Thursday, October 29, 2026

अभिजात मतदारांची अभिजित पसंती!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

 *अभिजात मतदारांची अभिजित पसंती*

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

————————————————

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ७८ जागांपैकी एक जागा असलेल्या नागपूर पदवीधर निवडणूकीचा निकाल लागला असून कॅांग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत अखेर दुसऱ्या फेरीतील मतांनी कमाल करत अभिजित वंजारींना विजयाचा कौल दिला आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रचा जलवा असतानाही वंजारी यांनी २०२० पाठोपाठ २०२६ ला भाजपाच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे. आत्मविश्वास आणि अती आत्मविश्वास यांत पुसटशी रेषा असते आणि याच अती आत्मविश्वासाने या निवडणुकीत भाजपचा बट्याबोळ झाला आहे.


झाले काय तर निवडणूक म्हटले की जय पराजय होणारच. मात्र याकरिता जरूरी रणनिती आखणे, व्यूहरचना करणे आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे असते. केंद्र आणि राज्यातले चलनी नाणे प्रत्येक गल्लाबोळात चालेलच याची शाश्वती नसते. नेमके इथेच भाजपचे गणित चुकले. याबाबतीत कॅांग्रेसचे ‘पक्ष दक्ष, विजयाकडे लक्ष’ होते. त्यांचा उमेदवार पण ठरला होता, प्रचाराला प्रारंभ ही झाला होता. तर दुसरीकडे भाजपने २०२० सारखा उमेदवारीचा घोळ केला. भाजपच्या दोन  उमेदवारांनी घोळ ची भाजी केल्याने शेवटी भाजपचा या निवडणुकीत खेला झाला.


हम किसी से कम नहीं च्या नादात, ना गुरूंनी शिष्याला आशिर्वाद दिले ना शिष्याने गुरूंना अंगठा दिला. याचाच परिणाम म्हणून मतदारांनी भाजपला ठेंगा दिला. काजव्यांच्या लढाईत चक्क चंद्र सूर्य जमिनीवर उतरले पण काळोख काही केल्या मिटला नाही. जबरदस्तीचा रामराम करत ‘मै तुझे कबूल तू मुझे कबूल’ पण झाले. मात्र तोपर्यंत मतदारांच्या मनात नाकबूली निर्माण झाली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेल्यानंतरचे मनोमिलन म्हणजे बैल गेला नि झोपा केल्यासारखे झाले. निवडणूकीत स्पष्ट चेहरा, क्लिअर व्हिजन आणि वन टू वन फाईट असली की रंगत वाढते.


एकदाचे मनोमिलन झाले, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भरलेला अर्ज नेत्यांच्या साक्षीने मागे घेतल्या गेला. कोणी गलबलून गेले तर कोणाला गहिवरून आले, जणुकाही माहेरची साडी सारखा इमोशनल ड्रामा झाला. मात्र मतदारांच्या लेखी याला कवडीची किंमत नव्हती. याउलट मतदानाच्या आदल्या रात्री कराळे गुरुजींनी पक्षातून निलंबन होताच कॅमेरा समोर ढसाढसा रडून मतदारांची सहानुभूती मिळवली. कारण त्यांचे अश्रू १००% अस्सल होते. विशेषतः युवा आणि ग्रामीण मतदारांना त्यांनी हेलावून सोडले. एरवी खिजगणतीत नसलेले कराळे गुरूजी अचानक प्रकाश झोतात आले. त्यांच्या एंट्रीने ‘हम भी डुबेंगे सनम, तुम को भी ले डुबेंगे’ होणार हे निश्चित होते.


जशी मतमोजणी सुरू झाली तशी भाजप कॅांग्रेसची धडधड वाढली होती. दोन्ही उमेदवार सापशिडीच्या खेळाप्रमाणे वरखाली होत राहिले. पहिल्या फेरीत सुधाकर कोहळे यांनी बाजी मारली होती परंतु मतांचा जरूरी कोटा ते पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मागणी वाढली होती आणि इथे एंट्री झाली, बे पोट्टेहो म्हणत माहौल तयार करणाऱ्या कराळे गुरूजींची! तसेही कराळे गुरूजींनी अनपेक्षितपणे जवळपास पंचवीस हजार मतांची मजल गाठल्याने त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मते भाजप कॅांग्रेस साठी जीवन मरणाचा प्रश्न बनली होती.


भलेही कराळे गुरुजींनी बंडखोरी केली होती पण त्यांची विचारसरणी आणि रोख कॅांग्रेस पुरक होता. वंजारींच्या दृष्टीने कराळे गुरुजी म्हणजे ‘तुम्ही ने दर्द दिया, तुम्ही दवां देना’ सारखे होते आणि झाले ही तसेच. कराळे गुरुजींनी या निवडणुकीत कॅांग्रेस साठी खलनायक ते नायक असा प्रवास केला. पहिल्या फेरीत अव्वल असणारे सुधाकर कोहळे दुसऱ्या क्रमांकाच्या पसंती मतांनी रिंगणातून बाहेर फेकले गेले. कराळे फॅक्टर भाजपसाठी बॅकफायर करेल असे कोणालाही स्वप्नात देखील वाटले नव्हते. भाजप साठी हा जोर का झटका धीरे से होता.


एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही तसेच भाजपचे आहे. एक जागा हरल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळणार नाही पण बुंद से गयी वो हौद से नही आती हे सुद्धा त्यांना लक्षात ठेवावे लागेल. आपल्या तंबूचे कळस वारंवार का कापले जात आहे याचा विचार त्यांनी नक्कीच करावा. उमेदवारीच्या घोळात पराभवाची बीजे रोवली गेली होती हे विसरून चालणार नाही. विजयाला अनेक बाप असतात तर पराभव हा अनाथ असतो. निवडणूक जिंकण्याचा कोणताही हमखास फॅार्म्युला नाही, मतदारांना बस समझ लिए असे करून चालणार नसते.


राहिली बाब कॅांग्रेसची तर त्यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्ये या निवडणुकीत बहुतेक एकच जागा जिंकली आहे आणि एका पिसाने मोर होता येत नाही. एरवी ईव्हीएम ला दोष देत असतांनाच बॅलेट पेपरवर पण कॅांग्रेसने होलसेल भावात या निवडणुकीत अंडे दिले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘एक ही मारा सॅालीड मारा’ या मानसिकतेतून बाहेर येणे गरजेचे आहे. नागपूर चा गड का आणि कसा सर केला हा त्यांच्यासाठी आदर्श पाठ आहे. अब की बार चार सौ पार चा नारा देणाऱ्या भाजपला त्यांनी लोकसभेत २४० जागा गाठतांना फेस आणला होता. त्यामुळे ‘अब की बारी, ॲड. अभिजित वंजारी’ हे कॅांग्रेस साठी प्राणवायुचे काम करेल यात शंका नाही.


थोडक्यात काय तर ही निवडणूक जरी पदवीधरांची असली तरी जवळपास सात आठ हजार मते रद्द ठरली ही एक शोकांतिका आहे. मतदारांना पुरेसे ज्ञान नसल्याने किंवा राजकीय पक्षांनी ही बाब गांभीर्याने न घेणे जय पराजयाचे कारण ठरू शकते. तसेच मतांचे हस्तांतरण आणि दुसऱ्या  क्रमांकाच्या मतांचे नियोजन किती महत्त्वाचे आहे हे या निवडणुकीत दिसून आले आहे. तर मतदानाचा टक्का सुशिक्षित मतदारांमध्ये पण साठ सत्तरीच्या आतच होता. महाराष्ट्रात या निवडणुकीत महाविकास आघाडीला ३/२ अशी बढत मिळाली असली तरी प्रमुख दोन्ही राजकीय पक्षांची कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती आहे. 

————————————————

दिनांक २९ ॲाक्टोबर २०२६

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

————————————————

मोहीत उल्वाचा पाकवर उल्कापात!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@  *मोहीत उल्वाचा पाकवर उल्कापात*         ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️ ———————————————— ओमानच्या अमिरेट्सला झालेल्या १९ वर्षाख...