Wednesday, June 4, 2025

अश्रूंची झाली विराट फूले!

 #@😈😈😈😈😈😈😈😈@#

         अश्रूंची झाली विराट फुले!

        ✍️डॅा अनिल पावशेकर✍️

—————————————————

तब्बल दिड तपानंतर म्हणजेच १८ वर्षानंतर विराटच्या आरसीबी संघाने आयपीएल चषक पटकावला असून अंतिम सामन्यात त्यांनी पंजाब संघाला पटकनी दिली आहे. आरसीबी संघ पाठीराख्यांच्या नसानंसात उसळणार्या आरबीसींना (रेड ब्लड सेल्स) साक्षी ठेवत विराटने चषक जिंकला आणि संघ तसेच पाठीराख्यांना अश्रूपूर्ण अभिवादन केले. तर प्रितीचा पंजाब किंग्ज संघ कमनशिबी ठरला. पाठलाग करतांना आवश्यक असलेली धावगती आणि सामन्यावरची पकड दोन्ही बाबतीत प्रितीचा संघ ढेपाळला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


झाले काय तर दुसऱ्या एलीमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्सला बुकलून काढत पंजाब किंग्जने फायनलला दणक्यात प्रवेश केला होता. विशेषतः कर्णधार श्रेयस अय्यरची कामगिरी लक्षवेधी होती आणि अशीच काहीशी खेळी त्याच्या कडून, त्याच्या संघाकडून अपेक्षित होती. मात्र अंतिम सामन्यात नंतर फलंदाजी करताना एकप्रकारे दडपण असते. त्यातही पाठलाग करताना धावगती जवळपास दहापर्यंत असल्याने एखाद्या फलंदाजाने मोठी खेळी करणे अपेक्षित होते. खरेतर इथेच पंजाब किंग्जची रणनिती फसल्यामुळे त्यांचा घात झाला. तसेही आरसीबी संघाकडे नाव घेण्यासारखे घातक गोलंदाज कुठे होते? मात्र फायनलचे प्रेशर श्रेयसचा संघाला झेपले नाही.


आरसीबी संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांनी प्रथम फलंदाजी करत एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच उभारली. भलेही ते २०/३० आणखी करू शकले असते परंतु शेवटच्या १० चेंडूत त्यांनी फक्त २३ धावां करत तब्बल पाच गडी गमावले. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक ठोकले नाही तरी पण आरसीबी संघाने चाळीशीच्या चार भागीदारी करत दोनशेच्या जवळ पोहोचले. पहिल्या सात फलंदाजांनी वैयक्तिक धावा न बघता संघासाठी दणदणीत, वेगवान खेळी करत पंजाब गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विशेषतः अर्शदीप, जेमीसन आणि चहल या प्रमुख गोलंदाजांना अजिबात भीक न घालता मुक्तहस्ताने ठोकले. 


 गमतीशीर बाब म्हणजे पंजाब संघाचा आखूड टप्प्यावर (शॅार्ट बॅाल) गोलंदाजीचा प्लॅन होता, जो आरसीबीने उधळून लावला तर अर्शदीप आणि जेमीसनला प्रत्येकी ३/३ बळी मिळाले ते फुल लेंथ बॅालवर. पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी पॅावर प्ले (५५ धावा, १ बळी) आणि फायनल ओव्हर (४५ धावा, ५ बळी) मध्ये चांगली कामगिरी केली परंतु मिडल ओव्हर मध्ये ते आरसीबी फलंदाजांवर अंकुश लावू शकले नाहीत. मिडल ओव्हरला आरसीबी संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा कुटल्या. अर्थातच १९१ धावांचे टार्गेट पंजाब संघासाठी घाम फोडणारे होते आणि झालेही तसेच.


सलामीवीर प्रियांश आणि प्रभसिमरनने साडेचार षटकांत ४३ धावांची सलामी जरूर दिली पण त्यात जिंकू किंवा मरू चा बाणा नव्हता. हॅपी गो लकी प्रमाणे खेळ सुरू होता. त्यातच सॅाल्टने प्रियांशचा सिमारेषेवर अफलातून झेल घेत पंजाबचे मीठ अळणी करून टाकले. तर प्रभसिमरनच्या धडपडी खेळीला कुणाल पांड्याने विराम दिला. पंजाब किंग्ज कडे श्रेयस, जॅाश इंग्लिश, नेहाल वढेरा, स्टॅायनिस  आणि शशांक सिंग सारखी भक्कम फलंदाजी लाभली होती. तिथे गरज होती या सुंदर टवटवीत फुलांना एका माळेत ओवणार्या एका मजबूत धाग्याची आणि तो धागा होता कर्णधार श्रेयस अय्यरचा. मात्र तो धागा दोन चेंडूत तुटला आणि प्रितीच्या संघाची अवस्था “इस दिल के टुकडे हजार हुए, कोई यहां गिरा कोई वहां गिरा” सारखी झाली.


मागील सामन्यात मुंबई इंडियन्सच्या बोल्ट, बुमराह या क्षेपणास्त्रांना श्रेयसच्या एस ४०० या डिफेन्स सिस्टमने लीलया निष्प्रभ केले होते. मात्र या सामन्यात “शिकारी खुद यहां शिकार” झाला होता. तरीही जॅाश इंग्लिशच्या जोशने सामन्यात रंगत बाकी होती. पण पंजाब किंग्ज साठी “ये दुख काहे खतम नहीं होता” अशी अवस्था होती. पांड्या लिविंगस्टोन युतीने जॅाश इंग्लिशला बाद करत पंजाबची नशा उतरवली. तर अनुभवी भुवीने १७ व्या षटकात वढेरा, स्टॅायनिसचा फडशा पाडत पंजाबच्या आशा मावळून टाकल्या. यशदयालने ओमरजाई आल्या पावली परत जाईल याची दक्षता घेतली.


मात्र कहाणीत अजून ट्वीस्ट बाकी होते. प्रचंड आशावादी असलेल्या शशांकने शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा ध्यास घेतला होता. शेवटच्या षटकांत २९ धावा हव्या होत्या मात्र हेझलवूडचे चक्रव्यूह तो भेदू शकला नाही. अवघ्या सहा धावांनी पंजाब पराभूत झाला. श्रेयस बाद होताच त्याच्या संघाचा टेम्पो हरवला, नाव पैलतीरावर नेण्यासाठी कुशल नावाडी उरला नव्हता, धावगती सोन्याच्या भावासारखी झपाट्याने वाढल्याने पंजाब किंग्जचा नाईलाज झाला होता. अखेर प्रितीच्या संघासाठी आयपीएल चषक पुन्हा एकदा “दिल अपना और प्रित पराई” ठरला. 


विराट जिंकला याचा जेवढा आनंद झाला तेवढेच दुःख प्रितीचा संघ हरल्याचे आहे. पन्नाशी गाठलेली परंतु हार जीत तेवढ्याच ताकदीने पचवणारी प्रिती झिंटा क्रिकेटच्या बाबतीत संयमाचा महामेरू ठरली आहे. पंजाबच्या फलंदाजांनी ३९% डॅाट बॅाल खेळले आणि ११ अवांतर धावा दिल्या ज्या त्यांना विजयापासून दूर घेऊन गेल्या. आरसीबी फलंदाजांची तडाखेबाज फलंदाजी, अय्यरचे लवकर बाद होणे, पांड्या भुवीने मोक्याच्या वेळी बळी घेणे हे या सामन्याचे महत्त्वाचे क्षण ठरले. शेवटच्या षटकात आरसीबी संघ अजिंक्य होत असताना विराटच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. एक कमकुवत संघ, चोकर्स आणि नेहमी सामना नव्हे तर ह्रुदय जिंकणारा संघ म्हणून ओळखल्या गेलेल्या संघांशी विराट प्रामाणिक राहिला. याचं प्रामाणिकपणाचे फळ म्हणून यावर्षी त्याच्या अश्रूंची विराट फूले झाली. हारसीबी चे रूपांतर जीतसीबी त करण्यात किती खस्ता खाव्या लागल्या याची साक्ष विराटचे अश्रू देत होते. 

—————————————————

दिनांक ४ जून २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...