@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अंतिम सामन्यात टीम इंडीयाची रनपंचमी*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
खऱ्याखुऱ्या रंगपंचमीला जरी वेळ असला तरी टीम इंडियाने अंतिम सामन्यात रनपंचमी साजरी करत टी ट्वेंटी मालिका जिंकली आहे. निर्णायक लढतीत इंग्लिश गोलंदाजीची अक्षरशः धुळवड करत टीम इंडियाने इंग्लंडला ३६ धावांनी नमविले आहे. इंग्लंड कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी जरुर स्वीकारली मात्र टीम इंडियाने हा डाव त्यांच्यावरच उलटवून बाजी आपल्या नावे केली आहे. खरेतर यासाठी टॉस हारकर बाजी जितनेवालेको विराट कहते हैं असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कसोटी मालिका जिंकल्यावरही टी ट्वेंटी मालिका रंगतदार होणार यात शंका नव्हती. शिवाय इंग्लंडच्या कसोटी संघापेक्षा त्यांचा टी ट्वेंटीचा संघ निश्चितच आपल्यापेक्षा वरचढ होता. सोबतच बुमराह नावाचे ब्रह्मास्त्र हनिमूनमध्ये व्यस्त असल्याने गोलंदाजी साशंक होतीच. तरीपण अनुभवी भुवनेश्वरच्या नेतृत्वात टीम इंडियाने शार्दुल ठाकूर, हार्दिक पांड्या सारख्या गोलंदाजांच्या कामगिरीने या मालिकेवर दबदबा राखला.
वास्तविकत: मालिकेत २/१ अशा पिछाडीवर असताना मालिका वाचवणे हे एक दिव्यच होते. मात्र आपली खरी डोकेदुखी होती ती सलामीची जोडी. कितीही झंडू बाम लावला असता तरी ही डोकेदुखी अजिबात जाणार नव्हती. अखेर टीम इंडियाला उपरती झाली आणि केएल राहुलला नारळ देताच संघाचे नशिब फळफळून आले. निर्मल बाबांच्या भाषेत सांगायचे झाले तर किरपा वहीं लटकी थी आणि माझी सलामी माझी जबाबदारी हा विडा विराटने उचलताच संघाचा कायाकल्प झाला.
कधी उचक्या देत, कधी ठेचाळत तर कधी धापा टाकत कशीबशी पन्नाशी गाठणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात दे दणादण नव्वदीची सलामी ठोकली. घाव मुळावर घातल्यास फांद्या आपोआप खाली येतात हे तत्व स्वीकारुन रोहीत, विराट अर्थातच या जय विरुच्या जोडीने इंग्लंडच्या बसंतीची चांगलीच छेडखानी केली. जोफ्रा आर्चर व मार्क वुडचा खरपूस समाचार घेत जवळपास दहाच्या सरासरीने इंग्लंडची लुट करत या दोघांनी छत्रपतींच्या सुरत लुटीची आठवण करून दिली.
मुख्य म्हणजे रोहीतच्या मुक्त फलंदाजीला विराटच्या मास्टरक्लास फलंदाजीची जोड म्हणजे सोनेपे सुहागा होते. तर सुर्यकुमार यादवची मदमस्त फलंदाजी व पांड्याची मस्तीखोर फलंदाजी यंगिस्तानची आगळीवेगळी ओळख दाखवून गेली. रोहीत नंतर सुर्यकुमार आणि सुर्यकुमार नंतर पांड्याची धुलाई म्हणजे इंग्लंडला आगीतून निघून फोफाट्यात जाण्यासारखे होते. या चौघांनी इंग्लिश गोलंदाजांना येथेच्छ बदडत त्यांचा चोथा करून टाकला.
अखेर अठरा चौकार आणि अकरा षटकारांच्या आतिषबाजीने टीम इंडियाने इंग्लंड समोर सव्वा दोनशेचे महाकाय लक्ष्य ठेवले. तसे पाहता इंग्लंड आयसीसी रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे. शिवाय त्यांची दमदार फलंदाजी पाहता ते सहजासहजी सामना आपल्याला आंदण देणार नाही हे तितकेच खरे होते. मात्र सत्य हे किती अगम्य, अकल्पित, भयावह असते हे बटलर, मालन जोडीने दाखवून दिले. जेसन रॉय दुसऱ्याच चेंडूत निपटला तरी या दोघांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळविले होते.
शेवटी टीम इंडियाचे बारा वाजणार की काय अशी धाकधूक असतांनाच तेराव्या षटकांत एक शुभ बातमी आली. संघाला बोहणी करुन देणाऱ्या भुवीने हाती चेंडू पकडताच सामना इंग्लंडच्या हातून सुटू लागला होता. खतरनाक बटलरला भुवीने रिटर्न टिकिट देताच शार्दुल ठाकुरचा विकेटजीवी बाणा जागा झाला. मागील सामन्याप्रमाणेच त्याने एकवर एक फ्री योजना राबवत एकाच षटकांत जॉनी बेअरस्टो, डेव्हीड मलानला टपकवत टीम इंडियाला पुनर्जिवित केले.
या सर्व धामधुमीत धावगतीने आपले काम चोखपणे बजावले होते. मग मॉर्गन असो वा अष्टपैलू बेन स्ट्रोक्स, त्यांना हाणामारीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. यातच पांड्याने मॉर्गनला चकवले तर नटराजनने बेन स्ट्रोक्सला बोनलेस करुन इंग्लंडच्या आशाआकांक्षांना मुठमाती देऊन टाकली. बटलर व डेव्हिड मलान वगळता इतर फलंदाज आवश्यक ती धावगती राखू शकले नाही तर भुवनेश्वर कुमारने आपल्या चार षटकांत केवळ पंधरा धावा देत इंग्लंडची नाकाबंदी करून टाकली होती.
विजयाची औपचारिकता पूर्ण करतांना शार्दुलने ख्रीस जॉर्डनला बाद करत मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा बहुमान पटकावला. तर विराटने संपूर्ण विस षटके फलंदाजी करत महत्वपूर्ण सामन्यात कॅप्टन्स इनिंग खेळली. केवळ वेगावर मदार ठेऊन सामने जिंकता येत नाही हे एव्हाना इंग्लंडच्या ध्यानात आले असेलच. शिवाय क्रिकेटचा कोणताही प्रकार असो,सामना जिंकायचा असेल तर उपयुक्त भागिदारी करण्याशिवाय पर्याय नसतो. केवळ नाणेफेक जिंकणे किंवा दवबिंदूच्या कुबड्यांवर अवलंबून राहणे किती धोकादायक असते हेच या मालिकेने दाखवून दिले आहे.
************************************
दि. २१ मार्च २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment