Sunday, March 7, 2021

मोटेरावर रिषभचे तांडव नृत्य

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
        *मोटेरावर रिषभचे तांडव नृत्य*
************************************
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडचे तिसऱ्याच दिवशी तिसऱ्या सत्रात तिनतेरा वाजविले आहे. लागोपाठ तिन कसोटीत इंग्लंडला बुकलून काढत भारतीय संघाने जागतिक कसोटी स्पर्धेकरीता आपली दावेदारी मजबूत केली आहे. फिरकीसमोर सपशेल शरणागती पत्करलेल्या इंग्लिश संघाची अश्विन आणि अक्षर पटेलने अक्षरशः धुळधाण केली तर आक्रमक रिषभ पंतने आपल्या बॅटचे पाणी पाजत इंग्लिश संघाला नामोहरम करण्यात प्रमुख भुमिका बजावली आहे.

खरेतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच रिषभ पंतने गोलंदाजांना बदडण्याचे व्रत हाती घेतले होते. त्याच्या याच सवयीने त्याच्यावर प्रचंड टीकासुद्धा होत होती. मात्र ऐकावे जनाचे करावे मनाचे हे त्याला पक्के ठाऊक होते. शिवाय गोलंदाज कांगारू असो अथवा इंग्लिश, लाथोंके बुत बॅटसे नहीं मानते हे जगजाहीर असल्याने पंतसमोर दुसरा पर्यायच नव्हता. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर कांगारुंच्या ॲडम गिलख्रिस्टने रिषभ पंतच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

नाही म्हणायला भारतीय संघात रोहीत शर्मा आणि शुभमन गिलसारखी आश्वासक सलामी जोडी आहे. मध्यफळीत संघाचा कणा असलेला कोहलीसारखा विराट कर्णधार लाभला आहे. तर पुजारा आणि राहाणे भारतीय संघाच्या अजिंक्यपदाला साजेशी खेळी करणात तरबेज आहे. मात्र या सर्वांवर भारी पडलीय ती म्हणजे रिषभची बेदरकार फलंदाजी. चौथ्या कसोटीत इंग्लंडला दोनशेत गुंडाळुनही भारतीय फलंदाजी चाचपडतच ०होती. शिवाय रथी महारथी तंबूत परतल्याने भारतीय संघ दोनशेची वेस ओलांडतो की नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकत होती.

भारताचे सहा गडी बाद झाले होते आणि चार बच गए फिरभी पार्टी अभी बाकी है चे दृश्य खेळपट्टीवर उभे होते. समोर आंतरराष्ट्रीय सामन्यात हजारांवर बळी घेणारा जिमी ॲंडरसन फलंदाजांचा यमदूत म्हणून उभा ठाकला होता. खेळपट्टी नेहमीप्रमाणे फिरकीपटूंच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तर चेंडूच्या वळवळी नजरेत भरण्याइतपत वाढल्या होत्या. रिषभच्या दिमतीला वॉशिंग्टन सुंदर वगळता नाव घेण्यासारखा फलंदाज उरला नव्हता. शिवाय समोर जागतिक कसोटी स्पर्धेकरीता सामना जिंकणे महत्वाचे होते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. मात्र रिषभने या संकटात संधी शोधली आणि इथेच भारतीय संघाला लॉर्डसवर स्वारी करण्याचा पासवर्ड रिषभने शोधून दिला. खेळपट्टीची वळवळ, फिरकीपटूंची चळवळ, स्वींगची सटवाई आणि ॲंडरसनच्या अनुभवाला एकत्रितपणे कुटून रिषभने त्याचे भस्म केले आणि ते अंगाला लावुन त्याने तांडवनृत्याला सुरुवात केली. पहिल्या पन्नास धावा रमतगमत काढणाऱ्या रिषभने पुढच्या खेळीसाठी त्याची फलंदाजी टॉप गिअरमध्ये टाकली आणि त्यात इंग्लिश गोलंदाजी पालापाचोळ्यासारखी उडून गेली.

संपूर्ण मालिकेत पीचच्या नावाने बोंबा ठोकणाऱ्यांना रिषभच्या खेळीने सडेतोड उत्तर दिले. विशेषतः ॲंडरसनला फटकावलेल्या रिव्हर्स स्वीपने भारतीय संघाला लॉर्डस मोहिमेचा ओटीपी मिळाला. उभ्या आयुष्यात ॲंडरसनला एवढे अंडरइस्टीमेट कोणत्याही फलंदाजाने केले नसेल. ॲंडरसनची दुर्दशा पाहताच इंग्लिश संघाचे खांदे पडले आणि इथेच भारतीय विजयाचा पाया रचला गेला होता. रिषभच्या तांडव नृत्याने विजयाची पार्वती भारतीय संघावर भाळली होती.

 सध्याच्या घडीला तरी रिषभ हा पैसा वसूल फलंदाज वाटतो. त्याच्या धडक बेधडक फलंदाजीने कित्येकांना वेडावून टाकले आहे. निश्चितच त्याने फलंदाजी सोबतच यष्टीरक्षणातही चुणूक दाखवली असून संघातला फलंदाजीचा समतोल साधण्यास हातभार लावला आहे. त्याच्या शतकाने केवळ भारताला विजयीच नाही केले तर इंग्लिश संघाचे चांगलेच मानसिक खच्चीकरण सुद्धा केले आहे. समकालीन रिद्धीमान सहा असो की संजू सॅमसन असो, रिषभ या दोघांच्याही बराच पुढे निघून गेला असून यापुढे विरोधी संघांना रोहीत विराट सोबतच रिषभचा दरारा सहन करावा लागेल यात शंका नाही.
***********************************
दि‌ ७ मार्च २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...