Tuesday, November 26, 2024

पर्थला टीम इंडीयाचे कांगारूमर्दन

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

   “पर्थला टीम इंडीयाचे कांगारूमर्दन”

              ‘डॅा अनिल पावशेकर’

—————————————————

पर्थच्या अॅाप्टस मैदानावर झालेल्या बॅार्डर गावस्कर चषकाच्या पहिल्या कसोटीत टीम इंडीयाने बलाढ्य कांगारूना तब्बल २९५ धावांनी मात दिली आहे. मायदेशी किवी संघाविरुद्ध लाजिरवाणा पराभव पत्करलेल्या भारतीय संघाने कांगारूंच्या बालेकिल्यात दमदार कामगिरी करत भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पहिल्या डावात दिडशेत गारद होणाऱ्या भारतीय संघाने जणुकाही बटेंगे तो कटेंगे चा नारा गांभीर्याने घेत सामन्यात पुनरागमन करत कांगारूंना काबूत केले. कांगारू संघाची मदार त्यांच्या पोलादी फलंदाजीत होती. शिवाय त्यांच्या दिमतीला स्टार्क, कमीन्स, हेजलवूड हे वेगवान त्रिकूट होते. मात्र भारतीय फलंदाजांनी अॅासींच्या ‘पेस है तो सेफ है’ चा नारा हाणून पाडत आपल्या संघात मालिकेत बढत मिळवून दिली.


खरेतर पर्थ ची खेळपट्टी फलंदाजांसाठी एक दु:स्वप्न होते. वेगवान गोलंदाजांचे चेंडू जणुकाही गरम तव्यावरील पॅापकॅार्न सारखे उडत होते. त्यातच सलामीला रोहीत नसल्याने, भारतीय फलंदाजी निराधार योजनेसारखी वाटत होती. क्रमवारीत यशस्वी जैस्वाल, राहुल, विराट, पंत, वॅाशिंग्टन सुंदर, रेड्डी असले तरी अॅासींच्या पेस बॅटरीपुढे ते कितपत तग धरतील हा प्रश्नच होता. याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला पहिल्या डावात मिळाले. उण्यापुर्या पन्नास षटकांत, दिडशेत भारतीय संघाचा बट्याबोळ होऊन सामन्याचे रूझान पहिल्याच दिवशी येऊ लागले होते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर पर्थला एक्झिट पोल घेतले असते तर टीम इंडीयाच्या दारुण पराभवावर प्रेक्षकांनी शिक्कामोर्तब केले असते.


कांगारूंना पहिल्या डावात मोठी आघाडी मिळू न देणे फार गरजेचे होते आणि त्यांच्या पोलादी फलंदाजीचा तोड ‘लोहा कितना भी सख्त हो, बस गलानेवाली आग चाहिए’ हा होता. टीम इंडीयाची नजर त्यांचा हुकमाचा एक्का बुमराहवर होती. त्यानेही ‘अॅाल आईज अॅान बुमराहच्या’ विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. एकहाती सत्ता द्या मी बदल घडवतो प्रमाणे बुमराहने एक हाती बॅाल दिल्यावर पर्थला सत्तांतर घडवून आणले. अख्खा कांगारू संघ बुमरो बुमरो शाम रंग बुमरो च्या तालावर नाचू लागला. उस्मान ख्वाजा आणि खडूस स्मिथला त्याने अक्षरशः बकरा बनवले. कधी नव्हे ते अॅास्ट्रेलियात डर का माहौल दिसू लागला होता आणि बुमराहसाठी आयसीसीने क्रिकेट संविधान बदलल्याच्या चर्चांना ऊत आले होते.


वास्तविकत: टीम इंडीयाला पहिल्या डावात कशीबशी लंगोट एवढी चाळीशीची आघाडी मिळाली होती. मात्र याच छोट्या धावांच्या आघाडीला कांगारूंचा गळफास बनविण्याची किमया आपल्या फलंदाजांना करायची होती. त्यासाठी फलंदाजांनी निर्भय बनो सोबतच खेळपट्टीवर वज्रमुठीच्या भागीदारी करण्याचे ठरवले होते. एकतर तू राहशील किंवा मी राहील याची खूणगाठ मनाशी बांधून जैस्वाल राहूल जोडी मैदानात उतरली. कोवळ्या जैस्वालचे कौतुक ते काय करावे समजत नाही. मुंबई के आझाद मैदान का ये परिंदा पर्थके सातवे आसमां पर घरौंदा बनाएगा ये किसीने सोचा ना होंगा. त्याचे ते फ्लिक, अप्परकट आणि बिनधास्त फलंदाजी कांगारूंचे गर्वहरण करण्यास पुरेसे होते.


आमचं ठरलंय प्रमाणे दोन्ही सलामीवीरांनी द्विशतकी सलामी देत अॅासींच्या तोंडचे पाणी पळवले. या दोघांसमोर स्टार्क अॅंड हेझलवूड कंपनी दात नख काढलेले, सर्कशीतील वाघसिंह वाटत होते. सचिन, विराटनंतर ॲासींना त्यांच्याच अंगणात नाचवणारा जैस्वाल हा तिसरा फलंदाज ठरला. तिसऱ्या दिवशी आपल्या फलंदाजांनी जी फलंदाजी केली ते पाहता कांगारूंच्या तेराव्याचा दिवस फार दूर नाही हे कळून चुकले होते. जैस्वाल, राहूल, विराटच्या फलंदाजीला तळाशी येऊन नितीश रेड्डीने जो तडका दिला ते पाहता कांगारूं गोलंदाजांचे हाल ‘इस दिल के टुकडे हजार हुए, कोई यहां गिरा कोई वहां गिरा’ असे झाले होते.


कांगारूंना पहिल्या डावात ‘१०४ घरी बसवल्याचा’ तडाखा दिल्याने आणि दुसऱ्या डावात त्यांना अब की बार चारसों पार चे लक्ष्य दिल्याने टीम इंडिया एका अभूतपूर्व यशाची चव चाखणार होती. कांगारूंवर बुमराची किती दहशत होती हे तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात पाहायला मिळाले. चौथ्या दिवशी अॅासी संघ कितपत प्रतिकार करतो याची उत्सुकता होती परंतु आपल्या वेगवान गोलंदाजांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. आतापर्यंत पर्थला प्रतिस्पर्धी संघाची कंबर खोदणार्या अॅासी संघाला सामना वाचवण्यासाठी धडपड करताना पाहणे सुखावह होते. मागच्या दौऱ्यात ‘तोड दिया गाबा का घमंड’ नंतर पर्थला कांगारूमर्दन बघायला मिळाले. कांगारू संघाला डर के आगे जीत नहीं, लेकिन दर्द जरूर होता है हे कळून चुकले असेल.


थोडक्यात काय तर आपल्या संघाने पहिल्या डावातील पडझडीने खचून न जाता, धारदार गोलंदाजी करत लढतीत रंगत आणली. तसेच दुसऱ्या डावात धीरोदात्त फलंदाजीने सामना आपल्याकडे फिरवला. जैस्वालची तुफानी फलंदाजी, केएल राहुलचा क्लास, विराट ची विंटेज फलंदाजी आणि बुमराहची स्वप्नवत गोलंदाजी हा सामन्यातला दुग्धशर्करा योग होता. पहिल्या दिवशी पीचवर चेंडू भयानक उसळत होता, आपले दहाच्या दहाही फलंदाज झेलबाद झाले होते . तर दुसऱ्या दिवशी उत्तरार्धात पीच खेळायला थोडी सोपी झाली, ज्याचा फायदा आपल्या फलंदाजांनी घेतला. तर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा असमान उसळीने कांगारू फलंदाज गोंधळले. पर्थ आणि अॅासींचे वेगवान गोलंदाज यांचे मोहोब्बत चे दुकान जैस्वाल, विराटच्या शतकी प्रहाराने बंद पाडले. गोलंदाजीत बुमराह, सिराजने अशक्यप्राय काम ‘करून दाखवले’. जैस्वाल, सिराज, हर्षित राणाचे मैदानावरील ॲग्रेशन विरोधकांचे मनोबल खच्ची करण्यास पुरेसे होते. या पीचवर बुमराह, जोश हेजलवूडने गुडलेंथ आणि शॅार्ट अॅाफ गुडलेंथ टप्पा पकडत बळी टिपले. तर आपल्या दुसऱ्या डावात जैस्वाल राहुलच्या द्विशतकी भागीदारीने सामन्याचा निकाल निश्चित करून टाकला. पाच कसोटींच्या मालिकेत टीम इंडीयाने १/० अशी बढत घेऊन अॅासी संघावर दबाव वाढवला आहे. मात्र अॅासी संघाचा मुळ स्वभाव पाहता, त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्यामुळेच ही मालिका आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे.

—————————————————

दिनांक २६ नोव्हेंबर २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++


Sunday, November 24, 2024

लाडक्या महायुतीचा खटाखट विजय

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

  लाडक्या महायुतीचा खटाखट विजय

              डॅा अनिल पावशेकर

————————————————

अवघ्या भारतवर्षाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती आले असून भाजपा महायुतीच्या वादळात इंडी आघाडी जमीनदोस्त झाली आहे. हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रातील जनतेने जातीपातीच्या भिंती तोडत जातीयवादी विरोधकांना आडवे केले आहे. दोन्ही राज्यांमध्ये जातीपातीच्या समुहाद्वारे राज्य, केंद्र सरकारला वेठीस धरण्याचा दुष्ट प्रयत्न जनतेने हाणून पाडला आहे. भाडोत्री आंदोलन जीवी असोत की अंधश्रद्धेचे मानवी बॅाम्ब असोत अथवा काकस्पर्श झालेले पोपट असोत, सुज्ञ जनतेने विवेकबुद्धीला स्मरत महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान केले आहे.



खरेतर लोकसभा निवडणूकांनी
समस्त राजकीय पक्षांना डोळस निकाल दिला होता. यांत एनडीए ची पिछेहाट झाली होती तर म्रुतप्राय इंडी आघाडीला जीवदान मिळाले होते. भाजपने चारसौ पार च्या धक्क्यातून सावरत सरकार स्थापन केले तर इंडी आघाडीचा वारू अल्प यशाने बेभान झाला होता. ५४३ पैकी ९९ जागा जिंकलेला कॅांग्रेस पक्ष ९९ टक्के यश मिळाल्यासारखा उडत होता. तर एकंदरीत इंडी आघाडी उन्मत्त, उद्दाम होत गेली, जणुकाही स्वर्ग त्यांना दोन बोटे उरला होता. इंडी आघाडीने लोकसभेला जे फेक नॅरेटीव्ह सेट केले, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून जे थोडेफार यश मिळवले ते त्यांना पचले नाही. जनतेला इंडी आघाडीला मदत केल्याचा पश्चाताप झाला होता आणि त्याचा हिशोब जनतेने विधानसभेत चुकता केला आहे.


राहिली बाब महाराष्ट्राची तर तीन नापासांनी मिळून भाजप नावाच्या मेरीट विद्यार्थ्यांला गंडवले होते. मात्र अमर अकबर अॅंथनी उर्फ जॅान जानी जनार्दनच्या मविआने सत्ता मिळताच आपले खरे रूप दाखवून राज्यात बेबंदशाही माजवली. मग ते पालघर, करमुसे, कंगणा, नारायण राणे, अर्नव प्रकरण असो अथवा कोवीड महामारीतील घोटाळे असोत. एवढेच नव्हे तर नॅशनल हायवे असो अथवा विकास प्रकल्प असोत, मविआ सरकार स्थगिती सरकार म्हणून कुप्रसिद्ध झाले होते. अरेरावी, दडपशाही आणि भोंगळ कारभाराने राज्याचे तीनतेरा वाजले होते. अखेर एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडून भाजपशी हातमिळवणी करत मविआची अराजकता संपुष्टात आणली.


लोकसभेत झालेल्या चुकांतून धडा घेत महायुतीने विधानसभेत एकदिलाने लढण्याचा चंग बांधला होता. तसेही भाजपा शिंदेसेनेचे नाते बांहो में तेरे मस्ती के घेरे  सारखे होते तर अजितदादांच्या एंट्री ने युती बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए असे होण्याची भीती होती. मात्र काळवेळेचे भान ठेवत तिन्ही पक्षांनी इंडीला गाडून विधानसभा सर करण्याचा संकल्प केला होता. अर्थातच अजितदादा आणि चक्की पिसिंगचा वादग्रस्त मुद्दा असला तरी त्यांनी आजन्म दुसर्यांचे घर फोडणार्यांना जी जन्माची अद्दल घडवली, त्यामुळे ते महायुतीत हवेहवेसे वाटत होते. पण विधानसभा एवढी सोपी अजिबात नव्हती. २०२४ पर्यंत महाराष्ट्रात शाफुआ नावाचा परवलीचा शब्द होता, त्याची जागा २०२४ ला आसंजा (आरक्षण, संविधान, जातनिहाय गणना) या शब्दाने घेतली होती आणि पुन्हा एकदा महायुतीला या संभ्रम, दुष्प्रचाराचा भोपळा फोडणे गरजेचे होते, जे त्यांनी सहजपणे केले.


जिथे महायुतीत सगळं अॅाल इज वेल होतं, तिथे इंडी आघाडीत मुख्यमंत्री पदावरून मोगलाई, बेदिली माजली होती. इंडी आघाडीत या मुद्द्यावर खाटा कुरकुरायला लागल्या होत्या आणि हम भी डुबेंगे सनम तुम को भी ले डुबेंगे सारखी परिस्थिती उद्भवली होती. इंडीच्या दिमतीला निर्भय बानो, काकस्पर्शी मिडिया, चाय बिस्किट पत्रकारांची फौज होती. यामुळेच महायुतीला काहीतरी गेमचेंजर प्लॅन हवा होता, जो त्यांनी लाडकी बहीण योजनेद्वारे अंमलात आणला. प्रारंभी इंडी आघाडीने या योजनेची येथेच्छ टिंगल टवाळी केली. लाडक्या बहिणींचा भरघोस प्रतिसाद पाहता इंडीने भ्रामक खटाखट योजना प्रस्तुत केली. मात्र लाडक्या बहिणींना लबाडाचं आवतन जेवल्या शिवाय खरं नाही हे चांगलंच ठावूक होतं.


विधानसभेचे रणमैदान सज्ज झाले होते, दोन्ही बाजूंनी दंडबैठका सुरु होत्या. पण निर्णायक वार करण्यासाठी महायुतीने अमोघ शस्त्राचा वापर करणे ठरवले होते आणि त्यासाठी निवड केली होती, आदित्यनाथ योगी यांची. लोकसभेला इंडीला झालेल्या एकगठ्ठा मतदानाचा तोड योगी यांनी हळुवारपणे काढला. त्यांचा बटेंगे तो कटेंगे या नार्याने हिंदूंच्या मनातील खदखद बाहेर पडली. योगींनी जळजळीत वास्तव मांडताच हिंदूंना आपल्या मतांची किंमत कळली. अभी नहीं तो कभी नहीं हे जाणत हिंदू मतदानासाठी पेटून उठला. भरीस भर म्हणून मोदींच्या एक है तो सेफ है घोषणेने हिंदू मन आश्वस्त झाले. लोकसभेची उतराई म्हणून यावेळी त्यांनी महायुतीला सुगीचे दिवस आणून दिले.


२३ नोव्हेंबर २०२४ हा दिवस महायुती साठी सोनियाचा दिनू ठरला. भाजपने दिडशेच्या दिशेने झेप घेतली तर शिंदेसेना, अजितदादांनी पन्नाशीला गवसणी घातली. इंडी त्रिकूटाला पन्नाशीत गारद करत जनतेने हिंदुत्वाच्या बाबन्नकशी सोन्यावर शिक्कामोर्तब केले. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही, साल्यांनो मी तुमच्या देवांचा बाप आहे, तसेच वक्फ बोर्ड प्रकरण आणि १७ मागण्या संदर्भात ममत्व दाखवत इंडीने हिंदुत्वाचा दु:स्वास केला, हिंदूंना डिवचले, खिजवले, खजील केले. यामुळेच हिंदूंनी खुन्नसपणे मतदान करत इंडीला सुपु्र्दे खाक केले. हिंदू देवीदेवतांचा अपमान करणाऱ्यांना उपरवाले की लाठी की आवाज नहीं होती, सिर्फ अहसास होता है याची जाणीव झाली असावी.


या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस मॅन ऑफ द मॅच ठरले. विरोधकांकडून सातत्याने होणारी टीका, जात आणि कुटुंबावर होणारे शिव्याशाप आरोप यांना एकटे देवेंद्रजी पुरून उरले. अकेला देवेंद्र काय करू शकतो याचे चोख प्रत्युत्तर दिले. मुंबई तोडण्याचा डाव असो की उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा कांगावा, संविधान बदलने असो की आरक्षण प्रश्न असो देवेंद्रजींनी विरोधकांना चांगलाच धडा शिकवला आहे. थोडक्यात काय तर केंद्र राज्य सरकारच्या विकासामुख योजना, लाडकी बहीण योजना, मतदानाची वाढलेली टक्केवारी, राज्यात एकाच दिवशी मतदान घेणे, इंडीचे फेक नॅरेटीव्ह मोडून काढणे, हिंदुत्वाची पाठराखण करणे याशिवाय बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या घोषणांनी राज्यात महायुतीची त्सुनामी आली, महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार आले. २०१९ च्या दगाबाजीचा हिशोब जनतेने २०२४ ला व्याजासहीत पुर्ण केला. १०५ घरी बसवणार्यांच्या उरावर २३० बसवून देवेंद्रजींनी इंडी आघाडीला यहां के ‘हम है सिकंदर’ हे दाखवून दिले आहे.



**********************************

दिनांक २४ नोव्हेंबर २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...