Saturday, March 6, 2021

अनैतिकतेला नैतिकतेचे कोंदण?

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                  *अगंबाई अरेच्चा*
*अनैतिकतेला नैतिकतेचे कोंदण कशाला?*
               *डॉ अनिल पावशेकर*
*************************************
सध्या गल्ली आणि दिल्ली, गुलाबी थंडीत न्हाऊन निघाली आहे आणि प्रत्येकाला उबदार वातावरण हवेहवेसे आहे. कुणाला मायेची तर कोणाला प्रेमाची ऊब हवी आहे. मात्र काही नतद्रष्ट मंडळींना दुसऱ्याचे भले, भरभराट कधी पाहवल्याच जात नाही. स्वतः कधी भिजला पापड मोडण्याचे धारिष्ट्य नसलेली मंडळीसुद्धा इतरांच्या भीमपराक्रमाला तुच्छ लेखत आपल्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करण्यात गुंग असतात. खरेतर भुक, भय आणि लैंगिकता ही सजिव असण्याची लक्षणे आहेत. मात्र याच विषयात "लक्षणीय" कामगिरी करणाऱ्यांना जग कसे धारेवर धरते हे नुकत्याच गौप्यस्फोट झालेल्या एका गुलाबी प्रकरणात सिद्ध झाले आहे.

झाले काय तर सरकार म्हणजे जनतेचे खऱ्या अर्थाने मायबाप असतात. किंबहुना याचेच अपडेटेड व्हर्जन किंवा सुधारीत आवृत्ती आपल्याला दादा,भाई,नवरोजी या स्वरुपात बघायला मिळते. शिवाय "आपले सरकार आपल्या दारी" येऊन कार्यसिद्धी करत असल्याने काहींच्या घरी रिद्धी सिद्धी नक्कीच पाणी भरत आहे. त्यामुळे कधी उत्साहात नियमांना डावलून कामे केल्या जातात. मात्र याकरीता काम,क्रोध, मत्सर आदी मानवी भावनांना कसोशीने सांभाळावे लागते. परंतु राजकारण, मग ते आत्ताचे असो अथवा जुनेपुराणे असो, कितीही निसरडे असले तरी त्याला गुलाबी किनार असतेच. मग यातून भले भले सुटले नाही.

व्हाईट हाऊस असो की हैद्राबाद हाऊस असो परस्पर संमतीची ही लैंगिक एक्स्प्रेस सुसाट निघाली असुन याला कोणताही राजकीय पक्ष, एखादे राज्य अथवा एखादा देश अपवाद असेल असे वाटत नाही. मात्र सापडला तो चोर, बाकी शिरजोर अशी परिस्थिती असते. शिवाय हे हिमनगाचे एक टोक असल्याने जितके खोलात जाल, तितके हात आणखी घाणीने बरबटण्याचीच शक्यता आहे. यामुळेच की काय तेरी भी चूप मेरी भी चूप करत प्रकरण निस्तारण्यात येते. तसेही आजकाल निवडून येणे ही उमेदवाराची एकमात्र योग्यता असल्याने आणि कोण केंव्हा पक्षाची दावणी सोडून स्वार्थासाठी कोणाच्या कळपात शिरेल याचा नेम नसल्याने एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ असे सर्वत्र बघायला मिळते.

एखादे सरकार कितीही निष्कलंक असले, पक्षप्रमुख कितीही भोळे,सोवळे असले तरी त्यांचे अनुयायी कितपत काबूत राहतील हे सांगणे खरोखरच अवघड आहे. युती काळात मागेल त्याला शेततळे चा नारा जोमात होता. सध्याचे वातावरण, हालचाली पाहता वाट्टेल त्याला रान मोकळे असल्याची भावना जनमानसात आहे. मग ते एखाद्याची मंत्र्यांच्या बंगल्यावर चामडी लोळवणे असो की इडीची पिडा असो. मध्यंतरी बघतोय रिक्षावालाच्या धर्तीवर लपतोय रिक्षावालाचे नाट्य जनतेच्या आठवणीत असेलच.

कोरोना महामारीला तोंड देतांना माझे कुटुंब माझी जबाबदारी असली तरी इकडे तिकडे तोंड मारणाऱ्यांसाठी तुमचे लफडे तुमची जबाबदारी हे नवीन सुत्र विद्यमान सरकार नक्कीच अवलंबेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तसेही मा.न्यायालयाने २०१८ साली ३७७, ४९७ कलमांबाबत क्रांतीकारक निर्णय दिल्याने कोणाला पटो अथवा ना पटो, पटवापटवीच्या गृहउद्योगाला भरभराटी आलेली आहे. याच नियमांचा, निर्णयाचा आधार घेत कधी लिव्ह इन रिलेशनशीप असो की परस्पर सहमतीचे नाट्य असो नैतिकतेचा गळा आवळला जात आहे. असे असले तरी उपरोक्त दोन्ही कलमांद्वारे अनैतिकतेला नैतिकतेचे कोंदण लाभल्याने लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

राजकारणी किंवा खेळाडू असोत, जनमानसात नेहमीच त्यांची एक आदर्श प्रतिमा असते. अर्थातच प्रत्येकाला खाजगी आयुष्य असले तरी सार्वजनिक प्रतिमेला तडा जाईल असे कृत्य त्यांच्याकडून अजिबात अपेक्षित नसते. मग ते करून दाखवलं असो की हार्दिक पांड्याचे करून आलो असो. शिवाय अशा बाबतीत टाळी एका हाताने वाजत नसली तरी, एका हाताने चुटकी जरूर वाजवली जाऊ शकते. सोबतच चुटकीत पटवणाऱ्यांचे कसब प्रत्येकातच असते असेही नाही. मग याच कसबात सब कुछ गमावणाऱ्यानी वेळीच भानावर येणे गरजेचे असते. कारण एकदा साप निघून गेल्यावर लाठी आपटण्यात काही फायदा नसतो.

आता बोभाटा झाल्यावर सावरासावर करून काही फायदा नाही. बुंदसे गयी वो हौद से नहीं आती हेच खरे ठरते. याप्रकरणी नक्की कोण दोषी आहे हे सांगणे कठीण असले तरी अनैतिकतेच्या बाबतीत समाजाचे उर्ध्वपतन, अधःपतन असो की तिर्यकपतन असो,,, नैतिकतेचे शिघ्रपतन झाले आहे असे हमखासपणे म्हणू शकतो. शिवाय दहीहांडीचे थर ठरवणाऱ्या धुरीणांनी राजकारण्यांच्या नैतिकतेचे थर निश्चित करायला काय हरकत आहे? किंबहुना अशा प्रवृत्तींकरीता आमदारकीचा एक विशेष कोटा ठेवायला हरकत नाही. म्हणजे उद्या चालून कोणत्याही थराला जाऊन अशी प्रकरणे उघडकीस आली तरी त्यांना माफ करायला सरकार संकोचणार नाही.

वास्तविकत: स्त्री अत्याचारांच्या बाबतीत कळस गाठला असल्याने अशा घटना निकोप समाजासाठी निश्चितच भुषणावह नाही. पर स्त्रीला  मातेसमान मानणारी संस्कृती इतकी लयास का गेली? पर स्त्री मध्ये सितामातेला शोधणारा समाज सितेमातेतही स्त्री शोधायला लागला ही अधोगती नव्हे काय? पाप हे क्षणभर हसवते, जिवनभर रडवते हे माहित असूनही धुरंधर या मोहपाशात का अडकतात याचे नवल आणि खेद वाटतो. आमची कुठेही शाखा नसल्याचे निवडणूक आयोगासमोर शपथपत्र घेणाऱ्यांनी इतरत्र आउटलेट का उघडावेत?

खरेतर अशा प्रश्नांची उत्तरे कोण देईल हा आणखी एक प्रश्न आहे. शिवाय घडलेल्या घटनांची जी पाठराखण होत आहे ती फारच दुर्देवी आहे. कायदे सर्वांसाठी सारखे असले तरी कारवाई सर्वांसाठी सारखीच राहील या भ्रमात कोणी राहू नये. किंबहुना न्यायाचा तराजू आपले वजन वापरून पाहिजे त्या दिशेला वाकवता येत असल्यानेच अशा प्रवृत्तींचे फावते. मग दोन्हीकडे झेंडे फडकवून कितीही न्यायाच्या गप्पा हाकल्या तरी ही वरवरची मलमपट्टीच असणार. याबाबतीत आणखी बोलणार तरी किती? शेवटी आपण एवढेच म्हणू शकतो,,,,
*ओ पता नहीं जी कौनसा नशा करता है*
*यार मेरा हर इक से वफा करता है*
*छुप छुपके बेवफाईवाले दिन चले गये*
*आंखोमे आंखे डालके दगा करता हैं*
*************************************
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...