Friday, May 26, 2023

लेट्स गो लेपर्ड सफारी, भाग ०२

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *लेट्स गो लेपर्ड सफारी, भाग ०२*
              *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान इथल्या भारतीय सफारीची सुरूवात होते लेपर्ड (बिबट्या) सफारीने. या सफारी करिता २५ हेक्टरमध्ये आधीच विरळ होत चाललेल्या जंगली भागात मानवी हस्तक्षेपाची थीम साकारली आहे. यांत काही जागी तुटकी घरे, कमी उंचीच्या भिंती तर कुठे मचाणासारखी रचना केलेली आहे, जेणेकरून बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळेल अथवा आडोसा शोधता येईल. या सफारीत सात बिबटे असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात तीन बिबटे दृष्टीस पडतात. त्यातही दुपारची उन्हाची वेळ असल्याने बिबट्यांनी फिडींग शेडच्या बाजूने मस्त ताणून दिल्याने त्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला नाही.

खरेतर चित्ता, बिबट्या आणि जग्वार हे तिन्ही प्राणी मार्जार कुळातील असले तरी तिघांचीही शारिरीक रचना, आकारमान भिन्न भिन्न आहेत. चित्ता हा लांब,सडपातळ आणि सर्वात वेगवान प्राणी असून प्रामुख्याने आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळतो. बिबट्या हा आकारमानाने लहान, मांजरासारखा मांसल असून  आफ्रिका आणि दक्षिण आशियात आढळतो. तर जग्वार हा प्राणी, चित्ता आणि बिबट्या पेक्षा आकाराने मोठा असून सेंट्रल आणि दक्षिण अमेरिकेतील दाट जंगलात आढळतो. चित्याची कातडी पिवळसर करडी, बिबट्याची कातडी क्रिम पिवळ्या,नारंगी रंगाची तर जग्वार ची कातडी पिवळसर करडी,त्यावर गुच्छाकृती छप्पे असून त्यात काळे ठिपके असतात. बिबट्याच्या त्वचेवरील छप्प्यांमध्ये काळे ठिपके नसतात तर चित्यांच्या त्वचेवरील ठिपके भरीव असतात. चित्यांच्या चेहऱ्यावर अश्रूंसारख्या रेषा असतात, जे त्यांचे वैशिष्ट्य होय‌.

बिबट्याच्या पिवळ्या कातडीवर ठिपक्यांत प्रदेशानुसार विविधता आढळते. पर्जन्यवनात त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी, वाळवंटी भागात काहीशी फिक्कट तर थंड प्रदेशात ती थोडी करड्या रंगाची असते. काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसून त्याच्या त्वचेतील रंगद्रव्य मेलॅनीनचे प्रमाण जास्त झाल्याने त्याचा गडद काळा रंग असतो. मात्र काळ्या बिबट्याची त्वचा जवळून पाहिली असता त्यावर नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबट हे दाट जंगलात आढळतात. तिथे त्यांना गडद दाट रंगाचा शिकारीसाठी, दबा धरून बसण्यासाठी फायदा होतो. भारतात काळे बिबट प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये तसेच नेपाळ आणि आफ्रिकेच्या माऊंट केन्याच्या जंगलात आढळतात. लोकप्रिय सिरिअल जंगल बुक मधला मोगलीचा मित्र, रक्षक, संरक्षक असलेला बघीरा म्हणजेच हा काळा बिबट होय.

बिबट्या त्याच्या जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा आकारमानाने लहान असला तरी तो चपळ शिकारी असून त्याच्या मोठ्या कवटीमुळे तो मोठ्या भक्षांचा सुद्धा फडशा पाडतो. बिबट्याचे वजन २० ते ९० किलो पर्यंत असू शकते‌. ही वैविध्यता भक्षाच्या उपलब्धतेवर आणि दर्जावर, स्थानकाळानुसार अवलंबून असते. बिबट्याच्या खाद्यामध्ये इतर मार्जारांपेक्षा जास्त वैविध्य असते. खुर असलेले प्राणी हे बिबट्याचे प्रमुख खाद्य असले तरी माकडे, उंदिरासारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे), उभयचर, पक्षी व किड्यांचा पण त्याच्या खाद्यात समावेश होतो. यासोबतच कोल्ह्यांसारखे लहान शिकारी प्राणी देखील तो खातो.

बिबट्याची गणना असुरक्षित प्रजाती मध्ये केली गेली आहे तर चित्ता भारतातून नामशेष झाला होता. मात्र अगदी काही महिने पहिले नामिबियातून आठ आणि द.आफ्रिकेतून बारा चित्ते आणून ते मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले गेले आहे. समाधानाची बाब म्हणजे कुनो उद्यानातील चित्ते असो की गोरेवाडातील बिबटे असो, दोन्ही प्रजातींनी प्रजननाची परंपरा योग्यरीत्या पाळली आहे. तसेही आपल्याकडे लोकसंख्येने जागतिक पातळीवर डंका वाजवला असल्याने बिचारे प्राणी तरी कसे माघारी राहतील? कोरोनो असो अथवा लॉकडाऊन असो, लोकसंख्या वाढीचे मीटर आपल्याकडे कधीच डाऊन होत नाही. 

भलेही कोरोना, लॉकडाऊन मुळे इतर व्यापार उद्योगाची माती झाली असली तरी आपल्याकडे आपली माती आपली माणसं असल्याने आपल्या देशात लोकसंख्या वाढीचा गृहउद्योग चांगलाच भरभराटीस आला आहे. सध्यातरी एप्रिलमध्ये गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील चिंकी या मादा बिबटने दोन बछड्यांना तर रुची मादा बिबटने तीन बछड्यांना जन्म दिल्याचे कळते. वास्तविकत: वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेत असल्याने त्यांची संख्या आणि जीवंत राहण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच अगदी गावाशेजारी, मनुष्य वस्तीजवळ देखील त्यांचा संचार आढळतो.

बिबट गावाशेजारी रहातो याचं कारण वाघ दाट जंगलात रहातो, त्याच्या भीतीमुळे बिबट जंगलाच्या सीमोवरच थांबतो, तर माणसाच्या भीतीने वाघ गावाकडे येण्याचं टाळतो. शेवटी काय तर मनुष्यप्राणी असो अथवा वाघ किंवा बिबट, 'डर का माहौल' सगळीकडे बघायला मिळतो. बिबटाचे शिकार, भक्ष्य असे कुत्रे, कोंबड्या सारखे वजनाने हलके प्राणी सहज उचलुन पळता यावे असे गावाजवळ आधिक्याने उपलब्ध असल्याने बरेचदा बिबटे गावखेड्याची वेस ओलांडताना दिसतात.
क्रमशः,,,,
**********************************
दि. २६ मे २०२३ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...