@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*सुशीलकुमार, पोलादी तन अपराधी मन*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
साल २००८, स्थळ बिजींगचे नॅशनल स्टेडियम आणि निमित्त होते ग्रीष्मकालीन ऑलिंपिक स्पर्धेचे. अर्थातच ऑलिंपिक खेळणे येरागबाळ्याच काम नव्हे कारण हे एकप्रकारचे जागतिक बॅटल विदाऊट बुलेट असते. वर्षानुवर्षाची तपस्या, प्रचंड ढोरमेहनत, कमालीची चिकाटी, एकाग्रता, संयम आणि पराकोटीच्या देशाभिमानाची ही कसोटी असते. यातच आपला देश पदकांच्या बाबतीत नेहमीच दारिद्र्यरेषेखालील असल्याने देशवासियांना पदकाचे कमालीचे आकर्षण असते. याच पदक तृष्णेला तृप्ततेचा पहिला घोट खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकला ब्रॉंझ पदकाने पाजला होता.
मात्र यानंतर तब्बल ५६ वर्षांनंतर कुस्तीत ऑलिंपिक पदकाचा दुष्काळ संपण्याची सुचिन्हे दिसू लागली होती. संपूर्ण भारतीयांच्या नजरा बिजींगच्या नॅशनल स्टेडियमवर लागल्या होत्या आणि एक भारतीय गजराज आपल्याच ढंगात, मदमस्त चालीने कुस्ती आखाड्याकडे मार्गक्रमण करत होता. भारदस्त पिळलेले शरीर, निरागस चेहऱ्याने, अस्सल गावरानी ढंगात ही स्वारी इतिहास रचायला चालली होती. खरेतर या पठ्ठ्याच्या रुपाने तमाम भारतीयांच्या आशा आकांक्षा इच्छापूर्ततेकडे मजल दर मजल करत होत्या. अखेर या गड्याने देशवासीयांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही आणि प्रतिस्पर्ध्याला लिलया लोळवत भारतमातेच्या चरणी कुस्तीतले दुसरे ऑलिंपिक पदक अर्पण केले.
बिजींगमध्ये भीमपराक्रम करणाऱ्या या खेळाडूचे नाव होते सुशीलकुमार. नजफगढ, दिल्लीत जन्मलेला या छोट्या भीमने देशात कुस्तीला लोकप्रिय करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. वयाच्या चौदाव्या वर्षापासून पहेलवानी आणि आखाडा हेच त्याचे आयुष्य होते. गुरू सतपाल यांचा परिसस्पर्श होताच सुशीलकुमारने मागे वळून पाहिले नाही. अवघ्या १५ व्या वर्षी म्हणजेच १९९८ ला वर्ल्ड कॅडेट गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. भक्कम ताकद, चित्याची चपळता, कमालीची एकाग्रता आणि संयमतेला पूरक आक्रमकतेची जोड लाभल्याने तो अजेय योद्धा ठरला होता.
सुशीलकुमारचा धडाडा ऑलिंपिक, आशियाई खेळ, कॉमनवेल्थ गेम्स असो की जागतिक स्पर्धा असो चांगलाच गाजत होता. आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्याने एकंदरीत दहा सुवर्णपदक, दोन रजत आणि चार कांस्यपदकांची लयलूट केली. पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पुरस्कार त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागले होते. खेळातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासोबतच अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने तो गौरवीला गेला. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुशीलकुमारने असामान्य कामगिरी करत सर्वांना चकित केले होते. या कामगिरीने लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरत होती.
मात्र बळ आणि उन्माद ही लक्ष्मीची बाळं आहेत हे विसरून कसे चालणार? ज्या छत्रसाल स्टेडियमपासून त्याची कारकीर्द सुरू झाली तेच ठिकाण त्याची कारकीर्द संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरले. यश मिळवणं सोपं असतं मात्र यश पचवणं फार कठीण असतं. नेमकं हेच सुशीलकुमाच्या बाबतीत घडलं. पहेलवान सागर धनकरच्या खुनात सुशीलकुमारचे हात रंगलेले आहेत असा त्याच्यावर आरोप आहे. आरोप होताच सुशीलकुमार फरार झाला आणि त्याच्यावरील संशय आणखी बळावला. इंडीयाज मोस्ट सक्सेसफुल रेसलर ते इंडीयाज मोस्ट वॉन्टेड रेसलर व्हायला वेळ लागली नाही.
कधीकाळी बक्षिसे आणि इनामांच्या राशीत लोळणारा हा पहेलवान एक लाखाचा इनामी अपराधी होऊन बसला होता. पोलादी तन आणि अपराधी मनाचा हा धनी क्षणार्धात होत्याचा नव्हता झाला आहे. कधीकाळी गर्वाने अंगाभोवती तिरंगा ओढणारा हा व्यक्ती अपराध्यासारखा तोंडाला टॉवेल गुंडाळून पोलिसांच्या गराड्यात पडला आहे. तिरंगा ते तौलीया हा प्रवास त्याच्यासाठी नक्कीच वेदनादायी, क्लेशकारक असणार. मात्र सलमान असो की सुशीलकुमार कायद्यापुढे ते आज गुन्हेगारच आहेत. ज्या मातीने त्याला फर्श ते अर्श पर्यंतची यात्रा घडवून आणली, त्याने आपल्या मस्तीने त्याच्या आयुष्याची माती करून टाकली आहे.
२०१० कॉमनवेल्थ गेम्सला क्विन बॅटन रिले प्रिन्स चार्ल्सला देणारा आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा ध्वजवहन करणारा हा खेळाडू बेड्यात अडकल्याचे पाहून त्याचे चाहते नक्कीच हळहळले असणार. मात्र नायक ते खलनायक या प्रवासाला तो स्वतः जबाबदार आहे. उद्या कदाचित तो न्यायालयातून निर्दोष सुटेलही. मात्र यानिमित्ताने त्याच्या आयुष्यावर या घटनेचा बट्टा जरुर लागला आहे. दाग अच्छे है हे जाहिरातीत ऐकताना कितीही चांगले वाटत असले तरी खऱ्याखुऱ्या आयुष्यात ते किती वेदनादायी असते हे एव्हाना माउंटन ड्यू, आयशर ट्रॅक्टर आणि अंड्यांची जाहिरात करणाऱ्या सुशीलकुमारच्या ध्यानात आले असेलच.
खरेतर २३ मे हा दिवस जागतिक कुस्ती दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र याच दिवशी भारताच्या ख्यातनाम कुस्तीपटूला गजाआड व्हावे लागले. किती हा दुर्देवविलास. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या गेलेल्या छत्रसाल स्टेडियमवरच सुशीलकुमारने आदी आणि अंताचा अनुभव घेतला आहे. वेळेपेक्षा कोणताही मोठा पहेलवान नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कधीकाळी कुस्तीप्रेमींच्या गळ्यातला ताईत असणारा सुशीलकुमार कायद्याच्या जाळीत पाहून कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू असे म्हणावेसे वाटते.
***********************************
दि. २४ मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment