@#😈😈😈😈😈😈😈😈#@
“पर्थला टीम इंडीयाचे कांगारूमर्दन”
‘डॅा अनिल पावशेकर’
—————————————————
पर्थच्या अॅाप्टस मैदानावर झालेल्या बॅार्डर गावस्कर चषकाच्या पहिल्या कसोटीत टीम इंडीयाने बलाढ्य कांगारूना तब्बल २९५ धावांनी मात दिली आहे. मायदेशी किवी संघाविरुद्ध लाजिरवाणा पराभव पत्करलेल्या भारतीय संघाने कांगारूंच्या बालेकिल्यात दमदार कामगिरी करत भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पहिल्या डावात दिडशेत गारद होणाऱ्या भारतीय संघाने जणुकाही बटेंगे तो कटेंगे चा नारा गांभीर्याने घेत सामन्यात पुनरागमन करत कांगारूंना काबूत केले. कांगारू संघाची मदार त्यांच्या पोलादी फलंदाजीत होती. शिवाय त्यांच्या दिमतीला स्टार्क, कमीन्स, हेजलवूड हे वेगवान त्रिकूट होते. मात्र भारतीय फलंदाजांनी अॅासींच्या ‘पेस है तो सेफ है’ चा नारा हाणून पाडत आपल्या संघात मालिकेत बढत मिळवून दिली.
खरेतर पर्थ ची खेळपट्टी फलंदाजांसाठी एक दु:स्वप्न होते. वेगवान गोलंदाजांचे चेंडू जणुकाही गरम तव्यावरील पॅापकॅार्न सारखे उडत होते. त्यातच सलामीला रोहीत नसल्याने, भारतीय फलंदाजी निराधार योजनेसारखी वाटत होती. क्रमवारीत यशस्वी जैस्वाल, राहुल, विराट, पंत, वॅाशिंग्टन सुंदर, रेड्डी असले तरी अॅासींच्या पेस बॅटरीपुढे ते कितपत तग धरतील हा प्रश्नच होता. याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला पहिल्या डावात मिळाले. उण्यापुर्या पन्नास षटकांत, दिडशेत भारतीय संघाचा बट्याबोळ होऊन सामन्याचे रूझान पहिल्याच दिवशी येऊ लागले होते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर पर्थला एक्झिट पोल घेतले असते तर टीम इंडीयाच्या दारुण पराभवावर प्रेक्षकांनी शिक्कामोर्तब केले असते.
कांगारूंना पहिल्या डावात मोठी आघाडी मिळू न देणे फार गरजेचे होते आणि त्यांच्या पोलादी फलंदाजीचा तोड ‘लोहा कितना भी सख्त हो, बस गलानेवाली आग चाहिए’ हा होता. टीम इंडीयाची नजर त्यांचा हुकमाचा एक्का बुमराहवर होती. त्यानेही ‘अॅाल आईज अॅान बुमराहच्या’ विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. एकहाती सत्ता द्या मी बदल घडवतो प्रमाणे बुमराहने एक हाती बॅाल दिल्यावर पर्थला सत्तांतर घडवून आणले. अख्खा कांगारू संघ बुमरो बुमरो शाम रंग बुमरो च्या तालावर नाचू लागला. उस्मान ख्वाजा आणि खडूस स्मिथला त्याने अक्षरशः बकरा बनवले. कधी नव्हे ते अॅास्ट्रेलियात डर का माहौल दिसू लागला होता आणि बुमराहसाठी आयसीसीने क्रिकेट संविधान बदलल्याच्या चर्चांना ऊत आले होते.
वास्तविकत: टीम इंडीयाला पहिल्या डावात कशीबशी लंगोट एवढी चाळीशीची आघाडी मिळाली होती. मात्र याच छोट्या धावांच्या आघाडीला कांगारूंचा गळफास बनविण्याची किमया आपल्या फलंदाजांना करायची होती. त्यासाठी फलंदाजांनी निर्भय बनो सोबतच खेळपट्टीवर वज्रमुठीच्या भागीदारी करण्याचे ठरवले होते. एकतर तू राहशील किंवा मी राहील याची खूणगाठ मनाशी बांधून जैस्वाल राहूल जोडी मैदानात उतरली. कोवळ्या जैस्वालचे कौतुक ते काय करावे समजत नाही. मुंबई के आझाद मैदान का ये परिंदा पर्थके सातवे आसमां पर घरौंदा बनाएगा ये किसीने सोचा ना होंगा. त्याचे ते फ्लिक, अप्परकट आणि बिनधास्त फलंदाजी कांगारूंचे गर्वहरण करण्यास पुरेसे होते.
आमचं ठरलंय प्रमाणे दोन्ही सलामीवीरांनी द्विशतकी सलामी देत अॅासींच्या तोंडचे पाणी पळवले. या दोघांसमोर स्टार्क अॅंड हेझलवूड कंपनी दात नख काढलेले, सर्कशीतील वाघसिंह वाटत होते. सचिन, विराटनंतर ॲासींना त्यांच्याच अंगणात नाचवणारा जैस्वाल हा तिसरा फलंदाज ठरला. तिसऱ्या दिवशी आपल्या फलंदाजांनी जी फलंदाजी केली ते पाहता कांगारूंच्या तेराव्याचा दिवस फार दूर नाही हे कळून चुकले होते. जैस्वाल, राहूल, विराटच्या फलंदाजीला तळाशी येऊन नितीश रेड्डीने जो तडका दिला ते पाहता कांगारूं गोलंदाजांचे हाल ‘इस दिल के टुकडे हजार हुए, कोई यहां गिरा कोई वहां गिरा’ असे झाले होते.
कांगारूंना पहिल्या डावात ‘१०४ घरी बसवल्याचा’ तडाखा दिल्याने आणि दुसऱ्या डावात त्यांना अब की बार चारसों पार चे लक्ष्य दिल्याने टीम इंडिया एका अभूतपूर्व यशाची चव चाखणार होती. कांगारूंवर बुमराची किती दहशत होती हे तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात पाहायला मिळाले. चौथ्या दिवशी अॅासी संघ कितपत प्रतिकार करतो याची उत्सुकता होती परंतु आपल्या वेगवान गोलंदाजांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. आतापर्यंत पर्थला प्रतिस्पर्धी संघाची कंबर खोदणार्या अॅासी संघाला सामना वाचवण्यासाठी धडपड करताना पाहणे सुखावह होते. मागच्या दौऱ्यात ‘तोड दिया गाबा का घमंड’ नंतर पर्थला कांगारूमर्दन बघायला मिळाले. कांगारू संघाला डर के आगे जीत नहीं, लेकिन दर्द जरूर होता है हे कळून चुकले असेल.
थोडक्यात काय तर आपल्या संघाने पहिल्या डावातील पडझडीने खचून न जाता, धारदार गोलंदाजी करत लढतीत रंगत आणली. तसेच दुसऱ्या डावात धीरोदात्त फलंदाजीने सामना आपल्याकडे फिरवला. जैस्वालची तुफानी फलंदाजी, केएल राहुलचा क्लास, विराट ची विंटेज फलंदाजी आणि बुमराहची स्वप्नवत गोलंदाजी हा सामन्यातला दुग्धशर्करा योग होता. पहिल्या दिवशी पीचवर चेंडू भयानक उसळत होता, आपले दहाच्या दहाही फलंदाज झेलबाद झाले होते . तर दुसऱ्या दिवशी उत्तरार्धात पीच खेळायला थोडी सोपी झाली, ज्याचा फायदा आपल्या फलंदाजांनी घेतला. तर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा असमान उसळीने कांगारू फलंदाज गोंधळले. पर्थ आणि अॅासींचे वेगवान गोलंदाज यांचे मोहोब्बत चे दुकान जैस्वाल, विराटच्या शतकी प्रहाराने बंद पाडले. गोलंदाजीत बुमराह, सिराजने अशक्यप्राय काम ‘करून दाखवले’. जैस्वाल, सिराज, हर्षित राणाचे मैदानावरील ॲग्रेशन विरोधकांचे मनोबल खच्ची करण्यास पुरेसे होते. या पीचवर बुमराह, जोश हेजलवूडने गुडलेंथ आणि शॅार्ट अॅाफ गुडलेंथ टप्पा पकडत बळी टिपले. तर आपल्या दुसऱ्या डावात जैस्वाल राहुलच्या द्विशतकी भागीदारीने सामन्याचा निकाल निश्चित करून टाकला. पाच कसोटींच्या मालिकेत टीम इंडीयाने १/० अशी बढत घेऊन अॅासी संघावर दबाव वाढवला आहे. मात्र अॅासी संघाचा मुळ स्वभाव पाहता, त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्यामुळेच ही मालिका आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे.
—————————————————
दिनांक २६ नोव्हेंबर २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment