*मोटेरावर इंग्लंडचे मातेरे, भाग ०१*
*************************************
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत मोटेरावर दुसऱ्याच दिवशी इंग्लंड संघाचे मातेरे झाले आहे. चेन्नई सामान्यांपासून दोन्ही संघांच्या पाठीशी लागलेल्या फिरकीच्या भुताटकी ने उभय संघांना चांगलेच पछाडले असून फलंदाजांना जळी स्थळी फिरकीचाच भास होतो आहे. चार कसोटींच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकून जागतिक कसोटी स्पर्धेकरीता आपली दावेदारी मजबूत केली आहे तर लागोपाठ दोन पराभवाने इंग्लंडचे देऊळ पाण्यात आले आहे.
खरेतर नव्यानेच बांधणी झालेले मोटेराचे मैदान नववधू प्रमाणे सजले होते. शिवाय जगातील सर्वात मोठे स्टेडियम असण्याचा थाटमाट पण मिरवत होते. सोबतच खुद्द राष्ट्रपती आणि गृहमंत्री उद्घाटनाला मैदानावर जातीने उपस्थित असल्याने आणखी काही वेगळे सांगायची गरजच नव्हती. मात्र नव्याचे नऊ दिवस प्रमाणे ही नवलाई फार काळ टिकली नाही. लग्नकार्य कितीही मोठे असले तरी वर मायेचा तोरा अलगच असतो. अगदी तद्वतच खेळपट्टीने पहिल्याच दिवशी आपला नखरा दाखवून दिला.
पहिल्या दोन कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणे हा यशाचा मुलमंत्र होता. मात्र हेच समीकरण सदासर्वकाळ योग्य ठरेल असे अजिबात नाही. जो रुट आणि सवंगड्यांना खेळपट्टीचा हिसका बसायला फार वेळ लागला नाही. खेळपट्टीने अश्विन, अक्षरला भरभरून प्रेम दिले आणि यातच इंग्लंड संघाची अक्षरशः माती झाली. अक्षरच्या काटेकोर गोलंदाजीला अश्विनच्या अनुभवाची जोड मिळताच इंग्लंडचा सव्वाशेच्या आत धुव्वा उडाला. अवघ्या ४९ षटकांत इंग्लिश संघ सातच्या आत घरात पोहचला.
इंग्लंड संघाची खस्ता हालत पाहता भारतीय संघ काय दिवे लावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले होते. मात्र भारतीय संघाने सलामीलाच रोहीत नावाचा हॅलोजन बल्ब लावल्याने भारतीय गोटाने समाधानाचा सुस्कारा सोडला होता. रोहीतनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत दणक्यात अर्धशतकी खेळी केली. खरेतर नाही म्हणायला इंग्लंडतर्फेही झॅक क्राऊलेनेसुद्धा ५३ धावा फटकावल्या होत्या परंतु त्यानंतर इतरांनी फिरकीसमोर क्राऊलींग करुन संघाचे जहाज बुडवले होते.
वास्तविकत: चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीपासून रोहीत बॅटने गोलंदाजांना जो ठोसे लावत आहे ते पाहता माईक टायसनलाही त्याचा हेवा वाटू शकतो. एवढेच नव्हे तर रोहीत वळवळत्या चेंडूंना असाच धोपटत राहीला तर तो भविष्यात बॉक्सिंगच्या रिंगणातसुद्धा उभा दिसू शकतो. रोहीतच्या भुजबळावर भारतीय संघ पहिल्या डावात मोठी आघाडी घेत असतांनाच इंग्लंडच्या फिरकीने भारतीय फलंदाजांच्या माना फिरकीच्या मफलरने आवळत दिडशेच्या आत खेळ खल्लास केला.
खरेतर पीच ने पहिल्याच दिवशी तेरा बळी घेत आपण विकेटजीवी असल्याची कबुली दिली होती. इंग्लंडचा पार्टटाईम गोलंदाज फुलटाईम गोलंदाजापेक्षा जास्त बळी घेऊ लागताच ही पीच कसोटीच्या दर्जाची आहे की नाही असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले होते. गोलंदाजच कशाला बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जरी या पीचवर फिरकी गोलंदाजी केली असती तर पीच ने त्यांना रित्या हाती वापस पाठवले नसते.
क्रमशः,,,,,
************************************
दि. २६ फेब्रुवारी २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment