@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*पालकांनो, ऊतू नका मातू नका!*
*डॉ अनिल पावशेकर*
********************************
नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागले असून रात्री कायमचुर्ण घेतल्यानंतर सकाळी जी मोकळं झाल्याची फिलींग येते, ती समस्त पालक वर्गात येत आहे. जणुकाही फिटे कोचिंग क्लासचे जाळे, झाले मोकळे आकाश अशी सगळीकडे स्थिती आहे. सोबतच हरहर टेन्शन घरघर टेन्शन समाप्त झाले असून आता सर्वांचे लक्ष्य मिशन ॲडमिशन कडे लागले आहे. बोर्डाच्या घर घर से मेरिट निकलेगा आणि मागेल त्याला प्रथमश्रेणी (संदर्भ बेस्ट ऑफ फाईव्ह) योजनेमुळे लाभार्थ्यांना अच्छे दिन आले आहे. कार्पेट ने पिकवलेले मेरिट आणि अतिरिक्त,अवांतर गुणांनी सुजलेल्या गुणपत्रिका पाहून कोचिंगच्या बाजारपेठेला प्रचंड प्रमाणात कच्चा माल उपलब्ध झाला आहे असे वाटते.
अर्थातच इथे गुणवंतांचा उपमर्द करण्याचा उद्देश नसून आधोब्या, अतिउत्साही, जश्ने रिझल्ट (बोर्ड परिक्षा) करणाऱ्या नवपालकांचे कान टोचण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे. खरेतर पाल्यांसाठी दहावी बारावीचा उंबरठा पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे यात वादच नाही मात्र ही तर चढाई आहे, असली लढाई पुढे आहे हे विसरून चालणार नाही. त्यातही दे दान सुटे गिराण प्रमाणे विद्यार्थ्यांवर गुणांची उधळण होते ती बरेचदा फसवी असू शकते. शरीर कमावणे आणि शरीराला सूज येणे यात फरक असतो. म्हणूनच पूर्वी कुंथून कुंथून काठावर पास होणाऱ्यांना आजच्या नव्वद टक्क्यांचे विलक्षण कौतुक आणि आकर्षण वाटते. मात्र दोन्ही वेळेची परिस्थिती, परीक्षांचे संदर्भ वेगवेगळे आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
मुख्य म्हणजे पालकांनी प्रत्येक बाळ आपली विशिष्ट ओळख आणि बुद्धी घेऊन जन्माला येत असतं हे विसरायला नको. शिवाय ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. पालकांनी आपल्या सुप्त आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी पाल्यांना डाऊनलोड केलं नसतं तर ते नैसर्गिक, शारिरीक धर्माला जागून वंशसातत्य, वंशवृद्धीचं फळ असतं. यामुळे त्याला केवळ वाढवणं हे उद्देश नसून त्याचं निकोप संगोपन करणं तेवढंच गरजेचं असतं. बाळांचे पाय पाळण्यात दिसत असले तरी त्यांचे मार्क्स दहावी बारावीत दिसतात. मार्क्स कमी मिळाले म्हणून वाळीत टाकणे किंवा मेरिट मध्ये आला म्हणून व्हीआयपी बनवने ही दोन्ही टोकं अत्यंत चुकीचे आहे. मुलांवर प्रेम करा, त्यांच्या मार्कांवर नव्हे हे इथे लक्षात घ्या. कमीजास्त मार्कांमुळे मुलांवरचे प्रेम कमीजास्त होऊ देऊ नका.
खरेतर मुलं म्हणजे 'सिर्फ एहसास है ये रुह से महसूस करो, प्यार को (बच्चोंको) प्यार ही रहने दो कोई नाम ना दो' असे आहे. थोडक्यात काय तर मार्कांमुळे मेरा बेटा राजकुमार अथवा माय डॉटर माय प्रिन्सेस असे फाजिल लाडवून ठेऊ नका. कारण राजेशाही केंव्हाचीच नष्ट झाली आहे तर संस्थानं पण खालसा झाली आहेत. उरल्या सुरल्या राजपुत्रांचे हाल कुत्राही खात नाही. कमीजास्त मार्कांच्या गोंधळात 'मार्क इज टेंपररी बट मुलांच नातं इज पर्मनंट ' याचा विसर पडू देऊ नका. मुलांच्या कमी मार्कांमुळे गळपटून, संतापून जाऊ नका तर फुगलेल्या मार्कांनी भारावून ओथंबून जाऊ नका. मुलांचे कौतुक जरूर करा, मात्र ते शेफारून जाणार नाही, डोक्यावर बसणार नाही याची काळजी घ्या.
सध्या विद्यार्थ्यांकरिता एका पेक्षा एक सरस करिअर क्षेत्र उपलब्ध आहेत. इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रासोबतच इतर विषयांचा विचार केला जाणे अपेक्षित आहे. याकरिता कल चाचणी, गुण योग्यता चाचणी सायकोमेट्रीक चाचणी, ॲप्टिट्यूड टेस्टची मदत घेता येईल. वास्तविकत: आवडते क्षेत्र निवडले तर हर दिन दिवाली, दिन दुगुना रात चौगुणा होण्याची शक्यता असते. केवळ हम जमानेके साथ है हे दाखवण्यासाठी मुलांना जबरदस्तीने एखाद्या क्षेत्रात टाकले तर पुढे जाऊन तो सांग पाटला काय करू, उपड पर्हाटी पेर गहू करणार. अथवा अनिच्छेने गेलेल्या क्षेत्रात त्याची अवस्था आंधळ पादलं, बहीऱ्यानं रामराम केला अशी होईल.
खरेतर दहावी बारावी म्हटले की पालकांना अन्नपाणी गोड लागत नाही. घरीदारी अघोषित कलम १४४ लागू असते. मात्र सोळा, अठरा वर्षांच्या कलमांना कोमेजू न देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. या प्रसुतीपिडेतून कोणाचीही सुटका नाही. पाल्यांची दहावी बारावी म्हणजे पालकांचा पुनर्जन्म असतो. निश्चितच पाल्यांचा कल, क्षमता योग्यता पाहून पालकांनी त्याच्यासाठी क्षेत्र निवडणे योग्य असते. याकामी करिअर कौंसिलींग तज्ज्ञांची मदत घेणे उत्तम असते. बॅट हातात घेतली म्हणजे सर्वच सचिन तेंडुलकर होत नाहीत. कुणी धोनी तर कुणी विराट सुद्धा होऊ शकतो. तर कधी फलंदाजीत फारसा उजेड न पाडलेला आकाश चोप्रा उत्तम समालोचक होऊ शकतो.
सर्वच काशीला गेले तर इथे कोण राहील हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्यामुळे पाल्यांना अनावश्यक ओझ्याखाली दाबू नका. प्रत्येक मुल डोक्यात काहीतरी घेऊन आलेलं आहे, त्याच्या क्षमतांना न्याय द्या. तुमचं मुल क्रिकेट सामन्यांसारखं कोणाचं तरी सबस्टीट्यूट, रिप्लेसमेंट अथवा राखीव खेळाडू म्हणून जन्माला आलेलं नाही. त्याला पाठबळ द्या,त्याच्या स्वप्नांना भरारी घ्यायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य द्या. मात्र आपल्या अती महत्त्वाकांक्षा त्यांच्यावर लादू नका. थोडक्यात काय तर ऊतू नका मातू नका, पालकत्वाचा वसा सोडू नका. संयमित राहून पाल्यांच्या यशापयशात त्याच्या तलवारीची घट्ट मुठ बनून रहा.
**********************************
दि. ०४ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment