Saturday, May 27, 2023

शुभमनने मुंबईची मैफिल लुटली!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *शुभमनने मुंबईची मैफिल लुटली!*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
आयपीएल सिझन सोळाच्या दुसऱ्या क्वालीफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला लोळवत अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. तब्बल पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिरवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना शुभमन गिलने अक्षरशः बदडत सामना पूर्वार्धातच गुजरातकडे वळवला होता. एकहाती सत्ता मिळवणे किंवा एकहाती सामना फिरवणे काय असते हे या सामन्यातील शुभमनच्या खेळीने दिसून येते. त्याच्या शतकी दणक्याने मुंबई इंडियन्स बाजार उठला आणि उरलीसुरली कसर टायटन्सच्या गोलंदाजांनी पुर्ण करून मुंबईची फुटलेली नाव साबरमती नदीत डुंबवून टाकली.

झाले काय तर मुंबई इंडियन्सचा संघ म्हणजे या सिझन मध्ये ओसाड गावच्या पाटीलकी सारखा होता. कलकत्ता, बंगलोर, लखनौ या संघासोबत मुंबई संघ म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी होती. मुंबई संघाने यापुर्वी आयपीएल वर जे राज्य केले त्यात पांड्या बंधू,  क्लिंटन डिकॉक, कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या पाच पांडवांचे महत्वपूर्ण योगदान होते. मात्र हे पंचप्राण संघात नसल्याने मुंबईचा संघ कवचकुंडले हिरावलेल्या कर्णासारखा अगतिक होता. त्यातही प्लेऑफला शुभमनच्या कृपादृष्टीने मुंबई संघ क्वालीफायरला पोहोचला होता. मात्र याच शुभमनने त्यांना परतीचे तिकीट देत 'दिल दिया दर्द दिया' ची आठवण करून दिली.

सामन्यावर पावसाचे सावट असल्याने रोहितने नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करली. पण गुजरात संघाला धडकी बसवणारा किंवा अडचणींत आणणारा गोलंदाज खरोखरच मुंबई संघाकडे कोणता होता हा प्रश्नच होता. त्यातच मुंबई संघाचा कर्दनकाळ ठरलेल्या शुभमनला त्यांनी प्रारंभीच जीवदान दिल्याने बुडत्याचे पाय खोलात असल्याचे दिसत होते. मलालाच्या वन चाईल्ड वन टीचर वन बुक वन पेन कॅन चेंज दी वर्ल्ड प्रमाणे या सामन्यात वन झेल (गिल चा सुटलेला), वन स्पेल (मोहित शर्माचा) कॅन चेंज दी मॅच ठरला आहे.

अर्थातच जीवदान मिळालेल्या शुभमनने लायसन्स टू किल करत चावला ॲंड कंपनीचा चावून चोथा करून टाकला. मागेल त्याला चौकार षटकार ठोकत त्याने मुंबई संघाला पळता भुई थोडी केली. त्याने फ्लिक, पुल आणि हेलिकॉप्टर शॉटची उधळण करत धावांचे सोने लुटले. बरे झाले शोले चा गब्बर सिंग हयात नाही. अन्यथा त्याने ठाकूर ऐवजी शुभमनचे हात मागितले असते. एकीकडे शुभमनने चौकार षटकारांचा लंगर चालू केला होता तर दुसऱ्या टोकाला साई ने आपले सुदर्शन चक्र चालवत त्याला उत्तम साथ दिली होती. शुभमनने पेटवलेल्या वणव्यात हार्दिक पांड्या आणि राशिद खानने आपली पोळी भाजून घेतली. खरोखरच या डावात मुंबई गोलंदाजांची किव येत होती‌. बिच्याऱ्यांचे जो भी कदम बढे बरबादी की ओर बढे असे झाले होते.

अंतिम फेरीसाठी मुंबई संघाला पॉवरप्ले मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे गरजेचे होते. मात्र तिथेही नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने होती. सलामीवीर ईशान किशन जखमी होता तर रोहीतच्या बॅटने मौनव्रताचा वसा घेतला होता. याउलट टायटन्सला फायनल साठी खुल जा मो. शामी शामी वर भरवसा होता. त्यानेही सुहानी शाम मो. शामी के नाम करत दोन्ही सलामीवीरांना उडवले. या धुमश्चक्रीत कॅमरून ग्रीन आणि सूर्याने पाय रोवण्यात सुरूवात केली होती. पण हार्दिक ने ग्रीन ला जखमी केल्याने मुंबई साठी पहिला रेड सिग्नल झाला होता. मात्र त्यातही सूर्याने तिलक वर्माच्या दिमतीने घोडदौड सुरू ठेवली होती. प्रारंभीच मुंबईला हादरे देणाऱ्या मो.शामीच्या एका षटकांत तिलक वर्माने तब्बल चोवीस धावा वसूल करत मुंबईचा राजतिलक निश्चित केला होता.

खरेतर इथे कर्णधार पांड्या ने नेतृत्वात चतुरता दाखवली. आपला हुकमी एक्का राशिद खानला आक्रमणाला आणून त्याने तिलक वर्माची खेळी संपवली. तरीपण ग्रीन आणि सूर्याने वेगाने धावसंख्या करत सामना जीवंत ठेवला होता. पुन्हा एकदा पांड्या ने आपले जॉश नावाचे लिटिल अस्त्र बाहेर काढून ग्रीनचा त्रिफळा उडवला. ज्याप्रमाणे जॉश लिटिलने ग्रीनच्या बॅट आणि पॅड मधून चेंडू काढला, ते पाहता तो मागच्या जन्मी अचूक नेमबाज असावा असे वाटते. जॉश लिटिलने ग्रीनचा घेतलेला बळी हे टायटन्सचे विजयाच्या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल होते. एवढ्या पडझडीतही सूर्या मुंबईची वज्रमूठ बांधून होता, गरज होती त्याला कोणीतरी समर्थ साथ देत निर्भय बनो म्हणण्याची. पण इथे मुंबई संघाचे डावपेच अनाकलनीय होते.

त्यांच्याकडे टीम डेव्हिड सारखा दणदणीत फलंदाज असतांना विष्णू विनोदला पाठवण्याचा गंभीर विनोद त्यांनी केला. टीम डेव्हिडचे लोणचे घालुन विष्णू विनोदला मैदानात उतरवल्याने सूर्याच्या खांद्यावरचा भार वाढला‌ होता. सूर्या मैदानात धावांची कारंजी उडवतांना पाहून हार्दिकची धडधड नक्कीच वाढली होती. कारण ज्याप्रमाणे सू्र्याने मैदान झाकोळून टाकले होते ते पाहता सामना बरोबरीत वाटत होता. मात्र हार्दिकने त्याचे मायावी अस्त्र, मोहित शर्माला बाहेर काढले आणि तळपणाऱ्या सूर्याला ग्रहण लागले. मोहितने मध्यमगती गोलंदाजी करतांना स्लोअर वनचा, मंदगतीचा अफलातून प्रयोग करत मुंबई फलंदाजांना मतीमंद करून टाकले.

मुंबई फलंदाजीचा सूर्यास्त झाला तरी टीम डेव्हीडच्या रूपात नभात लालीमा अजूनही बाकी होती. तर तिकडे बेरक्या हार्दिकने टीम साठी राशिद खानचा सापळा रचला होता. टीमचा गेम होताच मुंबईचे उरले सुरले वर्हाड मोहितने गुंडाळून टाकले. कारण टीम डेव्हिड बाद होताच मुंबई संघ टॉक टाइम नसलेल्या परंतु व्हॅलिडीटी शाबूत असलेल्या प्लान सारखा होता. वर्हाड्यांनी जेवन केल्याशिवाय जाऊ नये, त्याप्रमाणे औपचारिकता म्हणून उर्वरित फलंदाज बॅट घेऊन फलंदाजीला आले. मात्र एकवेळ बैलाकडून दूधाची अपेक्षा करता येईल परंतु मुंबई संघाच्या शेपटाकडून विजयी पाठलागाची अपेक्षा अजिबात नव्हती. पोलार्ड, हार्दिक पांड्या चे डबल इंजिन पूर्वी मुंबईला तारून न्यायचे. मात्र आता 'जाने कहा गये वो दिन' होते.

या लढतीचे संक्षिप्त वर्णन करायचे झाल्यास टायटन्स फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मुंबई इंडियन्स पेक्षा सरस ठरले. हार्दिक पांड्याने नेतृत्वात चुणुक दाखवतांना मु़ंबईच्या प्रमुख फलंदाजाचा ॲंटीडोझ त्याने तयार ठेवला होता. मुख्य म्हणजे तो गोलंदाजांच्या बाबतीत श्रीमंत कर्णधार होता. शामीची तेजतर्रार गोलंदाजी, राशिदची भुताटकी, मोहितची मोहिनी गोलंदाजी मुंबईला भारी पडली. तर रोहितकडे आकाश मधवालचा लखनौ संघाविरूद्धचा एका स्पेलचा अपवाद वगळता दारिद्र्य रेषेखालील गोलंदाज होते. खरेतर त्याच्या भात्यातील जोफ्रा आर्चर हा बाण शोभेची वस्तू ठरला. शिवाय रोहितची एकंदरीत देहबोली आणि कर्णधार म्हणून कामगिरी अगदी साधारण होती. रखडत रखडत क्वालीफायरला पोहोचलेला मु़ंबई संघ मजबूत टायटन्ससमोर हतबल ठरला‌.  एकट्या शुभमनने मुंबईची मैफिल लुटून सर्वांची वाहवा मिळवली आणि गुजरातचे टायटॅनिक दिमाखात फायनलला पोहोचले.
**********************************
दि. २७ मे २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Friday, May 26, 2023

लेट्स गो लेपर्ड सफारी, भाग ०२

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *लेट्स गो लेपर्ड सफारी, भाग ०२*
              *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान इथल्या भारतीय सफारीची सुरूवात होते लेपर्ड (बिबट्या) सफारीने. या सफारी करिता २५ हेक्टरमध्ये आधीच विरळ होत चाललेल्या जंगली भागात मानवी हस्तक्षेपाची थीम साकारली आहे. यांत काही जागी तुटकी घरे, कमी उंचीच्या भिंती तर कुठे मचाणासारखी रचना केलेली आहे, जेणेकरून बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळेल अथवा आडोसा शोधता येईल. या सफारीत सात बिबटे असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात तीन बिबटे दृष्टीस पडतात. त्यातही दुपारची उन्हाची वेळ असल्याने बिबट्यांनी फिडींग शेडच्या बाजूने मस्त ताणून दिल्याने त्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला नाही.

खरेतर चित्ता, बिबट्या आणि जग्वार हे तिन्ही प्राणी मार्जार कुळातील असले तरी तिघांचीही शारिरीक रचना, आकारमान भिन्न भिन्न आहेत. चित्ता हा लांब,सडपातळ आणि सर्वात वेगवान प्राणी असून प्रामुख्याने आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळतो. बिबट्या हा आकारमानाने लहान, मांजरासारखा मांसल असून  आफ्रिका आणि दक्षिण आशियात आढळतो. तर जग्वार हा प्राणी, चित्ता आणि बिबट्या पेक्षा आकाराने मोठा असून सेंट्रल आणि दक्षिण अमेरिकेतील दाट जंगलात आढळतो. चित्याची कातडी पिवळसर करडी, बिबट्याची कातडी क्रिम पिवळ्या,नारंगी रंगाची तर जग्वार ची कातडी पिवळसर करडी,त्यावर गुच्छाकृती छप्पे असून त्यात काळे ठिपके असतात. बिबट्याच्या त्वचेवरील छप्प्यांमध्ये काळे ठिपके नसतात तर चित्यांच्या त्वचेवरील ठिपके भरीव असतात. चित्यांच्या चेहऱ्यावर अश्रूंसारख्या रेषा असतात, जे त्यांचे वैशिष्ट्य होय‌.

बिबट्याच्या पिवळ्या कातडीवर ठिपक्यांत प्रदेशानुसार विविधता आढळते. पर्जन्यवनात त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी, वाळवंटी भागात काहीशी फिक्कट तर थंड प्रदेशात ती थोडी करड्या रंगाची असते. काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसून त्याच्या त्वचेतील रंगद्रव्य मेलॅनीनचे प्रमाण जास्त झाल्याने त्याचा गडद काळा रंग असतो. मात्र काळ्या बिबट्याची त्वचा जवळून पाहिली असता त्यावर नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबट हे दाट जंगलात आढळतात. तिथे त्यांना गडद दाट रंगाचा शिकारीसाठी, दबा धरून बसण्यासाठी फायदा होतो. भारतात काळे बिबट प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये तसेच नेपाळ आणि आफ्रिकेच्या माऊंट केन्याच्या जंगलात आढळतात. लोकप्रिय सिरिअल जंगल बुक मधला मोगलीचा मित्र, रक्षक, संरक्षक असलेला बघीरा म्हणजेच हा काळा बिबट होय.

बिबट्या त्याच्या जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा आकारमानाने लहान असला तरी तो चपळ शिकारी असून त्याच्या मोठ्या कवटीमुळे तो मोठ्या भक्षांचा सुद्धा फडशा पाडतो. बिबट्याचे वजन २० ते ९० किलो पर्यंत असू शकते‌. ही वैविध्यता भक्षाच्या उपलब्धतेवर आणि दर्जावर, स्थानकाळानुसार अवलंबून असते. बिबट्याच्या खाद्यामध्ये इतर मार्जारांपेक्षा जास्त वैविध्य असते. खुर असलेले प्राणी हे बिबट्याचे प्रमुख खाद्य असले तरी माकडे, उंदिरासारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे), उभयचर, पक्षी व किड्यांचा पण त्याच्या खाद्यात समावेश होतो. यासोबतच कोल्ह्यांसारखे लहान शिकारी प्राणी देखील तो खातो.

बिबट्याची गणना असुरक्षित प्रजाती मध्ये केली गेली आहे तर चित्ता भारतातून नामशेष झाला होता. मात्र अगदी काही महिने पहिले नामिबियातून आठ आणि द.आफ्रिकेतून बारा चित्ते आणून ते मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले गेले आहे. समाधानाची बाब म्हणजे कुनो उद्यानातील चित्ते असो की गोरेवाडातील बिबटे असो, दोन्ही प्रजातींनी प्रजननाची परंपरा योग्यरीत्या पाळली आहे. तसेही आपल्याकडे लोकसंख्येने जागतिक पातळीवर डंका वाजवला असल्याने बिचारे प्राणी तरी कसे माघारी राहतील? कोरोनो असो अथवा लॉकडाऊन असो, लोकसंख्या वाढीचे मीटर आपल्याकडे कधीच डाऊन होत नाही. 

भलेही कोरोना, लॉकडाऊन मुळे इतर व्यापार उद्योगाची माती झाली असली तरी आपल्याकडे आपली माती आपली माणसं असल्याने आपल्या देशात लोकसंख्या वाढीचा गृहउद्योग चांगलाच भरभराटीस आला आहे. सध्यातरी एप्रिलमध्ये गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील चिंकी या मादा बिबटने दोन बछड्यांना तर रुची मादा बिबटने तीन बछड्यांना जन्म दिल्याचे कळते. वास्तविकत: वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेत असल्याने त्यांची संख्या आणि जीवंत राहण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच अगदी गावाशेजारी, मनुष्य वस्तीजवळ देखील त्यांचा संचार आढळतो.

बिबट गावाशेजारी रहातो याचं कारण वाघ दाट जंगलात रहातो, त्याच्या भीतीमुळे बिबट जंगलाच्या सीमोवरच थांबतो, तर माणसाच्या भीतीने वाघ गावाकडे येण्याचं टाळतो. शेवटी काय तर मनुष्यप्राणी असो अथवा वाघ किंवा बिबट, 'डर का माहौल' सगळीकडे बघायला मिळतो. बिबटाचे शिकार, भक्ष्य असे कुत्रे, कोंबड्या सारखे वजनाने हलके प्राणी सहज उचलुन पळता यावे असे गावाजवळ आधिक्याने उपलब्ध असल्याने बरेचदा बिबटे गावखेड्याची वेस ओलांडताना दिसतात.
क्रमशः,,,,
**********************************
दि. २६ मे २०२३ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Wednesday, May 10, 2023

लेट्स गो लेपर्ड सफारी, भाग ०२

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *लेट्स गो लेपर्ड सफारी, भाग ०२*
              *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान इथल्या भारतीय सफारीची सुरूवात होते लेपर्ड (बिबट्या) सफारीने. या सफारी करिता २५ हेक्टरमध्ये आधीच विरळ होत चाललेल्या जंगली भागात मानवी हस्तक्षेपाची थीम साकारली आहे. यांत काही जागी तुटकी घरे, कमी उंचीच्या भिंती तर कुठे मचाणासारखी रचना केलेली आहे, जेणेकरून बिबट्यांना लपण्यासाठी अथवा आडोशाची सोय होईल. या सफारीत सात बिबटे असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात तीन बिबटे दृष्टीस पडतात. त्यातही दुपारची उन्हाची वेळ असल्याने बिबट्यांनी फिडींग शेडच्या बाजूने मस्त ताणून दिल्याने त्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला नाही.

खरेतर चित्ता, बिबट्या आणि जग्वार हे तिन्ही प्राणी मार्जार कुळातील असले तरी तिघांचीही शारिरीक रचना, आकारमान भिन्न भिन्न आहेत. चित्ता हा लांब,सडपातळ आणि सर्वात वेगवान प्राणी असून प्रामुख्याने आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळतो. बिबट्या हा आकारमानाने लहान, मांजरासारखा मांसल असून  आफ्रिका आणि दक्षिण आशियात आढळतो. तर जग्वार हा चित्ता, बिबट्या पेक्षा आकाराने मोठा असून सेंट्रल आणि दक्षिण अमेरिकेतील दाट जंगलात आढळतो. चित्याची कातडी पिवळसर करडी, बिबट्याची कातडी क्रिम पिवळ्या,नारंगी रंगाची तर जग्वार ची कातडी पिवळसर करडी,त्यावर गुच्छाकृती छप्पे असून त्यात काळे ठिपके असतात. बिबट्याच्या त्वचेवरील छप्प्यांमध्ये काळे ठिपके नसतात तर चित्यांच्या त्वचेवरील ठिपके भरीव असतात.

बिबट्याच्या पिवळ्या कातडीवर ठिपक्यांत प्रदेशानुसार विविधता आढळते. पर्जन्यवनात त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी, वाळवंटी भागात काहीशी फिक्कट तर थंड प्रदेशात ती थोडी करड्या रंगाची असते. काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसून त्याच्या त्वचेतील रंगद्रव्य मेलॅनीनचे प्रमाण जास्त झाल्याने त्याचा गडद काळा रंग असतो. मात्र काळ्या बिबट्याची त्वचा जवळून पाहिली असता त्यावर नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबट हे दाट जंगलात आढळतात. तिथे त्यांना गडद दाट रंगाचा शिकारीसाठी, दबा धरून बसण्यासाठी फायदा होतो. भारतात काळे बिबट प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये तसेच नेपाळ आणि आफ्रिकेच्या माऊंट केन्याच्या जंगलात आढळतात. लोकप्रिय सिरिअल जंगल बुक मधला मोगलीचा मित्र, रक्षक, संरक्षक असलेला बघीरा म्हणजेच हा काळा बिबट होय.

बिबट्या त्याच्या जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा आकारमानाने लहान असला तरी तो चपळ शिकारी असून त्याच्या मोठ्या कवटीमुळे तो मोठ्या भक्षांचा सुद्धा फडशा पाडतो. बिबट्याचे वजन २० ते ९० किलो पर्यंत असू शकते‌. ही वैविध्यता भक्षाच्या उपलब्धतेवर आणि दर्जावर, स्थानकाळानुसार अवलंबून असते. बिबट्याच्या खाद्यामध्ये इतर मार्जारांपेक्षा जास्त वैविध्य असते. खुर असलेले प्राणी हे बिबट्याचे प्रमुख खाद्य असले तरी माकडे, उंदिरासारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे), उभयचर, पक्षी व किड्यांचा पण त्याच्या खाद्यात समावेश होतो. यासोबतच कोल्ह्यांसारखे लहान शिकारी प्राणी देखील तो खातो.

बिबट्याची गणना असुरक्षित प्रजाती मध्ये केली गेली आहे तर चित्ता भारतातून नामशेष झाला होता. मात्र अगदी काही महिने पहिले नामिबियातून आठ आणि द.आफ्रिकेतून बारा चित्ते आणून ते मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले गेले आहे. समाधानाची बाब म्हणजे कुनो उद्यानातील चित्ते असो की गोरेवाडातील बिबटे असो, दोन्ही प्रजातींनी प्रजननाची परंपरा योग्यरीत्या पाळली आहे. तसेही आपल्याकडे लोकसंख्येने जागतिक पातळीवर डंका वाजवला असल्याने बिचारे प्राणी तरी कसे माघारी राहतील? कोरोनो असो अथवा लॉकडाऊन असो, लोकसंख्या वाढीचे मीटर आपल्याकडे कधीच डाऊन होत नाही. 

भलेही कोरोना, लॉकडाऊन मुळे इतर व्यापार उद्योगाची माती झाली असली तरी आपल्याकडे आपली माती आपली माणसं असल्याने आपल्या देशात लोकसंख्या वाढीचा गृहउद्योग चांगलाच भरभराटीस आला आहे. सध्यातरी एप्रिलमध्ये गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील चिंकी या मादा बिबटने दोन बछड्यांना तर रुची मादा बिबटने तीन बछड्यांना जन्म दिल्याचे कळते. वास्तविकत: वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेत असल्याने त्यांची संख्या आणि जीवंत राहण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच अगदी गावाशेजारी, मनुष्य वस्तीजवळ देखील त्यांचा संचार आढळतो.

बिबट गावाशेजारी रहातो याचं कारण वाघ दाट जंगलात रहातो, त्याच्या भीतीमुळे बिबट जंगलाच्या सीमोवरच थांबतो, माणसाच्या भीतीने वाघ गावाकडे येण्याचं टाळतो. शेवटी काय तर मनुष्यप्राणी असो अथवा वाघ किंवा बिबट, 'डर का माहौल' सगळीकडे बघायला मिळतो. बिबटाचे शिकार, भक्ष्य असे कुत्रे, कोंबड्या सारखे वजनानी हलके प्राणी सहज उचलुन पळता यावे असे गावाजवळ आधिक्याने उपलब्ध असल्याने बरेचदा बिबटे गावखेड्याची वेस ओलांडताना दिसतात.
क्रमशः,,,,
**********************************
दि. ०८ मे २०२३ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

ब्लॅक इज ब्युटीफूल, भाग ०३

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *ब्लॅक इज ब्युटीफूल, भाग ०३*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
बिबट सफारीत बिबटे दूर आरामात पहुडले असल्याने त्यांचे दूरदर्शन झाले होते. पण त्यांना जवळून बघता आले नाही याची मनात हुरहूर लागली होती. लगेच अस्वल सफारीत बस ने प्रवेश करताच दोन मोठ्या अस्वलांनी दर्शन दिले आणि बच्चेकंपनीच्या उत्साहाला उधाण आले. अर्थातच अस्वलांनी पर्यटकांना हुंगले नाही परंतु आपले नैसर्गिक सवयीनुसार ते सभोवताली हुंगत आपल्या भक्ष्य शोधण्यासाठी व्यस्त होते. अस्वल सफारीकरीता २४ हेक्टर क्षेत्र राखीव असून याठिकाणी नैसर्गिक सवाना क्षेत्र,पर्णपती वनांची थीम साकारली आहे.

पांडा सोडून सर्व अस्वले प्रामुख्याने काळ्या किंवा तपकिरी रंगांची असतात. धृवीय अस्वलाची त्वचा देखील काळ्या रंगाची असून फक्त केसांचा रंग पांढरा असतो. भारतीय अस्वलात पांढऱ्या रंगाचे लांब मुस्कट, खालचे ओठ लांब असणे, नाकपुड्या पुढे आलेले असणे हे त्याचे वैशिष्ट्य होय‌. अस्वले पुढच्या दोन पायांच्या पंजाचा उपयोग हातासारखा करतात. अस्वलाची उंची साधारणतः ७० ते ९० सेमी, लांबी १.८ मीटर तर वजन जवळपास १२० किलोपर्यंत असू शकते. अस्वलांचे सरासरी आयुर्मान २५ ते ३० वर्षांचे असते. जगभरात अस्वलांच्या एकूण आठ प्रजाती आढळतात.

अस्वले बोजड असतात. शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात. ते त्यांचे मागील पाय पूर्णपणे टेकवून चालतात तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. अस्वलाची दृष्टी कमकुवत असल्याने बरेचदा ते धोका जाणवला किंवा हवेतील गंध हुंगण्यासाठी अथवा सभोवताली अंदाज घेण्यासाठी मागील पायांवर उभे राहतात. भक्ष्य शोधण्यासाठी ते सर्वस्वी नाकावर अवलंबून असतात कारण त्यांचे नाक खूप तीक्ष्ण असते. भारतातील तपकिरी रंगाचे अस्वल जवळपास एक ते दीड किमी अंतरावरून येणारा गंध ओळखू शकतात.

अस्वले सर्वभक्षी असले तरी त्यांना मासे खायला आवडतात. म्हणून ते नदी काठी अथवा तलावाजवळ राहतात. सोबतच मधमाशा, झाडांच्या बीया, मुळे, फळे, किडे, मुंग्या, वाळव्या इत्यादीं वर ताव मारतात. अस्वले झाडांवर सहजपणे चढू शकतात तसेच ते पाण्यात पोहू शकतात. अस्वले सहसा आवाजाने संवाद साधत नाही आणि सहसा शांत असतात. पण भुक लागली,  दुसऱ्या अस्वलाने अथवा माणसाने आव्हान दिले किंवा जोडीदारासाठी स्पर्धा करतांना गुरगुरतात. वाळवी आणि अळ्यांच्या घरट्यावर छापा टाकून, त्यांना ओठांनी शोषून घेणे हा अस्वलांचा आवडता उद्योग होय.

या सफारीत एकूण पाच सहा अस्वले बघायला मिळाली. प्रारंभीच दर्शन देणारी दोन मोठी अस्वले, यानंतर एक आकाराने मोठे आणि धडधाकट अस्वल जमीन खोदून खड्डा करण्यात व्यस्त होते. ते बहुदा भक्ष्याच्या शोधार्थ असावे. आणखी काही अंतरावर दोन लहान आकाराची अस्वले एकमेकांशी खेळण्यात दंग होते. एका छोट्या मचाणावर चढणे, उतरणे किंवा एकदुसऱ्याला ढकलून देणे यात मस्तपैकी रमले होते. काळ्या कुळकुळीत रंगाची ही जोडी दुपारच्या उन्हात चांगली उठून दिसत होती. खरेतर त्यांचा दाट केशसंभार पाहून त्या दोघांनी काले घने बाल ची जाहिरात करायला हरकत नव्हती‌. त्यांचे एकंदरीत जंगली सौंदर्य, बालसुलभ, नैसर्गिक लीला पाहून सहजच ब्लॅक इज ब्युटीफूल असे म्हणावेसे वाटते.
**********************************
दि‌. १० मे २०२३
मो. ९८२२९३८२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Tuesday, May 9, 2023

गो फॉर गोरेवाडा भाग ०१

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
      *गो फॉर गोरेवाडा, भाग ०१*
          *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
महाराष्ट्रातील वनसंपदा प्रामुख्याने विदर्भात आढळते. वन विभागाने २०२२ मध्ये राज्यातील प्रादेशिक वन, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पात केलेल्या चौथ्या टप्प्यातील गणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास ४४६ वाघांची उपस्थिती जाणवली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षभरात २५ वाघांचा मृत्यू होऊनही एकंदरीत वाघांची संख्या वाढली आहे. नागपूरच्या सभोवताली असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड कर्हांडला वन्यजीवन अभयारण्य, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नावारुपास आणले आहे.

अर्थातच व्याघ्र दर्शनाचे आकर्षण आपण सर्वांना असते. इतरांना हमखास दिसणारे वाघोबा नेमके आपल्या सफारीच्या वेळेला का दडून बसतात याची मनाला हुरहुर लागून असते. मात्र आता अशी निराशा आपल्या पदरी येणार नाही. कारण नागपूरला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान इथे असलेली राजकुमार वाघ आणि लिली वाघीणीची जोडी आपल्याला हमखास दर्शन देते. नागपूर शहराला लागूनच गोरेवाडा जंगल आणि तलाव आहे. २००६ ला महाराष्ट्र शासनाने गोरेवाडा तलाव आणि जंगल लगतची जवळपास १९१४ हेक्टर जागा गोरेवाडा प्राणिसंग्रहालयासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले होते. या प्रकल्पाला सुटसुटीत करण्यासाठी आणखी २६ हेक्टर जागा महाराष्ट्र शासनाने व्यावसायिक कारणांसाठी हस्तांतरित केली होती. ‌

अखेर या प्रकल्पाला २०२१ साली मुर्तरुप आले आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२१ ला उद्घाटन झाले. या पार्कला सेंट्रल झू ऑथॉरीटीची मान्यता असून कॅप्टीव्ह (बंदिस्त) झू सफारी प्रकारात भारतातील सर्वात मोठा झूलॉजीकल पार्क‌‌‌ मानण्यात येत आहे. या पार्कमध्ये वन्यजीवांसाठी रेस्क्यू सेंटर, भारतीय वन्यजीव सफारी, आफ्रिकन सफारी, इंटरप्रिटेशन सेंटर आणि नाईट सफारीचे प्रयोजन आहे. भारतीय सफारीसाठी १४५ हेक्टर भूभाग निश्चित करण्यात आला असून यांत लेपर्ड सफारी (बिबट्या), बीअर सफारी (अस्वल), व्याघ्र  सफारीचा समावेश होतो.

याव्यतिरिक्त पर्यटकांच्या आकर्षणासाठी पुरातत्व थीम पार्क, प्रागैतिहासिक पार्क (डायनॅसोर थीम), एक्झोटीक एव्हीअरी ॲंड रेनफॉरेस्ट थीम, रेस्क्यू सेंटर, ट्रायबल व्हिलेज ट्रेल, गोरेवाडा रिझर्व्ह फॉरेस्ट, नेचर ट्रेल, व्यावसायिक संकुल इत्यादी प्रकल्पांची भर पडणार आहे. सध्याचे गोरेवाडा रेस्क्यू सेंटर २०१५ पासून कार्यान्वित असून वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण, काळवीट आणि विविध पक्षांवर  उपचार आणि संगोपन केले जाते. या पार्कची संकल्पना अजून पूर्णत्वास यायची आहे. प्रस्तावित पार्कमध्ये हर्बीवोर सफारी (तृणभक्षी, शाकजीवी) ४० हेक्टर, नाईट सफारी ४५ हेक्टर, आफ्रिकन सफारी ९० हेक्टर, बायो पार्क ३० हेक्टर, बर्ड पार्क ०७ हेक्टर, रिझरव्हायर २० हेक्टर, एन्ट्रन्स प्लाझा १६.५ हेक्टर असणार आहेत.

पहिल्या टप्प्यात सध्या भारतीय सफारी सुरू करण्यात आली असून यांत बिबट्या,अस्वल, व्याघ्र आणि हर्बीवोर सफारीचा समावेश होतो. सफारी करिता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बुकींग सुविधा उपलब्ध आहेत. मात्र शनिवार, रविवार किंवा इतर सुट्ट्यांच्या दिवशी अगोदर बुकींग केलेले केंव्हाही योग्य ठरते. कारण प्रवेशद्वारातून ऑनलाईन बुकींग असले किंवा ऑफलाईन बुकींग शिल्लक असेल तरच प्रवेश मिळतो. सफारी करिता एसी, नॉन एसी बसेसची सोय आहे. 

एन्ट्रन्स प्लाझा जवळच दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग आहे. तिकिटघराला लागूनच सौवेनीर दालन आहे. तिथे बांबू पासून निर्मित वस्तू, लाकडी गृहोपयोगी वस्तू, कापडी आणि इतर दागिने, सुंदर पेंटिंग्ज आणि युवा युवतींसाठी गोरेवाडाचा लोगो असलेले टी शर्ट, हॅट ,पर्स प्रदर्शन, विक्री साठी उपलब्ध आहेत. एन्ट्रन्स प्लाझा चा संपूर्ण परिसर सुंदर लॅंडस्केपने सजवण्यात आला असून बच्चे कंपनीसाठी विरंगुळा म्हणून विविध प्राण्यांचे पुतळे आणि खेळणींची सोय केलेली आहे. पर्यटकांच्या पोटपूजेची गरज भागविण्यासाठी एन्ट्रन्स प्लाझा लगतच एक रेस्टॉरंट आहे. त्यात नाश्ता आणि जेवनाची सोय आहे. 
क्रमशः,,,,
*********************************
दि. ०६ मे २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...