@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*चौथ्या टी ट्वेंटीत सुर्यकुमार तळपला*
*डॉ अनिल पावशेकर*
***********************************
खरेतर पौष महिन्यातच सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आपले उत्तरायन सुरू केले होते. मात्र क्रिकेटविश्वात आयपीएल राशीतून टी ट्वेंटीत प्रवेश करायला नवीन क्रिकेटसूर्य म्हणजेच सूर्यकूमार यादवला चौथ्या टी ट्वेंटीच्या सायंकाळची वाट बघावी लागली. अर्थातच दुसऱ्या टी ट्वेंटीत त्याला बोहल्यावर जरूर चढविण्यात आले होते मात्र इशान किशनने स्वयंवर जिंकताच पुढील सर्व शक्यतांना विराम मिळाला होता. एवढेच नव्हे तर तिसऱ्या टी ट्वेंटीत त्याला चक्क डच्चू नावाचे खंडग्रास ग्रहण सुद्धा लागले गेले होते.
अखेर गुरुवारी म्हणजेच १८ मार्चला त्याची प्रतिक्षा संपली आणि सायंकाळ होताच त्याने आंतरराष्ट्रीय पटलावर आपली आभा उमटवली. अर्थातच रणांगणातील परिस्थिती प्रतिकूल होती. पहिलेच टीम इंडिया मालिकेत पिछाडीवर होती तर मालिका वाचवायची असल्याने ही लढत करो अथवा मरो अशी होती. शिवाय भरवश्याचा रोहीत तंबूत परतला होता तर अजिबात फॉर्ममध्ये नसलेला केएल राहुल दिमतीला होता. उष:काल होता होता पुन्हा एकदा काळरात्रीचे भयाण स्वप्न समोर उभे ठाकले होते.
अशा बिकट प्रसंगी सूर्यकुमारने संघाची धुरा हाती घेतली आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. जोफ्रा आर्चरला उडवलेला हा सेमीनटराज शॉट क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेला. इंग्लंडचे वेगवान आक्रमण या सूर्यतेजापूढे फिके पडले. मैदानात चौफेर फटकेबाजी करत त्याने टीम इंडियाच्या झुकझुकगाडीला राजधानी एक्सप्रेसचे स्वरूप दिले. आपल्या धडाकेबाज खेळीत सहा चौकार आणि तिन षटकार खेचून त्याने सामन्याचा लोलक टीम इंडियाकडे वळवला.
दृष्ट लागावी अशी खेळी साकारत असतांनाच मैदानात दगाफटका झाला. खरेतर यावर्षीचे सूर्यग्रहण दहा जूनला आहे. मात्र पंचानी थोडा वादग्रस्त निर्णय देत यादवच्या सूर्याला खग्रास ग्रहण लावून त्याची झुंजार खेळी संपुष्टात आणली. तोपर्यंत त्याने इंग्लिश तोफखान्याची मारकता जरुर कमी केली होती. याचाच फायदा रिषभ पंत, आणि श्रेयस अय्यरने घेतला. या दोघांनी मिळून ६७ धावांचे बहुमूल्य योगदान देताच टीम इंडियाने या मालिकेतील आपल्या सर्वोच्च धावसंख्येची उभारणी केली.
इंग्लंडला हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायची नामी संधी होती. शिवाय त्यांची फलंदाजी पाहता १८६ चे लक्ष्य त्यांच्या आवाक्यात सुद्धा होते. सोबतच भारतीय संघ केवळ पाच गोलंदाजानिशी खेळत असल्याने हे काम आणखी सोपे झाले होते. मात्र नवव्या षटकांत पांड्याने जेसन रॉयची सुट्टी करताच आपण कुठेतरी हा सामना जिंकू शकतो हा आत्मविश्वास टीम इंडियात दिसू लागला होता. मुख्य म्हणजे इंग्लिश फलंदाज वेगवान गोलंदाजीला हुंगत नाही हे लक्षात येताच पांड्या आणि शार्दुलने कधी आखूड टप्प्याचे तर कधी स्लोअरवन टाकून इंग्लिश फलंदाजांना बेजार केले होते.
पंधराव्या षटकांत चहरने बेअरस्टोचा बेरंग करताच सामना पुन्हा एकदा जीवंत झाला. भरीस भर म्हणून सतराव्या षटकांत शार्दुलने खतरनाक बेन स्ट्रोक्स आणि मुरब्बी मॉर्गनला अक्षरशः मामा बनवत मैदानाबाहेर काढले. भारतीय डगआऊटमध्ये अश्रूंची फुले व्हायला लागली होती. त्यातच कुंगफू पांड्याने सॅम करनच्या चिपळ्या वाजवत टीम इंडियाला विजयासमीप नेले होते. एकोणिसाव्या महत्वाच्या षटकांत भुवनेश्वर कुमारने टीच्चून गोलंदाजी करून सामना जवळजवळ भारताच्या पुढ्यात आणून ठेवला होता.
मात्र कहाणीत अजूनही ट्वीस्ट बाकी होते. ख्रीस जॉर्डन आणि जोफ्रा आर्चर नावाचे दोन त्रस्त समंध खेळपट्टीवर ठाण मांडून बसले होते. शिवाय सामना संघाकडे खेचून आणणाऱ्या शार्दुलवरच सामना जिंकवण्याची जबाबदारी येऊन पडली होती. माझे षटक माझी जबाबदारी अशा भयाण स्थितीत शार्दुलने अखेरचे षटक हाती घेताच तमाम भारतीय क्रिकेटवेड्यांचे प्राण कंठाशी आले होते. कारण सामन्याच्या या निर्णायक स्थितीत चुकीला माफी नव्हती. शेवटी ज्याची भिती होती तेच घडले. आर्चरने आपल्या बॅटरुपी बाणातून चौकार, षटकार बाहेर काढताच शार्दुलचे चेंडूवरचे नियंत्रण सुटले गेले.
दोन वाईड बॉलने सगळ्यांच्या ह्रदयाची धडधड वाढवली होती. मुख्य म्हणजे सेनापती विराट मैदानात नसल्याने गोलंदाज पोरके झाले होते. बरे झाले आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधाराने म्हणजेच रोहीतने सामन्याची सर्व सुत्रे हाती घेत शार्दुलला कानमंत्र दिला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ख्रीस जॉर्डन बाद होताच हा अत्यंत महत्वपूर्ण सामना भारताच्या झोळीत पडला आणि टीम इंडिया जल्लोषात न्हाऊन निघाली. या विजयाने भारतीय संघाने मालिकेतले आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावे करायला दोन्ही संघ एकमेकांवर तुटुन पडतील यात शंका नाही.
नाणेफेक जिंकूनही इंग्लंडला या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. तर सूर्यकूमार यादवला आवळण्यात इंग्लिश गोलंदाज कमी पडले. वास्तविकत: विराट स्वस्तात बाद होऊनही सूर्यकूमार, पंत, अय्यरने संघाला चांगली धावसंख्या रचून दिली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला पन्नाशी ओलांडता आली नाही. मुख्य म्हणजे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाजांच्या भागिदारीचे अत्यंत महत्व असते. जेसन रॉय, बेअरस्टो ऐन मोक्याच्या वेळी बाद झाले तर शार्दुलचे सतरावे षटक इंग्लंडचे बारा वाजवून गेले. भारताने सामना जरी जिंकला असला तरी केएल राहुलचे अपयश कसे काय विसरता येईल. ही एक बाब या विजयातही संघाची चिंता वाढवणारी नक्कीच असेल.
*************************************
दि. १९ मार्च २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment