@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*प.बंगाल, पॅलेस्टाईन आणि पुतनेचा पान्हा*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
दिल्लीपासून जेरूसलेम जवळपास चार हजार किमी तर कोलकाता दिड हजार किमी अंतरावर आहे. मात्र आठवडा उलटूनही ज्यांना बंगालमधील रक्तरंजीत हिंसाचार दिसला नाही त्यांना जेरुसलेमच्या बातमीने अस्वस्थ केलेले आहे. अर्थातच अमेरिका असो वा इजरायल, शत्रुंचा बंदोबस्त कसा करायचा हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. शिवाय असे धाडसी निर्णय घेतांना मानवाधिकार, सर्वधर्मसमभावाला फाट्यावर कसे हाणायचे याची त्यांना चांगली जाणीव आहे. सोबतच युनो अथवा जग काय म्हणेल याची तमा न बाळगता ते एखाद्या कॉम्प्युटरलाही लाजवेल इतक्या चोखपणे हिशोब चुकता करतात.
झाले काय तर ममतांनी बंगाल काबिज करताच ममतांच्या गुंडांना आकाश दोन बोटे उरले आणि त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांची बोटी बोटी करणे सुरू केले. राजकीय विरोधकांचा खात्मा करण्याच्या इर्षेने पेटलेल्या ममतांना आवरणारे तिथे कोणीही नव्हते. शिवाय असा हिंसाचार सरकार प्रायोजित असल्याने तिथल्या हिंदूंना कुणीही वाली उरला नव्हता. संपूर्ण देश ममतांच्या या क्रुरतेपुढे हतबल झालेला दिसत होता. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, महिलांवरील अत्याचार, लुटपाट आणि जाळपोळीबाबत कुठेही ब्र काढला जात नव्हता. याला कारणही तसेच होते.
कुठल्याही घटनेला राजकीय आणि जातीधर्माच्या चष्म्याने पाहिले जात असल्याने हिंदूंवरील अत्याचार मिडीया आणि तथाकथित सेक्युलर मंडळींच्या खिजगणतीतही नव्हता. याउलट मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना रक्तरंजित ममतांच्या रूपात कुणाला वाघीण तर कुणाला झाशीची राणी दिसायला लागली होती. मानवतेचा मुडदा पडत असताना असल्या मुर्दाडांना भाजपा पराभवाचा विकृत आनंद लपवता येत नव्हता. तसेही हिंदूंच्या हत्या मिडीयाच्या दृष्टीने टीआरपी योग्यतेच्या नसल्याने वेगळे काही सांगायची गरज नव्हती.
एरवी देशात कुठेही खुट्ट झाले तरी उर बडवणारे यावेळी धर्मनिरपेक्षतेच्या उशीखाली मुंडके घालून झोपले होते. अखलाख, तबरेजच्या वेळी कंठ दाटून येणाऱ्यांना बंगालच्या हत्याकांडाने गुदगुल्या होत होत्या. बॉलिवूड गॅंग सोबतच जेएनयूछाप लालमाकडे असो अथवा चोपूनचापून साडी नेसलेली बिंदी गॅंग असो बंगालबाबत कोणालाही सोयरसुतक नव्हते. केंद्रासाठी बंगालची परिस्थिती म्हणजे धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी झाली होती. अखेर भाजपला मतदान केल्याची फारमोठी किंमत हिंदूंना चुकवावी लागली होती.
कसेबसे बंगाल थोडेफार शांत झाले आणि तिथल्या हिंदूंनी निःश्वास सोडला. मात्र दोन-चार दिवस उलटले तोच इजरायल पॅलेस्टाईन संघर्षाची खबरबात इथे येऊन धडकली आणि तमाम पुरोगाम्यांचा कंठ दाटून आला. सेव्ह गाझाची भुताटकी पुन्हा एकदा उफाळून आली आणि देशात मानवतेचे ढोंगी पुजारी जीवंत आहे याची जनतेला खात्री पटू लागली. बंगाल प्रकरणी सुखात्मे असलेले अचानक दुखात्मे होऊन तडफडू लागले. यातच भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने ट्वीटरवर आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली. देशबांधवांचे अश्रू ज्यांना दिसले नाही त्यांना सातासमुद्रापार धर्मबांधवांचा टाहो लगेचच कानी पडला याचे आश्चर्यच वाटते.
अर्थातच अशी परिस्थिती अथवा असला दुटप्पीपणा पहिल्यांदाच अनुभवायला येतोय असे अजिबात नाही. देशविरोधात कट कारस्थाने करणारा याकुब असो वा अफजल गुरु, काश्मीरात लष्कर, पोलीसांवर हल्ले करणारे बुरहान वाणी असो वा रियाझ नायकू,, यांच्या आतंकी कारवाया लक्षात न घेता निव्वळ त्यांच्या धर्मापोटी त्यांचे निर्लज्ज समर्थन करणारे नराधम इथल्या मातीत निपजलेच कसे याची खंत वाटते. बंगालमध्ये मानवतेची हत्या, धर्मनिरपेक्षतेच्या चिंधड्या आणि सर्वधर्मसमभावाची खांडोळी होत असतांना जे तोंडात मिठाची गुळणी घेउन बसले होते तेच पॅलेस्टाईन प्रकरणी तोंड फाडून विलाप करताना पाहून यांची कळवळ किती तकलादू आहे याची खात्री पटते.
निश्चितच प.बंगाल असो की पॅलेस्टाईन अथवा गाझा पट्टी,,मानवतेची जपवणूक व्हायलाच हवी. त्यात धर्माधारीत भिंती यायला नको. मात्र केवळ एकांगी भूमिका घेऊन किंवा मानवतेच्या पारड्यात केवळ एका धर्मालाच झुकते माप देऊन कसे चालणार? अर्थातच आपल्याकडे धर्मांधांना कुरवाळणे म्हणजेच पुरोगामीत्व असले तरी बाकी देशांनी डोळ्यांवर पट्टी बांधलेली नाही. आतंकी असो वा कुरापत करणाऱ्यांना कशी ट्रिटमेंट द्यायचे याचे उदाहरण अमेरिका, इजरायल सातत्याने देत आहेत. यामुळेच पॅलेस्टाईन प्रकरणी पुतनेचा पान्हा फुटलेल्यांनी कमीतकमी धर्मबांधवांसोबतच देशबांधवांच्या वेदना जाणून घेतल्या असत्या तर ना ते एकटे पडले असते ना त्यांच्यावर टीका झाली असती.
*************************************
दि. १२ मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment