@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*बोलावे परी जमानतरूपी उरावे*
***********************************
महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रतिक्षेत असतांनाच राणे ठाकरे संघर्ष लाटेने राज्य ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची लढाई शाब्दिक चकमकीवरून रस्त्यावर आल्याची महाराष्ट्राने अनुभवले आहे. काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याचे तारतम्य बाळगळे नाही तर परावा कावळा होतो हे या घटनेने दाखवून दिले आहे. कधीकाळी सख्खे असलेले हे दोन्ही नेते आता पक्के वैरी झाले असून सध्याचा संघर्ष निवळला असला तरी तो भविष्यात पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
झाले काय तर नारायण राणे जनआशिर्वाद यात्रेत असतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. राणेंसारख्या जेष्ठ नेत्यांकडून हे निश्चितच अपेक्षित नव्हते. खरेतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विधानाकडे दुर्लक्ष केले असते तर पुढील अप्रिय घटना उद्भवल्याच नसत्या. मात्र राणेंच्या वक्तव्याने मुख्यमंत्र्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाल्याने त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला.
केवळ राणे यांनीच वादग्रस्त वक्तव्य केले असे नाही तर यापुर्वीही अशी वक्तव्ये सर्वपक्षीय नेत्यांनी अनेकदा केलेली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागे योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मात्र त्यामुळे राणेंचे वक्तव्य समर्थनीय ठरते असे अजिबात नाही. किंबहुना दोन्ही वक्तव्यांची तुलना करणे म्हणजे तेरी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे म्हटल्याप्रमाणे ठरेल.
या सर्व घडामोडीत पोलिस प्रशासनाची भूमिका थोडी आश्चर्यकारक होती. ज्या तडफेने राणेंना भरल्या ताटावरून अटक करण्यात आली ते पाहता अशीच तत्परता जनसामान्यांच्या प्रश्नावर दिसली तर महाराष्ट्राचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. केवळ अटकेवर ही बाब न थांबता राणेंना न्यायालयातून लगेच जामीन मिळाल्याने चट अटक पट सुटका चा सामना लगेच संपुष्टात आला.
वास्तविकत: कोरोनामुळे राज्यात काही प्रमाणात बंदीपर्व सुरू आहे. मात्र या संघर्षात कोरोना होरपळून निघाला आहे. दो गज दुरी, मारामारी है जरूरी, माझे वक्तव्य माझी जबाबदारी सारखा तमाशा राज्याच्या वाटेला आला आहे. राज्यभर निदर्शने, तोडफोड, पक्षीय कार्यालय आणि कार्यकर्त्यांवर हल्ले यातच कोरोना लाजून मेला असेल तर नवल वाटायला नको.
अर्थातच यातून आपले राजकारणी आणि नेते काही धडे घेतील तो सुदिन समजावा. तसेही अशी वक्तव्ये एखाद्या राजकीय पक्षाची मक्तेदारी आहे असेही नाही. याबाबतीत हम किसी से कम नहीं याची प्रचिती वारंवार येत असते. यापुढे तरी किमान आपल्या बेताल वक्तव्यांवर लगाम घालून राजकारणी नेते जनतेच्या भल्यासाठी तोंड उघडतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अन्यथा बोलावे परी जमानतरुपी उरावे अशी वेळ त्यांच्यावर नक्कीच येऊ शकते.
************************************
दि. ३० ऑगस्ट २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment