Tuesday, June 13, 2023

ओव्हलची शोकांतिका, उत्तरार्ध

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
      *ओव्हलची शोकांतिका, उत्तरार्ध*
             *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
ओव्हलला तिसऱ्या दिवशीची अवस्था आसमां से गिरे और खजूर पे लटके अशी होती. भारतीय संघाने फॉलोऑन तर वाचवला होता परंतु पाऊने दोनशे धावांचे ओझे त्यांच्या मानगुटीवर होते. ऑसीच्या दुसऱ्या डावात आपल्या गोलंदाजांनी पहिल्या डावातील चुका टाळत सव्वाशे धावांत कांगारूंचा अर्धा संघ गारद केला होता. पण ऑसी फलंदाजांना पाऊने दोनशे धावांची शिदोरी गाठी असल्याने ते मनमोकळेपणे फलंदाजी करत होते. आपला संघ सामन्यात मुंगीच्या पावलांनी का होईना घरवापसी करत आहे असे वाटत होते. मात्र ॲलेक्स कॅरी आणि स्टार्कने टीम इंडियाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. अखेर आठ बाद २७० धावांवर ऑसींनी आपला डाव घोषित करुन भारतीय संघाला ४४४ धावांचे आव्हान दिले.

चौथा डाव आणि जिंकायला ४४४ धावा, ते सुद्धा कांगारूंच्या तुफानी आक्रमणापुढे म्हणजे भारतीय संघाला ४४० व्होल्टचा झटका होता. शेवटी आलिया भोगाशी असावे सादर करत भारतीय संघ लढण्यास सज्ज झाला. सलामीवीर रोहित,शुभमनचा पॉझिटिव्ह ॲप्रोच पाहून क्रिकेट प्रेमींत फिलगुड फॅक्टर निर्माण झाला. मात्र हा आनंद क्षणभंगुर ठरला‌. शुभमन पंचांच्या सदोष कामगिरीचा बळी ठरला. तरीपण या धक्क्यातून सावरत रोहित आणि पुजाराने शर्थीने खिंड लढवण्यास सुरूवात केली. तर शत प्रतिशत विजयासाठी कांगारू आसुसले होते. मैदानात भारतीय फलंदाज आणि तिखट कांगारु गोलंदाजांत निकराचे युद्ध सुरू होते. शेवटी रोहित, पुजारा वेगवान माऱ्याला भीक घालत नाही हे दिसताच ऑसींनी आपले मायावी अस्त्र बाहेर काढले.

नॅथन लॉयनने राऊंड दी विकेटचा पवित्रा घेताच अनुभवी रोहितने सावध व्हायला पाहिजे होते. यावेळी शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ ठरणार होती. भारतीय संघासाठी अच्छे दिन आले असतांनाच कुठे माशी शिंकली कोण जाणे. अचानक रोहितने नफरत के बाजारमे मोहोब्बत वाटने सुरू केले. इतका वेळ संयमाने फलंदाजी करणारा रोहित नॅथनला पॅडल स्विप करायला गेला आणि ओव्हल ते ऑस्ट्रेलिया पर्यंत एक आनंदाची लहर पसरवून गेला. जागतिक कसोटी अजिंक्यपद सारख्या मोठ्या स्टेजवर रोहितचा आळशी आणि बेजबाबदार फटका टीम इंडियाची वाट लावून गेला. रोहितच्या वाढत्या वय आणि वजनाने त्याच्या फलंदाजीवर कब्जा केल्याचे दुर्दैवी दृष्य यावेळी बघायला मिळाले.

रोहीत बाद होताच विराट, पुजाराच्या  दिमतीला आला. पण पुजारा रोहितचा विरह सहन करू शकला नाही. जागते रहो मेरे भरोसे मत रहो करत त्याने मैदान सोडले. खरेतर पुजाराने जवळपास वर्षभर इंग्लंडला कौंटीत घाम गाळून प्रतिष्ठा कमावली होती. मात्र पॅट कमीन्सच्या एका उसळत्या चेंडूवर त्याने आपली विकेट फेकली. पॅटच्या बाऊंसरची मेनका पाहताच पाहताच पुजाराच्या बॅटचे ब्रह्मचर्य कचकड्याचे ठरले. स्वप्नातसुद्धा अप्परकट न खेळणाऱ्या पुजाराने अनपेक्षित कट करत आपल्या हाताने मरण ओढवून घेतले. चार पाच चेंडूच्या अंतराने रोहित, पुजाराने आत्मघात करत संघाला पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने ढकलले.

 अवघ्या शंभर धावांत प्रमुख तीन फलंदाज बाद झाल्याने चारशे चौरेचाळीसचा गोवर्धन कोण उचलेल हा प्रश्नच होता. जरी विराट, रहाणे बाकी होते तरी जडेजा, श्रीकर भरत आणि शार्दुल ठाकूरच्या तिसऱ्या आघाडीचा भरवसा नव्हता. त्यातही जोपर्यंत एखादा फलंदाज एक टोक धरून तिहेरी धावसंख्या करत नाही तोपर्यंत काही खरे नव्हते. सामना नाही जिंकला तरी चालेल पण कमीतकमी अनिर्णित जरी ठेवला असता तरी भारतीय चाहत्यांना ते पुरेसे होते. मात्र चितले ते घडत नाही. ना सामना अनिर्णित राखला गेला ना कुठे फायटींग स्पिरीट दिसले. आपल्या राजकारण्यांना जेवढा धाक सीबीआय,इडीचा वाटतो त्याच्या कैकपट धाक ऑसी गोलंदाजांचा आपल्या फलंदाजांवर दिसला. पहिल्या डावात जवळपास पन्नाशी काढणारे जडेजा, शार्दुल ठाकूर दुसऱ्या डावात भोपळ्यांचे मानकरी ठरले.

एकंदरीत काय तर या सामन्यात टीम इंडियाची भट्टी जमलीच नाही. मुख्य म्हणजे आपले प्रमुख फलंदाज कागदी वाघ ठरले. शुभमन, पुजाराचे पहिल्या डावात स्टंप उडणे असो की दुसऱ्या डावात रोहीत पुजाराचे अपयश असो, रहाणेचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजात खेळपट्टीवर टिकून राहण्याची वृत्ती आढळली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये जी झुंजार वृत्ती लागते ती टी ट्वेंटी आणि आयपीएलच्या भडीमारात आपले फलंदाज गमावून बसले. हा केवळ नाममात्र कसोटी सामना नव्हता तर जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा सामना होता. त्यामुळे ती जिद्द, ती जिंकण्याची भुक, प्रसंगी आयपीएल वर पाणी सोडण्याची दानत आपल्या खेळाडूंत दिसली नाही.

दहा वर्षे झाली आपला संघ आयसीसीचा कोणताही चषक जिंकू शकला नाही हे आपले दुर्दैव आहे. तिमाही,सहामाहीत चांगल्या गुणांनी पास होणारा आपला संघ वार्षिक परिक्षेत का नापास होतो याचा निवड समितीने जरूर विचार करावा. क्रिकेटच्या तीन प्रकारासाठी तीन वेगवेगळ्या संघाची बांधणी करुन तीन वेगवेगळ्या कर्णधारांना जबाबदारी सोपवली पाहिजे. मुख्य म्हणजे एखादा चांगला खेळाडू चांगला प्रशिक्षक असतोच असे नाही या वास्तवाचे भान ठेवायला हवे. त्यामुळे द्रविड ऐवजी एखाद्या खमक्या प्रशिक्षकाची टीम इंडियाला नितांत गरज आहे हे ओळखायला हवे. शिवाय टीम इंडियात आपल्या सारखे हाडामांसांचे खेळाडू खेळतात, सुपरमॅन, स्पायडर मॅन आणि आयर्न मॅन नव्हे. त्यामुळे आपल्या खेळाडूंना परदेशात खेळताना कमीतकमी दोनतीन प्रॅक्टिस मॅचेस खेळवणे गरजेचे आहे. 

संघातील जुन्या खोडाला आणखी पालवी फुटणे अशक्य असल्याने त्यांना शाल श्रीफळ देऊन निरोप द्यावा. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीत नवनवीन उपलब्ध पर्याय कोमेजणार नाही याची दक्षता घ्यावी. आयपीएलची वाळवी (आर्थिक दृष्टीने) समूळ नष्ट जरी करता येत नसली तरी आयपीएलच्या सामन्यांची संख्या जरूर कमी करता येऊ शकते. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात कमीतकमी एक महिन्याचे अंतर राखले गेले पाहिजे. अन्यथा आपल्या संघावर लागलेला गुड सेमीफायनलीस्ट आणि फायनल्सचे चोकर्स असलेला डाग कोणत्याही साबणाने धुवून काढता येणार नाही. भाकर केवळ राजकारणातच नव्हे तर टीम इंडियात सुद्धा फिरवण्याची गरज आहे हे याठिकाणी नमूद करावेसे वाटते.
*********************************
दि. १३ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...