@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*मोटेरावर टीम इंडियाच मोटाभाई, भाग ०२*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
दिनांक २५ फेब्रुवारी, स्थळ मोटेरा स्टेडियम आणि निमित्त होते भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीचे. सामना सुरू होऊन उणेपुरे दिड दिवसही झाले नव्हते. खेळपट्टीने बकासुराचा अवतार घेत येईल त्या फलंदाजांना गिळणे सुरू केले होते. फक्त झॅक क्राऊली आणि रोहीतला गिळताना थोडा ठसका बसला होता, एवढाच काय तो अपवाद. अर्थातच दोन्ही कर्णधार पीचचा रुद्रावतार पाहून गर्भगळीत झाले होते आणि आता गरज होती एका भीमकाय फलंदाजाची जो पीचचा सामना करू शकेल.
निश्चितच यादृष्टीने इंग्लंडचा कर्णधार जो रुटचे नाव अग्रक्रमाने घ्यावे असेच होते. हा इंग्लिश सेनापती जागतिक कसोटी स्पर्धेकरीता मजल दर मजल करत भारतभूमीत दाखल झाला होता. शिवाय त्याने जागोजागी युनियन जॅक फडकवत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. जगज्जेत्या सिकंदरला जे जमले नाही, त्याचा विडा जो रुटने उचलला होता. सोबतच तो दृष्ट लागावी अशी फलंदाजी करत होता. कसोटीच्या अढळपदापर्यंत जायला त्याला चार पाऊले बाकी होती. त्यातही चेन्नईची पहिली कसोटी आरामात जिंकून त्याने या मोहिमेची यशस्वी सुरवात केली होती.
मात्र दुसऱ्या कसोटीपासून त्याचे दिवस फिरले. मोटेराला रुटने प्रथम बॅट हातात घेऊनही त्याचा हा निर्णय त्याच्या मुळावरच उलटला. पहिल्या डावात सव्वाशेच्या आत गारद होताच त्याची काळीकुट्ट छाया इंग्लंडच्या दुसऱ्या डावातही दिसली. चेंडूच्या भानामतीपुढे रुट ॲंड कंपनी गलितगात्र झाली आणि अवघ्या ३१ षटकांत त्यांचा ८१ धावांत खुर्दा उडाला. थोडे भुतकाळात डोकावले असता भारतीय संघाची इंग्लंडमध्ये अशीच त्रेधातिरपीट उडाली होती.
त्यावेळी जिंकण्याची नशा त्यांच्या ग्रॅमी स्वानला इतकी चढली होती की त्याने भारताविरुद्धचा विजय चक्क पक्षी संग्रहालयाला अर्पण केला होता. सुदैवाने हा खेळाडू सध्या हयात आहे आणि इंग्लंड संघाची सद्यस्थिती पाहता *या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे अपुल्या* असे मनोमन नक्कीच म्हणत असेल. मात्र सध्यातरी इंग्लंडचा कर्णधार पराभवाच्या बाबतीत इतरांवर खापर फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करत आहे ही समाधानाची बाब आहे. नाहीतर इंग्लिश क्रिकेटपटू पीच ओली करणे, दांडगाई करणे याबाबतीत कांगारूंपेक्षा फारसे मागे नाहीत.
इंग्लंडचा दुसरा डाव म्हणजे निव्वळ अक्षर अश्विन शो होता. मजेशीर बाब म्हणजे भारतीय संघात तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदर होता. मात्र इंग्लंडचे नऊ गडी बाद होईपर्यंत कोणालाच त्याची आठवण आली नाही. अखेर कर्णधार विराटला उपरती झाली आणि त्याने वॉशिंग्टन सुंदरला चेंडू सोपवला. अखेर त्याचेही नशीब फळफळले आणि अवघ्या चार चेंडूत त्याने इंग्रजांच्या शवपेटी वरील शेवटचा खिळा ठोकत आपली जबाबदारी पार पाडली.
वास्तविकत: अशा प्रकारच्या खेळपट्ट्या वादविवादांना जन्म देणाऱ्या आहेत. पाच दिवसांचे सामने धड दोन दिवसही चालत नसेल आणि जवळपास १३३ षटकांत ३० गडी बाद होत असेल तर याला कसोटी सामना म्हणावे तरी कसे? शिवाय जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, जेम्स ॲंडरसन आणि जोफ्रा आर्चर सारख्या नामवंत, गुणवंत गोलंदाजांना नव्याकोऱ्या चेंडू पासून सोशल डिस्टंसींग राखले जात असेल तर केवढे ते दुर्दैव? ६०० वर बळी घेणारा ॲंडरसन चेंडू हाताळण्याऐवजी मैदानात तंबाखू मळत उभा असेल तर अशाने कसोटी क्रिकेटचे कोणते भले होणार आहे?
अर्थातच असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे. यापुढे कसोटीसाठी आदर्श खेळपट्टी निर्माण करून कसोटी क्रिकेटची रंगत राखली जाईल अशी क्रिकेट प्रेमींना अपेक्षा आहे. तसेही जिमी ॲंडरसनचा बहुतेक हा भारताचा अखेरचा दौरा असावा. त्याच्या रिव्हर्स स्विंगची झळक त्याने चेन्नईला दाखवली होती. उर्वरित एका कसोटीत फलंदाजीतील रोहीतची दादागिरी, विराटची हुकुमशाही विरूद्ध जिमी, जोफ्राची स्विंगशाही यातील द्वंद क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळाले तर ते सोन्याहून पिवळे असेल.
*************************************
दि. २७ फेब्रुवारी २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment