@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
उकळलीस तू खंडणी कोटीभर,,,,!
*************************************
आयपीएलचा थरार अवघ्या दोन-तीन दिवसावर येऊन ठेपला असतांनाच हातगाडी सरकार आपल्या कर्माने थरथरायला लागले आहे. साठ महिने चालणारा हा सरकारी सामना सत्ताधाऱ्यांच्या मॅच फिक्सिंगने चांगलाच गाजत आहे. इनमिन एकदिड वर्षात महाबिघाडी सरकारचे दोन गडी बाद झाले आहे. तर एक गडी डीआरएसच्या कृपेनं थोडक्यात बचावला आहे. असे असले तरी कुणाच्या खांद्यावर कुणाचे वझे या न्यायाने अखेर गृहमंत्र्यांचा बळी घेतला असून हे केवळ हिमनगाचे एक टोक असून येत्या काळात आणखी काही भानगडी चव्हाट्यावर आल्यास नवल वाटू नये.
झाले काय तर करून दाखवलं, आमचं ठरलंय या थाटात या सरकारने संसार तर सुरू केला मात्र दोन बायका फजिती ऐका सारखी या सरकारची हास्यास्पद स्थिती झाली आहे. अगदी सुरवातीलाच गृहखात्याने जी बेपर्वाई, मुजोरी आणि हम करे सो कायदा सारखी वाटचाल चालू केली ते पाहता राज्य नक्की कोण हाकत आहे हा प्रश्न सामान्य जनतेला पडला होता. मग ते बंदीकाळात महाबळेश्वर सहल असो की एखाद्या व्यक्तीला मंत्र्याच्या बंगल्यावर गुरासारखे बदडणे असो. मुख्य म्हणजे पालघरचे मृत्युघर होऊनही तिथे जी उदासिनता दाखवली गेली त्यामुळे निष्पाप साधुसंतांचे तळतळाट या सरकारला भविष्यात भोवतील यात शंकाच नव्हती.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असतानाही दुधखुळेपणाने कुणीही राजकारण करायचे नाही असे शाब्दिक बुडबुडे सरकारतर्फे फोडले गेले. कंगणा, अर्णव प्रकरणात तर गृहखात्याने नको तितका उत्साह दाखवत आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. शिवाय बाजारु चाणाक्याने कहर करत उखाड लिया, मै नंगा आदमी हूं सारखी डायलॉगबाजी करत गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आणली होती. दरम्यान नकली शेतकरी आंदोलनात पॉपस्टार ते पॉर्नस्टार आपली अदा दाखवत असतांनाच भारतरत्नांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र इथेही गृहखात्याने चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम हाती घेतले आणि आपले जग हसे करून घेतले होते.
वास्तविकत: हा सरकारी तमाशा जनता निमूटपणे सहन करत होती. मात्र जेव्हा सरकारचे मंत्री या चिखलात लोळायला लागले तेव्हा जनतेचा उद्रेक होणे क्रमप्राप्तच होते. उसण्या पुतण्याचे लाडीकवाणे चाळे जनतेच्या केंव्हाचेच लक्षात आले होते. शिवाय पंचानेही सॉफ्ट सिग्नल देऊन पूतण्याला बाद ठरवले होते. अखेर डीआरएसने परस्पर सहमतीच्या नियमाला जागत पूतण्याला जीवदान दिले. याबाबतीत गबरूसेठ तेवढे भाग्यवान नव्हते. कारण एकमेव रिव्ह्यू वापरला गेला असल्याने त्यांना हॅंडल दी बॉल याप्रकारे बाद व्हावे लागले. जीवंतपणी आक्रोश न ऐकणाऱ्या सरकारला एका प्रेतात्म्याने वठणीवर आणले होते.
एवढे होऊनही गृहमंत्री कुठेतरी आपली जबाबदारी आणि कर्तव्याशी प्रतारणा करत असल्याचे चित्र समोर येत होते. तसेही तिन तिघाडा काम बिघाडा सरकार असल्याने कोणाचा पायपोस कोणाच्या पायी नव्हता. जीयो और जीने दो चा नियम असतांना खाओ और खाने दो च्या वाममार्गाला गृहमंत्रालय लागले. सोबतच जीओ वाल्यांना जिलेटीनची भिती दाखवली गेली. ॲंटालीयाला हलविण्याच्या नादात यांचेच ॲंटीने उखडले गेले. तरीपण गृहखाते गिरे भी तो टांग उपर या माग्रुरीत वावरत होते.
सोबतच सचिन वाझेंची कामगिरी वादग्रस्त असली तरी वाझे म्हणजे लादेन नव्हे चे तुणतुणे वाजवले गेले. मात्र वाझे लादेन नसले तरी लेनदेन वाले आहे हे उघडकीस आल्याने सरकारची पुरती शोभा झाली. वाझेगिरी अंगलट आल्याने मग माकडीणीसारखे जो तो आपला जीव वाचवू लागला. त्यातच पोलिस आयुक्त परमवीरसिंगांनी १०० करोडच्या गतीने लेटर बाऊंसर टाकताच गृहमंत्री गडबडले आणि होत्याचे नव्हते झाले. परमवीरसिंगांनी गृहमंत्र्यांना कॉट ॲंड बोल्ड करताच अमर अकबर अँथनी सरकारची दुसरी विकेट गेली.
खरेतर एवढा गदारोळ माजला असताना गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन बाहेर पडणे अपेक्षित होते. शिवाय सरकारचे ब्रेक दी चेन योजनाही अंमलात आली असती. मात्र निर्दोषत्व, नैतिकता आणि औपचारिकतेची रंगपंचमी खेळण्यात आली. आधारवडाला आलेले हे शेंडेफळ कधीही तुटुन पडणारच होते. मात्र जीव गुंतला तुझ्यात चे नाट्य उत्तमपणे वठवले गेले. जलेबी फाफडाच्या भेटीगाठीही पार पडल्याच्या अफवा पसरल्या गेल्या.
मात्र पापाचे कोंबडे कितीही झाकले तरी ते ओरडणारच होते. न्यायालय, सिबीआय हे निमित्तमात्र ठरले. मिठाच्या सत्याग्रहाने इंग्रजी सत्तेचा पाया खिळखिळा झाला होता. आता या कोटी कोटी उड्डाण प्रकरणी महाबिघाडी सरकार कुठवर तरते हे येणारा काळच सांगू शकतो. निश्चितच आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने खरेखोटे काय ते सिद्ध होईलच. मात्र आरोप होताच गृहमंत्र्यांनी पदत्याग केला असता तर त्यात त्यांची शान राहिली असती. न्यायालयाच्या दणक्यानंतर उपरती होऊन राजीनामा दिला तरी,,,
बहुत देरसे दरपे आंखे लगी थी
हुजूर जाते जाते बहोत देर कर दी असे म्हणावेसे वाटते.
*************************************
दि. ७ एप्रिल २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment