@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*|| ओव्हलचा बखरनामा ||*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
युगाब्द ५१२३, शके २९४३, श्रावणमास, कृष्णपक्ष, अमावस्या आणि निमित्त होते ओव्हलचा गड सर कराण्याचे. अर्थातच लॉर्ड्सची मोहिम फत्ते करूनही हेडींग्ले मुलखात दगाफटका झाला होता. सेनापती विराटने ओव्हलला हिंदुस्तानी पताका फडकवायचा चंग बांधला होता. यावेळी सातासमुद्रापार जवळपास ५० वर्षांनी ओव्हलचा गड अहोरात्र त्याला खुणावत होता. लढाईतल्या तिन चढाया पुर्ण होऊन अंतिम पाडाव टप्प्यात आला होता. सामना फिरंग्यांशी असल्याने सेनापती डोळ्यात तेल घालून मोर्चेबांधणी करत होते. अखेर झुंजुमुंजू झाले आणि संघसहकाऱ्यांची बैठक घेत सेनापतीचे अंतिम आक्रमणाची रणनिती ठरवली.
वास्तविकत: दोन्ही फौजा तुल्यबळ होत्या. दोन्ही फौजांनी एक एक लढाई जिंकत आपला दमखम दाखवला होता. हिंदुस्तानी संघात सलामीचा भार मुंबई प्रांताचे शिलेदार रोहीत आणि दख्खनचा सेनानी राहुलने सांभाळला होता. मध्यफळीत सेनापती विराटसह पुजारा आणि मराठमोळा अजिंक्य योद्धा रहाणे मोर्चा सांभाळून होते. अंतिम फळीत निधड्या छातीच्या पंतसोबत तलवारबाज जडेजा आणि उदयोन्मुख युवराज शार्दूल मांड ठोकून तयार होते. तर आणिबाणीच्या प्रसंगी बुमराह, उमेश यादव शिर तळहातावर घेवून लढण्यास सज्ज होते.
हिंदुस्तानी तोफखान्याची कमान बुमराहच्या ताब्यात होती. त्याला खतरनाक यादवद्वयीची साथ होती.भरीस भर म्हणून ताज्या दमाचा मो.सिराज आग ओकण्यास तत्पर होता. अटीतटीच्या प्रसंगी फिरकीचे गोळे फेकण्यात जडेजाचा हात कोणी पकडू शकत नव्हते. तर प्रतिपक्षाचाही तोफखाना बुलंद होता. ॲंडरसनच्या निगराणीत वेगवान फिरंगी तोफा हिंदुस्तानी फौजेला भाजून काढण्यात तरबेज होत्या. दिमतीला मोईन अली नावाचा धुर्त सरदार जोडी फोडण्यासाठी प्रसिद्ध होता.
फिरंगी फौजेचे नेतृत्व जो रूट कडे होते, जो प्रचंड पराक्रमी होता. मात्र बेअरस्टो वगळता इतर सरदार फारसे अनुभवी नव्हते. शिवाय हिंदुस्तानी तोफखान्यात विविधता असल्याने त्यांचा अडचणीत वाढतच होत्या. त्यातच सेनापती विराट लाथ मारीन तिथे पाणी काढीन बाण्याचा तर जो रूट शांतीमे क्रांती वर विश्वास ठेवून होता. अर्थातच ही लढाई जितकी शारिरीक क्षमतेची कसोटी पाहणारी होती तितकीच मानसिक कणखरतेची होती. बुमराह ॲंडरसन मधून विस्तव जात नव्हता. तर रोहीतच्या गदाप्रहाराने फिरंगी आक्रमणाची हाडे खिळखिळी झाली होती.
तरीही सुद्धा फिरंगी सेनेचा अहंकार उच्च कोटीचा होता. भलेही विराटच्या नजरेस नजर भिडवायची ताकद कोणाकडेही नव्हती परंतु हिंदुस्तानी फौजेला डिवचण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नव्हते. मोईन अलीने जडेजाला गंडवल्यावर तो ज्या कुत्सितपणे हसला ते पाहता हा हिंदुस्तानी छोटा सरदार हिशोब नक्कीच चुकता करणार याद वाद नव्हता. सोबतच मैदानावरील वातावरणात गॉड सेव्ह दी किंगचा गजर होताच हरहर महादेवच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. विराटसेना बचेंगे तो और लेंढेंगे म्हणत छातीला माती लावून मैदानात उतरली होती तर जो रुट आपली सरशी होणार म्हणून निश्चिंत होता.
अखेर एकदाचे युद्धाला तोंड फुटले आणि समस्त देशवासीय डोळे फाडून आपल्या सैन्याची कामगिरी नजरेत साठवू लागले. सेनापती विराट जोष आणि त्वेष वातावरणात वीर रस भरत होता. तर उमेश, बुमराहचा भेदक मारा फिरंग्यांना सतावून सोडत होता. मात्र रॉरी बर्न, हसिब हमीदची जोडी हिंदुस्तानी तोफखान्याला थोपवून धरत होती. बघता बघता शत्रुपक्षाने शंभरी गाठली आणि विजयश्री फिरंग्यांना पावणार अशी चिन्हे दिसत होती. प्रसंग बाका होता आणि याच क्षणी विराटने शार्दूलला आक्रमणाला आणले. शार्दूलने आल्याआल्या रॉरी बर्नला छाटताच हिंदुस्तानी गोटात एकच जल्लोष झाला. हरहर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
हसीब हमीदने एक बाजू भक्कमपणे राखली होती तर दुसऱ्या टोकाला घुसखोरी करणाऱ्या डेव्हिड मालानचा विराटसेनेने वाटेतच खात्मा केला. एव्हाना रणांगणात जडेजाची दादागिरी दिसू लागली होती आणि यातच त्याने हसीबचे हसिन सपने चकणाचूर करून टाकले. शत्रुगोटात धावपळ माजताच हिंदुस्तानी मुलुख मैदान तोफ बुमराहने फिरंग्यांच्या खात्म्याचा विडा उचलला. त्याच्या भडीमारापुढे ओली पोप आणि बेयरस्टोने सपशेल शरणागती पत्करली. शत्रुपक्षाची दाणादाण उडवत विराटसेना आगेकूच करत होती.
अर्धे सैन्य खल्लास होताच जो रूटला आपला पराभव स्पष्टपणे दिसू लागला होता. परंतु एवढ्या लवकर हार मानतील ते फिरंगी कसले. रूटने मोईन अली सोबत किल्ला लढवणे चालू ठेवले. मात्र जडेजाला मोईन अलीमध्ये त्याची शिकार दिसताच तो त्याच्यावर तुटून पडला. मोईनला चुप करायला त्याला फारसे कष्ट पडले नाही. शेवटी अंतिम फळीला साथीला घेत जो रूटने प्रतिहल्ला करण्याचा निर्णय घेतला. मात्र शार्दूलने त्याला घुटने टेकायला मजबूर केले. जो रूट चा काटा काढताच विजयश्रीने हिंदुस्तानी गोटाकडे वाटचाल सुरू केली. तरीपण शत्रुचे शेपूट वळवळतच होते. अखेर उमेश यादवच्या भडक्यात शेपूट निमुटपणे गळले.
प्रचंड मारकाट आणि गदारोळात अखेर हिंदुस्तानची सरशी झाली. सेनापती विराटचा जल्लोष बघण्यासारखा होता. कधीकाळी मान खाली घालून पराभवाची धनी ठरलेली हिंदुस्तानी सेना ओव्हलवर आज डौलाने आपले निशाण फडकवत होती. एकाच दिवशी शत्रुपक्षाला त्यांच्याच रणभुमीत, त्यांच्याच क्लुप्तीने नेस्तनाबूत करतांना पाहून विराटसेनेचा सर्वत्र जयजयकार होऊ लागला. या विजयाने विराटसेनेचा अख्या जगात दबदबा वाढला असून सध्यातरी विराट क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम योध्दा आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
*************************************
दि. ०७ सप्टेंबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com