@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*तुम बेवफा हरगीज ना थे!*
*डॉ अनिल पावशेकर*
**********************************
ईडन गार्डन वर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने द.आफ्रिकेला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लो स्कोअरिंग परंतु थोडी उत्कंठा वाढवणारी ही लढत कांगारूंनी आपल्या नावे केली असून फायनलला टीम इंडियाशी दोन हात करायला ते सज्ज झाले आहेत. खरेतर पुरुषांच्या भाग्यात काय आहे हे सांगणे कठीण असले तरी मोक्याच्या वेळी द.आफ्रिकेच्या नशिबात काय आहे, असते हे सांगणे त्यामानाने सोपे असते. एखाद्या शापीत गंधर्वा सारखा हा संघ ऐनवेळी गळपटतो आणि सामना गमावून बसतो. खंदे फलंदाज, धारदार गोलंदाज, प्रभावी फिरकीपटुंनी सजलेला हा संघ पुन्हा एकदा सेमीफायनलला खचला असून या संघाबाबत कितीही ममत्व असले तरी रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती आहे.
झाले काय तर द.आफ्रिका संघाने साखळी सामन्यात दणदणीत कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या संघाने साखळी सामन्यातील नऊ पैकी सात सामने जिंकून आपला दबदबा कायम केला होता. विशेष म्हणजे सेमीफायनलला ज्या संघाविरुद्ध त्यांनी लोटांगण घातले त्याच कांगारूंचा त्यांनी १३४ धावांनी पराभव केला होता. सोबतच लंकेवर १०२ धावांनी, इंग्लंडवर २२९ धावांनी, बांगलादेशवर १४९ धावांनी, किवींवर १९० धावांनी मात केली होती. तर पाकिस्तानला एका विकेटनी आणि अफगाणला पाच विकेट्सनी पराभूत केले होते. या संघाचे पाठलाग करताना धाबे दणाणते हे दिसून येत होते आणि यामुळे ते नेदरलँड्स विरूद्ध ३८ धावांनी तर टीम इंडिया विरुद्ध २४३ धावांनी मागे पडले होते.
उपांत्य लढतीबाबत बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेने फलंदाजी जरुर पत्करली परंतु ते त्यांच्यासाठी आ बैल मुझे मार झालं. कारण स्टार्क आणि हेझलवूडने टिच्चून गोलंदाजी करत त्यांच्यावर दबाव टाकला. टेम्बा बवूमा तर साधं एक षटक सुद्धा टिकू शकला नाही. या स्पर्धेत चार शतके ठोकणारा क्लिंटन डिकॉक धावा रखडल्याने उतावीळ झाला आणि आपली विकेट गमावून बसला. दोन बळी स्वस्तात निपटताच द. आफ्रिकेच्या नाटकाची तिसरी घंटा वाजू लागली. या पडझडीत केवळ बारा षटकांत चार बळी जाऊन या संघाचे बारा वाजले. निश्चितच नमनाला घडीभर तेल झाल्याने पुढची वाटचाल बिकट होती.
तरीपण हेन्री क्लासेन आणि मिलरने ९५ धावांची दमदार भागिदारी करत द.आफ्रिकेच्या जीवात जीव आणला. तीस षटकापर्यंत १२० धावफलक असताना आणि या दोघांचा जम बसला असतांना कमिन्स ने जुगार खेळत ट्रॅव्हिस हेडला गोलंदाजीला पाचारण केले. हा खरेतर सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. पार्ट टाईम गोलंदाज हेडने लागोपाठ दोन चेंडूत क्लासेन, यान्सनला माघारी धाडत सामना कांगारूंकडे झुकवला. मात्र खेळपट्टीवर मिलर असल्याने या संघाच्या आशा अजूनही जिवंत होत्या. मिलरने एकाकी झुंज देत आपले शतक झळकावले परंतु त्याला दुसऱ्या बाजूला फारशी साथ मिळाली नाही.
कांगारूंना फायनलमध्ये पाऊल टाकायला केवळ २१३ धावा हव्या होत्या. मात्र बरेचदा छोटे टारगेट फसवे असते. ज्याप्रकारे वार्नर, हेडने ३८ चेंडूत ६० धावांची सलामी दिली ते पाहता सामना लवकरच संपेल असे वाटत होते. पण झाले उलटेच. वेगवान गोलंदाजांना फारशी भीक न घालणारे कांगारु फलंदाज समोर फिरकीपटूंना पाहून थबकले. एडन मार्क्रम, केशव महाराज आणि तब्रेज शम्सीने लढतीत रंग भरला. तर कोट्झीने आपल्या वेगाने तळातील फलंदाजांना काबूत ठेवले. खरेतर गोलंदाजांच्या मेहनतीला क्षेत्ररक्षकांनी उत्तम साथ देणे गरजेचे होते आणि इथेच घात झाला. द.आफ्रिकेची कबर खोदणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला दोनदा तर स्मिथ आणि कमीन्सला प्रत्येकी एक जीवदान देत त्यांनी आत्मघात करून घेतला.
थोडक्यात काय तर लान्स क्लुझनर ते आत्ताच्या लुझर्स पर्यंतचा या संघाचा प्रवास त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. जॉंटी रोड्स, ॲलन डोनाल्ड, एबीडी, मखाया एनटीनी, कॅलीस, स्टेन, ड्युप्लेसी, डिकॉक, मिलर, रबाडा आदी क्रिकेट रत्नांची खाण असूनही या संघ विश्वविजेतेपदाला शिवू शकला नाही. यांत मॅच टॅलेंट म्हणा की गेम प्लॅन म्हणा, कुठेतरी हा संघ ताळेबंदात चुकतो, दबावात भरकटतो असे होत आहे. छोटे टारगेट असताना जवळपास चार झेल सुटले तर काय कप्पाळ जिंकणार? जो जोश, जी स्फुर्ती गोलंदाजीत दाखवली, त्याच्या तोडीस तोड क्षेत्ररक्षण आवश्यक होते. तिथेच खेळ उंचावणे गरजेचे होते. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर द.आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूम आणि समर्थकांतील ललनांचे चेंडूगणिक हिरमुसले चेहरे पाहून जीव तीळ तीळ तुटत होता. कांगारूंनी थोडेतरी स्त्री दाक्षिण्य दाखवायला हवे होते. मात्र क्रिकेट हा निष्ठूर खेळ आहे.
राहिली बाब कांगारूंची तर ते त्यांच्या डीएनए ला जागले. तिच खडूस वृत्ती, तोच विजिगिषु बाणा, तेच लढवय्ये रुप, सर्व काही ठरल्याप्रमाणे ते खेळत होते. सात गडी बाद होऊनही मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी जवळपास आठ षटके खेळत जिंकायच्या बावीस धावा काढल्या. तर स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरत तब्बल पाच भागिदाऱ्या करत गळती थांबवली. गोलंदाजीत स्टार्क, हेझलवूड आणि हेड पाठोपाठ पॅट कमिन्स ने चतूरता दाखवत स्लो बाऊंसर, स्लोअरवन टाकत कोट्झी, मिलर, रबाडाला फसवले. तर स्टार्कने फुललेंथवर बवुमा, मार्क्रम आणि महाराजला चकवले. या लढतीत कांगारूंनी बाजी मारली असली तरी द.आफ्रिकेने उत्तरार्धात चांगली झुंज दिली. मात्र छोटं टारगेट असल्याने कांगारूंचा गोट निश्चिंत होता. शेवटी काय तर,जो जिता वही सिकंदर! द.आफ्रिकेच्या बाबतीत आपण एवढेच म्हणू शकतो,,,
तुम बेवफा हरगीज ना थे, पर तुम वफा कर ना सके!
तुम को मिली उसकी सजा, तुम जो खता कर ना सके!
*********************************
दि. १७/११/२०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment