन करणे चुकीचे आहे. परंतु जगभरात त्वचेच्या वर्णावरुन जागोजागी भेदभाव केल्या जातो.   वास्तविकतः त्वचेचा रंग हा आजुबाजुचे वातावरण,  आनुवंशिकता आणि भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो. त्वचेत मेलॅनीन नामक रंगद्रव्याचे प्रमाण जितके जास्त तितकी त्वचा गडद रंगाची असणार. आपल्याकडे सुर्यप्रकाशाची तिव्रता पाहता गडद रंगाची त्वचा असणे सामान्य बाब आहे. गडद त्वचा ही सनबर्नपासून बचाव तर करतेच पण घातक स्किन कॅन्सरपासून सुरक्षा पण देते. मात्र गोऱ्यापान रंगाची भुताकटी आपल्या मानगुटीवर एवढी जबरदस्त बसली असते की ती सहजासहजी उतरायला तयार नसते. लग्न म्हटले की वधू हमखास गोरीच पाहिजे .जणुकाही गोरेपण म्हणजे यशाची हमखास गॅरन्टी... परंतु वास्तव काही वेगळेच असते. काळ्यासावळ्या रंगाला एवढे हिनवले जाते की त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासात प्रचंड कमी आलेली असते. 

चित्रपटसृष्टी अर्थातच बाॅलीवुडचा जनमानसावर चांगला पगडा असतो. दुर्दैवाने तिथेही याबाबतीत फारसे वेगळे चित्र दिसत नाही. बाॅलीवुडची हिरोइन तर गोरी चिट्टीच हवी. मात्र हेमामालिनी, रेखा, काजोल आदी अभिनेत्रींनी नृत्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचे साम्राज्य उभे केले हे कसेकाय विसरता येईल. हिंदी सिनेगीतात गौरवर्णाचा उदोउदो जागोजागी आढळतो. किशोरकुमारचे गोरे रंगपे ना इतना गुमान कर असो की आत्ताचे जॅकलीन वर चित्रीत केलेले चिट्टीया कलाइया वे असो...  राधा क्यों गोरी मै क्युं काला हा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीरच होत आहे. बर ही मानसिकता आजची आहे असे नाही तर जुन्या काळीसुद्धा बाळाचा रंग पाहून हा कृष्णपक्षात जन्मला,,हा शुक्लपक्षात जन्मला असे टोमणे हमखास ऐकायला मिळायचे. 

काळ्या रंगाला, वर्णाला एवढे व्हिलन बनविल्या गेले आहे की एखादे वाईट काम, कृत्य अथवा घटनेला काळा रंग जोडा,,,जनमानस आपोआप त्या बाबीला अप्रिय समजणार. उदाहरणार्थ तोंड काळे करणे, काळे झेंडे दाखविणे,काळा दिवस पाळणे,अपशकुन टाळण्यासाठी काळया बाहुल्या दारात बांधणे, दृष्ट लागू नये म्हणून बाळाला काळा टिका लावणे इ. चिटपटांतील व्हिलन,डाकू किंवा असामाजिक तत्वांचा रंग कोणता असतो हे वेगळे सांगायची गरजच उरत नाही एवढे ते आपल्या मनात पक्के ठरलेले आहे. 

अर्थातच समाजाच्या या मानसिकतेचा व्यापारी कंपन्यांनी अचूक फायदा घेतला नसता तर नवलच असते. पी हळद नी हो गोरी च्या जमान्यात लोभसवाण्या आणि फसव्या जाहिरातींचे एवढे पिक आले की विचारु नका. सौंदर्यप्रसाधनांचा व्यापार कोटीच्या कोटींची उड्डाणे घेत आहे. एक महिन्यात गोरा करणाऱ्या फेअर अँन्ड लव्हली सारख्या फेअरनेस क्रिम तर ड्रेसिंग टेबलच्या अविभाज्य अंग झालेल्या आहे. स्त्रियांएवढे पुरुषांनाही गोरेपणाचे वेड काही कमी नाही म्हणूणच तर फेअरनेस क्रिम फाँर मेन लगेचच विकल्या जातात. ह्या फेअरनेस क्रिमने नक्की किती जणांना गोरेपण आले हा तर संशोधनाचा विषय ठरतो. मर्क्युरी सारखे घातक रासायनिक पदार्थ आणि स्टिरॉइड्स टाकून फेअरनेस क्रिम सर्रास विकल्या जातात. तात्पुरता चेहरा उजळला की ग्राहक आनंदून जातात आणि त्याच्या आहारी जातात भलेही मग अशा फेअरनेस क्रिमचे कितीही साईड इफेक्ट असो. 

जनसामान्यांच्या सोबतच क्रिडाक्षेत्रालाही या वर्णभेदाचा फटका बसला आहे. द. अफ्रिकेत महात्मा गांधींना वर्णभेदाचा वाईट अनुभव आला त्याला कित्येक वर्षे लोटली परंतु या ना त्या रुपात ही वाळवी समाजात आजही जिवंत आहे. क्रिकेटच्या बाबतीत बोलायचे झलेच तर अँन्ड्र्यू सायमंड हरभजन विवाद ताजा आहे. भारताच्या हरभजनसिंग वर अँन्ड्र्यू सायमंडला बिग मंकी म्हटल्याचा आरोप आहे. इंग्लंडच्या माँटी पनेसरला ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाज काॅलीन क्राफ्टला वर्णद्वेषातून द. आफ्रिकेत रेल्वेतून हाकलण्यात आले. ऑसी डिन जोन्सने समालोचन करतांना द.आफ्रिकेच्या हाशीम आमलाला त्याच्या लांब दाढीवरून आतंकवादी संबोधले होते.

 इंग्लंडच्या टोनी ग्रेगचा भारत आणि पाक क्रिकेट खेळाडूंविषयी वर्णद्वेष जगजाहीर होता. गोल्फचा जगप्रसिद्ध खेळाडू टायगर वुडला 'काळा गधा' म्हणून अपमानीत करण्यात आले. आपल्याकडील सिनेकलाकारांनाही परदेशात याचा बरेचदा आला आहे. प्रियंका चोप्राला ब्राऊनी म्हणून हिणवण्यात आले तर सलमान, शाहरूखला अमेरिकेत विमानतळावर वारंवार झाडाझडतीला सामोरे जावे लागलेले आहे. वर्णद्वेष, रंगभेद, नस्लभेद ही एकाप्रकारची मानसिक विक्रुतीच म्हणावे लागेल. नेल्सन मंडेला यांनी तर आयुष्याची सत्ताविस वर्षे याच भेदाविरूद्ध लढण्यात  तुरुंगात घातली. मार्टिन ल्युथर किंग यांनी उभारलेल्या मानवतेच्या लढ्यापोटी त्यांना काळा गांधी अशी उपमा दिली गेली.

काहीही असो अभिनव मुकुंदने या विकृती आवाज उठवून समाजाला जागे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मुकुंदच्या या अभिनव कल्पनेचे आपण सर्वांनी स्वागत करायराच हवे. वर्णद्वेषी, रंगभेदी, नस्लभेदी समस्येला, संकल्पनेला मुठमाती दिलीच पाहिजे. पी.टी.उषा, पी. सिंधु, ब्रायन लारा, बाॅक्सिंग किंग मोहम्मद अली, सर व्हिव्हियन रिचर्डस, थंडरबोल्ट,,, उसेन बोल्ट,मुथैय्या मुरलीधरन अब्राहम लिंकन, बराक ओबामा असे एक ना अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी रंग, वर्ण आणि देशाच्या सिमा ओलांडून जग जिंकले आहे. गोर्या काळ्याच्या खुळचट कल्पना आता कालबाह्य झाल्या असून आता तुम्ही स्वकर्तृत्वाने जग जिंकू शकता. बरे झाले अभिनव मुकुंदच्या लढ्याला कर्णधार विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या, कंगणा रनौत, ज्वाला गुट्टा आणि समाजातून चांगले समर्थन मिळत आहे. या समस्येवर फार पुर्वीची  एक उक्ती अगदी तंतोतंत जुळते आहे.
काय भुललासी वरलीया रंगा
उस डोंगा परी रस नोहे डोंगा
*************************************
दि. १२ ऑगस्ट २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...