Monday, November 16, 2026

मोहीत उल्वाचा पाकवर उल्कापात!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

 *मोहीत उल्वाचा पाकवर उल्कापात*

        ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

————————————————

ओमानच्या अमिरेट्सला झालेल्या १९ वर्षाखालील आशियाई स्पर्धेत भारताने चित्तथरारक लढतीत पाकला सातवे आसमान दाखवत नवव्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी ही बाजी अखेर टीम इंडियाने आपल्या नावे केली आहे. नेव्हर गिव्ह अप हे काय असते हे तळातील फलंदाजांनी दाखवून पाकच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. जपान ते ओमान (एशियन गेम्स, आशियाई स्पर्धा) टीम इंडियाने पाकचा चुराडा केला आहे. या स्पर्धेत अंतिम सामन्यात अंतिम षटकांत मोहीत उल्वाने कमालीची प्रगल्भता दाखवून शेवटच्या चेंडूंवर एक्सट्रा कव्हरवर कडक चौकार ठोकून पाकची बोलती बंद केली.


प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास ही लढत भारतीय कोकरू आणि पाक कसायांत होती. स्पर्धा जरी १९ वर्षाखालील खेळाडूंची असली तरी पाकचे काही खेळाडू जरड आणि नक्कीच १९ वर्षांच्या वरचे वाटत होते. ते कोणती ॲंटी एजींग क्रीम अथवा संतूर साबण वापरतात हे कळायला मार्ग नाही. कसेकाय ते वारंवार १९ वर्षाखालील स्पर्धेत खेळतात हे बर्म्युडा ट्रॅंगल सारखे रहस्य आहे. “अक्ल, चरित्र और हुनर” कोई चुरा नहीं सकता हे ऐकले होते, मात्र पाक खेळाडूंनी वय चोरी केल्या सारखे वाटते. बरे झाले तिकडे आपल्या सारखे नेते नाहीत, नाही तर “उम्र चोर, टीम छोड” सारखे देशव्यापी आंदोलन उभे राहिले असते. शिवाय पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी विरुद्ध राजीनाम्यासाठी रान उठवले गेले असते.


सामन्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाक फलंदाजांनी प्रारंभीच आपली गोलंदाजी फोडून काढत वर्चस्व गाजवले होते. त्यातही उस्मान खान (१०७), अब्दुल कादीर (८०) आणि फरहान युसुफ (६३) यांनी तडाखेबंद फलंदाजी करत भारतीय संघाच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र ३ बाद २४० या सुस्थितीतून ते ४०० पर्यंत सहज मजल मारतील असे वाटत असतानाच वेंकटा आणि काव्या पटेल टीम इंडियाच्या मदतीला धावून आले त्यामुळे पाकचे शेपूट जास्त वळवळले नाही. तरीही अंतिम सामन्यात सव्वा तीनशेवर धावा कितीही बलाढ्य फलंदाजी असूद्या, पोटात गोळा तर उठणारच! पाक फलंदाजांनी तब्बल २४ चौकार आणि १५ षटकार ठोकले, त्यातही काही षटकार तर चक्क मैदानाबाहेर पडले होते. त्यामुळेच ते खरोखरच १९ वर्षाखालील आहेत की नाहीत यात शंका वाटते.


भारतीय संघाने पॅावर प्ले मध्ये विशेष कामगिरी केली नाही तरीही कर्णधार लक्ष्य आणि आर्यवीरने ९५ धावांची दमदार सलामी दिली. जिथे पाक फलंदाज हातोडा छाप फलंदाजी करत होते, तिथे आर्यवीरने कलात्मक फलंदाजी केली. मात्र तो ५८ धावांवर बाद होताच भारतीय डावाला खीळ बसली. लक्ष्यच्या ८० धावा वगळता मधल्या फळीने हाराकिरी केल्याने सामन्यावर पाकने चांगली पकड घेतली होती. ३७ व्या षटकात लक्ष्य आणि द्रविड बाद होताच अखेरचा हा तुला दंडवत करत पुढचा खेळ किती लोकांनी पाहिला असेल याची कल्पना करवत नाही. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि याची प्रचिती या सामन्यात आली. आर्यन आणि काव्या पटेलही लगेच माघारी परतल्याने पुन्हा एकदा सामना पाककडे झुकला. 


मात्र मैदानात मनाल चौहान आणि मोहीत उल्वा ही जोडी झुकेगा नही साला मुडमध्ये होती. खरंतर त्याक्षणी मैदानातील प्रेशरची कल्पना करवत नाही. हिरो आणि झिरो बनवण्यात फक्त काही धावांचे अंतर होते. तसेच पाठलाग करतांना एक वेगळेच दडपण असते. “अभी नही तो कभी नही” असतांना या दोघांनी जी जीगर दाखवली त्याला तोड नाही. खरेतर हे दोघेही अष्टपैलू खेळाडू होते, परतीचे दोर कापले गेले होते, रथी महारथी तंबूत परतले होते, १४० करोड जनतेच्या विश्वासाचा प्रश्न होता, दिवस मावळायच्या आत किल्ला सर करायचा होता, जास्त विचार करायला, रणनिती आखायला वेळ उरला नव्हता. वेळ न दवडता या दोघांनी विजयाचा विडा उचलला आणि पाकची कणिक तिंबणे सुरु केले. 


एम टू अर्थात मनाल मोहीत जोडीने पाकवर प्रतिहल्ला करत अवघ्या ३५ चेंडूत वेगवान ५६ धावांची भागीदारी केली. ही जोडी विजयाचा झेंडा फडकवणार असे वाटतांनाच मनालचा बळी गेला. आता उरल्यासुरल्या अपेक्षा मोहीत वेंकटा जोडीवर होत्या. जवळपास तीस धावांचे अंतर बाकी होते आणि सुदैवाने इथे पाक गोलंदाज ढेपाळले, सोबतच अटीतटीच्या क्षणी त्यांनी धावबाद करायच्या संधी गमावल्या. सर्वांना उत्सुकता शेवटच्या षटकाची होती परंतु खरा खेळ फिरला तो ४९ व्या षटकात! सेयामच्या ४९ व्या षटकात एक्स्ट्रा कव्हरला चौकार षटकारांसह तब्बल १७ धावा वसूल झाल्याने अखेरच्या षटकांत जिंकण्यास केवळ ८ धावा हव्या होत्या.


पण हातात केवळ एकच विकेट असल्याने सामना कुठेही फिरू शकला असता. शेवटचे षटकही नाट्यमय ठरले, पहिल्याच चेंडूंवर स्टंपिंग ची अपील झाली परंतु मोहीत नाबाद ठरला, दुसरा चेंडू वाईड झाला. मजल दरमजल करत पाऊले पंढरीच्या वाटेवर होती. एकेक धाव एखाद्या शतकासारखी किंमती होती. ह्रदयाची धडधड वाढली होती, इथून विजयाशिवाय दुसरा पर्याय नव्हता, त्याशिवाय श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले नसते. शेवटच्या चेंडूंवर तीन धावा हव्या होत्या, दाटून कंठ येतो म्हणजे काय होते हे अनुभवायला येत होते, प्राण कंठाशी आला होता. मात्र मोहीत प्रचंड आशावादी होता. दिल्ली ते लाहोर सर्वांचे डोळे भरून आले होते आणि मोहीत ने जे केले ते अंडर नाईनटीनच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले. समोर फिरकीपटू असल्याने त्याने पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरला सणसणीत चौकार ठोकला. त्याचा कंप अमिरात ते रावळपिंडी जाणवला गेला. तर भारतात दिवाळी पाठोपाठ पुन्हा एकदा दिवाळी धडाक्यात साजरी करण्यात आली.


मोहीत उल्वाच्या जलव्याने पाकवर उल्कापात झाला. हा केवळ एक विजय किंवा एक ट्रॅाफी नव्हती तर क्रिकेट प्रेमींच्या ह्रदयात चिरंतन राहणारी एक अविस्मरणीय घटना ठरली. १९८६ चा जावेद मियांदाद चा ॲास्ट्रेलेशिया कप चा षटकार, १९९७ ला पाकमध्ये राजेश चौहानने सकलेनला मारलेला षटकार, १९९८ ला सिल्व्हर ज्युबिली इंडीपेन्डेन्स कपमध्ये रिषिकेष कानेटकरने सकलेनला हाणलेला चौकार असो वा २०२२ ला विराटने हॅरीस राऊफला मारलेला षटकार असो अथवा या सामन्यातील मोहीतचा चौकार, सामन्याचा निकाल ठरवणारे हे क्षण अस्सल क्रिकेट रसिक कधीच विसरू शकणार नाहीत. भारतीय युवा संघाचे या दिग्विजयानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

————————————————

दिनांक १५ नोव्हेंबर २०२६

मो. ९८२२८३९२८७

anilpawshekar159@gmail.com

————————————————

मोहीत उल्वाचा पाकवर उल्कापात!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@  *मोहीत उल्वाचा पाकवर उल्कापात*         ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️ ———————————————— ओमानच्या अमिरेट्सला झालेल्या १९ वर्षाख...