Wednesday, March 17, 2021

तिसऱ्या टी ट्वेंटीत इंग्लंडची सरशी

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*तिसऱ्या टी ट्वेंटीत इंग्लंडने ईप्सित साधले*
              *डॉ अनिल पावशेकर*
*************************************
भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी मालिका आता रंगतदार स्थितीत आली असून तिसरा सामना जिंकत इंग्लंडने आपले ईप्सित साधले आहे. टीम इंडियाच्या प्रारंभी फलंदाजांनी कुचकामी कामगिरी करताच सामना पूर्वार्धातच इंग्लंडच्या झोळीत गेला. खरेतर आतापर्यंतच्या तिन सामन्यात तिन नवनवीन सलामी जोड्या खेळवून जो खेळखंडोबा करण्यात आला, त्याची फारमोठी किंमत टीम इंडियाला चुकवावी लागली आहे. सोबतच सुरवातीला महत्वाचे मोहरे गळाल्याने नमनालाच घडीभर तेल अशी टीम इंडियाची अवस्था झाली होती.

वास्तविकत: मालिकेतल्या तिन्ही सामन्यात सलामीच्या राहुकेतूने संघाला चांगलेच छळले आहे. तसेही केएल राहुल नावाचे क्षेपणास्त्र भलेही इस्रो अथवा नासा लॉंच करू शकेल परंतु नरेंद्र मोदी स्टेडियमवरुन ते कदापीही उडणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शिवाय राहुलने ज्याप्रकारे शुन्याचा प्रण केला आहे ते पाहता येत्या काळात शुन्याचा शोध आर्यभटाने नव्हे तर राहुलनेच लावला अशी जगवंदता होऊ शकते. किंबहुना टाईम ट्रॅव्हल करून साक्षात आर्यभटाने जरी शुन्याचा शोध लावला असे सांगितले तर जग त्याला वेड्यात काढू शकते.

बरे झाले आपण १९५७ ला दशमान पद्धती सुरू केली अन्यथा राहुलची कामगिरी पाहता आपल्याला राहुलमान पद्धती स्वीकारावी लागली असती. सोबतच कोणत्याही संख्येला राहुलने गुणले तर गुणाकार शुन्यच येतो अशी नवी संकल्पना समोर आली असती. लागोपाठ तिन सामन्यात राहुलने सलामीला ज्याप्रकारे जांगडबुत्ता केला ते पाहता खेळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारा कोणीतरी मायबाप नक्कीच त्याच्या पाठीशी आहे असे वाटते. जो न्याय शिखर धवनला लावला तोच न्याय राहुलला का लावला गेला नसावा हे एक कोडेच आहे. किंबहुना सलामीची जागा राहुलला बटईने तर दिली नाही ना अशी शंका येते.

राहुलचे घरजावयासारखे लाड करतांनाच आपण धवन, रोहीत, सूर्यकूमार यादव यांचे लोणचे घालत आहोत याचा संबंधीतांना विसर पडलेला दिसतोय. एवढेच कशाला गोलंदाजीतही कुलदिप यादव, मो. सिराज, मो. सामी सारख्यांना कुजवून त्यांचे कंपोस्ट खत तयार करण्याची बीसीसीआयची एखादी योजना असावी असे वाटते. शिवाय सलामीचा समतोल बिघडताच फलंदाजीच्या क्रमवारीची अक्षरशः संगीत खुर्ची होऊन बसली आहे. दुसऱ्या सामन्यात मुसळधार बरसणाऱ्या इशानला तिसऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर ढकलून त्याचा तेजोभंग करण्यात आला तर पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा काढण्याचे श्रेय घेणाऱ्या अय्यरला तिसऱ्या सामन्यात खाली ढकलून त्याच्यावर अंगबाई अरेच्चा म्हणण्याची पाळी आणली गेली.

खरेतर पॉवर प्ले फलंदाजांसाठी दोन्ही हाताने सोने लुटण्याची नामी संधी असते. मात्र पहिल्या व तिसऱ्या सामन्यात आपला संघ पॉवरलेस झाला होता. टी ट्वेंटीच्या रणांगणात पॉवर प्लेच्या चिखलात टीम इंडियाचा धावारथ फसताच तिथेच आपला पराभव निश्चित झाला होता. भलेही आपल्याकडे विराट, रिषभ नावाची कवचकुंडले होती. पॉवर प्ले मध्येच पॉवर कट झाल्याने आपल्याला धावांचे लोडशेडींग सहन करावे लागले. शिवाय एकदा सुरवातीची धावगतीची लाट ओसरली की दुसरी लाट यशस्वीरीत्या आणणे सध्यातरी कोरोना शिवाय दुसऱ्या कोणालाही शक्य नाही.

सध्यातरी टीम इंडियाची सुरुवात पाहता विराट भिष्म पितामह सारखा हतबल दिसतोय. एकटा कमावणार आणि इतर सर्व बसून खाणार अशीच स्थिती राहिली तर टीम इंडिया कशी काय जिंकणार. कमीतकमी इतर फलंदाजांनी एकदातरी विराटची जर्सी घालून खेळणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांच्यात शिस्त आणि जबाबदारी येणार नाही असे वाटते. मात्र या सर्व धबडग्यात विराटची फलंदाजी म्हणजे बाहोंमे तेरे मस्तीके फेरे, सासोंमे तेरी खुशबूके डेरे सारखी आहे. एकदा विराट लयात आला की सर्व कामधाम सोडून केवळ त्याची देखणी फलंदाजी पापणी न लवता बघतच राहावे असे वाटते.

मग त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह असो अथवा ऑफला जाऊन ऑनला चेंडू टोलवणे असो. शिवाय तो आपल्या रंगात आला की प्रतिस्पर्धी गोलंदाज त्याच्यासमोर किती खुजे आहेत याची लगेच प्रचिती येते. संघासाठी विराट म्हणजे हिरा है सदा के लिये असेच आहे. शिवाय लाखों है  मगर तुमसा यहाँ कौन हसीं है, तुम जान हो टीम इंडियाकी तुम्हे मालूम नहीं है असेच म्हणावेसे वाटते. मात्र क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि जोपर्यंत त्याचे संघसहकारी ही बाब मनावर बिंबवून घेत नाही तोपर्यंत विजय टीम इंडियापासून सोशल डिस्टंसिंग राखेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

अखेरच्या पाच षटकांत कोहली पांड्या जोडीने प्रयत्नांची शर्थ करत धावसंख्या दिडशेवर पोहचवली. इंग्लिश संघाला डिनरमध्ये दिडशेच्या धावा म्हणजे खरेतर ऊंटके मुंहमे जीरा असेच होते. त्यांनीही त्या धावा चकना म्हणून लगेच गळ्याखाली उतरवल्या. कारण त्यांच्या उरात धडकी भरवणारा कोणताही गोलंदाज आपल्याकडे नव्हता. शिवाय आठव्या नंबरपर्यंत फलंदाजीची क्षमता असलेल्या संघाला जुजबी धावा पाहून कपाळावर आठ्या पडणे शक्यच नव्हते. सोबतच गोलंदाजीत वॉशिंग्टनचा सुंदर उपयोग झालाच नाही. भारतीय डावाच्या सुरवातीलाच चालू झालेलं रडगाणं अखेर पराजयाच्या कटू स्मृतीत परिवर्तीत झालं. मालिका वाचवायची असेल तर उपयुक्त संघबदल, फलंदाजीचा योग्यक्रम अपेक्षित आहे. अन्यथा म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे याची दक्षता बाळगणे टीम इंडियासाठी जरूरी आहे.
************************************
दि. १७ मार्च २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...