@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*दुसऱ्या टी ट्वेंटीत 'इशान'चे "धुमशान"*
*डॉ अनिल पावशेकर*
*************************************
अहमदाबादला झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटीत भारताने इंग्लंडचा पाडाव करत मालिकेत बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या जुजबी आव्हानाला टीम इंडियाने सहज सर करत पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहे. मुख्य म्हणजे पदार्पणातच धडाकेबाज अर्धशतकाचे धुमशान घालत इशान किशनने मिशन मोटेरा फत्ते केले आहे. जोफ्रा आर्चर ॲंड कंपनीला भीक न घालत विराट, इशान आणि रिषभने सहजसुंदर विजय साकारला आहे.
खरेतर या मालिकेतले आतापर्यंतचे दोन्ही सामने पहिले गोलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहे. पहिल्या सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी भन्नाट वेगासोबतच अचूक टप्प्याने भारतीय फलंदाजांना चांगलेच जखडून टाकले होते. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी स्लोअरवनला फिरकीचा तडका दिला. वेगवान गोलंदाजांना खेळण्यात वाकबगार असलेले इंग्लिश फलंदाज अशा आक्रमणापुढे पुरते हतबल झाले आणि खेळपट्टीवर चक्क झिम्माफुगडी खेळू लागले होते.
मग तो जेसन रॉय असो इऑन मॉर्गन असो अथवा बेन स्ट्रोक्स असो,,,चेंडू आणि बॅट इमानेइतबारे सोशल डिस्टंसिंग पाळत असल्याने इंग्लिश संघ कसाबसा दिडशेपार पोहोचला. ऐन हाणामारीच्या षटकांत शार्दुलने फसव्या चेंडूची ठाकूरकी करताच इंग्लिश धावाबाजार कोसळला. यातच त्यांचे मोठ्या धावसंख्येचे स्वप्न धुळीस मिळाले. जेसन रॉय वगळता चार प्रमुख फलंदाजांनी विशी ओलांडली होती परंतु टीम इंडियाच्या कडक लॉकडाऊनपुढे त्यांची डाळ शिजली नाही.
वास्तविकत: नरेंद्र मोदी आणि राहुल या दोन नावात विळ्या भोपळ्याचे सौख्य आहे. शिवाय सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर असल्याने केएल राहुलने भोपळाही न फोडता या समजाला एकप्रकारे पुष्टीच दिली आहे. राहुल बाद होताच मैदानात शांतता पसरली. मात्र ही वादळापूर्वीची शांतता होती. कारण यानंतर मोटेरावर इशान नावाचे वादळ घोंगावले. एखाद्या कसलेल्या फलंदाजासारखा बेधडक खेळ करत त्याने सर्वांना चकित केले. पाच चौकार आणि चार षटकारांची आतिषबाजी करत इशानने इंग्लिश गोलंदाजी निष्प्रभ करून टाकली.
मात्र अर्धशतक होताच त्याचा संयम सुटला आणि उलट्या बॅटचा फटका हाणताना तो बाद झाला. खरेतर रिव्हर्स स्विप, स्विच हिट, हेलिकॉप्टर शॉट अथवा दिलस्कूप असो,, याकरिता जबरदस्त हॅंड आय कॉर्डीनेशन सोबतच वाघाचे काळीज लागते. शिवाय दरवेळी नशिब साथ देईलच याची शाश्वती नसते. याबाबतीत सध्यातरी रिषभ पंत चांगलाच नशिबाचा धनी दिसतोय. कसोटीत जिमी ॲंडरसनला आणि टी ट्वेंटीत जोफ्रा आर्चरच्या नाकावर टिच्चून त्याने जे दोन रिव्हर्स स्विप हाणले ते वर्षानुवर्षे क्रिकेट रसिकांच्या स्मरणात राहील.
इशान किशनने भलेही अर्धशतकानंतर बाद झाला परंतु तोपर्यंत टीम इंडिया सुस्थितीत पोहोचली होती. तसेही इशांत नंतर रौनक ऐ महफिल रिषभ मैदानात येताच त्याने चौफेर पंतशाही चालू करून इंग्लंडला बेजार करून सोडले. भलेही पंतची खेळी अल्पजीवी होती मात्र त्याने इंग्लंडच्या विजयाच्या आशा जीवंत राहणार नाही याची काळजी घेतली. इशान रिषभच्या खेळीने सामन्यात रंग भरला असला तरी यात खरा कलाकार विराटच्या रुपाने उपस्थित होता.
आजच्या घडीला तरी विराटच्या फलंदाजीला तोड नाही. केवळ चौकार षटकारच नव्हे तर एकेरी धाव घेतांना त्याची चपळता पाहण्याजोगी असते. एवढेच कशाला दुसऱ्या फलंदाजासाठी धावतांना सुद्धा तो त्याच जोश, त्याच जोमाने धावतो. इशानची कडक फटकेबाजी असो रिषभची बेदरकार फलंदाजी असो या दोघांसमोर विराटची खेळी सुंदर सुस्वरूप आणि निटनेटकी वाटते. सध्यातरी दोन्ही संघांनी एक एक लढत जिंकत आपण तुल्यबळ असल्याने दाखवून दिले आहे. निश्चितच इशान, सूर्यकूमार यादवच्या समावेशाने टीम इंडियात नवीन ऊर्जा निर्माण झाली असून याचेच प्रतिबिंब उर्वरित सामन्यात बघायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
*************************************
दि. १५ मार्च २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment