Sunday, May 30, 2021

बेबी ऑफ सुकेशिनी अंतिम भाग

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
     *बेबी ऑफ सुकेशिनी, अंतिम भाग*
               *डॉ अनिल पावशेकर*
************************************
रुग्णालयातील अग्नितांडव आता हळूहळू संपुष्टात आले होते. आगीच्या झळांनी स्पेशल न्युबॉर्न‌‌‌ केअर युनिट बेचिराख करून टाकले होते. दरवाजे, भिंती काळवंडल्या होत्या तर जागोजागी अग्निज्वालांचे निशाण आगीची भयानकता दाखवून देत होते. आगीच्या दाहकतेने जळलेली कापडे, वाकलेले वितळलेले फर्निचर रात्रीच्या अप्रिय घटनेचे मुक साक्षीदार होते. त्या वार्डातील एक विशिष्ट गंध आगीच्या क्रुर खेळाची आठवण करून देत होता. जीव वाचलेले रुग्ण देवाचे आभार मानत घरची वाट धरू लागले होते तर बघ्यांची गर्दी हळूहळू पांगायला सुरूवात झाली होती.

तब्बल चार तासांचा जीवघेणा संघर्ष उतरणीला लागला होता. प्रकृतीच्या नित्यनेमाने तांबडे फुटायला सुरुवात झाली होती. बाळांच्या वार्डाचा लेखाजोखा यायला सुरुवात झाली. एव्हाना सुकेशिनी शुद्धीवर यायला लागली होती. अस्पष्ट आरडाओरड, हुंदके, देवाचा धावा तिच्या कानी पडू लागला होता. डोळे किलकिले करून रुग्णालयाकडे बघताच तिची तंद्री भंग पावली. तोपर्यंत सहकारी महिलांनी तिला सांभाळले होते. अग्निशमन दल परतीच्या वाटेवर होते तर पोलिस दलाने रुग्णालयाचा ताबा घेतला होता. अनावश्यक गर्दी हाकलून पोलिसांनी नातेवाईकांना एकत्र केले.

या भीषण अग्निकांडात एकूण दहा बालके मरण पावली होती तर सात बालकांना वाचविण्यात यश आले होते. वाचलेल्या बालकांना इतरत्र सुरक्षित हलविण्यात आले होते तर मृत बालकांच्या नातेवाईकांना त्यांची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ओळख निश्चित करुन मातेच्या नावाने पुकारा करण्यात येऊ लागला होता. जसजसे नाव पुकारण्यात येत होते तसतसे रुग्णालयाचा परिसर दुःखावेगाने व्यापून जात होता. प्रत्येक वेळी अनोळखी मातेचा हंबरडा पहाटेच्या भयाण शांततेला चिरत उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेत होता.

प्रत्येक नाव पुकारतेवेळी सुकेशिनीचे हात आपोआप जोडले जात होते तर मनोमन आपले नाव न आल्याबद्दल देवाचे आभार मानत होती. मात्र नशिबापुढे कोणाचं चालतं? आता फक्त एक नाव पुकारणे बाकी होते आणि सुकेशिनी अंगातले सर्व बळ एकवटून, कान टवकारुन, डोळ्यात तेल घालून नियतीच्या निर्णयाची वाट बघत होती. आतापर्यंत सामान्य असलेली तिच्या ह्रदयाची धडधड अचानक तीव्र झाली होती, कपाळावर आठ्या पडल्या होत्या तर पुर्ण अंगात कापरे भरायला सुरुवात झाली होती. दोन्ही हातांच्या मुठी गच्च ह्रदयाशी बांधून, श्वास रोखून शेवटच्या नाव पुकारण्याची वाट बघू लागली.

अचानक तिला कानात काल रात्रीच्या तिच्या छकुलीच्या हाका अस्पष्ट,आर्तपणे पुन्हा एकदा ऐकू यायला लागल्या होत्या,, आई मला वाचव, आई मला चटके लागत आहे, आई माझा श्वास कोंडतोय, आई मला जवळ घे. एकाएक काळचक्र कुठेतरी थांबून आपली क्रुर थट्टा करत आहे असा तिला भास झाला. असं काही झालंच नाही याची ती मनाला वारंवार खात्री पटवून देत होती. माझ्या छकुलीचं देव नक्कीच रक्षण करेल यावर तिचा ठाम विश्वास होता. शिवाय इतक्या दिवसांनी तिच्या आयुष्यात आलेल्या आनंदाला कोणीही इतके निर्दयपणे हिसकावू शकत नाही याची तिला खात्री होती.

अखेर तिची प्रतिक्षा संपली आणि एक कर्कश, निष्ठूर आवाज तिच्या कानी पडला,,, बेबी ऑफ सुकेशिनी,, खरेतर हे शब्द कानाद्वारे नाही तर तिच्या ह्रदयाद्वारे ऐकले गेले आणि क्षणार्धात तिच्या आशा आकांक्षा, विश्वासाचा, श्रद्धेचा डोलारा कोसळून पडला. असं होऊच कस शकतं म्हणून ती उसळली आणि नाव पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यावर धावून गेली. मात्र नियतीचा संदेश स्पष्ट होता. काळाचे गणित चुकण्याचा प्रश्नच नव्हता. सुकेशिनीचा गोड संसार उध्वस्त झाला होता. धरणी दुभंगून त्यात समाविष्ट होऊन जावे अशी तिची मनोवस्था झाली होती. आतापर्यंत थोपवून धरलेले अश्रूंचे धरण ओसंडून वहायला लागले होते. वेड्या ममतेने पान्हा झरायला लागला होता.

काही वेळातच अश्रू आटायला लागले, पान्हा सुकायला लागला आणि वेडीपिसी होऊन ती छकुलीच्या नावे टाहो फोडायला लागली होती. कोणाला दोष देऊ,  कोणाला शाप देऊ, तिला काही सुचत नव्हते. तर तिकडे कोणीतरी सुरेशला या ह्रदयद्रावक घटनेची माहिती देताच तो ओक्साबोक्शी रडू लागला. आयुष्यात कधी कोणाचे चुकुनही वाईट केले नसतांना आपल्या नशिबी हा भोग का आला याचेच त्याला वाईट वाटले. साधी टाचणी टोचली किंवा अगरबत्तीचा चटका लागला तरी आपण कळवळून उठतो तर माझ्या छकुलीने हे सर्वकाही कसेकाय सोसले असेल याचा विचार करताच तो कोलमडून पडला.

नेहमीप्रमाणे दुर्घटना झाल्यानंतर जे होते ते इथेही झाले. राजकीय पर्यटनाला उधाण आले. मृतांच्या कुटुंबीयांना मदतीच्या नावे लाखोलाखोंच्या बोली राजकारणी करु लागले. सामाजिक चळवळीतले गिधाडे इथेही स्वार्थीपणे घिरट्या घालायला लागली. कडक कारवाईची आवई उठवण्यात आली. लगेचच बळीचे बकरे शोधायला सुरुवात झाली. एवढ्या मोठ्या दुर्घटनेचे खापर फक्त डॉक्टर, नर्सेस वर फोडण्यात आले. बहुतेकांना केंव्हा एकदा दोन-चार जणांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली जाते याची घाई झाली होती. दुर्घटनेचे मुळ कारण शोधण्यात कोणालाही स्वारस्य नव्हते कारण ते कित्येकांच्या मुळावर आले असते. निलंबन आणि बडतर्फीच्या सोयिस्कर शब्दाखाली दोषयुक्त यंत्रसामुग्री असो अथवा जुगाडी विजयंत्रणा असो अथवा फायर सेफ्टीचे नियम पायदळी तुडवणे असो किंवा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा असो, सर्वकाही झाकले गेले.

माध्यमांनी जरूर या घटनेला उचलून धरले, प्रसिद्धी दिली. मात्र त्या कोवळ्या जीवांना जातीपातीचे वलय नव्हते, धर्माची गडद किनार नव्हती, प्रांतवाद, अस्मितेचे वेष्टन नसल्याने ते लवकरच विस्मृतीत गेले. झाले गेले विसरून जग पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच कामाला लागले. मात्र ज्यांनी या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावले त्यांचे दुःख मायबाप सरकारने कागदी नोटांत मोजले. ही घटना सरकारी रुग्णालयात झाल्याने आंदोलनजीवींना याचे फारसे सोयरसुतक नव्हते. शिवाय ज्या राज्यात ही घटना घडली ते राज्य अशा बाजारु आंदोलनाला पोषक नव्हते. गोरगरिबांचे दिपक अकाली मालवून काळ पुन्हा एकदा आपल्या नव्या सावजाच्या शोधात निघाला होता. मात्र जाता जाता या दुर्घटनेत वाचलेल्या सातपैकी एका बाळावर एक महिन्याने काळाने झडप घालून बळीसंख्या अकरावर नेली होती.
************************************
दि. ३० मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...