Monday, April 10, 2023

भारताचा हीटमॅन "रोहित शर्मा"



             रोहीत शर्मा,,दी हिटमॅन
            *डॉ अनिल पावशेकर*
***********************************
खरेतर क्रिकेट जगताला दिग्गज सलामीवीरांची भलीमोठी परंपरा आहे. मात्र वनडे चा विचार करता सचिन, सेहवाग, जयसुर्या, शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल, गिलख्रिस्ट, वाॅर्नर, नॅथन ॲस्टल यांच्यासारख्या दे दणादण स्टाईलने फलंदाजी करणाऱ्या स्टार्सनी सलामीवीरांचे संघात आगळेवेगळे महत्त्व प्रस्थापित केलेले आहे.

 सचिन, सेहवागच्या निवृत्ती नंतर टिम इंडीयाकडे सर्वात जास्त भरवश्याचा आणि जागतिक दर्जाचा सलामीवीर म्हणून कोणाचे नाव घ्यायचे ठरले तर आजच्यातरी घडीला रोहीत शर्मा हे नाव नक्कीच ओठावर येते. नागपूरला जन्मलेल्या आणि मुंबईत वाढलेल्या या खेळाडूने आपल्या मनगटाच्या जोरावर टिम इंडीयात आपले अढळ स्थान प्राप्त केले आहे. टिम इंडीयाचे सारथ्य करायच्या पहिले रोहितने २०१३ आणि २०१५ ला आयपीएल मध्ये आपल्या सकस नेतृत्वाने मुंबई इंडीयन्सची नाव  दोनदा पैलतीरावर लावली होती. म्हणूनच विराट सी.एल.(लग्न कार्यासाठी) वर असतांना टिम इंडीयाची धुरा निवड समितीने निःसंकोचपणे रोहीतच्या हातात दिली होती. मिळालेल्या संधीचे सोने न करेल तर तो रोहीत कसला? धर्मशाळेचा अपवाद वगळता इतर सामन्यात त्याने आपला ठसा चांगलाच उमटवला होता तर त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने लंकन गोलंदाजांच्या पाठीवरचे वळ अजुनही काळेनिळे आहेत असे म्हणतात.

वास्तविकतः वनडेत श्रीगणेशा करुनही कसोटीत प्रवेशासाठी त्याला बराच काळ वेटींगमध्ये रहावे लागले. मात्र वनडेत त्याची बॅट आग ओकत होती. वनडेत तब्बल तिन द्विशतके झोडून तो ध्रुवतारा झाला आहे तर टी ट्वेन्टी मध्ये ३५ चेंडूत शतक ठोकून द.आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या विश्वविक्रमाला त्याने गवसणी घातली आहे. उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करणारा हा अवलीया आपल्या रंगात असला की ती मॅच म्हणजे वन मॅन शो अर्थातच रोहीत शो असते. त्याची कलात्मक आणि नैसर्गिक फलंदाजी डोळ्याचे पारणे फेडून जाते. 

पुल, हुक मारण्यात हातखंडा असणारा रोहीत सेहवाग, गेल सारखा पाॅवर हिटर नसला तरी आपल्या जबरदस्त टायमिंगच्या साहय्याने अपेक्षित रिझल्ट देतो. गेल, सेहवाग गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत असतात तर रोहीत गोलंदाजांच्या गालावरून मोरपीस फिरवावे एवढ्या हळुवारपणे बॅटने चेंडू मैदानाबाहेर फेकतो. उपरवालेकी लाठीकी और रोहीतके बॅटकी आवाज नही आती म्हणतात ते याचसाठी. बायसेप, ट्रायसेप आणि डेल्टाॅइड मसल पाॅवरपेक्षा रोहीत मनगट आणि अचुक टायमिंगच्या शिदोरीवर भरगच्च धावा काढतो. लंका आणि कांगारु ही त्याची फेवरेट डिश आहे. वनडेतील त्याच्या एकूण सोळा शतकांपैकी पाच शतके लंकेविरूद्धची तर सहा कांगारूंसोबतची आहे. दोन व्दिशतके लंकेसोबत तर एक कांगारूंविरूद्ध काढलेले आहे.
 
एवढे असले तरी त्याच्या फलंदाजीत अरेरावी अजिबात नाही. रोहीतने गोलंदाजांची धुलाई केली तरी गोलंदाज त्याच्याकडे खुन्नसने नव्हे तर आदरयुक्त कौतुकाने बघतात हा त्याचा दर्जा आणि ही त्याच्या बॅटची ऊंची सांगून जाते. डावाची सुरवातीला मवाळ असणारा रोहीत मध्यंतरानंतर कधी जहाल होतो हे गोलंदाजांना कळतदेखील नाही. शतकानंतर द्विशतक ठोकतांना त्याची जी स्पिड असते त्यासमोर उसेन बोल्टसुद्धा खुजा वाटतो. मारुती ८०० ते फरारी चे दर्शन याची देही याची डोळी आपणास त्याने द्विशतकी खेळी करतांना तिनदा करून दिले आहे. 

सेहवाग, गेल गोलंदाजांवर मानवी बाँम्ब बनून तुटून पडतात तर रोहीत सिरीयल किलरसारखा थंड डोक्याने त्यांची कत्तल करत असतो. खरेतर युनोने आणि आयसीसीने रोहीतच्या तिन्ही द्विशतकी खेळींना रक्तविहीन क्रांती म्हणून घोषित करायला हरकत नाही. गोलंदाजांची एवढ्या शांतपणे कत्तल करून सामने जिंकवल्याबद्दल त्याला क्रिकटचे शांततेचे नोबेल प्राईझ  नक्कीच मिळू शकते.  

फलंदाजीसोबतच त्याने आपल्या नेतृत्व गुणाची पण चुणूक बरेचदा दाखवली आहे. मुंबई इंडीयन्सचे यशस्वी नेतृत्व करतांना कित्येकदा तो स्वबळावर सामने जिंकून देतो. मैदानावर कुठेही आदळआपट, खळ्ळ खट्याक न करता शांतपणे संघ हाताळतो. इंदौरला चहल, यादवला लंकन फलंदाज बदडत असतांना धोनीसोबत त्यानें दोन्ही स्पिनर्सवर विश्वास दाखवत त्यांची गोलंदाजी चालूच ठेवली आणि टिम इंडीयाने पुढील सतरा चेंडूत सात विकेटची भरगच्च कमाई करून मॅच खिशात घातली. 

२०१५ फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या टाॅप हंड्रेड इंडीयन्समध्ये त्याने आठवे स्थान पटकावले होते. तर आयपीएल मध्ये मुंबई इंडीयन्सला दुसऱ्यांदा त्याने जेतेपद मिळवून दिले. एका वनडेत सर्वात जास्त म्हणजे १६ षटकार आणि सर्वात जास्त चौकार (३३) मारण्याचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे. वर्षभरात तब्बल ६४ षटकार हाणून तो अग्रक्रमी आहे तर तिनदा द्विशतकाची किमया त्याच्याखेरीज कोणालाच जमली नाही. टी ट्वेंटीतल्या सर्वात वेगवान शतकाच्या किलर मिलरच्या  विक्रमाच्या पंक्तीत तो आता बसला आहे. 

सचिन सेहवागच्या सलामी जोडीनंतर रोहीत शिखर धवनची जोडी हिट ठरली आहे. रोहीतला सचिनसोबत सलामीला खेळण्याचे भाग्य जरी लाभले नसले तरी गब्बर इज बॅक अर्थातच धवनसोबत सलामीला त्याची भट्टी चांगली जमते. सचिन सेहवाग जोडीसारखी ही जोडी सुरवातीलाच धावांचे अग्निकुंड धडधडीतपणे पेटवत नसली तर समईसारखे मंद मंद पेटत शेवटी विरोधी गोटात अग्नितांडव नक्कीच माजवते. काळापरत्वे टिम इंडीयातून सेहवागचा सुर्य मावळतीला लागला होता आणि अगदी त्याचकाळात रोहीत नावाचा बालसुर्य आकार घेत होता. जशीजशी पैलतिरावर सेहवागची सावली मोठी होत गेली तसतशी रोहीतची बॅट तळपायला लागली. 

फिजीक्सचा नियम आहे... एनर्जी नेव्हर एंड्स इट कन्व्हर्ट्स इनटू अनादर फॉर्म अगदी त्याचप्रमाणे सलामीला सचिन, सेहवागची कायनेटीक एनर्जी आपल्याला पोटेन्शियल एनर्जीच्या रुपात रोहीत, धवनमध्ये बघायला मिळते. सलामीलाच रोहीतच्या असण्याने टिम इंडीयासुद्धा  त्याच्याकडून चांगल्या सुरवातीची अपेक्षा बाळगून असते. भलेही सचिन, सेहवाग एवढी लोकप्रियता आणि कौतुक रोहीतच्या वाट्याला आले नसेलही परंतु यामुळे त्याच्या योग्यतेत आणि दर्जात फारसा फरक पडत नाही. अझरुद्दीन, सचिन आणि लक्ष्मणच्या बॅटींगचे काॅकटेल* म्हणून रोहीतची बॅटींग एन्जॉय करायला आपल्याला हरकत नाही. इंदौरच्या गुलाबी थंडीत त्याने लंकेविरूद्ध झळकवलेले झंझावाती शतक पाहता आपण एवढेच म्हणू शकतो....
बर्कसी गिर गई, कामही कर गई
आग ऐसी लगाई, मजा आ गया

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...